Home > मॅक्स ब्लॉग्ज > शिदा चांभार...

शिदा चांभार...

शिदा चांभार...
X

एक मॉल मध्ये फिरत असताना रॅक मध्ये मांडलेल्या फॅशनेबल चपल्लांची किंमत पहिली आणि डोळे अक्षरशः पांढरे झाले. एके काळी चांभारवाड्यात मिळणाऱ्या पायतांनाना इतकं ग्लॅमर प्राप्त झाल्याचं पाहून मन हुरळून गेलं. पण क्षणभरच. झरकन डोळ्यासमोर गावाकडचा शिदा चांभार त्याच्या खपाटीला गेलेल्या पोटासहित येऊन समोर उभा राहिला. मॉलच्या काचेमधून समोर दिसणाऱ्या रस्त्याकडे नजर गेली तर झाडाखाली शिदा चांभार चपला सांधत बसल्याचा भास.

गावाबाहेरच्या हागणदारी शेजारी एका कोपऱ्यात चांभारवाडा वर्षानुवर्षे उभा. त्याच्या आत किड्यामुंग्यासारखी वळवळ करणारा शिदा ही तसाच वर्षानुवर्षे त्याच घराच्या खणात उभा. शिदाच्या घरातल्या बाहेरच्या सोफ्यात जुन्या खेटरांचा आणि टायरांचा ढीग पडलेला. चांभारवाड्यातल्या बाकी लोकांपेक्षा प्रामाणिक धंदा करायचा शिदा.

अंगावर मळकट सदरा, डोक्यावर पटका आणि खाली ठिगळ मारलेलं धोतर बांधलेला शिदा चांभार पारासमोरच्या वडाच्या झाडाखाली हमखास बसलेला असे. वर्षानुवर्षे शिदा जसा आहे तसाच. समोर रापी, टोच्या, खिळे, जाड दोऱ्याच्या गुंड्यासोबत चपल्लांच्या भल्या मोठ्या ढिगात, सकाळची उन्ह अंगावर घेत शिदा पायताण शिवत असायचा. बाजूच्या सानेवर अधे मध्ये रापी उलटी पालटी करून घासायचा. घासलेल्या रापीने पायतानावर बारीक बारीक छाटा मारायचा. झिजून झिजून तुटलेल्या चपलांच्या तळाला पुन्हा चामडं कापून ठिगळं जोडून बसवायचा. त्यावर नवे कोरे शिवलेले अंगठे शिवारातल्या पिकागत उभे राहायचे. एखाद्याच्या पायतानाचा तळच निसटला असेल तर जुना जाडसर टायर कापून तो पायतानांच्या तळाला आकार देऊन लावायचा. नवं पायतान तयार करताना तो असं काही खालून तळ जोडायचा की चार-पाच वर्षे तरी पायतान निसटणारच नाही. इतक्या मजबूत चपला बांधायचा शिदा चांभार. बांधलेल्या नव्या कोऱ्या पायतानाला शिदा तेल लावून मुरवायचा. तेल प्यायलेलं पायतान रस्त्यावरून चालताना करकर आवाज करायचं. त्याच्या कामात कधी फसवेगिरी नाही की कधी लांडी लबाडी नाही. कामाशी प्रामाणिक होता शिदा चांभार. फेकलेल्या शब्दांना जागणारा होता शिदा चांभार.

सकाळच्या वेळी पारासमोरच्या वडाच्या झाडाखाली गल्ली बोळातून बाहेर पडणाऱ्या माणसांची गर्दी जमायची. कुणाला शेता शिवारात जाण्याची घाई तर कुणाला तालुक्‍याला जायची. जो तो पायातलं तुटकं पायतान पुढं सारायचा. एखादा म्हणायचा, "शिदा माझा तळ चांगला जोडून दे! ह्यो तूच लावलावतास बघ! वर्षभरात झिजला!" मग समोरच्या माणसाला हसून शिदा म्हणणार, "चांगला ईमानाच्या टायराचा तळ लावतो बघ! ईमानागत पळत सुटशील!" तर एखाद्याचं नवं पायतान बांधलं की हमखास शिदा म्हणणार, "सात-आठ वर्षे तरी तुज्या पायतान निसटायचं नाय बघ! कसं बी नांगरटीत हाण!"

