Home > News Update > ‘संयमीठाकरे : ठाकरे खानदानाची नवीन ओळख’

‘संयमीठाकरे : ठाकरे खानदानाची नवीन ओळख’

‘संयमीठाकरे : ठाकरे खानदानाची नवीन ओळख’
X

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवण्याची घोषणा केली. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. केंद्र सरकार आणि राज्य सरकार हातात हात घालून काम करत आहे आणि या परिस्थितीतून देश पुन्हा पूर्ववत होईल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

यासोबतच आज दुपारी बांद्रा येथे झालेल्या गर्दीवरूनही त्यांनी धमकीवजा इशारा दिला आहे. १४ तारखेपासून रेल्वे सुरू होतील असं पिल्लू काही लोकांनी सोडलं आणि ही गर्दी जमल्याचं ठाकरे यांनी सांगितलं. या घटनेला कोणताही रंग देऊ नका. कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम केलं तर सोडणार नाही असा सज्जड दम मुख्यमंत्र्यांनी दिला आहे. आपल्याकडे आगीचे बंब बरेच आहेत. मात्र, त्यांना आग पसरवू देणार नाही, असं शांत आणि संयमी भाषेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिलं आहे.

मुख्यमंत्र्यांच्या या फेसबूक लाईव्ह नंतर अनेक नेटिझन्स नी मुख्यमंत्र्यांचं कौतुक केलं आहे. ठाकरे घराण्यातील व्यक्ती म्हणजे राग, अरेला कारे, चोख प्रत्युत्तर हे आत्तापर्यंत महाराष्ट्र पाहात आला आहे. मात्र, उद्धव ठाकरे यांनी राज्याची सूत्र हाती घेतल्यानंतर त्यांनी ठाकरेशाही, अरेला कारे बाजूला ठेवून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून स्वत:च्या खांद्यावर असणारी जबाबदारी संयमाने लिलया पार केली आहे.

शिवसेना म्हणजे हिंदूत्व! मात्र, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा कोणताही धर्म नसतो. सर्व जाती धर्माचा मान ठेवून उद्धव ठाकरे पुढे जात आहेत.

आज त्यांनी सांगितलं की, मी मौलवी शी देखील बोललो. यावरुन मुख्यमंत्र्यांनी आपण कोरोना ची लढाई जिंकण्यासाठी कोणाशीही बोलायला तयार आहोत. असं दाखवून देण्याचा प्रयत्न केला आहे. अमेरीकन विचारवंत थॉमस जेफरसन यांनी धर्माने शासनात व शासनाने धर्मात हस्तक्षेप करायचा नसतो. हे तत्व सांगितलं होतं. ( Wall of separation between religion and the state ) हेच तत्व मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी अंगिकारले असल्याचं दिसून येतं. अन्यथा ते मुख्यमंत्री नसतानाची त्यांची मुस्लीम समाजाबाबतची वक्तव्य तुम्ही आठवली तरी तुमच्या लक्षात येईल की, मुख्यमंत्री पदाचा स्विकार केल्यानंतर उद्धव ठाकरे संयमी झाले आहेत.

हाच धागा पकडत गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी #संयमीठाकरे

ठाकरे खानदानाची नवीन ओळख मान गये #माझा_महाराष्ट्र

अशी पोस्ट ट्विटर वर ट्विट केली आहे.

तसंच पत्रकार राजू परुळेकर यांनी देखील एक ट्विट केलं आहे. त्यामध्ये त्यांनी ‘उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं अजुन एक समजूतदार भाषण.’ असं म्हटलं आहे.

एकंदरीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची एक संयमी, साधा सरळ मुख्यमंत्री म्हणून राज्यात प्रतिमा निर्माण होत आहे. मात्र, त्याचबरोबर ठाकरे शैलीतील भात्यातील बाण सोडवायला ते विसरत नाहीत.

Updated : 14 April 2020 5:56 PM GMT
Next Story
Share it
Top