बॉलिवूडच्या ‘लव्हर बॉय’ची अशीही हिरोगिरी !

Rishi kapoor Bobby

लव्हर बॉय म्हणून प्रसिद्ध असलेले ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांची अनेक वैशिष्ट्ये आहेत. हिंदी सिनेसृष्टीच्या दोन वेगवेगळ्या कालखंडातील नायिकांसोबत ऋषी कपूर यांनी हिरो म्हणून भूमिका साकारल्या. पण ऋषी कपूर यांचं आणखी एक खास वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी १९ पेक्षा जास्त अभिनेत्रींसोबत त्यांच्या पहिल्या सिनेमात हिरोचे काम केले होते. ऋषी कपूर यांच्याशिवाय आतापर्यंत हा विक्रम अजून तरी कोणत्याही हिरोला करता आलेला नाही. ऋषी कपूर यांच्यानंतर अक्षयकुमार आणि सलमान खान यांनी जवळपास १० नायिकांच्यासोबत त्यांच्या पहिल्या सिनेमामध्ये हिरो म्हणून काम केले आहे. तसेच जवळपास ५० नायिकांच्या सोबत ऋषी कपूर यांनी पडद्यावर रोमांस रंगवला, हा सुध्दा बॉलिवूडमधील एक अनोखा विक्रम आहे. इतक्या नायिकांसोबत पडद्यावर रोमांस रंगवणारा ऋषी कपूर हा कदाचित बॉलिवूडमधला एकमेव हिरो असू शकेल.

बॉबी या चित्रपटद्वारे ऋषी कपूर यांनी बॉलिवूडमध्ये हिरो म्हणून पदार्पण केले. त्याआधी बालकलाकार म्हणून श्री ४२० आणि मेरा नाम जोकरमध्ये ते पडद्यावर झळकले होते. मेरा नाम जोकर साठी त्यांना सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा राष्ट्रीय पुरस्कारदेखी मिळाला होता.

हे ही वाचा..

बॉबी चित्रपटात त्यांची पहिली नायिका होती डिंपल कपाडिया. राजकपूर यांनी या सिनेमासाठी नितू सिंगची निवड केली होती. पण राज नवा चेहरा पाहिजे म्हणून त्यांनी डिंपल कपडियाची निवड केली. बॉबी सिनेमापूर्वी नितू सिंगचे चार-पाच सिनेमे येऊन गेले होते. पण त्यानंतर ऋषी कपूर – नितू सिंग यांनी अनेक चित्रपट केले आणि १९८० मध्ये विवाहबद्ध झाले.
बॉबी हा ऋषी कपूर आणि डिंपल कपाडिया या दोघांचा पहिली सिनेमा…. पण त्यानंतर ऋषी कपूर यांनी जवळपास २० अभिनेत्रींसोबत त्यांच्या पहिल्या सिनेमामध्ये काम केले.

या अभिनेत्रींच्या पहिल्या सिनेमात ऋषी कपूर होते हिरो
काजल किरण (हम किसीसे कम नहीं)
शोमा आनंद (बारुद)
भावना भट (नया दौर)
जयाप्रदा (सरगम)
राधिका आणि फराह (नसीब अपना अपना)
नसीम (कभी कभी)
प्रियंका (सांबार साल्सा)
रंजिता (लैला मजनू)
गौतमी (नकाब)
विनीता गोयल (जनम जनम)
झेबा बाख्तीयार आणि अश्विनी भावे (हिना)
शीला शर्मा (दरार)
सोनम (विजय)
रुकसार रेहमान (इंतेहा प्यार की)
तब्बू (पहला पहला प्यार)
पद्मिनी कोल्हापुरे (जमाने को दिखाना है)
संगीता बिजलानी (हथियार)

ऋषी कपूर यांनी या नव्या नायिकांसोबत तर काम केलेच पण त्याचबरोबर त्यांनी राखी, हेमा मालिनी, टीना मुनीम,श्रीदेवी, माधुरी दीक्षित, झीनत अमान, परवीन बाबी, शबाना आजमी, जुही चावला, मीनाक्षी शेषाद्री, मौसमी चटर्जी, रिना रॉय, नीलम, किमी काटकर, अमृता सिंग, रती अग्निहोत्री, ऊर्मिला मातोंडकर, वर्षा उसगांवकर, रवीना टंडन, मनीषा कोईराला, पूजा भट, दिव्या भारती या नायिकांसोबतही काम केले आहे. पत्नी नितू सिंगसोबत त्यांनी यशस्वी चित्रपट केले.

दुर्दैवी योगायोग

ऋषी कपूर यांच्या एक दिवस अगोदर निधन झालेल्या अभिनेते इरफान

खानसोबत त्यांनी डी डे (D-Day) या सिनेमात काम केले होते. यात ऋषी कपूर यांनी अंडरवर्ल्ज डॉन दाऊदची भूमिका साकारली होती. तर इरफान खान यांनी दाऊदला भारतात परत घेवून जाणाऱ्या भारतीय रॉ एजंटची भूमिका निभावली होती. विशेष म्हणजे यात इरफान खान यांच्या मृत्यूनंतर लगेच ऋषी कपूर यांचाही मृत्यू दाखवला होता, प्रत्यक्ष जीवनातही असेच घडले…हा सुध्दा एक दुर्दैवी योगायोग.
अशा या हरहुन्नरी कलावंताला मानाचा मुजरा आणि अलविदा…..

लक्ष्मीकांत पाटील, सिने समीक्षक