Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > इथं कोण कोणाला उपरा म्हणणार?

इथं कोण कोणाला उपरा म्हणणार?

आपल्या देशातील महत्त्वाच्या नद्यांची दिशा, त्यांचा प्रवाह, त्यांच्या काठावर वसलेली संस्कृती, नदीच्या काठावर वसलेल्या मानवी वस्तीचा स्वभाव हे सगळ्यामध्ये एक वैविध्य आहे. या वैविध्याचे सौदर्याचं परिणीता दांडेकर यांनी केलेलं अप्रतिम वर्णन नक्की वाचा…

इथं कोण कोणाला उपरा म्हणणार?
X

एक झेलम जिच्या तीराने ऐरावातासारखे चिनार आता पिवळे, केशरी, लाल केशरी होत जातील. तर एक सिपना जिच्या शेजारचे अर्जुन आपला हिरवा-करडा युनिफॉर्म शेकडो वर्ष आलटून-पालटून वापरत राहतात.

एक बावनदी जिच्या काठची नेवरीची फुले पहाटे नदीच वाहती गुलाबी करतात, तर एक दूर खेड्यातली नाव नसलेली नदी जिच्या डोहात ताम्हणीची जांभळी, फ्रिलची फुले सांडतात.

एक गोदावरी जिच्या खाडीत हेSS मोठे prawns रांगतात, एक सुबानसिरी जिच्यात डॉल्फिन नाचतात. (आणि एक आमची मुठा जिच्यात मरळ मासा दिसला तरी दिवस चांगला की ओ तुमचा :)

एकीचं नाव जगबुडी पण ती उन्हाळ्यात आटते तर एक अघनाशिनी जी वर्षभर व्रतस्तपणे पाणी वाहावते. एकीच्या तीरावर वाल आणि वांगी तर एकीच्या खाडीत भात आणि किनाऱ्यावर सोनेरी मीठ. एक मेघना जिच्यात समुद्राएवढं पाणी सामावतं तर एक कावेरी जी इतकी कोरडी होते, की आषाढात हिच्यात पहिले पाणी येते. तेव्हा तमिळ माणसं देवदर्शन झाल्यासारखे उत्सव करतात.

एक ब्रह्मपुत्र, समुद्राजवळ आल्यावर शेकडो वाटा बदलणारी, तर एक नर्मदा, लाखो वर्ष जुन्या आखीव मार्गाने वाहणारी. एका हिमालयातली तीर्थन जिच्या Trout मासे उड्या मारतात आणि जिच्यात बर्फ वितळला की उन्हाळ्यात दुसरा पूर येतो, तर एक दक्षिणेची वैगई जी उन्हाळ्यात इतकी कोरडी होते की, लोक तिच्या पात्रात क्रिकेट खेळतात.

एक रेवा जी गुलाबी संगमरवराच्या घळीतून वाहते, तर एक वैतरणा जिच्या देखण्या दऱ्या धरणाने बुडवल्या. एक केण जिचे केशरी, नारिंगी gorges सतत 'मावळत्या दिनकरा" मोड वर असतात…

तर एक चंबळ जिच्या कभिन्न कपारीत कोल्हे राहतात. एक यमुना जिचे उंच-उंच काठ रस्त्यांनी सतत ढासळतात तर एक सियांग जिच्या कड्यावरून खालची नदीच दिसतच नाही!

वाळणाऱ्या, फुलणाऱ्या, दोनदा पूर येणाऱ्या, पूरच न येणाऱ्या, समुद्रास मिळणाऱ्या, वाळवंटात संपणाऱ्या, तळ्यातून जन्माला येणाऱ्या, तळ्यात विलीन पावणाऱ्या अनेक नद्या, त्यांचे अनेक स्वभाव. कधी कृपाळू हात, कधी विध्वंसक वाटा.

भारतातच हजार जातींचे मासे आणि गवतं, हजारो जातींची फुलपाखरे, पश्चिम घाटात नव्याने सापडणारे बेडूक, अरुणाचलमधली असंख्य नवी रेकॉर्ड झालेली फुलपाखरे, पश्चिमवाहिनी नद्यांमध्ये दर तीनेक महिन्यांनी नवा रेकॉर्ड होणारा मासा, बारके बारके जीव..bees, diatoms, water skaters, damselflies, dragon flies... म्हणयला क्षुल्लक, पण प्रत्येकाची आपली जागा, प्रत्येकाचे अनन्यसाधारण महत्त्व.

कधी दमून, हरून एखादी special खाली बसलीच तर तिची Olympic ज्योत हाती घेऊन दुसरी पुढे जाते.. परिक्रमा पूर्ण करते.

हे वैविध्य आहे, म्हणून आपले जग आहे. वैविध्य आहे म्हणून सुंदरता आहे, म्हणून डोळे विस्फारणारा आनंद आहे, curiosity आहे, अप्रूप आहे, आसक्ती आहे.

काही लोक शांत, काही पाऱ्यासारखे, काही मृदू, काही कठीण, काही लेकुरवाळे, काही कैक मैल आनंदाने एकटे चालणारे, काही अबोल, काही स्वतःहून बोलणारे.

या जगाचे सगळे. नद्या, जीव, माणसं. कोण कोणाला उपरा म्हणणार? प्रत्येकाचे प्रयोजन त्याच्या इथे असण्यानेच आहे, त्याला ना वेगळे कारण पाहिजे ना justification.

Mary Oliver म्हणते तसे,

Whoever you are, no matter how lonely,

the world offers itself to your imagination,

calls to you like the wild geese, harsh and exciting -

over and over announcing your place

in the family of things.

- Parineeta Dandekar

Updated : 14 Sep 2020 8:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top