Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > .....अन् मी इंदिरा भक्त झालो!

.....अन् मी इंदिरा 'भक्त' झालो!

.....अन् मी इंदिरा भक्त झालो!
X

इंदिरा गांधींच्या (Indira Gandhi) या जन्मशताब्दी वर्षामध्ये मागे वळून पहात मी स्वत:लाच प्रश्न विचारतोय की मी इंदिरा भक्त का व कसा झालो? तसे पहाता बालपणापासून माझ्यावर संस्कार होत होते ते डाव्या विचारांचे! घरी येणे जाणे असलेल्या कम्युनिस्ट नेत्यांच्या चर्चांमधून, भांडवलदारांचा पाठीराख्या काॅंग्रेसच्या कडवट विरोधाचे प्रतिबिंब पडत असे. काॅंग्रेस म्हणजे गरीबीला जबाबदार असलेला पक्ष अशी माझीही धारणा होऊ लागली होती. अचानक संस्थानिकांची तनखा बंदी, बॅंकांचे राष्ट्रीयीकरण, इंदिरा गांधींचा काँग्रेसमधील (Congress) बड्या धेंडांशी सुरू झालेला संघर्ष, इंडिकेट व सिंडीकेट अशी काॅंग्रेसची विभागणी, अशा घटना एका पाठोपाठ एक आकार घेऊ लागल्या. इंदिरा गांधींची पुरोगामी व समाजवादी धोरणे यामुळे काॅंग्रेस विरोध हाच राजकारणाचा पाया असलेल्या समाजवाद्यांसह कम्युनिस्ट मंडळीही प्रभावित होऊ लागली. हा बदल मला जाणवत असे.

"वो कहते है इंदिरा हटाव, मैं कहती हूॅं गरीबी हटाव" असे म्हणत इंदिरा गांधी बहुमत मिळवून सत्तेवर आल्या. गरिबांच्या कल्याणाच्या योजना आखणाऱ्या इंदिरा गांधीनी जनतेच्या मनामधे स्थान निर्माण केले. आम्हां शाळकरी मुलांच्या मनामध्येही इंदिराजींबद्दल आदरभाव निर्माण होऊ लागला. एव्हढ्यांतच पूर्व पाकिस्तानमध्ये पाकिस्तानी लष्करशहांनी पूर्व बंगालमधील जनतेवर केलेल्या अत्याचारांनी जनता होरपळून निघाली. इंदिरा गांधीनी पूर्व पाकिस्तानमधील जनतेच्या लढ्याला पाठींबा देऊन भारतीय फौजाना पूर्व पाकिस्तानमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला. युध्दाला तोंड फुटले. अमेरिकेच्या सातवे आरमार पाठवून युध्दामधे हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नांनी जराही विचलित न होता इंदिरा गांधीनी भारतीय फौजांची आगेकूच सुरूच ठेवली. १६ डिसेंबर १९७१ ह्या दिवशी पाकिस्तानी सैन्याने भारतीय फौजांसमोर शरणागती पत्करली.

बलशाली भारताचे दर्शन जगाला घडविणाऱ्या कणखर व धैर्यशील नेत्या इंदिरा गांधी जनतेच्या गळ्यातील ताईत झाल्या. विरोधी पक्षाचे नेते अटलबिहारी वाजपेयी (Atal Bihari Vajpayee) ह्यांनी देखिल इंदिराजींचा उल्लेख "दुर्गा" असा करून त्यांच्या हिंमतीची दाद दिली. आम्हा मुलांमधेही पाकिस्तानला अद्दल घडविणाऱ्या इंदिराजींविषयी आपुलकीची भावना निर्माण झाली.

इंदिरा गांधी १९७४ साली अशा लोकप्रियतेच्या शिखरावर असताना, आंदोलने सुरू झाली. गुजरात (Gujarat)व बिहारमधे (Bihar) विद्यार्थ्यांनी सरकारविरूध्द रणशिंग फुंकले. जयप्रकाश नारायण (Jayaprakash Narayan) यांनी आंदोलन दडपू पहाणाऱ्या इंदिरा गांधी सरकार विरूध्द 'संपूर्ण क्रांती'चा नारा देत आंदोलनाचा रोख दिल्लीकडे वळवला. जयप्रकाशांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्ष संघटित होऊ लागले. जाॅर्ज फर्नांडिस यांनी रेल्वेचा देशव्यापी संप पुकारला. ही आंदोलने व संप दडपशाहीच्यी मार्गाने मोडून काढू पहाणाऱ्या इंदिरा सरकारविरोधात वातावरण तापू लागले. मी एव्हाना तारुण्याच्या उंबरठ्यावर असलेला महाविद्यालयीन विद्यार्थी झालो होतो.

