Home > मॅक्स ब्लॉग्ज > "पोटासाठी तर करावंच लागेल बाई… आमचं तरी बरं आहे इतरांचे हाल पाहावत नाही"...

"पोटासाठी तर करावंच लागेल बाई… आमचं तरी बरं आहे इतरांचे हाल पाहावत नाही"...

पोटासाठी तर करावंच लागेल बाई… आमचं तरी बरं आहे इतरांचे हाल पाहावत नाही...
X

गेल्या पन्नास दिवसांपासून चालू असलेल्या या टाळेबंदीच्या काळात घडणाऱ्या घडामोडी भिन्न भिन्न आयाम घेत आहेत. एकीकडे याच काळात वेळ घालवायचा कसा? म्हणून काही निवडक वर्गाचे समोर येणारे प्रश्न तर एकीकडे खायचं काय? यासारखे मोठ्या प्रमाणात असणाऱ्या बहूजन, आदिवासी, दलितांचे जीव घेणारे प्रश्न तुम्हाला स्वस्थ बसू देत नाहीत. सद्य परिस्थितीत मानसिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय बाजुंनी भरडल्या जातोय. तो फक्त सामान्य माणूस. ज्याला दोन वेळच्या भाकरीची भ्रांत आहे, ज्याला राहण्यासाठी घर नाही, ज्याला कामाची शाश्वती नाही. एक ना अनेक असे किती तरी प्रश्न... मग यात स्वतःच्या अस्तित्वाचा प्रश्न तर दूरच राहिला.

रोजचे स्थलांतरीत मजुरांचे होणारे हाल, किरकोळ विक्रेत्यांची संसाराचा गाडा टिकवून ठेवण्यासाठीची तगमग, वृद्धांच्या आरोग्याचे प्रश्न आणि सद्य स्थितीतील कोविड-१९ या आजाराने ग्रस्त असणाऱ्या रुग्णाच्या असहनीय वेदना हे सर्व पाहून, ऐकून मन हादरून जात अगदी सुन्न व्हायला होतं. देव, पैसा, मान सन्मान, हेवेदावे या परिस्थिती पुढे फोल ठरायला लागतात.

असेच एक पंचावन्न ते साठीत आलेलं किरकोळ विक्रीच काम करणार रामू मेहेर व माया मेहेर हे दांपत्य गेल्या पन्नास दिवसांच्या टाळेबंदीत स्वतःला सांभाळत समोर ठिय्या मांडून बसलेल्या कोरोना काळातील भविष्याकडे बघतांना म्हणतात, "पोटासाठी तर करावंच लागेल बाई.. आमच तरी बरं आहे. इतरांचे हाल पाहावत नाही" हे दांपत्य गेल्या पस्तीस ते चाळीस वर्षांपासून किरकोळ विक्रेते म्हणून काम करत आहेत. चंद्रपूर तालुक्यातील ब्रम्हपुरी येथील ग्रामीण भागात काका लहानाचे मोठे झाले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची, त्यामुळे रस्त्यावर गाडी लावून त्यावर भजे, समोसे विकायला सुरवात केली. लग्नानंतर काकुंचीही तितकीच साथ त्यांना मिळाली. हळूहळू काकू-काकांच्या सोबतीला ३-४ त्यांच्याच सारखी कष्टकरी पुरुष मंडळी साथीला घेऊन त्यांनी आपलं काम मोठं केलं. या पस्तीस ते चाळीस वर्षांच्या काळात विविध शासकिय धोरणांमुळे, हे मोठे केलेले काम कित्येकदा एकदम बंद होण्याच्या काठावर आलेले होते. पण काकू-काकांनी हिम्मत व सोबतीला घेतलेल्या त्यांच्या सोबत्यांना कधीही सोडले नाही.

तेव्हापासून आतापर्यंत अत्यंत कष्टातून त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह याच कामातून चालवला. मुला मुलींचं शिक्षण पूर्ण केलं, मोठ्या मुलीला इंजिनिअरिंगच शिक्षण तर धाकटीच शिक्षण टाटा सामाजिक विज्ञान संस्थेतून केलं, इंजिनिअर झालेला लहान मुलगा सध्या शासकीय सेवा परीक्षेची तयारी करतो, त्यासोबतच स्वतःचा खर्च भागवतोय. मुलींचे लग्न हा सगळा प्रपंच ते याच कामातून चालवत आले आहेत.

