Home > मॅक्स ब्लॉग्ज > Nanar: नाणार रिफायनरी नकोच..

Nanar: नाणार रिफायनरी नकोच..

Nanar: नाणार रिफायनरी नकोच..
X

दोन दिवसांपूर्वी नाणार रिफायनरीच्या समर्थनासाठी रत्नागिरी मध्ये मोर्चा निघाला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी पर्यावरणासाठी किती घातक आहेत हे सांगणारा पर्यावरणविषयक अभ्यासक गिरीश राऊत यांचा लेख

रिफायनरीतून प्रक्रिया झालेले सुमारे ८५- ९०% तेल ( पेट्रोल व डिझेल ) मोटारी वापरतात. मोटारींच्या उत्सर्जनाचा जगातील 'कार्बन डाय ऑक्साईड' वायूच्या एकूण उत्सर्जनात सुमारे ४०% (१५२० कोटी टन - सन २०१८) वाटा आहे. रिफायनरी चालताना, या वायूचे काही लाख वा कोटी टन उत्सर्जन प्रतिवर्षी, तिच्या क्षमतेप्रमाणे स्थानिक पातळीवर होते. तापमानवाढीमुळे मानवजात व जीवसृष्टी नष्ट होणे ही काल्पनिक गोष्ट नसून तसे घडत आहे. कार्बन डाय ऑक्साईड' वायू हा सूर्याची उष्णता शोषून तापमान वाढवण्यास प्रमुख्याने कारण आहे.

मोटारीकरणामुळे होणारे रस्ते, प्रत्यक्ष मोटार बनवण्यासाठी खाणकाम व इतर गोष्टी यासह मोटार चालताना होणाऱ्या उत्सर्जनाचा एकत्र विचार केला तर या वायूच्या पृथ्वीवरील सुमारे ७५ % ( सन २०१८ मधे २८५० कोटी टन) उत्सर्जनास मोटार व पर्यायाने रिफायनरी जबाबदार आहे.

मानवजात वाचवण्यासाठी, सूर्याची उष्णता शोषून धरणा-या 'कार्बन डाय ऑक्साईड' व इतर वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी, डिसेंबर २०१५ मधे पॅरिस येथे झालेल्या ऐतिहासिक करारावर पंतप्रधान मोदींनी स्वाक्षरी केली आहे. मात्र त्याप्रमाणे भारतासह चीन रशिया अमेरिका इ. देशांचे वर्तन न झाल्याने कार्बनचे उत्सर्जन वाढत गेले. दहा वर्षांपूर्वी या वायूचे उत्सर्जन सुमारे १००० कोटी टन प्रतिवर्षी होते. मात्र गेल्या वर्षी जगात या वायूचे सुमारे ३८०० कोटी टन उत्सर्जन झाले. यापैकी वर म्हटल्याप्रमाणे २८५० कोटी टन उत्सर्जनास मोटार व अर्थातच रिफायनऱ्या जबाबदार आहेत.

मोटारीचे अनेकांगी दुष्परिणाम दाखवणार्या जर्मनीतील संशोधनाने हे स्पष्ट केले आहे की मोटार हे पृथ्वीसाठी अरिष्ट आहे. एक अपघातच घ्या. दरवर्षी रस्ते अपघातात होणार्याो सुमारे साडेचार लाख मृत्यूंना प्रामुख्याने मोटारीकरण जबाबदार आहे. तीन दिवसांपूर्वी शनीवारी एकाच दिवशी महाराष्ट्रात १२ तरूणांचा मोटार अपघातात मृत्यू झाला.

सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे लाखो वृक्ष तोडणारे गोवा मुंबई महामार्ग रूंदीकरण रेटले गेले. पण मुळात सावित्री पूल दुर्घटना तापमानवाढीमुळे सह्याद्रीच्या महाबळेश्वर परिसरात झालेल्या ढगफुटींचा परिणाम होता. ढगफुटीच्या अतिवृष्टीस व महापूरास तापमानवाढ जबाबदार होती. त्यासाठी पुन्हा प्रामुख्याने मोटारीचे उत्सर्जन व तिच्या रस्त्यांसाठी केलेली डोंगर व जंगलांची महापूर आणणारी तोड व त्यातून झालेला कार्बन शोषणाऱ्या हरितद्रव्याचा नाश कारण आहे. अज्ञानामुळे व त्याला स्वार्थाची जोड मिळाल्याने विकासाचा मुखवटा घालून गोवा मुंबई महामार्गाचे रूंदीकरण करून एका दुष्टचक्राला गती दिली गेली आहे.

याचा भयंकर परिणाम पहा. तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. जगात सर्वत्र तापमान वाढत आहे. परवा दि. १९ जुलै रोजी मुंबईतील आतापर्यंतचे जुलै महिन्यातील विक्रमी तापमान नोंदले गेले. विदर्भ, नागपूर, मराठवाडा ऐन पावसाळ्यात भाजून निघत आहे. लोक गावे सोडत आहेत. हिंगोली तील 'सेनगाव' तालुक्यातील 'ताकतोडा' गाव ग्रामस्थांनी सलग चार वर्षे पाऊस पडला नाही, पाणी नाही, पिक येत नाही म्हणून विकायला काढले आहे. त्यांना जगण्यासाठी तेथे एम आय डिसी व औद्योगिक विकास करावा असे औद्योगिकरणाचे सूत्रधार, जनतेच्या मनात पेरतात. जनता त्याला बळी पडते. शेतकरी म्हणतो की, आता निसर्ग पण आम्हाला जगू देत नाही.

