Home > मॅक्स ब्लॉग्ज > कोरोना विरुद्ध लोक : गडचिरोलीत ‘आरोग्य स्वराज’ कार्यक्रम

कोरोना विरुद्ध लोक : गडचिरोलीत ‘आरोग्य स्वराज’ कार्यक्रम

कोरोना विरुद्ध लोक : गडचिरोलीत ‘आरोग्य स्वराज’ कार्यक्रम
X

आदिवासी गाव ‘टवेटोला’ - कालूराम बोगा घरासमोरील अंगणात कायमस्वरूपी असलेल्या २० बाय २० च्या पक्क्या मांडवात खाट टाकून निवांत बसले होते. हिवाळ्यात लावलेला भोपळ्याचा वेल वाळून आता त्याच वेलाचं आच्छादन पसरून सर्वत्र थंडगार सावली पसरली होती. गळ्यात असलेल्या पंचाने वारंवार तोंड झाकण्याचा त्यांचा प्रयत्न सुरू होता. कोरोना संसर्गामुळे तोंडावर कायम मास्क अथवा रुमाल बांधणं आवश्यक असल्याचं त्यांना ठाऊक होतं.

कोरोना काय म्हणते, असं सहज विचारताच ते उत्तरले, बाहेर जाण्याची पंचाईत झाली आहे. आमच्या गरजा तशा फारच कमी असल्या तरी किराणा दुकानातून काही ना काही तरी आणावं लागतच. तो पण आता वस्तू महाग झाल्याचे सांगतो. सरकार धान्य फुकटात देणार असल्याचे त्यांना ठाऊक होते. गडचिरोली जिल्ह्याच्या टोकावर असलेल्या टवेटोला गावात ते किती लवकर पोहोचेल ही शंका त्यांना आहे. ते म्हणाले, “कोरोंना सारख्या कितीतरी मरी आजपर्यंत पाहिल्या. पण हे वेगळच प्रकरण आहे. बाहेरच निघू नका म्हणते. आम्ही जंगलात राहणारे लोक. टेमरं खाऊन, मोहा खाऊन कसेही जगून घेऊ. शहरातल्या लोकांना जगवा म्हणावं सरकारला. कोरोना रोग आणि अन्नधान्याच्या गरजाही त्यांच्याच आहेत”

पिसेवडधा हे आरमोरी तालुक्यातील मोठ्या लोकवस्तीचं गाव. आरमोरी शहरात जाणार्‍यांचे प्रमाणही बरेच. पण सध्या कोरोना संसर्गामुळे सगळच थांबलं. गावचे रस्ते ओसाड असले तरी बंद असलेल्या दुकानांच्या पायर्‍यांवर लोकांचा घोळका कुठलेही सुरक्षित अंतर न ठेवता गप्पा मारताना सतत नजरेस पडतो. आमच्या गावात कोरोना नाही. आला तर बाहेरच्या लोकांमुळेच येईल. त्यामुळे आरोग्यासंदर्भात माहिती घेण्यासाठी बाहेरून येणार्‍या लोकांचाही त्यांना राग येतो. गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष शामराव वाटे आणि सदस्य रुषी वट्टी मात्र गावकर्‍यांना कोरोना संसर्गाबाबत जागृत करण्यासाठी जीवाचं रान करीत आहेत.

रुषी वट्टी सांगतात, लॉकडाऊन झाल्यापासून जास्त लोकांनी एकमेकांच्या जवळ न येण्याच्या सूचना आम्ही वारंवार करीत आहोत. ग्रामपंचायतमध्ये असलेल्या भोंग्यातून शासनाने दिलेल्या सूचनांची टेप वाजवत असतो. शामराव सांगतात, हे गाव मोठं बदमाश आहे. दारूचं प्रमाणही खूप आहे. लोकं पिण्यासाठी मोठी गर्दी करतात. त्यामुळे आधी अशा विक्रेत्यांना ताकीद दिली. जंगलातील दारूच्या हातभट्ट्याही आम्ही उद्द्वस्त केल्या. बकरे कापणार्‍यांपाशी लोक गर्दी करतात म्हणून त्याच्यावरही बंदी घातली. पण ते आता घरी कापून विकत आहेत. त्यांच्या घरी होणारी विक्री थांबवणं सोप्पं नाही.