विद्यार्थ्यांमधे इंदिरा गांधींच्या विरोधात विद्यार्थीद्वेष्ट्या असल्याबद्दल संताप व्यक्त होऊ लागला होता. ह्या संताप यात्रेमध्ये मी ही सहभागी झालो. इतक्यातच, इंदिरा गांधींनी निवडणुकीत अवैध मार्गाचा अवलंब केल्याचा ठपका ठेवत दि. १२ जून १९७५ रोजी अलाहाबाद न्यायालयाने त्यांना सहा वर्षे कोणत्याही संसदीय पदावर रहाण्यास मनाई करणारा आदेश दिला. इंदिरा गांधींच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर पकडला. २५ जून १९७५ रोजी दिल्लीमधे जाहीर सभेमध्ये जयप्रकाश नारायण यांनी इंदिरा गांधींच्या राजीनाम्याची मागणी करतानाच पोलीस, लष्कर व सरकारी कर्मचाऱ्यांना सरकारचे आदेश धुडकावण्याचे आवाहन केले.

इंदिरा गांधीनी याची गंभीर दखल घेत दुसऱ्याच दिवशी आणीबाणी जाहीर केली. विरोधी पक्षाच्या नेत्यांसह आणीबाणीला विरोध करणाऱ्या शेकडो कार्यकर्त्यांनी तुरुंग भरून गेले. प्रसार माध्यमांवर बंधने लादून त्यांची मुस्कटदाबी करण्यांत येऊ लागली. दिल्लीतील तुर्कमान गेट परिसरामधे संजय गांधींच्या सूचनेवरून शेकडो झोपड्यांवर बुलडोझर फिरवून त्या जमीनदोस्त करण्यांत आल्या. सरकारी कार्यालयांमध्ये शिस्तिचा अतिरेक होऊ लागला. नसबंदी कार्यक्रमामधे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी केलेल्या अत्याचारांच्या कहाण्यांनी लोकांमधे सरकारविषयी तिरस्काराची भावना निर्माण झाली.

आणीबाणी लादणाऱ्या इंदिरा गांधीविषयीचा माझा उरलासुरला आदर संपुष्टांत येऊ लागला. मार्च १९७७ मधे अनपेक्षितरीत्या इंदिरा गांधीनी आणीबाणी उठवून निवडणुका घेण्याची घोषणा केली. हुकूमशहा इंदिरा गांधी आणीबाणी लादून सत्ता आपल्या हाती कायम ठेवण्यासाठी लोकशाहीचा गळा घोटत आहेत असा प्रचार करणारे विरोधी पक्षही चकित झाले. ह्या धक्क्यातून सावरत कम्युनिस्ट वगळता विरोधी पक्ष जयप्रकाश नारायण ह्यांच्या नेतृत्वाखाली एकत्र झाले. जनता पक्षाची स्थापना झाली. जनता पक्षाला देशभर सर्व थरातून जनतेचा पाठिंबा मिळू लागला. मी ही मित्रांसमवेत जनता पक्षाच्या सभांना उत्साहाने जाऊ लागलो. निवडणुका झाल्या. इंदिरा गांधींना व काॅंग्रेसला जनतेने सपशेल नाकारून जनता पक्षाला विजयी केले. खरीखुरी लोकशाही प्रस्थापित झाल्याचा आनंद मलाही झाला.

जनता पक्षाचे सरकार मोरारजी देसाईंच्या नेतृत्वाखाली स्थापन झाले. परंत जनतेच्या आशा आकांक्षांच्या पूर्ततेकडे लक्ष देण्याऐवजी इंदिरा गांधींविरूध्द सूडबुध्दीने कारवाया करणे हेच उद्दिष्ट असल्याचे दिसू लागले. अशातच सूडाने पेटलेल्या नेत्यांनी इंदिरा गांधीना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक करण्याचा आततायी निर्णय घेतला. अटकेतील इंदिरा गांधींविषयी जनतेमधे सहानुभूतीची भावना निर्माण झाली व जनता पक्षाच्या नेत्यांविषयी चीड! काॅंग्रेस कार्यकर्त्यांनी देशभर ह्या अटकेच्या निषेधार्थ निदर्शने केली व लोकही त्यामधे उत्स्फूर्तपणे सहभागी झाले. इंदिरा गांधी ह्यांना झालेली अटक न आवडल्याने आम्हीही ह्या निदर्शनांमधे सहभागी होऊ लागलो.

