Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'राज'कीय पश्चातापाचे अटळ भविष्य!

'राज'कीय पश्चातापाचे अटळ भविष्य!

राजकीय पश्चातापाचे अटळ भविष्य!
X

राज ठाकरेंचं (Raj Thackeray) भाषण ऐकलं. लाईव्ह ऐकायला वेळ मिळाला नाही. म्हणून रात्री उशिरा ऐकलं. एक चांगला नेता, योग्य आणि अयोग्य यांची जाण असलेला नेता, स्वतःचा करिश्मा असलेला नेता, चांगल्या साहित्याची, संगीताची समज असलेला नेता, राजकीय अपयशापोटी नैराश्येतून इतकं टोकाचं पाऊल उचलेल असं वाटलं नव्हतं. त्यांचं हे भाषण हीच त्यांची भविष्यातली राजकीय दिशा असेल तर ती त्यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी पश्चातापाची दिशा असेल याबद्दल अजिबात शंका नाही.

काय म्हणाले राज ठाकरे? CAA आणि NRC विरोधात जी आंदोलनं सुरू आहेत. ती म्हणजे मुस्लिम समाजाचा ३७० आणि राम मंदिर बद्दलचा राग आहे म्हणून निघत आहेत. हा शोध त्यांना कुठे लागला तर 'कोणीतरी म्हणालं' म्हणे!

राज ठाकरे यांना जमलं तर थोडं वेषांतर करून देशात ठिकठिकाणी जी सामान्य माणसांनी आंदोलनं चालवली आहेत तिथे एकदा जावं! मग त्यांना कळेल की हे कोणीतरी त्यांना जे काही सांगत आहे ते किती पोकळ आहे!! शाहीन बाग ते दरभंगा आणि हैदराबाद ते मंगळुरू अशी देशभर प्रचंड मोठी आंदोलनं उभी राहिलीत. एकतर ती एक धर्मीय म्हणजे मुसलमानांची नाहीत आणि दुसरं म्हणजे या आंदोलनातून ठिकठिकाणी सामान्य महिलांनी, मुलींनी आणि तरुणींनी पुढाकार घेतलेला आहे!

हा, पण ही आंदोलनं हिंदू विरुद्ध मुस्लिम आहेत. असं भासवण्याचा एक कट आहे. तो भाजपला सरेंडर झालेला मीडिया आणि भाजप यांचा आहे. मीडियाच काय तर देशातल्या सगळ्याच संस्था कश्या केंद्र सरकारच्या सत्तेसमोर नतमस्तक झाल्या आहेत. हे राज ठाकरेंशिवाय आणखी कोण चांगलं सांगू शकेल?! यासाठी आपले लोकसभेचे सगळे व्हिडीओ काढून त्यांनी बघितले तरी पुष्कळ आहे!!

हिंदुत्ववाद्यांचा आणखी एक नेहमीचा डायलॉग त्यांनी मारला. अमुक अमुक मुसलमान हे देशभक्त आहेत. पण मी सरसकट मानणार नाही वगैरे वगैरे. राज ठाकरेंकडे कधीपासून देशभक्तीची सर्टिफिकेट मिळायला लागली? नाही म्हणजे ही सर्टिफिकेट वाटण्याचा अधिकार भाजपने बळकावला होता. तो त्यांनी राज यांना शेअर केला की बहाल केला?

एक तर इतकं गंभीर आणि भयंकर विधान केलं की युद्ध सुरू झालं तर म्हणे सीमेवर नाही. तर देशात हे जे मोहल्ले उभे राहिलेत तिथे ताकद लावावी लागेल. आपण काय बोललो आहे. हे त्यांनीच जरा आज नीट ऐकावं! या देशात नेमकं काय व्हावं असं राज यांना वाटतं? या वाक्याचे पडसाद नेमके काय उमटू शकतात हे त्यांना समजत नाही का?

राज यांना माहितीये का की दोन दिवसांपूर्वी एक आदित्य राव नावाचा मुलगा मंगळुरू मध्ये बॉम्ब प्लांट केला म्हणून पकडला गेला! ज्या पुलवामा बद्दल प्रश्न उपस्थित करण्याची कौतुकास्पद हिंमत राज यांनी अवघ्या 8 महिन्यापूर्वी दाखवली होती.