प्राचीन ऋषींनी डोंगर व पर्वतांना पृथ्वी मातेचे स्तन म्हटले. विज्ञानाचे नाव घेऊन प्रत्यक्षात अमानवी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या काही पिढ्या झाल्या तरी यांना त्याचा अर्थ अजून कळत नाही. अरे, विकासाच्या नावाने एवढे डोंगर व त्यावरचे जंगल तोडता. बांधकामे, रस्ते करता. मग पाऊस, पाणी नाही, नदी वाहत नाही, भूजल नाही, विहिरी तळ्यांना पाणी नाही, म्हणून निसर्गालाच दोष देता? भूआवरण, जलावरण, वातावरण व जीवावरण, यापैकी एक तरी आवरण तुम्ही धड शिल्लक ठेवले आहे काय? हा बलात्कार, अत्याचार आधुनिकतेच्या नावाने तुम्ही राजरोस करता. करोडो वर्षे निसर्गाने तुम्हाला सर्व दिले. मग आताच ५०-६० वर्षांत ही परिस्थिती का? याचा साधा अर्थ तुम्हाला समजत नाही! या विकासाने देश व पृथ्वी प्रत्येक दिवशी उजाड होत चालली आहे. आणि तुम्ही, आम्हाला जगवायला उद्योग आणा, असे म्हणता! ज्यामुळे तुम्ही मृत्यूपंथाला लागला आहात त्यालाच आमंत्रण देता? काय म्हणावे या करंटेपणाला? कार, टीव्ही, काँप्युटर, फ्रीज, ए सी, वाॅशिंग मशिन, मोबाईल, प्लास्टिक, सीमेंट खाणार काय ? रसायनं पिऊन जगणार काय ? की नोटा खाणार?

प्रतीकात्मक फोटो

जूनमधे युरोपात सुमारे ४५°से पेक्षा जास्त तापमानाच्या उष्णतेच्या लाटा आल्या. दक्षिण ध्रुवाजवळील ऑस्ट्रेलियात, जानेवारी महिन्यात ५०° से पर्यंत तापमानाच्या लाटा आल्या. हजारो प्राणी,

पक्षी व लाखो मासे मेले. सध्या, पूर्व अमेरिकेत ४०°से पर्यंत तापमान जाणारी अभूतपूर्व उष्णतेची लाट चालू आहे. लक्षात घ्या की, त्या देशांत लाखो वर्षे शून्याजवळ तापमान असे.

अवकाळी, वादळे, वणवे, घटते भूजल, अतिवृष्टी, बर्फवृष्टी, महापूर, आम्लवर्षा- शेती, जंगलांचा नाश, सागरातील प्रदूषण- मॅनग्रोव्ह व मासळीचा नाश , कॅन्सर व इतर व्याधी इ. चा रिफायनरीशी सरळ संबंध आहे. हे झाकले जाते, कारण तेलाचे मालक प्रसारमाध्यमांसह जगावर नियंत्रण ठेवून आहेत. शिवाय वृत्तपत्रे टीव्ही चॅनेल्सना मोटार, सीमेंट इ. कंपन्यांच्या जाहिराती हव्या. त्यापुढे त्यांना मानवजातीचे अस्तित्व कमी महत्वाचे वाटते.

आणि रिफायनरीचे स्थानिक दुष्परिणाम पहायचे तर हरयाणातील पानिपतला कशाला, मुंबईतल्याच माहुलला जा ना. माणसं कशी जिवंत मरण जगताहेत ते पहा ना. शेती मासेमारीची तर वाताहात झालीच पण, आपल्या भगिनी कशा भीषण स्वरूपाचे मासिक पाळीसंबंधी आजार भोगताहेत ते समजून घ्या, आणि थोडेदेखील माणुसपण शिल्लक असेल तर, रिफायनरीला काही कारणाने विरोध नसेल करता येत, तर समर्थनाचे मोर्चे तरी काढू नका.

काहींना वाटते की, कोकणात 'पर्यटन' यावे. पण 'पर्यटक' हा औद्योगिकरण व शहरीकरणाचाच भाग असतो. तो मुंबई, न्यूयॉर्क सारख्या शहरात निसर्गाला उध्वस्त करून पैसा कमावतो व पैसा खर्च करून आपले पाप झाकतो. वेश्येप्रमाणे निसर्गाला फक्त भोगतो. स्त्रीच्या दुःखाशी वेदनेशी तिच्यावर होणार्याग अन्यायाशी जसं त्या पुरूषाला देणंघेणं नसतं तसंच पर्यटकाला निसर्गाच्या व निसर्गाधारित जीवन जगणाराच्या उध्वस्त होण्याशी सोयरसुतक नसते. शहरात असताना हे याच उध्वस्त करणार्या विकासाचे खंदे समर्थक असतात. यांच्या गरजा नव्हे, अनावश्याक मागण्या भागवण्यासाठी नाणार व जैतापूर सारखे विनाशकारी प्रकल्प येतात. परंतु वातावरण बदलामुळे होणार्याव तापमानवाढीमुळे हेदेखील जात्यात आले आहेत. पण त्यांना अजून ते कळलेले नाही.