शिदा गावचा बैत्याचा चांभार. सालभर मोडकं तुटकं शिवून द्यायचं. कुणाच्या विहीरीवरच्या मोठंची कामं करायची. कुणाच्या चाबकाच्या कातडी वाद्या वळायच्या. बैलांच्या गळ्यातील चामडी पट्टे बनवायचे. तंबाखू साठी चामड्याचा बटवा बनवायचा. तर नवा बांधलेला पायतानाचा जोड मात्र विकतच द्यायचा. बैत्याच्या बदली सुगीच्या दिवसात खळ्यावर पसा मूठ धान्य मिळायचं. त्यावरच त्याची सालभर गुजराण. सुगी सुरू झाली की सायकलीवर रिकामी पोती अडकवून शिदा शिवारात शिरायचा. मळणी चाललेल्या खळ्यावर बैत्याचं धान्य गोळा करायचा. शेंगासहित भुईमुगाचं वेल न्यायचा. वैरणकाडी हक्कानं कापायचा. इतर वेळात तो सकाळी गावच्या पारासमोर वडाच्या झाडाखाली चपलांच्या ढिगात मुजून जाई. त्याची बायको त्याच्या मुलासोबत ओढ्याकडेच्या पिढीजात मिळालेल्या शेताच्या तुकड्यावर दिवसभर राबताना दिसे. कधी मधी शिदाही चांभारकीच्या शेतात दिसायचा.

शुक्रवारी तालुक्याचा आठवडी बाजार. आठवडाभर शेतात राबणारी पाऊले या दिवशी हमखास तालुक्याला सरकायची. शिदाची सायकल तर दिवस उगवायलाच चांभारवाड्यातून बाहेर सुटायची. त्याच्या सायकलच्या घंटीच्या आवाजाने गल्ली बोळांना जाग यायची. गर्दीने फुलून गेलेल्या आठवडी बाजारात शिदाची स्वारी सकाळीच पोहचायची. बाजारच्या मुख्य चौकात आसिफ भाईच्या पानाच्या टपरी पुढं शिदाची बसायची जागा ठरलेली. वर्षानुवर्षे बाजारात तो त्याच ठिकाणी बसलेला असायचा. आजूबाजूच्या दहा बारा गावात तरी शिदाच्या ओळखी. बाजारच्या दिवशी अशी ओळखीची लोकं तुटक्या चपल्लांचं गाठोडं आणून त्याच्या पुढं ओतत. या दिवशी त्याची मान वर होतच नसे. छत्रीचा दांडा मातीत रोवून त्याच्या सावलीत बसलेला शिदा दिवसभर कामात व्यस्त. उन्हं कलू लागली कि शिदा चौकातल्या भजीवल्या रखमाबाईच्या कढईकडं जाऊन कांदा भजी खायचा. बायको पोरासाठी एखांदा पुडा पिशवीत बांधून घ्यायचा. सोबत मेवा बटरांचा एखादा पुडा असणारच. दिवस मावळतीकडं सरकला की बाजार उठायचा. ठीक्यात गुंडाळलेलं शिदाचं सामान सायकलच्या कॅरेजवर चढून बसायचं. अंधार धरून सायकल पुन्हा कच्चा रस्ता तुडवत गावाकडं सुटायची.

वर्षामागून वर्षे सरत गेली. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले. सरणाऱ्या वर्षासोबत गावाला सुधारणेची नवी झळाळी येऊ लागली. कच्च्या रस्त्यावर डांबराची चकाकी उमटली. गाव नवी कापडं घालून दिमाखात सजू लागलं. याच काळात रबराच्या रेडिमेड चपला शहरातून गावात घुसल्या आणि चांभारवाडा तळातून हादरला. नवं जग न पाहिलेल्या शिदासाठी हा बदल नवीन होता. सगळीकडे प्लास्टिक आणि रबराच्या चप्पलांचा सुळसुळाट. नवं घेऊन वापरायचं आणि तुटलं की फेकून द्यायचा जमाना. चांभाराचा हात चपलांना नाहीच. तालुक्याला तर सगळीकडे रेडिमेड चपल्लांची दुकाने. काचेने सजवलेली. बलुतेदारीच विसावली. शिदासहित सबंध चांभारवाड्याच्या पोटाचं हाल. नवीन पायतान बांधेनाच कोणी. बांधलेले वर्ष वर्ष विकत घेईनाच कोणी. सगळा रेडिमेड जमाना कुत्र्याच्या छत्री सारखा आजूबाजूला उगवू लागला. शिदा मात्र तसाच जुन्या चपलांच्या ढिगाला धरून घट्ट रुतून बसलेला. वाट पहात. कितीतरी वर्षे.

