Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'त्यांच्या लैंगिकतेवरचे सिनेमे'

'त्यांच्या लैंगिकतेवरचे सिनेमे'

त्यांच्या लैंगिकतेवरचे सिनेमे
X

आपल्याकडे अपंग व्यक्ती आणि त्याची लैंगिकता यावरचे सिनेमे जवळपास बनलेलेच नाहीत. मुळात समस्या आपल्या समाजाच्या आहेत. आपल्याकडे अपंगांच्या लैंगिक भावनांकडे जाणिवपुर्वक दुर्लक्षच केलं जातं. त्यांना फक्त आणि फक्त सहानभूतीचीच गरज असते असा समज आपल्याकडे आहे. विशेषत: त्याच्या लैंगिक भावनांकडे पाहण्याचा दृष्टीकोन तितकासा साफ नाही. अपंग असल्यानं समाज त्यांच्या लैंगिक भावनाच नाकारतो. असं एकूण चित्र आहे.

परदेशात अपंगांच्या किंवा शारीरिक व्याधींनी ग्रासलेल्या व्यक्तिच्या लैंगिकतेबाबत प्रचंड जागरुकता आहे. याबाबत त्यांना इतरांसारखेच मुख्य प्रवाहात जगता यावं, याकडे मानवी दृष्टीकोनातून पाहिलं जातं.

मागच्या काळात अपंग आणि त्यांची लैंगिकता यासंदर्भात दोन चांगले सिनेमे पाहण्यात आले. पहिला 'द सेशन्स' (2012) आणि दुसरा 'किप द चेन्ज' (2017).

'द सेशन्स' ही अमेरिकेतला अपंग पत्रकार, लेखक, कवि मार्क ओब्रियानची खरीखुरी गोष्ट आहे. पोलियोमुळं मानेच्या खाली न हलणारं शरीर, कृत्रिम यंत्रांच्या मदतीनं श्वासोच्छवास घेणारा मार्क ओब्रियान वयाची 55 वर्षे भन्नाट जगला. आपल्या या जगण्यावर त्यानं प्रेम केलं. स्वत:वर प्रेम केलं. इंग्लिश साहित्याचा अभ्यास केला, पत्रकारितेचा कोर्स केला आणि तो लिहू लागला. ब्रिथींग हा कवितासंग्रह आणि How I Became a Human Being: A Disabled Man’s Quest for Independence ही त्याची पुस्तकं गाजली. शिवाय तो अपंगांच्या हक्कासाठी लढणारा जागतिक चेहरा बनला.

'ऑन सीइंग सेक्स सरोगेट' या 'सन' वृत्तपत्रात प्रसिध्द झालेल्या मार्कच्या लेखानं वेगळाच माहौल तयार केला. अपंग व्यक्तिची लैंगिकता आणि त्याच्या लैंगिक भावनांना वाट करुन देण्यासाठी तिथं सुरु झालेली 'सेक्स सरोगसी' ही जगावेगळी थेरपी, असा हा आत्मकथनापर लेखाचा विषय होता. त्यावर 'द सेशन्स' हा सिनेमा बेतलेला आहे.

जसं सरोगेट मदर असतात तसे सेक्स सरोगेट. पाश्चिमात्य देशात हे कॉमन आहे. तिथं ही सायको फिजिकल थेरपी म्हणून प्रसिध्द झालीय. फक्त अपंगासाठी नाही तर सेक्स संदर्भात समस्या असलेल्या सर्वसामान्य लोकांसाठी त्याचा वापर करण्यात येतो. याकडे पाहण्याचा दृष्टीकोन शास्त्रीय आहे.

अोब्रीयालनं शेरल कोहेन-ग्रीन या आपल्या सेक्स सरोगेट पार्टनरबरोबरच्या संबंधावर हा लेख लिहिला होता. बेन लेवीन या ऑस्ट्रेलियन दिग्दर्शकाला त्यात सिनेमा दिसला. सेक्स सरोगरी करताना शेरलबरोबर तयार झालेल्या नात्यावर, आपल्या अनुभवांबद्दल मार्क ओब्रीयाननं सविस्तर लिहलं होतं. भाषा प्रवाही होती. त्यामुळं त्यावर सिनेमा बनवताना जास्त काहीही विशेष मेहनत करण्याची गरज पडली नाही. हे विशेष.

जॉन हॉक्स आणि हेलन हंट या भन्नाट जोडीनं मार्क आणि शेरलचं काम केलंय. हेलनला त्यासाठी ऑस्करचं उत्कृष्ठ अभिनेत्रीचं नॉमिनेशनही मिळालं होतं. मार्कवर बनलेल्या Breathing Lessons: The Life and Work of Mark O'Brien या शॉर्ट सबजेक्ट डॉक्युमेंट्रीलाही 1997 साली ऑस्कर मिळालेला आहे.

Courtesy : Keep The Change

तर किप द चेन्ज (2017) हा आणखी एक भन्नाट सिनेमा. रशेल इस्रायल या दिग्दर्शिकेचा. ऑटीजमग्रस्त असलेल्या दोघांची ही फिलगुड प्रेमकथा आहे. ही कल्पनाच भन्नाट आहे. ऑटीजमग्रस्त पुरुषाची वर्जिनिटी तोडण्याची भन्नाट कल्पना, त्यातून घडणारं नाट्य आणि या नाट्यातून तयार होणारी सुंदर प्रेमकथा.

सर्वसामान्य लोकांसारखेच ऑटीजम असलेले हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात, भांडतात, वेगळे होतात आणि पुन्हा एकत्र येतात. हे सर्वकाही भारी आहे. दिग्दर्शिका रशेल 'किप द चेन्ज'ला रोमियो-ज्युलिएट टाइप प्रेमकथा म्हणते.

Brandon Polansky आणि Samantha Elisofon या खऱ्याखुऱ्या ऑटीस्टिक कलाकार जोडीनं यात काम केलंय. बाकीचे एक दोन कलाकारही ऑटीस्टिकच आहेत. ऑटीस्टिक कलाकार घेऊनच हा रॉमकॉम सिनेमा बनवणं ही कल्पनाच भारी आहे. या सिनेमात एका सर्वसामान्य प्रेमकथेत तो आणि तीमध्य जे रुसवे-फुगवे असतात, मिलना-बिछडना असतं तसं सर्वकाही आहे.

माझा मुलगा अबीश सेरेब्रल पाल्सी असल्यानं त्याचं पुढे काय होणार, त्याची सेक्सुएलिटी कशी असेल यासंदर्भात अनेक प्रश्न होते आहेत. त्याची उत्तरं शोधताना हे दोन्ही सिनेमे सापडले.

आपल्याकडे असे सिनेमे बनायला हवेत.

मार्गारेट विथ स्ट्रॉ (2014) हा सिनेमा आला पण तो टिपिकल बॉलीवूड सिनेमा आहे. त्यात खूप वेगवेगळ्या तर्क नसलेल्या गोष्टी एकत्र केल्या होत्या. त्यामुळं तो तेव्हढा पटला नाही.

अपंग ज्याला आता दिव्यांग म्हटलं जातं तो गट मोठा आहे. त्यांना समाजात सामावून घेताना त्यांच्या या गरजांकडे सहानभूती म्हणून न पाहता मानवी दृष्टीकोनातून बघणं गरजेचं आहे.

- नरेंद्र बंडबे

यांच्या फेसबुक वॉलवरुन साभार

Updated : 5 April 2019 3:08 AM GMT
Next Story
Share it
Top