सोशल डिस्टन्स आणि जातीयवाद

पंच- कोन जात हो आप मोहन बाबू?
मोहन- जी ब्राह्मीन!
पंच- तो उसे आचरण करना भी सिखों
मोहन- तो मुझे क्या करना होगा?
पंच- मेलाराम के हाथ का खाना खाते हो! तुम्हे मालूम है कोन जात है वो?
मोहन- उससे क्या फरक पडता है? कौन से सदी में जी राहे है आप?
पंच- भाई! हमरा धर्म भ्रष्ट करने को काहे तुले हो मोहन बाबू?
आणि शेवटी
पंच – जो कभी नही जाती उसे हि “जाती” कहते है!

हा संक्षिप्त रुपातला सवांद आहे “स्वदेस” ह्या सिनेमातला. ह्या सिनेमात दाखवलेला “भारत” हा आरश्याचे काम करतो. “जाती”, “धर्म” हे शब्द भारतीयांसाठी रोजच्या अन्नपदार्थ सारखे आहेत. हा प्रसंग नुकताच खरा ठरला उत्तर प्रदेश मध्ये. कुशीनगर येथे क्वारंटाइन केलेल्या काही लोकांनी जेवण जेवण्यास नकार दिला, फक्त नकार नाही तर ते त्यावर अडून राहिले. त्याचे कारण बघता आपण खरचं “माणूस” म्हणून सक्षम आहोत की नाही याची प्रचिती येते. ते अन्न लीलावती देवी या एका “दलित” स्त्रीने बनवले होते.

‘दलितांनी बनवलेल्या अन्नाला आपण हात पण लावू शकत नाही खाणे तर दूरची गोष्ट’, या कारणासाठी त्यांनी ते नाकारलं. तेव्हा त्यांना सांगण्यात आलं की हेच जेवण जेवावं लागेल कारण ज्या शाळेत त्यांना ठेवले होते तिथल्या एका कुक ने जेवण बनवण्यास आपल्याला संसर्ग होईल या भीतीने नकार दिला. म्हणून ते लोक नियम झुगारून आपल्या घरी २ वेळा जेवायला जात असत आणि परत सेंटर मध्ये येत असत. हि घटना फक्त कुशीनगर इथली नाही, उत्तर प्रदेश मधेच सिसवा-बरुवर येथे १० जणांनी २ दलित कुक यांनी बनवलेले जेवण जेवण्यास नकार दिला. कोरोना सारख्या महामारी बरोबर आपण सगळेच २ हात करतो आहोत, पण या अश्या परिस्थितीत सुद्धा आपल्याला “जाती” नावाच्या अतिभयंकर विषाणू सोबत लढावे लागत आहे. लीलावती देवी म्हणते, मी त्या सेंटर मध्ये संसंर्गची पर्वा न करता अन्न घेउन जाते आणि मला परत पाठवले जाते, मी केलेले सगळे अन्न वाया जात आहे. ते कुणाच्या तरी पोटात जाऊ दे अशी भावना आहे. पण लीलावतीदेवीच्या नशिबात अजूनही तो सन्मान नाही ज्याची ती खरी मानकरी आहे .

