Home > News Update > आपले चुकलेले अग्रक्रम

आपले चुकलेले अग्रक्रम

आपले चुकलेले अग्रक्रम
X

डोंबिवलीमधे गटार साफ करताना तीन सफाई कामगारांचा मृत्यू झाल्याची बातमी आपल्या मुखपृष्ठावर सर्व भाषांतील वर्तमानपत्रांनी ठळकपणे अथवा लक्षवेधी लाल अक्षरात छापली होती. मुर्दाड मनाने वर्तमानपत्राची पाने उलटून पुढे जाण्याआधी अंतर्मुख होण्याची वेळ आली आहे. भारतात दरवर्षी अशा तऱ्हेने प्राण गमवणाऱ्यांची संख्या सहा हजाराच्या वर आहे. त्याबाबत निषेधाचा सूर अत्यंत क्षीण आहे. बळी जाणारे हे लोक परिस्थितीने लाचार आणि जोरजुलूम, अन्याय अंगवळणी पडलेले लोक आहेत. महाराष्ट्रासारखी प्रगत राज्यं खास अध्यादेश काढून माणुसकीला लाज आणणारे हे काम ठराविक जातींसाठी राखीव ठेवीत असतात. खरं तर मानवी हक्क आयोगाने अशा घटनांबद्दल भारताला धारेवर धरण्याची गरज आहे.

आपले चुकलेले अग्रक्रम बदलण्याची आज नितांत गरज आहे. उंच- उंच पुतळे, बुलेट ट्रेन मध्ये गुंतवलेला पैसा, गटारे साफ करणारी यंत्रे आणि तंत्रज्ञान यासाठी तसेच पंजाब, हरियाणा येथील गहू आणि मक्याच्या शेतातील पाचटाची योग्य विल्हेवाट लावून नवीन नांगरणी आणि पेरणी करणारी यंत्रे आणि तंत्रज्ञान यासाठी वापरला गेला पाहिजे. ज्यायोगे लोकांचे जगणे सुसह्य होईल. हा बदल घडवून आणण्यासाठी विवेकवादी चळवळींनी अधिक सक्रिय होण्याची गरज आहे. न्याय आणि नीतीची चाड बाळगणारा वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासत संविधानाच्या चौकटीत राहून आपला प्रभाव टाकणे शक्य व्हावे.

देशाचे गतवैभव परत आणण्याच्या प्रयत्नात असलेल्या विद्यमान शासनाने श्री तळपदे ह्यांच्या कपोलकल्पित विमानाची आणि गणेशावर हत्तीच्या मुखाचे रोपण केल्याची पुराणातील वांगी पुराणातच सोडून मध्ययुगीन सातव्या शतकातील भारतातील गौरवशाली परंपरेकडे पाहायला हवे. त्या काळचा चीनी प्रवासी ह्यू एन त्संग बनारस बद्दल लिहितो, “तेंव्हा बनारसमधे बरेच निरीश्वरवादी व्यापारी होते. दुतर्फा झाडे असलेले आणि जागोजागी खुणांच्या पाट्या असलेले राज्य महामार्ग होते. वाटेवर खानावळी आणि आरोग्यकेंद्रांची पण सोय होती. विभिन्न सामाजिक घटकात अभिसरण होते. युद्ध करण्याला पण सुबुद्ध नियम होते. युद्धात नागरी जीवन, संपत्ती तसेच शेतीला हानी पोचणार नाही ह्याची काळजी घेतली जाई.” विवेकवादाला तेंव्हा समाजात मान्यता होती.

सध्याच्या बिहारमधील नालंदा विद्यापीठात जगभरातून हजारो विद्यार्थी विद्यार्जनासाठी भारतात येत होते. प्राचीन भारताने गणित आणि इतर वैज्ञानिक क्षेत्रात जी प्रगती केली त्याचे मूळ त्या काळातल्या 'संशयवादी' परंपरेत आहे. रूढ विचारांना धक्का देणाऱ्या, सतत प्रश्न विचारणाऱ्या पूर्वग्रहमुक्त बुद्धीलाच नवे शोध लागतात आणि भौतिक प्रगती होते. अलाहाबादचे नाव बदलून, अयोध्येत मशीद पाडलेल्या जागी रामाचे मंदिर उभारून आपले गतवैभव प्राप्त होईल आणि अच्छे दिन येतील ह्या भ्रमात न राहिलेले बरे.

Updated : 22 Sep 2019 4:42 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top