Home > मॅक्स ब्लॉग्ज > अर्णब गोस्वामी Vs सोनिया गांधी आणि सोशल मीडियावर व्यक्त होणारी खदखद

अर्णब गोस्वामी Vs सोनिया गांधी आणि सोशल मीडियावर व्यक्त होणारी खदखद

अर्णब गोस्वामी Vs सोनिया गांधी आणि सोशल मीडियावर व्यक्त होणारी खदखद
X

सोनिया गांधी यांना नाव ठेवणाऱ्या लोकांनी विशेषतः महिलांनी फक्त विधवा झाल्यानंतरचे आयुष्य कसे असेल? याचा विचार करून पहावा, त्यात किती त्याग आणि पीडा असते. हे त्यालाच माहीत ज्याच्या माथी हे दुर्भाग्य आले आहे. महिलांनी महिलांच्या हक्कासाठी झटणे सोडून कथित रूढी परंपरा मान्य करून महिलांच्या हक्काच्या आड येणे. म्हणजे अधोगतीचे लक्षण आहे.

महिलांच्या हक्कासाठी महिलांपेक्षा जास्त पुरुष मंडळी पुढे आलेली दिसतात; इतिहासही हेच सांगतो. हे महिलांसाठीच दुर्दैव आहे आणि पुरुष मंडळीच स्वागत करण्याची बाब; आपल्या हक्काची जाणीव आपल्याला नसावी. ही फार केविलवाणी गोष्ट आहे. आयुष्य हे फक्त मान मरातब आणि पैसा यात नसतं.

आपल्या आयुष्याचा जोडीदार जेव्हा सुख दुःखात सोबत नसतो. तेंव्हा मिळालेल्या यशाचं कौतुक आणि आलेल्या दुःखाचं सांत्वन करायला आपला मायेचा हात नसतो. हे विष प्यायला फार मोठी हिंमत लागते. यश मिळाल्यावर बाहेरील लोकांनी कितीही मोठी सत्कार समारंभ पार पाडली. तरी आपल्या माणसाने दिलेलं फुल किंवा कौतुकाची थाप ही त्याहूनही मोठी असते. जन्म आणि वास्तव्य इटलीचे असले तरीही भारतासारख्या जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीच्या देशात पंतप्रधान असलेल्या व्यक्तीच्या पत्नी म्हणून मिळालेला काळ. त्यानंतर दुर्दैवी मिळालेलं वैधव्य. हे त्याहूनही जास्त काळासाठी त्यांना भोगावे लागले आहे.

एखाद्या विधवा घटस्फोटित किंवा लग्न न केलेल्या स्त्रीला नाव ठेवायला लोकांना फार अभिमान वाटतो. किंवा त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायला फार मोठेपणा वाटतो. परंतु एक विधवा, घटस्फोटित किंवा लग्न न केलेल्या स्त्री कडे समाजाची असलेली घाणेरडी नजर. ही फक्त तीच महिला समजू शकते आणि त्यासारखं किळसवाण आयुष्य तिने जगणे. हे तिचं निव्वळ कौतूकास्पद आहे. कारण थोड्या अपयशाने आत्महत्या करणाऱ्यांची संख्या पाहिल्यास असे जीवन जगणाऱ्या महिला मला नेहमी थोर वाटतात.

सोनिया गांधी या मुळात भारतीय नसल्या तरी त्यांनी भारतीय संस्कृतीत स्वतःला मिळवून घेण्याचा आटोकाट प्रयत्न केलेला आहे. १००% परिपूर्ण कुणीच नसतो आणि त्यांना नाव ठेवणाऱ्यांनी जर स्वतःच आत्मचिंतन केलं. तर त्यांची लायकी त्यांना आपसूकच कळून येईल.

सोनियाजी या मूळच्या इटलीच्या आहेत आणि त्यांनी काँग्रेस वर वर्चस्व मिळवलं याही पेक्षा मोठं दुःख आहे. ते त्यांचं एक महिला असणं आणि भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असलेल्या देशातील लोकांना हे कधीच न मान्य होणारं आहे. भले आपल्या देशाला महिला पंतप्रधान आणि राष्ट्रपती मिळालेल्या असल्या तरीही एक महिला म्हणून त्यांना झालेला त्रास सुद्धा नाकारता येणारा नाही.

६० पैशावर ट्रोल करणाऱ्या कोणत्याही पक्षाच्या भिकार ट्रोलर्स नी त्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले. तरी त्याने सोनियाजी यांची किंमत कमी होणार नाही. पती नसल्यावर एका अनोळखी देशातील सरकार चालवणे. ही कसोटी त्यांनी अगदी योग्य हाताळली. ही मोठी कौतुकास्पद गोष्ट आहे. एक व्यक्ती म्हणून आपला साथीदार गमावणे आणि त्याचा आपल्या आयुष्यावर होणारा परिणाम, त्या लोकांना कधीच कळणार नाही.