विकासाचे भूत, प्रकल्प समर्थकांच्याच नाही तर आंदोलकांच्याही मानगुटीवरून लवकर उतरावे. 'भौतिक विकास' हा आपल्याला करोडो वर्षे अस्तित्व देणार्याो या एकमेव ग्रहावरील अत्याचार आणि निसर्ग व ईश्वराचा अपमान आहे. शिवाजी महाराजांनी वृक्ष, जंगल तोडू नका अशी आज्ञा दिली. गांधीजींनी त्यांच्या "हिंद स्वराज्य" या ग्रंथात, "यंत्रामुळे युरोप उजाड झाला, भारताचेही तेच होईल" , असा इशारा सन १९०९ मधे दिला होता.

आपण आत्ताच थांबलो नाही तर येत्या तीन- पाच वर्षांत नागपूरसह विदर्भ- मराठवाडा निर्मनुष्य करावा लागेल. त्यानंतर सर्वांचा क्रम लागणार आहे. याकडे दुर्लक्ष करू नये. तापमानवाढीची अतिवृष्टी व मुंबईचे बुडणे मी अचूक सांगितले होते व आंदोलन घडवून सी - लिंक प्रकल्पाचा भराव मच्छीमार व इतर नागरिकांसह आंदोलनाद्वारे थांबवून, माहीमचा सागर पूर्ण बुजवू दिला नाही, मिठी नदी अडवणारा काही भराव काढला, म्हणून लाखो माणसांचे प्राण व मुंबई, २६ जुलै २००५ ला अधिक भयंकर प्रलयापासुन वाचली. हे माझ्या कौतुकासाठी नाही, तर मुद्दा तुमच्या लक्षात यावा म्हणून सांगितले.

मानवजात व जीवसृष्टीचे उच्चाटन सुरू झाले आहे. जर वाचायचे असेल तर पृथ्वीला, निसर्गाला, ईश्वराला शरण जाण्याची व पृथ्वीविरूध्द चालू असलेला भौतिक विकास थांबवण्याची गरज आहे. रिफायनरी व तिच्या तेलावर धावणारी मोटार व इतर वाहने, बनणारे प्लास्टिक व इतर द्रव्ये ही उत्कर्षाची नव्हे तर विनाशाची प्रतीके आहेत. राजापूरची मोर्चा काढणारी मंडळीदेखील मानवजातीचा भाग आहेत. 'नाणार' गावाने स्वातंत्र्यदिनी दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी ग्रामसभेत केलेला अधिकृत ठराव त्यांनी वाचावा. समाजातील मान्यवरांनी रिफायनरीविरोधी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याचे "विनाशकाले विपरित बुध्दी" हे पत्रकही वाचावे आणि प्रकल्पाचे समर्थन थांबवावे. ठराव व पत्रक सोबत जोडले आहे. 'नाणार' व इतर गावे मानवजात व जीवसृष्टी वाचवण्याचा महान संदेश जगाला देत आहेत. गेल्या वर्षीपासुन युरोप, अमेरिका व ऑस्ट्रेलियात लाखो विद्यार्थी मोटारी व रिफायनऱ्या, कोळशापासुन वीज निर्माण करणारे, सीमेंट निर्माण करणारे प्रकल्प थांबवण्यासाठी शाळा कॉलेजात न जाता मोर्चे काढत आहेत. ते सरकारला सांगत आहेत की, आम्ही तापमानवाढीमुळे नष्ट होणार, आमच्या पिढीला अस्तित्व नसणार, तर मग पृथ्वीचे तापमान वाढवणार्याी जीवनशैलीकडे नेणारे शिक्षण आम्ही का घ्यायचे?

मोटारीचा संशोधक व मर्सिडीज सारख्या अनेक जगप्रसिद्ध ब्रँडच्या मोटारी निर्माण करणारा जर्मनी व इतर युरोपीय देश आता देशातील आटत चाललेल्या नद्या सततची वादळे महापूर आणि मानवजातीच्या अंताच्या वाटचालीची झालेली जाणीव यामुळे मोटारविरोधी धोरणे राबवत आहेत. जर्मनीने गेल्या वर्षी सर्वत्र उत्कृष्ट सार्वजनिक बस सेवा मोफत उपलब्ध करून दिली.

यातुन आपण बोध घ्यावा आणि नाणारच नव्हे तर 'रायगड' किंवा कोठेही रिफायनरी होऊ नये, हे देश, मानवजात व जीवसृष्टीच्या रक्षणासाठी आवश्यक आहे.

-ऍडव्होकेट गिरीश राऊत

Updated : 23 July 2019 12:06 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top