Home > मॅक्स ब्लॉग्ज > सिंदखेडराजा..! महाराष्ट्राची 'अस्मिता भूमी'

सिंदखेडराजा..! महाराष्ट्राची 'अस्मिता भूमी'

सिंदखेडराजा..! महाराष्ट्राची अस्मिता भूमी
X

सोळाव्या शतकातल्या तिसऱ्या दशकाच्या मध्यावरला कुठलासा एखादा दिवस, त्या काळी औरंगाबाद शेजारचा देवगिरी किल्ला हे मोठं राजकीय सत्ताकेंद्र होतं. एरवी सताड उघडे असणारे देवगिरी किल्ल्याचे अजस्त्र दरवाजे कडेकोट बंद करण्यात आले. आणि मराठी रियासतीचे मातब्बर सरदार लखुजीराव जाधव आपल्या मुला नातवासह कोंडले गेले. ते असे कोंडले गेले की, त्या किल्ल्यातून ते पुन्हा बाहेर कधीच निघू शकले नाही. लखुजी जाधवांच्या तिथे उपस्थित असतील नसतील तेवढ्या कुटुंबातल्या लोकांवर सपासप तलवारी चालवल्या गेल्या. त्या दिवशी लखुजी जाधवांचे तीनही मुलं बापाकडे पाहून काय म्हणाली असतील, भावनांचा किती हल्लकल्लोळ माजला असेल त्या चिरेबंदी भिंतीच्या आड, रक्ताच्या चिळकांड्या उडत असताना जिवाच्या आकांताने कुणी ओरडलं असेल का तिथे.? हा सगळा भावनांचा कल्लोळ पाहून गलबलून गेल्या असतील का? त्या दिवशी देवगिरी किल्ल्याच्या भिंती... इतिहासाच्या अंगावर थरकाप उडवणार हे भयावह हत्याकांड कसं पचवलं असेल इतिहासाने? हाही एक प्रश्नच आहे. त्या दिवशीचं हत्याकांड हे लखुजी जाधवांचं अस्तित्व पुसून टाकण्यासाठी घडवलं गेलं पण आज चारशे वर्षानंतर त्याच लखुजी जाधवांची जहागिरी ही तमाम मराठ्यांच्या 'अस्मितेची भूमी' बनत चालली आहे. त्यांच्या केंद्रस्थानी आहेत. त्याच पराक्रमी लखुजी जाधवांच्या कन्या राजमाता जिजाऊ..!

आज १२ जानेवारी २०१९ पहाटे पाच वाजल्यापासूनच जय जिजाऊ जय शिवरायच्या घोषणांनी सिंदखेड राजाचा परिसर दुमदुमून गेला आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून एक दिवस आधीच जिजाऊ भक्त सिंदखेड नगरीत दाखल झाले आहेत. ३० हजार लोकसंख्येच्या सिंदखेड राजा या गावात अजूनही म्हणाव्या तशा राहण्याच्या सुविधा नाहीत. पण आलेले लोक जागा मिळेल तिथे पहुडले आहेत. कडाक्याच्या थंडीत सुद्धा कुणाची काहीच तक्रार नाही. अनेक कुटुंब आपल्या बायका मुलांसह जिजाऊ जन्मोत्सवासाठी सिंदखेड राजात आले आहेत. हळूहळू लोकांच्या मनात जिजाउंबद्दल वाढत चाललेलं प्रेम हे लोक सोसत असलेल्या हालअपेष्टामधून दिसून येतं.

