Home > मॅक्स ब्लॉग्ज > प्रशांतभूषण, अरविंद केजरीवाल, लोकपाल आंदोलन आणि संघभाजपा… भाग 1

प्रशांतभूषण, अरविंद केजरीवाल, लोकपाल आंदोलन आणि संघभाजपा… भाग 1

प्रशांतभूषण, अरविंद केजरीवाल, लोकपाल आंदोलन आणि संघभाजपा… भाग 1
X

लोकपाल आंदोलन खरंच भाजप आणि संघाच्या आधारानं उभं राहिलं... ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांचा दावा... लोकपाल विधेयक खरं कोणी तयार केलं? कशी फुटली टीम अण्णा? वाचा सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांचा लेख...

सुरुवातीलाच दोन गोष्टी स्पष्ट केल्या पाहिजेत.

पहिली गोष्ट ही की प्रशांत भूषण- शांतीभूषण या पितापुत्रांबद्दल मला नितांत आदर आहे. तो आदर दोन कारणांसाठी आहे. एक तर दोघेही आजपर्यंत निश्चित अशी भूमिका घेत चळवळींना मदत करत आलेले आहेत. आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयातली दोघांचीही कामगिरी निःसंशयपणे जबरदस्त परिणामकारक राहिली आहे.

दुसरी गोष्ट ही की अरविंद केजरीवाल यांनी माझा जेवढा द्वेष केला. तेवढा अन्य कोणीच केलेला नाही. तरीही या पोस्टच्या विषयी सत्य केजरीवाल यांच्या बाजूचे आहे आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून सत्याची बाजू घेताना माझ्या मनात अजिबात संकोच नाही. हेत्वारोप होऊ नयेत म्हणून याचाही पुनरूच्चार करून ठेवतो की, मी आप या पक्षात जाणार नाही आणि मला आपकडून कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा पूर्ण करून घ्यायची नाही.

आता मूळ मुद्दा.

प्रशांतजींनी राजदीप सरदेसाई यांना दिलेल्या मुलाखतीत IAC Movement was PROPPED UP by BJP RSS and I realised it too late असं विधान केलं आहे. Propped up चा अर्थ आधार देऊन उभे करणे असा होतो. प्रशांतजी सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आहेत. ही शब्दयोजना त्यांनी जाणीवपूर्वकच केली असणार. प्रशांतजींच्या विधानाचे दोन भाग आहेत. तेवढ्यावरच बोलू.

1. मला पश्चात्ताप होतो की IAC ही चळवळ संघ आणि भाजपाच्या आधारानं उभी राहिली. हे मला फार उशीरा कळलं. 'कदाचित' (probably) अण्णांनाही ते माहीत नव्हतं.

2. अरविंद केजरीवाल यांना मात्र ते माहीत होतं. (थोडक्यात काय तर संघ-भाजप-अरविंद एकत्र)

आपल्या दोन्ही विधानांच्या पुष्ट्यर्थ एकही पुरावा प्रशांत भूषण यांनी दिलेला नाही. या सत्याची जाणीव त्यांना नेमकी कधी झाली हे ही त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं नाही. किंबहुना हे आंदोलन संघ-भाजपाच्या पाठबळावर उभं होतं. असे आरोप आजवर अनेकांनी केले. मात्र, पुरावा समोर आणण्याचा जबाबदारपणा कोणीही अद्याप दाखवलेला नाही. हेही नोंदवलं पाहिजे.

कधी अण्णा, कधी अरविंद, कधी लोकपाल आंदोलनावर आरोप करण्यासाठी हा मुद्दा गेल्या नऊ वर्षांच्या काळात अनेकांनी वापरला. कॉंग्रेस आणि कॉंग्रेसच्या एजंटांनी वापरला तसाच तो आंदोलनात त्यावेळी जोरदार घोषणा देत सामील झालेल्या पुरोगामी आणि डाव्यांनीही वापरला; पुरावा देण्याचा जबाबदारपणा मात्र, अजून यातील कोणीही दाखवलेला नाही.

प्रशांत भूषणांना हे उशीरा कळलं पण म्हणजे नेमकं कधी? त्याचा उल्लेख नाही. आंदोलन 2011 साली झालं. प्रशांतजी नेमकं सांगायचं तर 21 एप्रिल 2015 पर्यंत अरविंद सोबत होते. त्यानंतरही तब्बल पाच वर्ष (2015 ते 2020) प्रशांतजी या विषयी काही एक बोललेले नाहीत. म्हणजे 2011 साली जे काही झालं. त्याचं भान प्रशांतजींना 2020 साली आलं. भारतातल्या एका ज्येष्ठ विधिज्ञाला 2011 साली आपल्या अवतीभवती बाबा रामदेव, श्री श्री रवि शंकर आदि मंडळी होती.