ग्रामपंचायतमधून लोकांना मास्क आणि हात धुण्यासाठी साबणीचे वाटप केले जात आहे. ते योग्य प्रकारे करणे आणि लोकांना ते वापरण्यासाठी समजावणे कठीण जात आहे. बाहेरून आलेल्या ५ जणांना होम क्वारंटाईन केलं आहे. पण मिरची तोडण्यासाठी तेलंगणात गेलेले गावातील तब्बल ७० जण अडकून आहेत. लॉकडाऊन संपल्यावर त्यांना क्वारंटाईन करणे आमच्यासाठी आव्हान आहे. महसूल मंडळाचे सभागृह आणि शाळेत त्यांची व्यवस्था करण्याची तयारी आम्ही करीत आहोत. १४ व्या वित्त आयोगातील निधी यासाठी कशा प्रकारे वापरता येईल याचाही विचार करीत आहे. पण गावाने यासाठी साथ देण्याची गरज ते व्यक्त करतात.

गिलगावातील ५२ जण तेलंगणात अडकले आहेत. हे लोक परत आल्यावर त्यांना क्वारंटाईन करण्याच्या सूचना आहेत. याविषयी येथील सरपंच अर्चना कोडाप सांगतात, लॉकडाऊन पूर्णपणे कधी उठणार आणि ही माणसं केव्हा गावात येऊन धडकणार हे अद्याप माहिती नाही, पण घराचे त्यांच्या संपर्कात आहोत आणि आम्ही घरच्यांना सातत्याने विचारात असतो. ते लोक थेट गावात येणार नाही याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. गावाच्या प्रवेशद्वारावर गावबंदीचा फलक आम्ही लावला आहे. कुणीही बाहेरचा माणूस येऊ नये यासाठी मी स्वतः तिथे जाऊन बसते. ग्रामसेवकांमार्फत मास्क आणि साबण वाटल्या जाणार आहेत. पण लोकांना ते वापरायला सांगणं सोप नसल्याचे अर्चना ताई सांगतात.

गावातील आशा वर्कर असलेल्या शारदा फुलझेले यांनी आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनेवरून गावाबाहेर गेलेल्यांची यादी तयार केली आहे. कोरोना आजाराबाबत आणि त्याचा फैलाव रोखण्यासाठी आवश्यक सूचना दवाखान्यातून त्यांना मिळाल्या असल्या तरी मिटिंग अथवा प्रशिक्षण अद्याप मिळालेले नाही. गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात लॅपटॉपवर त्यांना काही माहिती देण्यात आली एवढंच.

त्यांच्याकडून माहिती घेत तेलंगणात मिरची तोडण्यासाठी गेलेल्या गुरुदास कोडाप यांना फोन लावला असता आपण खम्मन जिल्ह्यातील नेमिलीपुरी येथे असल्याचे त्यांनी सांगितले. मिरचीचा तोडा आटोपला आहे. पण येण्याचे वांदे झाले. शेतात तात्पुरत्या झोपड्या बांधल्या आहेत. बाहेर निघण्यास मनाई आहे. धान्य दिले आहे. भात खायचा आणि राहायचं हेच सध्या सुरू आहे. ३ मे नंतर बसेस सुरू होईल असं कानावर आलं. पण गावात गेल्यावर तेथेही १४ दिवस गावाबाहेर राहावं लागणार असल्याचे घरचे सांगत आहे. ते चालेल पण इथं एकटं राहणं नको.

आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यात कोरोना संसर्ग अद्याप दाखल झालेला नाही. पण बाहेरून अनेक जण या जिल्ह्यात येण्याच्या वाटेवर आहेत. त्यामुळे धोक्याची एक टांगती तलवार सतत लटकत आहे. अनेक गावे आदिवासीबहुल आहेत. या गावांना या आजाराचे कितपत गांभीर्य आहे. त्यांना आजाराचा प्रसार न होण्यासाठी आवश्यक असलेल्या सूचना ठाऊक आहेत का आणि नियमांचे पालन लोकांकडून होत आहे का हे जाणून घेण्यासाठी सर्च या आरोग्यसेवी संस्थेद्वारे कोविड आजाराची लक्षणे व मृत्यूची पाहणी करण्यासाठी एक कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे.

'सर्च'चे कार्यकर्ते गावांमध्ये जाऊन लोकांची माहिती घेत आहेत. त्यांचे या रोगाविषयी असलेले आकलन जाणून घेण्याचा प्रयत्न ते करीत आहे. एकमेकांपासून तीन फुटांपेक्षा जास्त अंतर ठेवणे, शक्यतो घराबाहेर न पडणे, खूपच आवश्यकता असल्यास घराबाहेर पडताना नाका-तोंडावर मास्क अथवा रुमाल बांधणे, दिवसातून किमान सहा वेळा हात साबणाने स्वच्छ धुणे, ताप खोकला अशी आजाराची लक्षणे आढळल्यास स्वतःला लोकांपासून वेगळे करणे असे काही ठराविक नियम पाळणे हा कोरोना आजार रोखण्याचा एकमेव उपाय आहे. पण शासनाने सांगितलं आणि लोकांनी ऐकलं असं होत नाही.

या निमित्ताने गावांच्या पोटात शिरून स्थानिकांशी संवाद साधला असता वरील काही उदाहरणं हाती लागली. अनेक गावांनी प्रवेशद्वारावर गावबंदीचा फलक लावला आहे. पण गावात कोण येतंय हे पाहायला तिथे कुणीही नाही. सर्वच फलक पंचायत समितीमार्फत देण्यात आले आहेत त्यामुळे केवळ गावाचे नाव बदलून बाकी प्रकार सारखाच. काही गावांनी मात्र रस्त्यावर झाड आडवे टाकून थेट गावबंदी केली आहे. पण अशावेळी गावात एखाद्याची तब्येत बिघडली तर काय करायचं याच उत्तर अशा गावांकडे नाही.

सेवासुविधा उपलब्ध असलेल्या मोठ्या गावांमध्ये लोकांना कोरोना काय आहे हे ठाऊक असलं तरी या रोगाला अद्याप गांभीर्याने घ्यायला ते तयार नाही. शेतातील कामे आटोपली आहेत. घरी राहण्याची सवय नाही. चहाटपर्‍या, पानठेले बंद असल्याने गावात कुठे बसावं आणि काय करावं हा प्रश्न बहुतेकांना पडला आहे. पिसेवडधा येथील ऋषी वड्डे सांगतात, गाड्यांमध्ये पेट्रोल नाही. बाहेरगावी जाण्याची परवानगी नाही. भाजी विक्रेत्यांना मुभा असल्याने अनेक जण आता आपणही हा व्यवसाय सुरू करतोय, खाली बसून काय करणार असे सांगत पेट्रोल साठी परवानगी पत्र मागायला येतात.

या तुलनेत दुर्गम आदिवासी गावांना या लॉकडाऊनचा तितकासा परिणाम जाणवत नाही. सकाळी उठून लोक मोहा वेचण्यासाठी जंगलात जातात ते थेट दुपारीच घरी येतात. युवकांना परिस्थितीची बर्‍यापैकी जाणीव आहे. पण घरच्यांना सांगण्यात त्यांना रस नाही. एखाद्याच्या घरी अथवा जंगलात जाऊन पत्ते खेळत बसण्यावर त्यांचा भर आहे. जिओचे नेटवर्क असलेल्या गावांतीळ युवकांचा वेळ टिकटॉकचे व्हिडिओ पाहण्यात आणि पबजी खेळण्यात जात आहे.

