Home > मॅक्स ब्लॉग्ज > संग-ओ-ख़िश्त मुक़य्यद हैं और सग आज़ाद ...

संग-ओ-ख़िश्त मुक़य्यद हैं और सग आज़ाद ...

संग-ओ-ख़िश्त मुक़य्यद हैं और सग आज़ाद ...
X

पंतप्रधान श्री. मोदी यांच्या अध्यक्षतेखालील विशेष समितीने आज तात्काळ बैठक घेऊन सीबीआय प्रमुख पदावर नुकतेच पुन:स्थापीत केलेल्या अलोक वर्मांना बहुमताने हटवले.

प्रशांत भुषण, अरूण शौरी आणि यशवंत सिन्हा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीच्या आधारे गुन्हा नोंदविण्याची कार्यवाही कर्तव्य म्हणून पुर्ण करणा-या अलोक वर्मा यांना रात्री बेरात्री सीबीआय प्रमुख पदावरून काढून टाकण्याचा श्री. मोदी सरकारचा आदेश रद्द करून, त्यांना पदावर पुन:स्थापीत करण्याचा आदेश मा.सर्वौच्च न्यायालयाने नुकताच दिला होता. मात्र त्यांचे अधिकार सिमित ठेवले होते. त्याच सिमित अधिकाराचा वापर करत त्यांनी श्री.नागेश्वरराव यांनी त्यांच्या काळात केलेल्या बदल्या रद्द केल्यामुळे सरकारचे धाबे दणाणले आणि त्यांना बहुमताने त्यांना केवळ ४८ तासाच्या आत हटवले. एका बाजूला त्यांच्यावर गंभीर आरोप अाहेत म्हणून हटवले म्हणणा-या सरकारने त्यांची बदली मात्र गृहरक्षक दलात केली आहे!

अलोक वर्मांना हटवताना सरकारला भिती तरी कोणती वाटली असावी, याचे उत्तर स्पष्ट आहे! स्वत:ला गोमुत्र आणि गोमयासम पवित्र व सुचिर्भूत समजणारे सरकार मुळात प्रचंड पापात बरबटलेले आहे हेच यातून सिद्ध होत नाही काय? आणि त्याचीच परीणीती म्हणजे वर्मा यांना दोन वर्षाचा कालावधी पुर्ण होण्याआधी हटविण्यात झाली नाही काय?

राफेल विमान खरेदी व्यवहारात स्वत:ला निष्कलंक समजणारे श्री. मोदी, संसदेत राफेल संसदीय समितीमार्फत चौकशीची मागणी मान्य करत नाहीत आणि प्रशांत भुषण, अरूण शौरी आणि यशवंत सिन्हा यांनी दाखल केलेल्या फिर्यादीच्या आधारे गुन्हा नोंदविण्याची भिती मनात बाळगून त्यांनाही पदावरून तडकाफडकी हटवतात. यातून, ५६ इंची छातीला पडलेली खिंडारे मात्र स्पष्ट दिसत आहेत. पावित्र्याच्या, मांगल्याच्या व शुचिर्भूततेच्या विराट आणि विशाल भिंतीला तडे गेल्याचेच हे लक्षण म्हणावे लागेल की नाही?

राफेल करारातील कथित अपहाराची चौकशी न करता, भारतीय जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी सर्वंणांना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक म्हणून आरक्षणाच्या ' चुनावी जुमल्याच्या' झगमगत्या प्रकाशात जनतेचे डोळे दिपवून, त्यांना भक्तांप्रमाणे अंध करण्याचा प्रयत्न करत असताना सरकारने अलोक वर्मांना घाबरून त्यांना हटविण्याचा कुटील डाव खेळला आहे, असेच चित्र दिसत आहे.

नियोजन आयोग, आरबीआय, न्यायव्यवस्था, निवडणूक आयोग, एफटीआयआय, जेएनयू सारखी स्वायत्त विद्यापीठे, लोकपाल नियुक्ती आणि सीबीआय या सर्व संस्थांना उध्वस्त करण्याच्या प्रयत्नांमुळे सरकारची 'करतुद' यातून स्पष्टपणे समोर आली आहे. अगदी येत्या काळात निवडणूक तरी होईल का अशी शंका मनात निर्माण होण्यासारखी परीस्थिती आहे.

जनमेजयाच्या सर्पसत्रयज्ञाप्रमाणे श्री. मोदीजींनी आंरभलेले देशातील स्वायत्त संस्थांना उध्वस्त करण्याचे हे सत्र पाहता भारतातीय संसदीय लोकशाहीचेच भवितव्यच यामुळे धोक्यात आले आहे, ही वस्तुस्थिती आहे.

