Home > मॅक्स ब्लॉग्ज > सचिन आम्हांला माफ कर - असिम सरोदे

सचिन आम्हांला माफ कर - असिम सरोदे

पाकिस्तानला क्रिकेट मॅच मध्ये हरवून युद्धाचा बदला घ्या आणि पाकिस्तानसोबत मॅच न खेळून त्यांना फुकटचे 2 गुण द्यायचे का ? या सचिन तेंडुलकरच्या म्हणण्यावर अनेकांनी वाईट शब्दात टीका केली हे बघून खूप वाईट वाटले.

काही जणांनी सचिनला भडव्या, भोसडीच्या, देशद्रोही असे काहीही म्हटल्याचे वाचणे दुःखदायक आहे. तारतम्य न राहिलेला आणि हिंसक पद्धतीने व्यक्त होणारा हा समाजघटक आजच्या अभद्र राजकीय प्रवृत्तीचे व धर्मांधतेची झिंग चढलेल्या विचार क्रीडेतून निर्माण झालेले अपत्य आहे. लोकशाही संकल्पना आणि प्रक्रिया उभी करतांना इतकी वर्षे गेलीत आणि लोकशाही मुल्यांचे हे उभारलेपण उद्ध्वस्त करण्यासाठी मागील काही वर्षे पुरेशी ठरली याचे द्योतक आहे. आपल्याला साधारणतः कल्पना येणार नाही. इतके आपण मागे गेलो आहोत.

आम्हाला अनेकांना अनुभव येतो नेहमीच लोकांच्या अशा वाईट प्रतिक्रियांचा पण सचिन तेंडुलकर सारख्या व्यक्तीला सुद्धा या अशा भक्तांनी असे शेलकी शब्दात संबोधावे हे नक्कीच वैचारिक अधोगतीचे लक्षण आहे. बाकी युद्ध म्हटले की केवळ भावनिक होऊन बोलायचे व वेगळे मत मांडणारे सगळे देशद्रोही असतात हे जाहीर करायचे. ही वाढती मानसिकता देशविघातक आहे याचा अंदाज सचिनचा अपमान करणाऱ्या लोकांनी दिला आहे. लोकप्रिय आणि भावनिक बोलणारेच सगळे देशभक्त हे जर पुलावामाच्या घटनेचे फलित असेल तर पाकिस्तानचे अर्धे काम झाले आहे. भारतातील सगळ्या भागात काश्मिरी लोकांवर हमले करून आम्ही सगळे जण आतंकवाद यशस्वी करण्यात पाकिस्तानला मदत करीत आहोत. याची जाणीवही नसलेले लोक खरंच मला 'महान' वाटतात. देशपातळीवर वाढलेला युध्दज्वर, बदल्याची भावना यातून मला एक दुर्गंधी येते आहे.

क्रिकेट हा खेळ म्हणून खेळावा, बदला घेण्याचे माध्यम क्रिकेट नाही हे सचिन तेंडुलकरला सांगितले पाहिजे. परंतु आपण जर पाकिस्तानशी खेळलो नाही तर पाकिस्तानला आपोआप 2 गुण मिळतील ते द्यायचे का? हा त्याने अनुभवावर आधारित उपस्थित केलेला प्रश्न विचार करण्यासारखा सुद्धा नाही का?? पुलावामा घटना झाल्यावर विविध ठिकाणी प्रचारसभा घेणे, फोटो काढणे आणि इतर दिखाऊ उपक्रम करणारा असंवेदनशील पंतप्रधान आम्हाला चालतो आणि सचिन तेंडुलकरने साधे तर्काधारीत व्यक्त केलेले मत चालत नाही?? त्याला घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करायची? हे असे सवंग देशप्रेम नको, या असल्या वरवरच्या राजकारणप्रेरीत-देशप्रेमाचा घाणेरडा वास येतो.

आता ही भक्तगिरी सोशल मीडिया इतकीच मर्यादीत राहिलेली नाही. ती आता टीव्ही चॅनेलच्या मीडिया रुमपर्यंत पोहोचली असून मीडियारुमध्ये येणाऱ्या गेस्टला आता देशभक्तीचे सर्टिफिकेट वाटले जात आहे. त्यामुळे देशातील नामांकित चॅनेलमधून सुरु असलेल्या डिबेट शोमधून गेस्ट उठून जात आहेत. गेस्टवर आपलं मत लादलं जात आहे. देशभक्ती नवी व्याख्या आता या देशात मांडली जात आहे.

सध्या घडणाऱ्या या घडामोडींवर आयसीसीचे माजी अध्यक्ष अध्यक्ष शरद पवार यांनी सचिन तेंडुलकरला शिव्या घालणाऱ्या भक्तांना चांगलंच सुनावले आहे.

मी आयसीसीचा अध्यक्ष म्हणून काम पाहिलं, जगाचं क्रिकेट अनुभवलं. मात्र आज क्रिकेटसारख्या खेळातही वाद घडवले जात आहेत व सचिन तेंडुलकर, सुनील गावसकर अशा महान खेळाडूंचा अपमान केला जात आहे. .सचिन तेंडुलकर यांनी एक भूमिका मांडली की भारताच्या खेळाडूंना पाकिस्तानशी क्रिकेट सामना करू द्या. त्यांचा पराभव करण्याची धमक आमच्या खेळाडूंमध्ये आहे. मात्र त्यांच्यावर जातीयवाद आणि पाकिस्तान प्रेमाचा ठपका ठेवला गेला. ज्यांनी सचिनवर आरोप केले त्यांना माहीत नाही वयाच्या १५व्या वर्षी सचिनने पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानचा पराभव केला होता. पराभव करण्याची धमक ज्या सचिनमध्ये आहे त्यावर आरोप केले गेले याची खंत वाटते. याचे एकच कारण आहे. यांना विष पसरवायचे आहे.

अशा शब्दात शरद पवार यांनी भक्तांना सुनावले.

सचिन तेंडुलकर आम्ही 'शर्मिदा' आहोत, आम्हाला माफ कर की आमच्यापैकी काही जण भारताचे नागरिक असण्यापेक्षा एका राजकीय पक्षाचेच आहेत, असे काहीजण एखाद्या राजकीय पक्षाच्या नेत्याच्या पायाशी लोळण घेणारे आहोत, ते काही जण आधी धर्माचा आणि मग देशाचा विचार करणारे आहेत. सभ्यतेने चर्चा करताच येणार नाही असे वातावरण आधी निर्माण करायचे, आपल्याला चिडवायचे आणि आपण चिडून काही बोललो की त्याचा गवगवा करणारी ही मंडळी असली तरीही त्यांचे असे अमानुष, द्वेषपूर्ण वागणे गंभीरतेने घ्यावे लागेल कारण अशा लोकांची संख्या वाढली तर देशाचे मानसिक संतुलन बिघडेल अशी मोठी भीती निर्माण झाली आहे.

- असीम सुहास सरोदे

[button color="" size="" type="square" target="" link=""]लेखक संविधानतज्ञ वकील आहेत.

[email protected][/button]

Updated : 24 Feb 2019 2:44 PM GMT
Next Story
Share it
Top