गडचिरोलीच्या ग्रामीण भागातील अनेक वयोवृद्ध महिलांना अद्याप कोरोना शब्दच उच्चारता येत नाही. ‘कोणता का रोग आला, लोकायले मारते म्हणते’ एवढच त्यांना माहिती आहे. पण या आजाराचा संसर्ग आपल्याला होऊ नये यासाठी काही सवयी लावल्या का या प्रश्नावर चपखल उत्तर देताना एक महिला म्हणाली, आम्ही घरातून पुरुषांसारखं दहावेळा बाहेर जातच नाही आणि कपडे व भांडे धुताना आमचे हात किती तरी वेळा धुतले जातात. वेगळे हात धुण्याची गरजच काय?

लोकांना आजाराची लक्षणे आणि कोरोनासंदर्भात माहिती घेण्यासाठी जात असलेल्या सर्च च्या पर्यवेक्षक कुसूमताई सांगतात, वयोवृद्ध तर जाऊच द्या पण ३० ते ४० दरम्यानच्याही अनेक महिलांना या संसर्गाबाबत माहिती नाही. अशा वेळी त्यांच्याकडून या आजाराला गांभीर्याने घेत त्यासाठी आवश्यक नियम पाळण्याची अपेक्षाच करता येत नाही.

पर्यवेक्षक महेश उरकुडे सांगतो, साधा रुमालही न बांधता गावभर मोकाट हिंडणारे व महिनाभरापासून बाहेर न जाता आल्यामुळे फ्रस्टेट झालेले तरुण आमच्यासोबत मुद्दाम भांडण करतात. तुम्हाला कसं फिरायला मिळतं असे विचारताना त्यामागील त्यांचा आक्षेप लक्षात येतो.

मुंजालगोंदीच्या सरपंच वच्छला नरोटे कोरोना विषयक जनजागृती करण्यात व्यस्त आहेत. त्या म्हणतात, आम्हाला तलाठ्यांनी सूचना केल्या आहेत. त्यानुसार आम्ही लोकांना नाका-तोंडावर मुसका (मास्क) लावायला सांगतो. पण लोक ऐकत नाही. येथून छत्तीसगड राज्याची सीमा खूप दूर नाही. त्यामुळे एक भीती आहेच. पण सध्या ये-जा बंद आहे. पोलीस गाडी तपासून सरळ परत पाठवतात. परिणामी हा महामार्ग सध्या निर्मनुष्य झाला आहे.

बँकेची शाखा असलेल्या रांगी, अमिर्झा सारख्या गावांमध्ये मात्र लोकांची तोबा गर्दी पाहावयास मिळते. सुरक्षित अंतर हा नियम तर लोकांनी ऐकला आहे का हा प्रश्न पडतो. तालुक्याला जाता येत नसल्याने पैसे काढण्यासाठी लोक बँकेकडे धाव घेतात. त्यातच शासनाने लोकांच्या खात्यात पैसे जमा केल्याच्या बातम्या ही गर्दी आणखी वाढवत आहेत.

पिसेवडधा गावात भेटलेल्या लताबाई रस्त्यावर एखादं वाहन भेटण्याची वाट पाहत होत्या. त्यांना गडचिरोली ला जायचं होतं. कोरोना आजाराचं नाव ऐकलं असलं तरी गडचिरोलीला जाण्याचा मार्ग सध्या बंद आहे हे त्यांना माहीतही नव्हतं. रांगीपर्यंत नेऊन देण्याची त्यांनी विनंती केली. त्यांना समजवलं की रांगीला जाऊनही तिथून गडचिरोलीला जाता येणार नाही. तिथली बँक देखील काहीच वेळाकरिता उघडली जाते आणि एखाद्याच्या गाडीने गडचिरोलीला गेल्याच तरी येताना काहीच भेटणार नाही. लताबाईंना निराधार योजनेचे पैसे मिळतात. हाती काहीच पैसा नाही. त्यामुळे पैशासाठीची त्यांची तळमळ लक्षात येते. रांगीला नातलग राहतात. ते गडचिरोलीला घेऊन जातील हा विश्वास त्यांना होता. पण यामुळे कोरोनाचा धोका आपल्याला व इतरांना होऊ शकतो याची तीळमात्र कल्पना त्यांना नाही.

