राहुल गांधी, वीर सावरकर आणि आपण सगळे!

सत्तर वर्षे वयाची आपली संसदीय लोकशाही. गेले काही दिवस ज्या भाषेत सामाजिक , राजकीय चर्चा सुरु आहेत, त्यामुळे ही लोकशाही परिपक्व होण्याऐवजी ठिसूळ होत तर चालली नाही ना,याची शंका वाटू लागली आहे.

१.लोकसभेत कामकाजाच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या महिला सदस्यांनी काँग्रेस सदस्य राहुल गांधी यांच्या एका जाहीर भाषणातील एक संदर्भ निवडून गोंधळ घातला. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी या तर बात का बतगड करण्यात विशेष माहीर.त्यांनी या विषयाला लोकसभेत खूप जोरजोरात बोलून गोंधळ वाढवला. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला हे अक्षरशः सुन्न झाले आणि त्यांनी कामकाज तहकूब केले.

राहुल गांधी यांनी रेप in India असे जे विधान केले होते, त्याचे गांभीर्य समजून न घेता भाजपने त्यावर जो गोंधळ घातला,तो पूर्णतः चुकीचा होता. याच भाजपा महिला सदस्यांनी कथुआ, Unnav, हैदराबाद येथील भीषण बलात्कार घटना घडल्या,त्यावेळी किती मौन पाळले होते,हे आम्ही विसरलो नाही!

२.राहुल गांधी यांनी माफी मागायला मी राहुल सावरकर नाही,असे विधान जाहीर सभेत करून अकारण वाद ओढवून घेतला आहे. सावरकर यांच्या सशस्त्र क्रांती भूमिकेला स्वातंत्र्य चळवळीत गांधीजी आणि त्यांच्या अनुयायी यांचा विरोध होता आणि तो रास्त होता. लंडन आणि भारतातील हिंसक कारवाया यांच्यामुळे सावरकरांना अटक झाली आणि अंदमान येथे सेल्युलर जेलमध्ये दोन जन्मठेपेच्या शिक्षेसाठी रवानगी झाली. तेथे त्यांनी बाहेर पडण्यासाठी माफी पत्रे लिहिली होती, ज्यामुळे राहुल गांधी यांनी माफी मागायला मी राहुल सावरकर नाही,असे विधान केले.असे त्यांनी करायला नको होते,कारण त्यामुळे आता भाजपच्या हातात काँग्रेसला सतत दूषणे देण्यासाठी एक निमित्त सापडले आहे.

आता महाराष्ट्रातील एक उच्चभ्रू वर्ग, सावरकरप्रेमी जमेल तशी राहुल गांधी आणि काँग्रेसची नाचक्की करत राहतील.त्याचे पडसाद उमटत आहेत. वृत्तवाहिनी आणि समाज माध्यमांवर असभ्य, असंस्कृत भाषेत निंदानालस्ती सुरु झाली आहे. यानिमित्ताने पुन्हा गांधीजी हेही लक्ष्य केले जात आहेत.
राहुलने असे विधान करायला नको होते.

३.या संदर्भात सावरकरांचे साहित्य, त्यांची माफिपत्रे आणि त्यांची अंदमांमधील शिक्षा याविषयी अनेक लोक मुक्ताफळे उधळत आहेत. त्यांच्या सामाजिक विचाराबद्दल कौतुक करणारे त्यांच्या हिंदुत्व भूमिकेबाबत गप्प राहतात,ते सहेतुकच असते.या भूमिकेमुळे आणि जीना यांच्या दुराग्रही विचारांनी,भारताची फाळणी धार्मिक आधारे करण्याचा विचार मांडला गेला,हे लक्षात घेतले पाहिजे.जे सावरकर १८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध पुस्तकरूपाने लिहिताना बहादूरशहा जाफरचा शेर गौरवाने नोंदवतात,तेच अंदमान जन्मठेप काळात हिंदू अस्मितेचे भाष्यकार होतात,हा त्यांच्या वैचारिक प्रवासातला फरक स्पष्ट आहे.

४.उद्यापासून महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरु होणार.राहुल गांधींच्या विधानामुळे एक अजेंडा आता नक्की झाला आहे. भाजपला आता महविकास आघाडीला पेचात पकडण्याची , त्यातही शिवसेनेची कोंडी करण्याची भावनिक राजकारणाची संधी सापडली आहे.संजय राऊत यांनी स्पष्ट विधान करूनही भाजप हे
राजकारण वाढवणार,हेही समोर दिसते आहे.

५.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी लोकांचे प्रश्न वाऱ्यावर उडून जाणार नाहीत,याची काळजी घेतली पाहिजे.
……..
आणि आपण सगळे?
लोकशाहीचे मुके प्रेक्षक होऊन चालणार नाही.आपण आपली भूमिका मांडत राहून असभ्य, असंस्कृत वचवच करणाऱ्यांना सभ्य शब्दांच्या माऱ्याने रोखण्याचा प्रयत्न करू यात…

अरुण खोरे…