एका बाजूला देशाबाहेरील लोकांना भारताचे नागरीकत्व देण्यासाठी आतुर आसणारे श्री. मोदीजींचे सरकार, दुस-या बाजूला मात्र राजकीय विरोधकांना शत्रू ठरवून, त्यांना पाकीस्तानात पाठविण्याची वल्गना सतत करत असते. म्हणून खासकरून पाकीस्तानी नागरीक असणा-या फैज अहमद फैज यांची एक कविता आहे, जी आठवते. फैज यांनी पाकीस्तानमधील तत्कालीन राजकीय वातावरणावर या कवितेतून कटाक्ष टाकला होता, जो खूप चपखल आहे......

निसार मैं तेरी गलियों के ए वतन, कि जहाँ

चली है रस्म कि कोई न सर उठा के चले

जो कोई चाहनेवाला तवाफ़ को निकले

नज़र चुरा के चले, जिस्म-ओ-जाँ बचा के चले

है अहल-ए-दिल के लिये अब ये नज़्म-ए-बस्त-ओ-कुशाद

कि संग-ओ-ख़िश्त मुक़य्यद हैं और सग आज़ाद....

(माझ्या देशातील त्या पवित्र रस्त्यांना माझे वंदन की ज्या रस्त्यावरून कोणीही सन्मानाने चालयचेच नाही ,अशा नव्या परंपरेने जन्म घेतला आहे. कोणी देशाभिमानी असणारा प्रदिक्षणा करण्यास निघाला तर त्याने इतरांच्या नजरा चुकवून चालायचे , जीव मुठीत घेवूनच जायचे ! हे सर्व पाहून हृदय पिळवटून जाते ,पण काय करणार , ज्यांच्या पासून प्रेरणा घेऊन देश उभारायला हव्या अशा सर्वांना भिंतीत बंदिस्त करून जणू त्यांना दगड आणि विटा प्रमाणे कैद केले आहे आणि हिंस्र कुत्रे मात्र मोकाट सुटलेत )

फैज़ हा डाव्या विचारांचा कवि ! तत्कालीन भारतात लाहोर इथे त्यांनी प्रोग्रेसिव रायटर्स मूवमेंट ची स्थापना केली. पाकिस्तान निर्मिती नंतर त्यांचे लाहोर इथे वास्तव्य होते. आजही उर्दू साहित्यात फैज म्हणजे प्रत्यक्ष दैवत समजले जाते. त्यांच्या साहित्यातून त्यांनी जनसामान्यांचे दु:ख जगासमोर मांडले ,शोषण व्यवस्थेच्या विरोधातील त्यांच्या कवितांमध्ये जनसामान्यांना स्वतःचा आवाज गवसला आणि त्यांच्या रचना खूप लोकप्रिय झाल्या , सरकार विरोधातील असंतोषाच्या अभिव्यक्ती बनल्या !

फ़ैज यांचे डावे असणे ,पाकिस्तान मधील धर्मांध मुस्लिमांना खटकणारे होते. त्यांच्या साहित्यात इस्लामी मूल्यांना स्थान नसते , ही इस्लामी धार्मिक मंडळीची ओरड होती. आपल्याकडेही धर्माध लोक साहित्यिकांवर डावे असल्याचा आरोप करून असेच ओरडत असताना आपण पाहत आलो आहोत. अगदी नुकताच ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांच्याबाबत घडलेला प्रसंग, फैजला भोगाव्या लागलेल्या परिस्थिती सारखाच आपल्या देशात घडला आहे.

नयनतारा सहगल यांच्या प्रमाणेच, फ़ैज यांनी पाकीस्तानातील तत्कालीन लियाकत अली सरकारवर कठोर प्रहार केले होते. एका बाजूला सरकार आणि दुसऱ्या बाजूला धर्माध लोक ,या संघर्षात लियाकत अली यांचे सरकार उलथून टाकण्याच्या रावळपिंडी कटात त्यांचा सहभाग असल्याचा आरोप करून त्यांना कारागृहात टाकण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या साहित्यावर बंदी देखील घातली गेली. सरकारच्या या दडपशाहीच्या विरोधात त्यांनी लिहिलेली ही कविता खूप अर्थपूर्ण आहे!

फैज यांच्या रचनेतील भावार्थ खूप व्यापक आहे ,तो ठराविक स्थळ आणि काळ या पुरता मर्यादित नाही. आपल्या देशातील सद्यस्तिथी सह ,या कवितेतील मुल्य आणि संदेश सार्वकालिक आहे ,जगातील सर्व देशांना लागू पडणारा आहे .

आज भारता संसदीय लोकशाहीचे विसर्जन होऊन नवीन 'शाही' व्यवस्था अंमलात येवून भारताचा हिंदु पाकीस्तान होतो आहे की काय अशी मनात धास्ती निर्माण होण्याचा काळ असताना ही कविता चपखल लागू पडणारी आहे. म्हणजेच फैज यांच्या शब्दांत सांगायचे तर संग-ओ-ख़िश्त मुक़य्यद हैं और सग आज़ाद! फैज च्या कवितेतील 'सग' म्हणजे 'कुत्रे', जे आज मोकाट आहेत!

- राज कुलकर्णी

Updated : 11 Jan 2019 9:04 AM GMT
Next Story
Share it
Top