Home > मॅक्स ब्लॉग्ज > शेणापासून तयार केलेली चिप फोनचे रेडिएशन कमी करते! कामधेनू आयोगाच्या अध्यक्षाचा दावा...

शेणापासून तयार केलेली चिप फोनचे रेडिएशन कमी करते! कामधेनू आयोगाच्या अध्यक्षाचा दावा...

गाईच्या शेणापासून तयार केलेली चिप सेलफोनवर ठेवली असतां रेडिएशन कमी करते. असा दावा राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांनी केला आहे. मात्र, हा दावा खरा की खोटा? वाचा Hemant Karnik यांचा वैज्ञानिक दृष्टीकोन जागवणारा लेख

शेणापासून तयार केलेली चिप फोनचे रेडिएशन कमी करते! कामधेनू आयोगाच्या अध्यक्षाचा दावा...
X

देशातील ४०० पेक्षा अधिक वैज्ञानिकांनी राष्ट्रीय कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कथिरिया यांना एक अनावृत पत्र पाठवले आहे. १३ ऑक्टोबर रोजी कथिरिया यांनी पत्रकारांना सांगितले की, गाईच्या शेणापासून एक चिप तयार करण्यात आली आहे, जी सेलफोनवर ठेवली असतां रेडिएशन कमी करते. तर, ही माहिती त्यांना कुठून मिळाली, असे हे वैज्ञानिक विचारत आहेत.

पत्रात हे वैज्ञानिक कथिरियांना उद्देशून म्हणतात, ''आपली सर्व विधाने वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेली आहेत, असेही आपण म्हणालात. तर, सदर वैज्ञानिक प्रयोग कुठे आणि कधी झाले? या संशोधनात कोणाचा पुढाकार होता? त्यातील निष्कर्ष कुठे प्रसिद्ध करण्यात आले? ते जर एखाद्या संशोधनसंबंधित पत्रिकेत प्रसिद्ध झाले असतील, तर त्यांची छाननी इतर तज्ञांकडून झाली आहे का? प्रयोगातील डेटा आणि प्रयोगाचे तपशील मिळू शकतील का?''

या संशोधनासाठी सार्वजनिक निधी, म्हणजे लोकांचा पैसा, किती खर्च करण्यात आला, असे विचारून पत्रात संशोधन पुरस्कृत करणाऱ्या निधी पुरवठादार संस्थेच्या तपशिलांची मागणी करण्यात आली आहे. पुढे असेही म्हटले आहे की ''तुम्ही केलेल्या दाव्यांची पुष्टी करणारा असा सुयोग्य डेटा जर तुमच्यापाशी नसेल, तर तुमची पत्रकार परिषद अंधश्रद्धेच्या आणि फसव्या विज्ञानाच्या प्रसारासाठी होती, असे ठरते आणि हे कृत्य घटनेच्या ५१ए(एच) या अनुच्छेदाला छेद देते; कारण सदर अनुच्छेदामध्ये म्हटले आहे की 'वैज्ञानिक वृत्ती, मानवतावाद आणि चौकसपणा व सुधारणा या प्रेरणा यांची जोपासना करणे हे भारताच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे.'

पत्रात पुढे असेही म्हटले आहे की ''हा आयोग जनतेच्या पैशावर कार्य करीत असल्याने सदर दावे जर वैज्ञानिक पाठबळाविना करण्यात आले असतील, तर ... त्याचा अर्थ जनतेच्या पैशाची नासाडी, तीही देशाचे हरेक क्षेत्र निधीसाठी धडपडत असताना केलेली नासाडी, असा होऊ शकतो.'' या पत्राशी मुंबई आयआयटी, टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एजुकेशन अँड रिसर्च येथील व इतर वैज्ञानिक संबंधित आहेत. त्यातले अभिजीत मजुमदार म्हणतात,

''विज्ञान हे पुराव्याच्या आधारावर उभे असते, दाव्यांच्या नव्हे. हा दावा खोटा आहे, असे आमचे म्हणणे नाही; हा दावा वैज्ञानिक आहे, असे सिद्ध करणारा पुरावा काय आहे, इतकेच आम्ही विचारत आहोत.'' कालच्या इंडियन एक्स्प्रेसमधली ही बातमी. हे कुणाचे मत नाही, घडलेल्या घटनेचा हा वृत्तांत आहे. ही बातमी आहे. असे घडले आहे. मात्र, याला कोणी काही उत्तर देईल, अशी अपेक्षा नाही. मुद्दा तो नाही. ''काय ते विज्ञान फिज्ञान! फेकून द्या ते कचऱ्याच्या डब्यात,'' असे कोणाला का वाटत असेल? हा मुद्दा आहे.

(हेमंत कर्णिक यांच्या फेसबुक भिंतीवरून)

Updated : 20 Oct 2020 4:02 AM GMT
Next Story
Share it
Top