आता इतक्या वर्षानंतर तर गावाचं रुपडं पूर्ण पालटून गेलंय. या नव्या गावात पाठीला पोक आलेला आणि मावळतीकडं सरकलेला शिदा चांभार अजून तग धरून आहे. आमच्या लहानपणी शिदा रोज सकाळी ज्या पारासमोरच्या वडाच्या झाडाखाली बसायचा ते वडाचं झाड मुळासहीत कधीच उपटून पडलंय. त्या जागी शिदा चांभाराच्या गावकीची रुतलेली मुळं झाडासोबतच मुळातून तुटली असतील का? चांभारवाड्याच्या पडक्या खिंडारात बसलेला शिदा चांभार पहिला की आतून गलबलून येतं. "तुज्या आज्याचं पायतान बी म्याच बांधलं! तुज्या बापाचं पायतान बी म्याच बांधलं! मोठंपणी तुज बी म्याच बांधणार!" असं म्हणणाऱ्या शिदाचं गावठी पायतान आपल्या पायात मोठेपणी का शिरलं नसावं? महिनाभरातून एखादा का होईना थकलेला शिदा अजून सकाळच्या एस.टीने बाजाराला का जात असावा? शिदाच्या आत बसलेला चांभार अजून हार मानायला तयार नसेल की त्याच्या जन्मालाच चिकटून बसलेली रापी? केसांच्या कवटीखाली अनेक प्रश्न. उत्तर नसलेले.

एकेकाळी शिदाच्या मुरवणीचं तेल प्यालेलं साऱ्या गावचं पायतान आता करकरतच नाही गल्ली बोळातून. रस्त्यावर घासतच नाही तळव्याला मारलेल्या नाळांचा आवाज. दिसतच नाही सुगीच्या दिवसात सायकलीवर पोती अडकवून बैतं गोळा करायला निघालेला शिदा चांभार. आता बसून असतो तो चांभारवाड्यातल्या खिंडाराच्या एखाद्या दगड धोंड्यावर. गावकीची वस्त्रे अंगावरून झिडकारत झेलत राहतो सकाळची कोवळी उन्हं अंगावर. समोरच्या डांबरी सडकेवरून त्याच्या पुढे जात येत राहतात फॅशनवाल्या सैंडल, चप्पलांच्या पोरी-बायका. डांबरीवरून टपाटप आवाज उडतात बापयांच्या नव्या बुटांचे. पहात बसतो शिदा चांभार. भूतकाळात जाऊन फिरुन येतो शिदा चांभार. स्वतःलाच विचारत राहतो. कोणती दुनिया चांगली? जुनी की नवी?

चांभार वाड्यातली चार दोन पोरं काळानुसार पुस्तकाला चिकटून बसली त्यांच्या घरावर नवी बेंगलोरी कौले चढली. भिंतीवर सिमेंटचे थर विसावले. पण केवळ रापी आणि टोच्याला आयुष्यभर चिकटलेल्या शिदा सारख्यानचं काय? त्यांच्या जुन्या घराच्या भिताडानी काळासोबत केव्हाच धर सोडली. अर्धवट ढासळलेल्या भिताडावर घाणाऱ्यांचे कूड चढले. चपलांची ठिगळे मुजवता मुजवता साऱ्या आयुष्यालाच ठिगळे पडली त्यांना घालणार तरी कोण टाके? आठवडी बाजारात अजून मोडक्या छत्रीचा दांडा रोवून चप्पल तुटक्या माणसाची वाट बघणाऱ्या शिदाला, आपण रेडिमेड दुकानाचा मालक झाल्याचा कधी भास तरी होत असेल का? नसेलच तर निदान एखाद्या मध्यरात्री नवीन फॅशनेबल चपलांचा कारखाना उभा केल्याचं स्वप्न तरी त्याला पडत असेल का? उठलं तरी कोण म्हणायचं मुळावर?

तुम्ही...?

मी...Sh

व्यवस्था..?

की शहरी आणि रेडिमेड राहणीमानाचे बळी बनत चाललेले आपण सगळेचजण? निर्जीव...पांढरपेशी...खुडूक...

Updated : 20 July 2019 6:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top