Home > मॅक्स ब्लॉग्ज > बाळासाहेब मला घर द्या, पतंगरावांनी मला शब्द दिला होता...

बाळासाहेब मला घर द्या, पतंगरावांनी मला शब्द दिला होता...

बाळासाहेब मला घर द्या, पतंगरावांनी मला शब्द दिला होता...
X

अखमली मखमली दिव्याच्या जोती

बाळाची आत्ती लॉकीट करती

सोनार दादापाशी घडवायी देती

सोनार दादाला उशीर झाला

बाळाने रडून गोंधळ केला झू बाळा झू झू रे झू

रामा कमळापुर पंचक्रोशीत उंचावर टांगलेल्या भोंग्यावरून सरूबाई धडे यांचा वरील पाळण्याचा आवाज आसमंतात घुमू लागतो आणि परीसराला समजत कुणाला कन्यारत्न पुत्ररत्न प्राप्त झालं आहे. सरू बाई सूर लावतात. कोरड्या पडलेल्या मानवी नातेसंबंधात नव्याने वंगण पडू लागतं. बाळाचा पाळणा म्हणताना लॉकेट घेऊन आलेल्या आत्तीचे करदोडा घेऊन आलेल्या मावशीचे कौतुक करतात. हे करताना सोनारदादाला देखील सन्मान देत घरोबा जपतात. आती मावशी, काका, मामा, आजा, बहीण, मावळण या सर्वांना त्या झोका द्यायला पुढे आणतात. बाळाचं नाव ठेवलं जातं. सरुबाई पांडुरंगाचा पाळणा म्हणतात.

पहिल्या दिवशी आनंद झाला

टाळ विण्याचा गजर केला

चंदन बुक्याचा सुवास त्याला

उटणे लाऊनी न्हाऊ व घाला

झू बाळा झू झू रे झू

बाळाच्या जन्मावेळी पांडुरंगाच्या जन्माचाच आनंद साजरा होतो. हे होत असताना निसर्गाशी असलेले नाते देखील जपले जाते. त्यांच्या पाळण्यात त्या म्हणतात

चवथ्या दिवशी चंद्राची छाया

पृथ्वी संरक्षण काम व तया

चंद्र सूर्याची बाळावर छाया

झू बाळा झू झू रे झू

सरूबाई यांनी अशी असंख्य पाळणा गीते ओव्या रचलेल्या आहेत. त्यांना लिहिता वाचता येत नाही. त्यांनी ग्रामीण संस्कृतीतील या परंपरांचा अमूल्य ठेवा. पुढच्या पिढीसाठी एखाद्या बियाणाचे वाण राखेत जपून ठेवावे. त्याप्रमाणे जपून ठेवला आहे.

पूर्वी होणाऱ्या लग्नाविषयी त्यांना विचारले असता त्या सांगतात "आता पूर्वीसारखं राहील नाही. पूर्वी माणूस संस्कृती जपत हुता. आता माणसाचं जीनं पशू पक्षाप्रमाणे झाले आहे"

त्या सांगतात त्यांच्या काळात पोरीच लग्न ठरलं म्हणजे घरात चोरी झाल्यासारखं वाटायचं. आई बाप अस्वस्थ असायचे लग्नाचा सोहळा हा आजच्यासारखा काही तासांचा नसायचा. चार चार दिवस लग्न चालायची. मुलगी पाहण्यापासून ते लग्न होइपर्यंतची घालमेल त्यांनी त्यांच्या जात्यावरच्या ओवीत मांडली आहे.

त्या म्हणतात...

लेकीला व मागइन

आलं पुण्याचं पोलिस

नाही देयाची सांगा त्याला

साळु शिकते कालिज

लग्न ठरल्यानंतर बापाची होणारी घालमेल त्या गाण्यातून व्यक्त करतात.

मांडवाच्या बाई दारी

बाप बघतो चोरावानी

आसवं गाळतो मोरावाणी

लेक नांदायला निघाल्यावर अश्रू गाळणाऱ्या बापाची व्यथा त्या या ओळींमधून मांडतात.

या सोहळ्यामध्ये वरमायी (वराची आई) आपल्या माहेरकडून येणाऱ्या आहेराची वाट कशी पाहते आणि भावाची गाडी येताच तिला होणारा आनंद त्या पुढील ओळीत मांडतात.

मांडवाच्या बाई दारी

का ग वरमाय हसली

बाई बंधूच्या आहेराची

समोर टॅक्सी दिसली

आज लग्नातील अनेक परंपरा नष्ट होत चाललेल्या आहेत. असे असताना त्यांनी या जुन्या परंपरा त्यांच्या गाण्यातून टिकवून ठेवल्या आहेत. हळदी समारंभात लावली जाणारी हळद जात्यावर दळली जायची. हळद दळणे हा एक उत्सव असायचा. आजही ग्रामीण भागात ही परंपरा जिवंत आहे. सरू बाई या कार्यक्रमात जात्यावर ओव्या गातात.

या परिसरात लग्नातील जाते. त्यांच्या शिवाय फिरत नाही. जन्मलेल्या मुलाचं नाव त्यांच्या पाळण्याशिवाय ठेवलं जातं नाही. त्या त्यांची ही कला सेवा म्हणून देत असतात. बोलावणं आलं की, त्या कोणाला नाही म्हणत नाहीत. मानधनाची अपेक्षा करत नाहीत. कुणी नाही दिलं तर जायचं टाळत नाहीत.

सरुबाई या लोककलेचा वारसा जपत आलेल्या आहेत. मात्र, त्यांची ही कला अद्याप त्यांच्या घराव र छप्पर देखील देऊ शकली नाही. समाजासाठी आपली कला भरभरून वाटणाऱ्या सरूबाई आजही भाड्याच्या घरात राहतात.

दिवंगत पतंगराव कदम आणि त्यांच्या घराण्यातील सर्वांवर त्यांनी गाणी लिहिली आहेत. त्यांनी साहेबांचा प्रचार केला आहे. हाताला मतदान करा म्हणून आपला घसा झिजविला आहे. साहेबांनी त्यांना घराचे आश्वासन दिले होते. त्या सांगतात कदम साहेबांनी मला घराचं स्वप्न दाखवलं होतं ज्या प्रमाणे त्यांचं मुख्यमंत्री पदाचं स्वप्न अधुरं राहिलं. तसंच माझं घराचं स्वप्न अधुरं राहील. बाळासाहेब कदम यांनी हे स्वप्न पूर्ण करावे अशी अपेक्षा त्या व्यक्त करतात.

ग्रामीण कलाकारांची कला स्टेजवर सिनेमा मध्ये सादर करून अनेक कलाकारांनी आर्थिक माया प्रसिद्धी कमावली. मात्र, महाराष्ट्रातल्या मातीतील ही कला ज्या कलावंतांनी जतन करून ठेवली त्यांना स्वतःच घर मिळू नये ही शोकांतिका आहे. सरुबाईंच्या जिवंतपणी त्यांना घर मिळणार का? हा प्रश्न आहे. त्यांनी आयुष्याची पस्तीस वर्ष कदम घराण्याची सेवा केली. दिवंगत पतंगराव कदम यांचे नाव जनतेच्या हृदयात गोंदलं. त्या कदम घराण्याने पुढे येऊन त्यांचे घराचे स्वप्न पूर्ण करावी अशी त्यांची अपेक्षा आहे.

Updated : 16 July 2020 12:51 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top