जानेवारी १९७८ मधे इंदिरा गांधींनी काॅंग्रेस (आय) पक्षाची स्थापना केली व लगेचच फेब्रुवारीमध्ये झालेल्या कर्नाटक व आंध्र मधील विधानसभा निवडणुकांमधे जनता पक्षाला धूळ चारत विजय मिळवला. इंदिरा गांधींना लोक पुन्हा स्वीकारीत असल्याची ही पावती होती. इंदिरा गांधींची विजयी घोडदौड आम्हां तरूणांना व विद्यार्थ्यांना प्रभावित करू लागली होती. मुसळधार पावसातून कधी जीपने, कधी ट्रॅक्टरने प्रवास करीत तर मध्येच वाहन बंद पडल्यावर चिखलातून, कंबरेपर्यंत पाण्यातून वाट काढीत, शेवटी हत्तीवर बसून बिहारमधील दलित हत्याकांड झालेल्या बेलचीतील दलितांचे अश्रू पुसणाऱ्या इंदिराजींनी आमच्यावरच नव्हे तर लाखो देशवासीयांवर आपल्या धैर्यशील स्वभावाने गारूड केले

होते.

१९७९ मधे मोरारजी देसाईंचे जनता सरकार पायउतार झाले. चौधरी चरणसिंग यांचे सरकारही टिकू शकले नाही. जानेवारी १९८० मध्ये लोकसभेच्या निवडणुका झाल्या. जनतेने संधी देऊनही सरकार चालवू न शकलेल्या अकार्यक्षम व भांडखोर नेत्यांना विटलेल्या भारतीय जनतेने इंदिरा गांधींच्या नेतृत्वावर पसंतीचे शिक्कामोर्तब करीत त्यांच्या काॅंग्रेस (आय) पक्षाला बहुमत देऊन निवडून दिले. इंदिरा गांधींच्या नेतृत्वाचे आकर्षण पुन्हा एकदा आम्हां तरुणांना वाटू लागले.

त्याच सुमारास पंजाबमध्ये फुटीरतावादी शक्तींनी डोके वर काढण्यास सुरूवात केली. जर्नेलसिंग भिंद्रनवाले या संताने स्वतंत्र खलिस्तानची मागणी करून हिंसक कारवायांना चिथावणी दिली. हिंसेचा आगडोंब उसळला. ज्येष्ठ पत्रकार, पोलीस अधिकारी तसेच निरंकारी पंथाचे अनुयायी यांच्या खुले आम हत्या होऊ लागल्या. अमृतसरच्या पवित्र सुवर्ण मंदीरामध्ये तळ ठोकून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या सशस्त्र अनुयायांकडून अतिरेकी कारवायांची सूत्रे हलत व स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीला बळ दिले जाई.

देशभर दहशतीचे वातावरण निर्माण झाले. पंजाबमधे वेळीच अतिरेक्यांना ठेचून काढणारा निर्णय घेण्याचे धैर्य व हिंमत इंदिरा गांधींपाशी आहे याची मला खात्री होती. पंजाबला देशातून फुटून जाण्याच्या शक्यतेपासून वाचवायचे असेल तर कठोर धाडसी निर्णय घ्यावे लागतील याची खूणगाठ मनाशी बांधून इंदिरा गांधीनी लष्करी अधिकाऱ्यांशी सुवर्ण मंदीरामध्ये लष्कर घुसवून तेथे ठाण मांडून बसलेल्या भिंद्रनवाले व त्यांच्या सशस्त्र अतिरेकी अनुयायांना हुसकावून लावण्यासंबंधी विचार विनिमय केला. असे करणे भविष्यात गंभीर परिणाम भोगावे लागणारे ठरेल असा सल्ला पंतप्रधान इंदिरा गांधींना देण्यात आला. वाटेल ती किंमत मोजावी लागली तरी चालेल पण देश एकसंघ ठेवण्यासाठी ही कारवाई करावीच लागेल असे सांगून इंदिरा गांधीनी लष्कराला सुवर्ण मंदीरामध्ये 'आॅपरेशन ब्ल्यू स्टार' ह्या कारवाईचे आदेश दिले.

