Home > मॅक्स ब्लॉग्ज > सोशल मीडिया, मोदी आणि सामान्य माणूस

सोशल मीडिया, मोदी आणि सामान्य माणूस

सोशल मीडिया, मोदी आणि सामान्य माणूस
X

दिवे लावण्याचे पंतप्रधानांनी आवाहन केले. त्यावर सोशल मीडियात अत्यंत टोकाच्या, रागाच्या, तिरस्काराच्या प्रतिक्रिया आल्या, असे वातावरण तयार झाले की, यातील फोलपणा सर्व बाजूने उघड झाल्यामुळे आता याला अजिबात प्रतिसाद मिळणार नाही. पण प्रत्यक्षात रात्रीचे नऊ वाजले आणि सगळीकडे अंधार पसरला. हे आवाहन जवळपास अनेक ठिकाणी यशस्वी झाल्याचे दिसले.

त्यात शहरी भागातल्या बिल्डिंग होत्याच पण अगदी खेड्यापाड्यापर्यंत झोपडपट्टीत सुद्धा लोकांनी दिवे लावले. यातून पुरोगामी वर्तुळात काहीशी निराशा, उदासीनता निर्माण झाली आहे. त्यातील काहीजण तर समाजाला मूर्ख ठरवत दुषणे देत आहेत. परंतु असे करणे ही आत्मवंचना ठरेल. यामध्ये आपले समाजाबद्दलचे आकलन चुकते आहे काय? समाज माध्यम आणि समाज यात इतके अंतर का पडते आहे? आपल्या आकलनातच काही गफलत आहे का? हे तपासून पाहण्याची ही संधी आहे, असे मला वाटते.

सोशल मीडियात आपण जी चर्चा करीत आहोत, त्या चर्चेच्या परिघात विचार करणारा, लेखन-वाचन करणारा व पुरोगामी पार्श्वभूमी असणारा एकूण समाजाचा खूप छोटा वर्ग आहे व इथली चर्चा हेच सर्व समाजाचे मत आहे, असा नकळत आपला समज होतो. वास्तविक आपल्या चर्चा विश्वापासून कोसो मैल दूर असणारा एक मोठा समूह आहे. त्याच्याशी आपले काहीच नाते नाही किंवा आपला काहीच संवाद नाही. त्यामुळे आपण सहमत असणाऱ्यांनाच सहमत करत राहणे असे समाजमाध्यमांवर करत आहोत व त्यातूनच एक विशफुल थिंकिंग करतो आहोत, असेच दुर्दैवाने होते आहे काय? आणि हे प्रत्येक निवडणुकीच्या निकालाच्या वेळी जाणवले आहे.

प्रत्येक निवडणुकीचा प्रचार सुरू असताना मीडियातील काहीजण व समाज माध्यमातील अनेक जण इतक्या टोकाला जाऊन चित्र रंगवतात आणि प्रत्यक्ष झालेले मतदान मात्र वेगळेच असते. तेव्हा समाजमाध्यम या शब्दाचा प्रत्यक्ष समाजाशी काही संबंध उरला आहे का, हा प्रश्‍न या ठिकाणी उपस्थित करायला हवा, असे कालच्या घटनेनंतर तर नक्कीच म्हणावे लागेल. सर्वसामान्य माणसांशी आपण बोलतो आहोत का? ते का दिवे लावत आहेत? ते का थाळी वाजवत आहेत? याबाबत त्यांचे मन आपण समजून घेत आहोत का? की त्यांची बाजू न समजून घेता थेट निकालपत्र वाचत आहोत, हेही कबूल करण्याची ही वेळ आहे.