आपण त्यांच्यासोबत बैठका घेत होतो. त्यांच्या संघटना आपल्यासोबत काम करत होत्या. हे नऊ वर्ष खटकलेलं नाही, ते आता 2020 साली कळत आहे आणि कळून पश्चात्ताप होत आहे.

आज शरद पवार जसे मविआचे मालक- पालक- चालक आहेत. तसेच प्रशांतजी या आंदोलनाचे एक मालक- पालक- चालक होते. त्यांना नऊ वर्षांनी वस्तुस्थितीची जाणीव व्हावी. हा फार दुःखद योगायोग आहे. या योगायोगाचा कार्यकारणभाव काय? हे मी निश्चितच विचारणार नाही. कारण त्यांच्यावर कोणतेही हेत्वारोप मला करायचे नाहीत. खुद्द शांतीभूषणजी अल्पकाळ का असेना थेट भाजपात होते. तरीही सेक्युलॅरिझम बद्दल त्यांची जी कमिटमेंट आहे. तिच्यावर कोणीच शंका घेऊ शकत नाही.

अण्णांच्या बाबतीतलं त्यांचं विधान अजून आश्चर्यकारक आहे. Probably हा शब्द मोठा चतुराईनं ते वापरतात.

लोकपाल या संकल्पनेचे जनक आदरणीय शांतीभूषणजी. या आंदोलनाचा विचार अण्णांकडे मांडला अरविंद, मनिष, प्रशांतभूषण यांनी. अरूणा रॉय याही सुरूवातीला या उद्योगात होत्या, नंतर 'आपसी मतभेदातून'त्या दूर गेल्या (ते मतभेद अण्णांशी नव्हते एवढंच सांगून ठेवावं लागेल).

म्हणजे लोकपाल हे मूळ अपत्य या चार जणांचं. आंदोलनासाठी चेहरा शोधत राळेगणला आले. यांच्या प्रस्तावावर अण्णा आंदोलनात उतरले आणि आज हे म्हणतात की...

आंदोलन संघ-भाजपानं उभं केलंय. हे अण्णांना कदाचित (!) माहीत नव्हतं! आधी प्रशांतजी आंदोलनात आले, त्यांच्या निमंत्रणावर अण्णा उतरले आणि आंदोलन कोणाचं हे मात्र, प्रशांतजींना नक्की माहीत नव्हतं, पण अण्णांना 'कदाचित' माहीत नव्हतं!

माझ्या घरी मी ‘अ’ या व्यक्तीला जेवायला बोलवावं. आणि जेवणानंतर नऊ वर्षांनी मी म्हणावं की वस्तुतः माझ्या घरी ‘अ’ जेवायला आला. तेव्हा शिधा ‘ब’ ने पुरवला होता; मला ते माहीत नव्हतं आणि ‘ब’ ला ही 'कदाचित' ते माहीत नसावं!

आंदोलनाची कल्पना प्रशांतजींसह सगळ्या दिल्लीकरांनी मार्च 2010 च्या आसपास आखली. अण्णा त्यात डिसेंबर 2010 च्या आसपास सामील झाले. तारखा देऊन बोलायचं झालं. तर ज्यांना पुरोगाम्यांचा एक मोठा गट कायम छुपे संघी म्हणत. आला ते अण्णा 19 सप्टेंबर 2012 रोजी या चळवळीतून पूर्णतः बाहेर पडले. पण कट्टर पुरोगामी शांतीभूषण, प्रशांतभूषण, योगेंद्र यादव यांना मात्र, बाहेर पडण्यासाठी 21 एप्रिल 2015चा दिवस उजाडावा लागला!

हे आंदोलन संघ भाजपानं प्रायोजित केलं. असं प्रशांतजी म्हणत नाहीत. ते कोणीही म्हणणं हा आचरटपणाच आहे. या आंदोलनाला संघ आणि भाजपानं पाठिंबा दिला. असं त्यांचं म्हणणं आहे. ही वस्तुस्थिती आहे की, राजकीय लाभासाठी कोणताही विरोधी पक्ष हा सत्ताधारी पक्षाविरूद्ध कोणीही केलेल्या आंदोलनात स्वतःच्या स्वार्थासाठी उतरत असतो. यात कॉग्रेसनं रडारड करावी असं काहीच नाही. उदाहरण द्यायचं तर पुण्यात नोटाबंदी विरूद्ध आम्ही केलेल्या आंदोलनाला कॉंग्रेस नेत्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला होता! पण म्हणून ते आंदोलन कॉंग्रेसचं निश्चितच नव्हतं.