जे घरात माय बाप बायको लेकरं असूनही त्यांची किंमत न करता सोनियाजी यांना ट्रोल करतात. घरात असलेल्या म्हाताऱ्या आई बापाला कवडीचीही किंमत न देणाऱ्या लोकांकडून गांधी आणि नेहरू परिवाराला ट्रोल केलं जातं; त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यावर राळ उठवली जाते. पती नसल्यास असलेली व्यथा आणि इतकं सगळं झुगारून देशाचा गाडा चालवणे. ही तारेवरची कसरत पार करणे म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे.

इंदिराजी या सडेतोड होत्या जे बोलायच्या ते करूनही दाखवायच्या! कुणालाही न घाबरणाऱ्या होत्या, कुणालाही भीक घालत नव्हत्या आणि देशासाठी स्वतःचा जीव अर्पण करायलाही भिणाऱ्या नव्हत्या. ज्या दिवशी त्यांची हत्या झाली. त्याच दिवशी त्यांना याबाबद्दल सूचना दिलेली असूनही त्या न घाबरता घराबाहेर पडल्या! याला वाघाचं काळीज लागतं. जे त्यांच्यात होतं म्हणून अमेरिका सारख्या बलाढ्य देशाने बंगाल च्या उपसागरात युद्ध नौका पाठवून सुद्धा काही करु शकला नाही. आणि बांगलादेशासारखा नवीन देश निर्माण करण्यात इंदिराजी यांनी खूप मोठं काम करून दाखवलं. पाकिस्तानचे दोन तुकडे झाले.

अमेरिका सारख्या देशाला भीक न घालता आम्ही सुद्धा कमी नाही. ही भूमिका घेऊन त्यावर पाऊले उचलायला ५६इंच नाही लागत, लागते ती फक्त धमक जी एक महिला असूनही इंदिराजींनी जे केलं ते त्यावेळी जगाला एक संदेशच होता. परंतु सोनियाजी या परखड नाहीत, त्या कमी बोलतात, कधी शक्यतो सडेतोड बोलत नाहीत. त्या LOW PROFILE असतात.

परंतु त्यांची कार्यशैली ही बरीच धडाकेबाज आहे. हे त्यांनी आणलेल्या सरकारने केलेल्या कामावरून दिसून येते. देशातील सर्वात मोठ्या राष्ट्रीय पक्षावर असलेली त्यांची प्रतिभा आणि वचक हा मुद्दा लक्षात घेण्यासारखा आहे. आपण समोरच्या व्यक्तीचे दुःख तेंव्हाच समजू शकतो. जेंव्हा ते दुःख आपल्या वाट्याला आले असेल किंवा आपण कमालीचे समजूतदार असू. अथवा दुरून डोंगर साजरे या उक्तीप्रमाणे घरात बसून लोकांची लायकी काढणे म्हणजे आपली किती खरकटी आहे. हे न पाहता लोकांच्या बुडाखाली अंधार शोधण्यासारखं आहे.

तसेच पुढे पाहता, बाप नसलेला मुलगा किंवा मुलगी यांना लहानपणापासून कोणत्या गोष्टींना सामोरे जावे लागते. हे माय बाप असणाऱ्या पाल्यांना कधीच कळणारे नाही. नाही! बिलकुल भावनिक पोस्ट लिहिण्याचा हेतू नाही. किंवा कुणाला प्रभावित करून लाळघोटेपणा करायची कधीच इच्छा नाही. पण हे दुःख तोच जाणवू शकतो. जो यात होरपळलेला आहे.

सोनिया गांधी किंवा राहुल गांधी यांना नाव ठेवणे तितकेच सोपे आहे. जितके आपल्याला कुठल्याही गोष्टीचा गंध नसताना त्यावर प्रतिक्रिया देणे. घरावरील छप्पर जेंव्हा उडते. तेंव्हा आपण उघडे पडतो. अगदी हीच भावना त्या विधवा महिलेस किंवा बाप जिवंत नसलेल्या पाल्यास होते. आणि याचा परिणाम सामाजिक दृष्टिकोनातून पाहिल्यास लोकांची वागणूक सुद्धा घाणेरडी होऊन दुजाभाव असणारी बनते.

कुणी म्हणेल सोनिया गांधी किंवा राहुल गांधी हे फार मोठ्या घरातील आहेत. त्यांना याचं काय दुःख असेल? मला सांगा #metoo चळवळ ही काही गरीब परिवारातून आली नव्हती. म्हणजे ती त्या परिवारात नव्हतीच असेही नाही. मग जर आजवर कोणत्याही एकट्या स्त्रीला सामाजाच्या घाणेरड्या नजरेपासून कुणी वाचवू शकले नाही. तर सोनिया गांधी तर या वाईट प्रसंगातून कश्या वाचल्या असतील! आणि आपल्याकडे white collar crime हा प्रकार जास्त आहे.