लॉकडाऊन जसा महत्वाचा आहे तसाच या काळात घडणारी प्रत्येक गोष्ट हि महत्वाची वाटत आहे. त्याची एक एक वाचनीय गोष्ट बनत आहे. यामध्ये कौंटुबिक हिंसा म्हणा किंवा स्त्रियांवरील अत्याचार यात काही कमतरता दिसत नाही. मग “जाती” नामक प्रश्नतरी कसा मागे राहील. या अश्या संकटकाळी आपला जीव वाचवणे हि महत्वाची गोष्ट आहेच त्याचबरोबर दुसऱ्याचा जीव वाचवणे हि सुद्धा जबाबदारीची गोष्ट आहे. पण या सगळ्यात आपण माणूस म्हणून फक्त शरीराने जिवंत राहत आहोत आपली वैचारिक धारणा काही बदलत नाही किंवा यावर अजून कुठलीही लस निर्माण झालेली नाही आणि सर्वात जास्त भीतीची गोष्ट म्हणजे ती लस कधी सापडेल याची शास्वती नाही. लॉकडाऊनच्या कठीण काळात तामिळनाडू मध्ये एका महिन्यात जातीयवादामुळे अॅट्रॉसिटीच्या २५ घटना नोंदवल्या गेल्या हा आकडा ४० % ने वाढला आहे. याचबरोबर १५० गुन्हे हे जातीय हिंसेचे नोंदवले गेले आहेत. हे नोंदवलेले गुन्हे आहेत न नोंदवलेले गुन्ह्यांचा आकडा याच्यापेक्षा नक्कीच जास्त असेल अशी भीती आहे. चेंगम येथे डॉ. आंबेडकरांचे चित्र असलेला टी-शर्ट घातलेल्या मुलाला एका पोलिसाने मारले कारण तो एका वरच्या जातीच्या मुलीसोबत बोलत होता. अॅट्रॉसिटीच्या अॅक्ट खाली त्याला नंतर सस्पेंड करण्यात आले.

हल्लीच्या काळात “जातीयवाद” किंवा “जात” हा विषय काढला कि जे तरुण वर्ग आहे जे कॉलेज मध्ये शिकत आहेत ते नेहमी “आरक्षण” बद्दल तक्रार करताना दिसतात. त्यांचा म्हणण्यानुसार जो पर्यंत “आरक्षण” जाणार नाही तो पर्यंत “जातियवाद” काही संपणार नाही. त्यांच्यानुसार “बॅकवर्ड क्लास” ला मिळणारी सवलत याचे प्रमुख कारण आहे. याबद्दल त्यांच्या मनात राग निर्माण होत आहे. पण याची खरी गरज काय आहे किंवा याचा इतिहास जाणून घेण्याचा कुणी प्रयत्न करत नाही. डॉ. आंबेडकरांचे एका विचारानुसार “तुम्हाला जुना इतिहास माहित असल्याशिवाय तुम्ही नवीन इतिहास घडवू शकत नाही. “डॉ. आंबेडकरांनी मांडलेला हा विचार या मुलांसाठी किंवा अश्या माणसांसाठी एक संधी आहे ज्यामुळे आपण खरा भारत कुठलाही फिल्टर न लावता बघू शकतो, त्याचे चिंतन करू शकतो आणि तो बदलण्यासाठी काम करू शकतो. याच बॅकवर्ड क्लास कोट्यातून तामिळनाडू मध्ये एका गावात एक सरपंच निवडून आली तिचे नाव अमसावल्ली.

ती आणि तिचा नवरा सतिष कुमार हे दिवसरात्र झटत आहेत आपल्या गावाला उत्तम गाव बनवण्यासाठी पण काही दिवसांपूर्वी याच लॉककडाऊन च्या काळात अमसावल्ली चा एक व्हीडिओ व्हायरल झाला होता. त्यात ती हाथ जोडून विनवणी करत होती की “मी आणि माझ्या नवऱ्याला विष पिण्याची वेळ आली आहे, कारण आम्हाला कुठलंच काम कुणी करू देत नाहीये.” 22 एप्रिलला श्रीलंकन तामिळ रेफुजी कॅम्प मध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्याने तो सोडवण्यासाठी अमसावल्ली तेथे पोहचली पण मोहन नावाच्या एका वरच्या जातीच्या व्यक्ती जमावाला घेऊन आला आणि या दोघांना काम करण्यास मज्जाव केला. काठ्या घेऊन यांच्या समोर येऊन उभे राहिले आणि धमकी देऊ लागले. त्या दोघांना कुठलेच काम ते करू देत नाही. तशी तक्रार अमसावल्ली आणि तिच्या नवऱ्याने पोलीस स्टेशन मध्ये दाखल केली .