मुलांनीही खडतर परिस्थितीची जाणीव ठेवून शिक्षण पूर्ण केलं हा अभिमान त्यांना सुखावून जातो. "या कामात माझ्या पत्नीची सोबत होती म्हणून इथवर आलो" असे सूर त्यांच्या सोबत झालेल्या संभाषणात शेवट पर्यंत जाणवले.

दिवसाला साधारणतः पाचशे ते हजारेक रुपयाचे खूप होणारे हे काम टाळेबंदाच्या या काळात गेल्या काही दिवसांपासून ठप्प झालं आहे. "टाळेबंदीचे हे दिवस साठवून ठेवलेल्या पैश्यांवर निघाले. परंतु तेही संपत यायला लागले आता करायचं काय? हा प्रश्न स्वस्थ बसू देत नाही." खरच हे काकू-काकांचे प्रश्न आपल्यालाही स्वस्थ बसू देणारे नाहीत.

"वयोमानानुसार जडलेल्या व्याधी आणि त्यांना लागणारा औषधांचा खर्च झेपावणारा नाही. मुलाचं शिक्षण सुरू आहे आणि मुलींचे लग्न झाले व सर्व सुरळीत आहे आता. तरीही ते मदत करतात त्यांचं प्रेम आहे म्हणून. पण त्यांच्याकडे नियमित पैसे मागणं योग्य वाटत नाही. जोपर्यंत होत आहे तोपर्यंत करत राहू.” पस्तीस-चाळीस वर्षे काम करून मिळवलेला स्वाभिमान त्यांच्या बोलण्यात जाणवतं राहतो.

तीन मे दरम्यान महाराष्ट्रामध्ये जे जिल्हे कोरोना विषाणू मुक्त आहेत किंवा जिथे स्थिती आटोक्यात येण्याजोगी आहे. अशा क्षेत्रांमध्ये शासनाकडून निवडक उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी मिळाली. चंद्रपूर जिल्ह्यात कोविड-१९ ग्रस्तांची संख्या जास्त नसल्यामुळे बहुतेक उद्योगधंद्यांना सुरवात झाली आहे. स्वतःची काळजी घेत, स्वच्छता पाळत, शासनाचे नियम पाळत सध्या काकू-काकांनीही घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला आणि काम चालू केले. बनवलेले पदार्थ घेऊन ते सायकलने फिरत स्वस्त दरात विकत आहेत. अर्थातच कोविड-१९ प्रतिबंधांनासाठी नित्य असलेले सर्व नियम पाळत.

स्वतःच्या जीवाचा धोका पत्कारत परत एकदा आयुष्यासोबत दोन हात करण्याची तयारी या दांपत्याने केली. कुटुंबाचा उदरनिर्वाह चालावा. यासाठी घरूनच काम सुरू केलं. एवढंच नाही तर स्वतःच्या कामा सोबतच इतर किरकोळ विक्रेत्यांनाही मदत करता येईल. यासाठी ते सतत प्रयत्न करत आहेत. यामध्ये त्यांच्या सोबतीला असलेल्या पुरुष मंडळींचाही समावेश आहे. माझ्या घरी तरी थोडी सावरून घेता येईल अशी परिस्थिती आहे... पण इतरांचे हाल पाहवत नाही हे काकांच वाक्य सध्याची परिस्थिती आणि माणुसकीची जाणीव करून देणारं आहे.

काकांसारखे असंख्य किरकोळ विक्रेते थोडं कमी-जास्त प्रमाणात अशाच परिस्थितीशी झुंज देत आहेत. शेतकऱ्यांचे, कामगारांचे प्रश्न व सध्याची परिस्थिती सामान्य माणसांच्या आयुष्यात अनिश्चितता निर्माण करणारी आहे. बुद्ध, शाहू, फुले, आंबेडकर यांचा समतेची तत्व जपणारा समाज उभारण्यासाठी तळागळातील या खांबांना भक्कम करण्याची गरज आहे. कर्तृत्ववान लोकांचे चरित्र नेहमीच प्रेरणादायी असतात. परंतु अशा सामान्य माणसांकडून मिळणारी ऊर्जा देखील आपणास नेहमी जिवंत ठेवते, बरच काही शिकवुन जाते. ज्याने मुलांना चांगलं आयुष्य दिलं, ज्याने जगण्याला जिंकलं, आणि अजूनही समस्येला सामोरे जाण्याची तयारी करतो आहे. असंच एक सामान्य दाम्पत्य आपल्यापुढे मांडण्याचा हा प्रपंच.

शब्दांकन:

योगिता जनुताई आत्राम

Updated : 21 May 2020 11:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top