लोकांनी कोरोना संसर्गाचा धोका अद्याप मनावर घेतला नसल्याचे गावांमध्ये जाऊन वस्तुस्थिती जाणून घेताना जाणवते. ज्या गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी जातीने लक्षं घालून आहेत त्याच गावांमध्ये लोक किमान काही सूचना पाळत आहेत. काहींनी फुकटात मिळतील याची वाट न पाहता गावातच मास्क शिवायला सुरुवात केली आहे. सॅनीटायझर, हँडवॉशचे वितरणही केले आहे. पण या सर्वांमध्ये जिल्ह्यात संसर्ग नसल्याने आणि गावात एकही रुग्ण नसल्याने एका प्रकारचा बेफिकीरपणा लोकांमध्ये जाणवतो.

एरव्ही एखाद्या आजाराविषयी लोकांचे सामूहिक आरोग्याशिक्षण करता येतं. पण कोरोना आजारात लोकांचे एकत्र येणेच धोक्याचे आहे. त्यामुळे लोकांना समजावून सांगणे, सूचना करणे कठीण फार कठीण आहे. अशा वेळी महात्मा गांधीच्या विचारावर आधारित सर्च ची ‘आरोग्य स्वराज–गावाचे आरोग्य गावाच्या हाती’ ही संकल्पना गावांनी अवलंबने फार गरजेचे आहे. संकट आज दिसत नसले तरी ते उद्या येईल हे नक्की. अशा वेळी गावांनी तयार राहण्यासाठी त्यांना तयार करणे फार गरजेचे आहे. गावाला यासाठी तयार करण्याची रंगीत तालिम 'सर्च'ची चमू १५ कलमी कार्यक्रमातून करीत आहे.

काय आहे १५ कलमी कार्यक्रम

१. गावातून बाहेर जाणे व येणे बंद

२. बाहेर गावाहून परत येणार्‍यास १४ दिवसांचे विलगीकरण

३. गर्दी होईल असे - लग्न व इतरही समारंभ बंद. बाजारही बंद.

४. घराबाहेर एकमेकांपासून सहा फुट अंतर राखणे

५. घराबाहेर पडताना नाका-तोंडावर मास्क/रुमाल/कपडा बांधणे

६. दररोज कमीत कमी सहा वेळा साबणाने हात स्वच्छ धुणे

७. गावातील खर्राविक्री पूर्णतः बंद. घरपोच खर्रा पोचविणेही बंद.

८. गावात दारू पूर्णतः बंद. गावाबाहेरही दारू पिण्यासाठी जाणार्‍यांवर बंदी

९. दारू पिणे व खर्रा खाणे सुटल्यावर ही सवय पुन्हा लागणार नाही यासाठी प्रयत्न करणे.

१०. ताप, खोकला व दम लागणे ही चिन्हे असलेल्यांना शोधून त्यांची तपासणी करण्यासाठी आरोग्यादूत किंवा आशा कडे पाठवणे

११. आजाराची चिन्हे असणार्‍यांवर उपचार करूंन घरीच त्यांचे विलगीकरण करणे.

१२. गंभीर रुग्णांना ओळखून तत्काळ रुग्णालयात पाठवण्याची व्यवस्था करणे

१३. गावातील आजारांची व मृत्यूची नोंद करणे

१४. गावातील लोक, गावसमिती स्वयंसेवक, युवापथक व आरोग्यादूतांचे प्रशिक्षण करणे.

१५. गरजूंना मास्क, निधी, शिधा व क्वारंटाईन साठी सहकार्य करणे.

पराग मगर, गडचिरोली

(लेखक सर्च या आरोग्यसेवी संस्थेत कार्यरत आहेत.)

Email– [email protected]

Updated : 2 May 2020 5:41 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top