माननीय पंतप्रधान यांनी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता 9 मिनिटे लाईट बंद ठेवण्यास सांगितले होते. याच प्रसंगावरून हरियाणामध्ये धनपाल नावाच्या एका दलित व्यक्ती आणि त्याचा कुटुंबावर हल्ला केला. त्यांनी 9 वाजता लाईट बंद केली नाही असे म्हणून 9.30 वाजता गुज्जरांचा 35 जणांचा जमाव काठी, सळ्या अशी हत्यारे घेऊन त्यांच्या घरात आले आणि आज रात्र भर लाईट बंद ठेवायची नाहीतर मारले जाईल अशी दमबाजी केली. धनपालने रीतसर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली. या आणि अश्या बऱ्याच घटना घडल्या आहेत आणि घडत आहेत. काहींनी या लॉकडाऊनच्या काळाचा फायदा घेत जातीय अत्याचार केले आहेत.

आपण आता 2020 मध्ये आहोत. आपण सर्व पद्धतीने जगाच्या बरोबर किंवा वरचढ जाऊ शकू अशी तयारी करत आहोत. एक घर, एक गाव, एक शहर असे एकएक जोड बनून देश बनतो. पण गावागावात होणारे अत्याचार, ज्याची बुद्धी आहे त्याला फक्त जातीवरून मागे टाकणे. या अश्या घटना पहिल्या तर “सुपरपॉवर” हा शब्द आपल्यापासून फार लांब आहे. एक देश “सुपरपॉवर” होण्यासाठी विचारशक्ती प्रगल्भ लागते. आपण सर्व या जातीच्या आणि धर्माच्या चिखलात असे रुतलो आहोत की यातून बाहेर पडण्याची मानसिकताकच बनत नाहीये किंवा तसे वातावरण तयार केले जात नाहीये. “जात” या दोन अक्षरी शब्दांमध्ये इतकी ताकत आहे की ती थेट मेंदूवर स्वार होऊन तुमचं विचार करणं थांबवते, माणूस म्हणजे काय ? हि संज्ञा पारखून घेण्याचीही संधी देत नाही. कोरोना पेक्षा जास्त वेगात याचा प्रादुर्भाव तुमच्या रक्तात पसरतो आणि “भेद” ,”तुमचं – आमचं”, “तुम्ही – आम्ही” अशी आपसूक लक्षण दिसू लागतात.

याचा इलाज तर दूरची गोष्ट “जो कभी नाही जाती उसे ही जाती केहते हे” असे विधान करून आपण त्याला गोंजारत बसतो. आता जो शब्द आपण रोज ऐकतोय “सोशल डिसटन्स ” हा शब्द जरी आता नवीन वाटत असला तरी अंतर पाळून राहणे हि स्थिती आणि हि भावना बॅकवर्ड क्लास ची व्यक्ती वर्षनुवर्षे भोगत आलेला आहे. कोरोना वर लस नक्की सापडेल ती गावोगावी हि पसरेल यात शंका नाही. पण जातीच्या या आजारावरचं लसीकरणाचे काय ? खूप संशोधन करून डॉ. आंबेडकरांनी समता प्रस्थापित होण्यासाठी “संविधान” नावाची लस बनवली होती जी थेट विषाणूवर मारा करून जातीविरोधी मानसिकता नष्ट करू शकते पण त्याची अजूनही चाचपणीच सुरु आहे. या कोरोना विषाणू मध्ये आणि जातीच्या विषाणू मध्ये एक साम्य आहे ते म्हणजे “अदृश्यतता”. तो विषाणू आहे पण दिसत नाही. जर याचं नीट लसीकरण केलं तर डॉ. आंबेडकरांच्या स्वप्नातला “कास्टलेस इंडिया” हा “सुपरपॉवर” नक्की होईल अशी आशा आहे.

-प्रशांत वि कांबळे