त्यानुसार त्यांच्याविषयी अशी भावना निर्माण न होणं ही शक्यता फार कमी आहे. परंतु तरीही सोनियाजी या मोठ्या पदावर असताना त्यांच्याकडील जबाबदाऱ्याचा प्रचंड कामाचा ताण, त्यात व्यक्तिगत आयुष्य पूर्णतः होरपळून निघालेलं असताना; आधी सासूची हत्या, मग नवऱ्याची हत्या अशा भीतीच्या वातावरणात देशातील सर्व जनतेच्या हिताचीच कामे करण्यात त्यांनी धन्यता मानली. सुडाचे राजकारण त्यांनी केले नाही.

जे आजकाल आपण सर्रास पाहतो आहे, तशी दुफळी आणि धर्मांध वातावरण त्यांच्या सरकारने कधीच केले नाही. चूका प्रत्येकाकडून होतात. त्यांनीही केल्या असतील. परंतु मोजक्या चुका धरून आणि केलेली जनहिताच्या कामे सोडून देणारी लोक निव्वळ सुडाची भावना असणारी आहेत हे खरं. इतकं सगळं घरात घडलेले असताना सुरक्षित नसल्याची भावना निर्माण होऊनही सर्व समर्थपणे चालवायला ५६ इंच काळीज असायची गरज खरच नसते. हो, लागते ते फक्त हिंमत आणि क्षमता जी या महान महिलेत आहे. शांत, संयमी आणि मितभाषी असणे ही त्यांच्या यशाची गुरुकिल्ली आहे.

एक महिला म्हणून त्यांचा आदर आहेच पण एक विधवा असूनही सगळं समर्थपणे पार पाडणे. ही भूमिका अगदी कौतुकास्पद आहे. दुरडीमध्ये भाकरी असताना उपाशी लोकांवर टीका टिप्पणी करणे फार सोपे असते. परंतु जेंव्हा भूक असते आणि खायला मिळत नाही. तेंव्हा त्या भुकेल्या जीवाची किंमत कळते. हे वास्तव आहे. जे आजच्या पिढीला मान्य नाही, हेच खरे दुर्दैव आहे. फक्त १३० कोटी जनता माझी आहे.

त्यांच्यासाठी झटणे ही गोष्ट महत्वाची असते. आपल्या परिवारातील व्यक्तीची हत्या होते. किंवा त्यांच्या जाण्याला कारणीभूत असलेली व्यक्ती जेंव्हा सर्रास बाहेर मोकळी फिरते. तेव्हा अन्याय काय असतो? हे त्यालाच माहीत आहे. ज्याने हे भोगले आहे.

असो इथे सोनियाजी किती ग्रेट किंवा महान आहेत हा हेतू नाही, तर त्यांनी ज्या यातना भोगल्या असतील त्याचीही जाणीव त्यांच्यावर टीका करण्याआधी असायला हवी. आता आला प्रश्न अर्णब चा, ज्या माणसाला आपली पत्रकारितेची पातळी इतक्या खाली नेऊन ठेवली आहे. त्याने सोनिया गांधींबद्दल काही बरळणे म्हणजे फार मूर्खपणाचे लक्षण आहे. अर्णब आणि त्याची वैचारिक पातळी ही पूर्णतः थुकरत आहे. हे कुणी सांगायची गरज नाही.

पत्रकाराला त्याचं एकांगी किंवा कुण्या पक्षाची विचारसरणी आवडणे. ही लोकशाहीची देणं आहे, परंतु एखाद्या वाहिनी च्या माध्यमातून व्यक्त होताना पूर्णतः निःपक्षपाती असणे. ही त्याची जबाबदारी आणि कर्तव्य आहे. पंरतु धार्मिक द्वेष माजवणे आणि अल्पसंख्याकांना दोषी ठरविणे, खोट्या बातम्या पसरवणे, बातमी देण्याची घाई करून त्यात नेहमीच चुकीची माहिती देणे. ही सगळी मूर्ख कामं अर्णब करतो. आता त्याच्यावर हल्ला झालां हे ट्विट त्याने करून काँग्रेस वर आरोप केला. परंतु हसण्यावारी हे आहे की, त्याचे ट्विट यायच्या आधी संबीत पात्रा यांनी एक मिनिट आधी याबद्दल निषेध नोंदनवला!

#chronology कळतीये का?

ही आहे सुडबुद्धी आणि द्वेष पसरवण्याची भावना.

Updated : 23 April 2020 12:19 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top