त्या ठिकाणी देवींदर सिंग नावाचा पोलीस अधिकारी दहशतवाद्यांना आपल्या गाडीतून नेताना पकडला गेला! आणि हा देवींदर त्याला अटक करणा-या ऑफिसरला 'यह गेम है, खराब मत करो' असं म्हणाला म्हणे! आता या लोकांची सर्टिफिकेट देशभक्तीची आहेत की, देशात घातपात घडवून आणणारी आहेत? यांच्या मोहल्ल्यांचं काय करायचं राजसाहेब?! तेव्हा देशविरोधी कृत्ये हा एका धर्माच्या विरोधातला मुद्दा नाहीये. तर तो सगळ्या धर्मांमधल्या समाजविघातक घटकांमधला आहे हे लक्षात असू द्यावं.

CAA नंतर उत्तरप्रदेशात, दिल्लीत सरकार पुरस्कृत हिंसाचार झाला. महाराष्ट्र शांत राहिला त्याचं कारण इथल्या नेतृत्वाने शहाणपणा दाखवला. राज ठाकरे यांनी राज्याच्या शांततेकडे बघावं. ती ढासळावी अशी इच्छा असणाऱ्या शेठजींना राजनखांची साथ मिळता कामा नये ही महाराष्ट्राची किमान अपेक्षा आहे!

लोकसभा निवडणुकानंतर एका भव्य अपेक्षेने तुमच्याकडे देशातली डोकं ठिकाणावर असलेली आणि धर्म, जात यांच्या वादांच्या वर उठून, या वादांमागे असणारे मेंदू कोण आहेत? याची कल्पना आल्यामुळे देश एकसंध राखु पाहणारी मंडळी बघत होती. ती मंडळी ह्या भाषणाने निराश झाली!

अधिक नेमकं सांगायचं तर या मंडळींच्या आशा निराशेची फारशी तमा नाही. सार्वजनिक आयुष्यात मतभेद झाल्यावर असे प्रसंग येतातच. पण राज ठाकरे इतिहासाच्या लेखी पूर्णतः चुकीच्या, दमनकारी आणि धूर्त यंत्रणांच्या बाजूने उभे राहिले. याची इतिहासात होणारी नोंद अधिक क्लेशदायक आहे. ही भूमिका कदाचित आता नजीकच्या काळात यश मिळवून देईल. पण दीर्घकालीन भविष्यात मात्र, राज यांना या भूमिकेबद्दल अभिमानाने सांगता येण्यासारखं काहीही असणार नाही हे नक्की आहे.

हा काळ अभूतपूर्व आहे. भारताच्या नजीकच्या इतिहासात आताच्यासारखा काळ आला नव्हता. या देशाच्या आत्म्याचा संघर्ष सुरू आहे. तो शाहीन बागेत सुरू आहे, तो जेएनयू आणि जामियामध्ये सुरू आहे, तो पुणे विद्यापीठात सुरू आहे आणि गुवाहाटीमध्ये सुरू आहे, तो चेन्नईत सुरू आहे आणि कोचीत सुरू आहे, तो पतियाळामध्ये सुरू आहे. श्रीनगरमध्ये सुरू आहे. आज आपण सगळेच जण त्या संघर्षाच्या मधोमध उभे आहोत. आणि त्यामुळे त्याचं महानपण, त्याचं लखलखतेपण, त्याचं अथांगपण आपल्याला जाणवत नाहीये. पण हा काळ उलटेल. तेव्हा भारताने आपल्यातल्याच वर्णवर्गवर्चस्ववाद्यांशी कशी रोमांचक झुंज दिली. याची जाणीव इथे पसरेल. या संघर्षात मग कोण कुठल्या बाजूला उभं राहिलं. हेही समोर येईल आणि राज साहेब, हे अत्यंत दुर्दैवाने, खेदाने सांगतो, तुम्ही या दमनकारी यंत्रणाना अंगावर घेणारे अवघ्या काही काळापूर्वीचे हिरो अखेर त्यांच्या बाजूने झुकले होते याबद्दल इतिहास हळहळ व्यक्त करेल.

Updated : 24 Jan 2020 4:36 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top