सिंदखेड राजा या शहराच्या मध्यभागी आजही लखुजीराजे जाधव यांचा भव्य दिव्य असा वाडा आहे. वाड्याची मुख्य इमारत आज अस्तित्वात नाही पण त्याचे काही अवशेष आजही शाबूत आहेत. वाड्यात प्रवेश केल्यानंतर चौथरा चढून गेल्यानंतर उजव्या हाताला शेवटच्या कोपऱ्यात आजही खूप चांगल्या स्थितित असलेली एक खोली आहे. ही खोली म्हणजे बाळांतघर असावं असा कयास तत्कालीन सिंदखेड राजातील जाणत्या लोकांनी लावला आणि त्या खोलीलाच जिजाऊ यांचं जन्मघर म्हणून घोषित करण्यात आलं आहे. या खोलीत आज जिजाऊंचा पुतळा बसवण्यात आला आहे. जिजाऊ जन्मोत्सवाचा मुख्य कार्यक्रम हा दर १२ जानेवारीला सकाळी सहा वाजता इथेच पार पडतो. आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जमलेला असंख्य जिजाऊ भक्त हा दिवसभर याच खोलीत जिजाऊंना अभिवादन करत असतो.

जिजाऊ जन्मस्थळाच्या इतिहासबाबत सांगताना सिंदखेड राजा नगरपरिषदेचे अध्यक्ष नाझेर काझी सांगत होते की, "पूर्वी या परिसरात सरकार आणि इतिहास संशोधक यांचं पूर्ण दुर्लक्ष झालं होतं हा राजवाडा पूर्णपणे मोडकळीस आला होता. उरलेल्या वस्तूही काही काळात नामशेष होण्याची स्थिती होती. परंतु माझे आजोबा नझरूलहसन गुलामहुसेन काझी आणि त्यावेळचे त्यांचे तत्कालीन काही सहकारी मिळून या राजवाड्याच्या संवर्धनाला सुरुवात केली. साधारण 1969 च्या आसपास नझरूल काझी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी आज जिथे जिजाऊंचा जन्मस्थळ म्हणून ओळखलं जातं त्या खोलीत राजमाता जिजाऊ यांचा पुतळा बसवला. खरतर या राजवड्याकडे सपशेल दुर्लक्ष करणारं पुरातत्व खातं आमच्या आजोबांना तिथे पुतळा बसवू देत नव्हतं पण आजोबांनी आणि गावातील काही माननीय व्यक्तींनी मध्यरात्री पुरातत्व विभागाला कसलीही खबर लागू न देता पुतळा बसवला आणि तोच पुतळा आजतागायत तिथे कायम आहे." नझरूल काझी हे मुस्लिम समाजातील व्यक्ती होते पण त्यांच्या मनात जिजाऊंप्रती ओतप्रोत आदर होता. सुरुवातीला त्यांनी जिजाऊंची पुण्यतिथी साजरी करायला सुरुवात केली पण कालांतराने 12 जानेवारी ही जन्मतारीख मिळाल्यानंतर त्यांनीच सिंदखेड राजा इथे जिजाऊ जयंती साजरी करायला सुरुवात केली. आणि आज मराठा सेवा संघाच्या अथक प्रयत्नांमुळे जिजाऊ जयंतीला आंतराष्ट्रीय महत्व प्राप्त झालं आहे. पण याच्या मुळाशी नझरूल काझी नावाचा एक मुस्लिम व्यक्ती आहे हे विसरून चालणार नाही.

जिजाऊ जन्मस्थळाच्या विकास व्हावा यासाठी यापूर्वी अनेकवेळा निधी मंजूर झाला पण पूर्ण क्षमतेने हा निधी काधिच मिळाला नाही त्यामुळे आज जिजाऊ जन्मस्थळाच्या विकास खंडित झाला आहे. अलीकडेच भाजा सरकारने या स्मारकाच्या विकासासाठी 300 कोटी रुपये मंजूर केले आहेत पण गेल्या चार वर्षात त्यातला एक रुपया सुद्धा मिळाला नसल्याची खंत याठिकाणी जिजाऊ चाहते बोलून दाखवत आहेत. छत्रपतींच्या नावाने राजकारण करायचं आणि छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित शक्तीस्थळे दुर्लक्षित करायची हाच आजपर्यंत राजकारण्यांचा शिरस्ता राहिला आहे की काय असा प्रश्न अलीकडे उपस्थित होत आहे.

Updated : 12 Jan 2019 6:07 AM GMT
Next Story
Share it
Top