ही चौथी वेळ आहे, नोटबंदी, सर्जिकल स्ट्राईक आणि आता थाळी वाजवणे, दिवे लावणे या चारही वेळा मोदींच्या बोलण्यातील फोलपणा सर्व विद्वानांनी उलगडून दाखवला. परंतु या देशातील सामान्य माणसं मोदींना अजिबात दोषी ठरवत नाहीत. किंबहुना त्यांचे युक्तिवाद सामान्य माणसांना अजूनही योग्य वाटतात. नोटबंदीत किती नोटा रिझर्व बँकेत परत आल्या, या तपशिलात सामान्य माणसाला रस नाही. पाकिस्तानला खरंच धडा शिकवला काय? या तपशिलात जाण्याची त्यांना गरज वाटत नाही किंवा दिवा लावल्याने कोरोनाचं नेमकं काय होईल याचीही त्यांना फिकीर नाही. अत्यंत श्रद्धेने ते मोदींना फॉलो करत आहेत. हे का घडते आहे याच्या मुळाशी जाण्याची आवश्यकता आहे.

पहिला भाग हा की या चारही आवाहनात मोदी एका राजकीय नेत्यापेक्षा देशाचे नेते म्हणून आवाहन करत आहेत, असे पटवून देतात व तो विषय राष्ट्रभक्तीशी जोडून दाखवतात. त्यामुळे नोटबंदी, पाकिस्तान आणि कोरोना हे आपण एका राजकीय नेत्याचे ऐकून नाही तर देशासाठी काहीतरी करत आहोत, अशी सामान्य माणसाची भावना होते. त्यामुळे ते भेदणे मोठे कठीण होते. तिथे तर्क गळून पडतो किंबहुना तुम्ही तर्काने वाद घालता म्हणजे तुम्ही समाजविरोधी ठरू लागता. दुसरा भाग हा की समोर विश्वासार्ह राजकीय पर्याय नसल्याने समोरचे काय ओरडतात हे लोक गंभीरपणे घेत नाहीत. त्यामुळे लोकांनी सरकारवर भरवसा टाकला आहे. तो तोडायला प्रत्यक्ष रोजगार, शेती, आरोग्य यातील पडझड त्यांच्यापर्यंत नेऊन सांगावी लागेल.

नोटबंदी आणि पाकिस्तानच्याबाबत तरी खरोखर काहीतरी गंभीर मुद्दे होते. याचा प्रतिवाद करणे आवश्यक होते आणि थाळी वाजवणे आणि दिवे लावणे याकडे दुर्लक्ष केले असते तरी चालले असते. परंतु पुरोगामी वर्तुळ मोठ्या प्रमाणावर प्रतिक्रियावादी झाले आहे आहे. भाजपाने व मोदी यांनी काहीही केले की त्यावर अतिशय मोठ्या प्रमाणावर चर्चा वाद-विवाद आपण करत राहतो. त्यातून चर्चेच्या केंद्रस्थानी येणे हे त्यांचे उद्दिष्ट साध्य होते. आपण सारे प्रतिक्रियावादी झालो आहोत का? तुम्ही मेणबत्तीत अडकणे हे त्यांच्यासाठी चांगले आहे, कारण त्यातून आरोग्यव्यवस्थेच्या अंधाराची चर्चा थांबते. खरेच थाळी वाजली, मेणबत्ती पेटली तर असा काय फरक पडणार आहे? खरा मुद्दा हा आरोग्यव्यवस्था किती आजारी आहे, गरिबांच्या चुली विझल्यात, धार्मिक विद्वेष वाढतोय यावर आपला फोकस हवा ना ? त्यावर अभ्यास करून आणि तपशील जमवून जर पोस्ट शेअर केल्या तर दडपण निर्माण होईल.

गावोगावी आरोग्यव्यवस्था कशी आहे? हे तपशील येत राहिले तर सरकार बचावाच्या पवित्र्यात जाईल. मोदी आणि भाजप यांनी काहीतरी बोलायचे, करायचे आणि आपण त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायची. भक्तांनी त्यावर टोकाला जाऊन काही तरी लिहायचे आणि मोदी आणि भाजपाला चर्चेच्या केंद्रस्थानी ठेवायचे, असे हे सगळे सुरु आहे. मला असे वाटते की यांना दुर्लक्षित करून, उपेक्षा करून आपण ते जसा त्यांचा अजेंडा पुढे नेतात तसा सर्वसामान्य माणसांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या वेदना, त्यांचे दुःख, त्यांचे प्रश्न या विषयाचा अजेंडा का पुढे नेत नाही? आपण सारखे प्रतिक्रियावादी का बरे होत आहोत? याचा विचार करण्याची आज गरज आहे. असे सांगितेल जाते की, गोळवलकर गुरुजींना एकदा विचारले की तुमचे सर्वात मोठे प्रचारक कोण? ते म्हणाले, ”पंडित नेहरू आणि काँग्रेसचे सर्व प्रमुख नेते, याचे कारण ते लाखोंच्या सभेत संघावर टीका करतात.