ह्या कारवाईत सशस्त्र प्रतिकार करणारे भिंद्रनवाले व त्यांचे अनेक अनुयायी ठार झाले. सुवर्ण मंदिराच्या भिंती रक्ताने माखल्या. पवित्र तख्ताचेही नुकसान झाले. शीख समुदायामधे संतापाची लाट उसळली. याची किंमत मोजावी लागणार होती ह्याची इंदिराजींना कल्पनाही होती. ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी इंदिरा गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेतील शीख सुरक्षा रक्षकांनी गोळ्यांचा वर्षाव करून इंदिराजींची हत्या केली. इंदिराजीनी देशाच्या एकात्मतेसाठी आपल्या प्राणांचे बलिदान दिले होतं. या धक्क्यातून सावरणे मला फारच अवघड गेले. काही दिवस आधीच सुरक्षा यंत्रणांनी सुरक्षा व्यवस्थेतील शीख सुरक्षा रक्षकांना वगळण्याचा निर्णय घेतला होता. परंतु धर्मनिरपेक्षता हे जीवनमूल्य मानणाऱ्या इंदिराजीनी "आपण सेक्युलर नाही आहोत का?" असा प्रश्न विचारून हा निर्णय बदलला. इंदिराजींची धर्मनिरपेक्षतेवरची ही निष्ठा माझ्या मनावर ठसा उमटवणारी ठरली. भुवनेश्वर येथे इंदिराजीनी केलेल्या अखेरच्या भाषणातील काळजाचा ठाव घेणारे शब्द "देश सेवेमधे मला मृत्यू जरी आला तरी माझ्या शरीरातील रक्ताचा एक एक थेंब देशाला बलशाली बनवेल" माझ्या कानामधे गुंजत राहू लागले.

कालपरवापर्यंत इंदिराजींवर कधी प्रेम करणारा तर कधी त्यांचा तिरस्कार करणारा मी इंदिराजींचा भक्त झालो. इंदिराजींच्या विचारांशी पक्की बांधिलकी ठेवून राजकारणामधे सक्रीय होण्याचा माझा निर्णय झाला. इंदिराजींना माझी हीच खरी श्रध्दांजली होती. वयाच्या पंचविशीमधे असा मोठा बदल जीवनामधे झाल्यावर मी इंदिराजींच्या जीवनाचा व त्यांनी घेतलेल्या निर्णयांचा अधिक सखोल मागोवा घेण्यास सुरुवात केली. इंदिराजींनी राबवलेले अणुशक्ती कार्यक्रम व धोरण, हरित क्रांती योजना, सिक्किमचे सामीलीकरण, केलेले पर्यावरण विषयक कायदे, रशियाशी मैत्रीचे नाते जोडण्याची भूमिका हे पहाता इंदिराजींची विविध रुपे माझ्या समोर आली. इंदिराजी या केवळ राजकीय नेत्या नव्हत्या तर त्या एक बहुआयामी व्यक्तीमत्व होत्या ह्याची खात्री पटत गेली. इंदिराजींविषयी माझ्या मनामधे अढी निर्माण करणारी आणीबाणी कशासाठी होती हे सखोल वाचन व अनेक मान्यवरांशी चर्चा केल्यावर उलगडत गेले.

विरोधी पक्षांना फूस लावून भारतामधे अस्थिरता माजवण्याचा साम्राज्यवादी शक्तींचा डाव उधळून लावण्यासाठी इंदिराजीनी अपरिहार्यता म्हणून हा निर्णय घेतल्याची खात्री पटत गेली. इंदिराजी हुकूमशहा होत्या का? याचे उत्तर ठामपणे नाही असेच द्यावे लागेल कारण त्या हुकूमशाही प्रवृत्तीच्या सत्तालोलुप नेत्या असत्या तर आपल्या विरोधात प्रचंड जनक्षोभ आहे याची जाणीव असतानाही आणीबाणी उठवून निवडणुका घेण्याचा निर्णयच त्यांनी घेतला नसता. इंदिराजींच्या राजकारणाचे व व्यक्तीमत्वाचे पदर जसजसे उलगडले जाऊ लागले तसतसा मी इंदिराजींच्या विचारांशी अधिकाधिक निष्ठावंत होत इंदिराजींचा केवळ चाहताच नव्हे तर 'भक्त' झालो तो आयुष्यभरासाठी !

अजित सावंत

[email protected]

(लेखक मुंबई काॅंग्रेसचे माजी सरचिटणीस व प्रवक्ता आहेत)

Updated : 19 Nov 2017 3:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top