संघ आणि भाजपानं या आंदोलनाचा फायदा घेऊन सत्ता मिळवली हे म्हणता येईल. पण त्यांच्या सत्तेसाठी हे आंदोलन झालं असं एखादा पट्टीतला मूर्खच म्हणू शकतो.

दिल्लीत 19 सप्टेंबर 2012 रोजी कॉन्स्टीट्यूशन क्लब मध्ये जी बैठक झाली. त्यात अण्णांना या सगळ्यांनी मिळून एकटं पाडलं. किरण बेदी, प्रशांतभूषण, अरविंद, मनिष, योगेंद्र असे सगळे एकत्र मिळून राजकीय भूमिका घेणं कसं गरजेचं आहे ते सांगत होते. अण्णांनी अर्थातच नकार दिला आणि टीम अण्णा फुटली.

ज्या अर्थी किरण बेदी आणि व्ही के सिंग यांच्या सुरात सूर मिसळून प्रशांतजी अण्णांशी प्रतिवाद करत होते. त्याअर्थी त्यांना आज झालेली जाणीव 19 सप्टेंबर 2012 या दिवसापर्यंत तरी झाली नव्हती. अण्णांचा या टीम सोबतचा प्रवास इथं संपला. अण्णा एकाकी पडले.

प्रशांतजी ज्या लोकपाल आंदोलनाचे एक सूत्रधार होते. त्या आंदोलनात उजव्या बाजूचे बाबा रामदेव, श्री श्री, किरण बेदी, व्ही के सिंग होते. तसेच डाव्या बाजूचे शांतीभूषणजी, प्रशांतजी, अरूणा रॉय, मेधाताई, राजेंद्रसिंह, राजगोपाल, डॉ. सुनीलम, राकेश रफिक हेही होते. दुर्दैवाने छुपे संघी हा आरोप मात्र फक्त अण्णा आणि अरविंदच्या वाट्याला आला.

वस्तुतः सगळ्यांनीच हा मुद्दा नंतरच्या काळात जवळपास सोडून दिला असतांना प्रशांतजींनी तो सुप्रीम कोर्टात लावून धरला, अण्णांनी त्यासाठी दिल्ली आणि राळेगण अशी दोन उपोषणं केली, अरविंदनं मोदींपुढे दिल्लीच्या मर्यादेत का असेना? ते राजकीय आव्हान उभं केलं. जे घरातल्या तीन पिढ्यांनी देशावर राज्य करूनही राहूल गांधींना करता आलं नाही. पण शेवटी छुपे संघी मात्र ठरवले गेले. अण्णा आणि अरविंदच. हे नॅरेटीव कोणी आणि का तयार केलं? या बद्दल दुसऱ्या भागात बोलू.

मुद्दा असा आहे की, अरविंद केजरीवाल यांनी संघभाजपाच्या पाठिंब्यावर हे आंदोलन उभं केलं. हे प्रशांतजींना कधी कळलं? हे त्यांनी स्पष्ट करावं. 2011 साली घडलेल्या घटनेचा पश्चात्ताप 2020 साली का झाला? हा कोणता मुहूर्त याचाही खुलासा करावा.

आपमधून बाहेर पडतांना प्रशांतजी-योगेंद्रजींनी अरविंद केजरीवालांच्या हुकूमशाही सोबत अनेक मुद्द्यांचा उहापोह केला होता. पण तेव्हाही दोघांनी आंदोलनामागील संघ-भाजपा होते. याचा उच्चार केला नव्हता. योगेंद्र यादव हे अतिशय आदरणीय आणि जबाबदार नेते आहेत. त्यांनी तर आजपर्यंत असा काही दावा केलेला नाही. प्रशांतजींच्या म्हणण्याला त्यांनी ही पोस्ट लिहीत असेपर्यंत दुजोरा दिलेला नाही.

अण्णांच्या आंदोलनात सगळे होते, हा कुंभमेळा होता हे त्यांनी निखील वागळे सरांना दिलेल्या मुलाखतीत म्हणलं आहे. मात्र, ते आंदोलनातला सहभाग या अर्थानं आहे, आंदोलनाचं यजमानपद या अर्थानं नाही. प्रशांत भूषण यांच्या या विधानाशी योगेंद्र यादव सहमत आहेत का?

सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ विधिज्ञ आणि या देशातील पुरोगामी चळवळींचे नेते या नात्यानं प्रशांतभूषण यांची जिम्मेदारी दुहेरी आहे. आणि त्यांचं प्रत्येक विधान महत्वाचं आहे, त्यांनी तारखा आणि पुरावे मात्र, द्यायला हवेत. कारण ते त्यांचं नैतिक कर्तव्य आहे.

(दुसऱ्या भागात कॉंग्रेस आणि लोकपाल आंदोलन)

Updated : 15 Sep 2020 5:20 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top