आम्ही जेव्हा देशभर काम करायला जातो, तेव्हा त्या लाखोंच्या सभेत यांनी आमचा परिचय टीका करून अगोदरच लोकांना करून दिलेला असतो त्यामुळे आम्हाला तिथे पोहोचणे सोपे होते.” 2002च्या गुजरात नरसंहारापासून दिसले आहे की मोदींवरील टीका त्यांच्यासाठी टॉनिक ठरते आहे. हीच टीका त्यांना पुन्हा पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आणते आहे. हा परिवार त्यांचा अजेंडा जर पुढे आणतो आहे तर आपला अजेंडा केवळ त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करणे कसा असू शकतो? आपण स्वतः स्थलांतरित मजूर किंवा यानिमित्ताने दिसलेली आरोग्य व्यवस्था, या आरोग्य व्यवस्थेतील सुधारणा, त्यावरील वाढता खर्च असे काही ठोस मुद्दे घेऊन का पुढे जाऊ शकत नाही? याचा फेसबुक मित्रांनी खरोखर विचार करण्याची आवश्यकता आहे, असे मला मित्र म्हणून वाटते... याचा सोपा अर्थ असा अनेकजण घेतील की जे सुरू आहे त्याविषयी काही बोलायचं नाही का? बोलायचे, परंतु तो आपल्या एकूण मांडणीचा फार तर 20 टक्के भाग असावा.

परंतु आज आपण शंभर टक्के फक्त प्रतिक्रियावादी झालो आहोत का? याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणखी एक मुद्दा असा की ते कृती करीत आहेत .निवडणुकीत अमित शहा मतदार यादीच्या पानापानांचे नियोजन करत होते आणि आम्ही फक्त फेसबुक पेजवर होतो. किमान १० मतदारांना भेटून तरी आपण मतपरिवर्तन करण्याचा प्रयत्न केला का ? प्रश्न प्रत्यक्ष कृतीचा आहे. हा परिवार सोशल मीडियात आहे. परंतु प्रत्यक्ष रस्त्यावर येऊन त्यांना अपेक्षित असलेला अजेंडा पुढे नेण्याचा प्रयत्नसुद्धा करत आहे.

फेसबुकवरील सर्व विचारी आणि संवेदनशील कार्यकर्त्यांना एकत्र येऊन प्रत्यक्ष असा दबावगट निर्माण करणे व प्रत्यक्ष कृतीला गती देईल अशा पद्धतीचे संघटन कसे होऊ शकते यावरही विचार करायला हवा. शेवटी देशातील सरकार हे केवळ किती लाईक केले किंवा किती शेअर केले याने बदलत नाही. तर प्रत्यक्ष मतपेटीतून ते बदलते याचाही विचार करण्याची आवश्यकता आहे, याच्या पलीकडे माझ्यासकट आपल्या सर्वांना जाण्याची गरज आहे असे वाटते. आपण काय लिहायचं हे ते ठरवताहेत आणि त्यांच्या चक्राभोवती आपल्याला फिरायला लावताहेत..उलट करू या जगण्याचे प्रश्न घेऊन इतके तपशील, प्रश्न मांडू, वेगवेगळ्या माध्यमातून येऊ की त्यांना यावर बोलावे लागेल. मग निराशा येणार नाही. त्यांनी दिवे लावले तरी उदासीनता येणार नाही. समाज माध्यमातून प्रत्यक्ष समाजात उतरण्याची गरज आहे.

Updated : 7 April 2020 1:38 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top