Home > मॅक्स ब्लॉग्ज > माहितीच्या व्हायरसचा उद्रेक

माहितीच्या व्हायरसचा उद्रेक

माहितीच्या व्हायरसचा उद्रेक
X

करोनाची साथ आली आहे आणि त्याबरोबर आणखी एक साथ आली आहे. ती आहे माहितीच्या व्हायरसची. माहितीच्या व्हायरसचा हा उद्रेक, कधी कधी करोनापेक्षाही तापदायक ठरतो आहे.

बरीचशी माहिती उपयुक्त असते, विधायक असते, पण काही बाबी या नुसत्याच निरुपयोगी नाही तर प्रसंगी घातक देखील असतात. खरी माहिती, खोटी माहिती, कधीकधी मुद्दामहून खरी म्हणून पुढे केलेली खोटी माहिती, अशी सगळी सरमिसळ समाज माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचत असते.

हे पाहून, वाचून नेमकं खरं काय आणि खोटं काय असा प्रश्न आपल्याला पडतो. ही माहिती तुमच्यापर्यंत पाठवणारे तुमचेच मित्र असतात; कधी कधी तर डॉक्टर किंवा अन्य उच्चशिक्षित मंडळी असतात; प्रत्येक वेळी, प्रत्येक माणूस, प्रत्येक माहिती तपासूनच पुढे पाठवतो असं नाही; त्यामुळे सर्वांकडूनच गफलती होण्याची शक्यता असते. बरेचदा सत्य अगदी बेमालूमपणे असत्याशी एकजीव केलेलं असतं. मग सत्य असत्याशी मन ग्वाही करणं भल्याभल्यांना जमत नाही, तिथे तुम्हाआम्हा सामान्यांची काय कथा.

महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत तात्काळ पोहोचवून, समाजाचं भलं करावं असाच बहुतेकदा हेतू असतो; पाठवणारा सद्हेतूने, निरागसपणेच पाठवत असतो. पण त्याच्या नकळत तो स्वतः लटक्या माहितीची शिकार झालेला असतो. आपण गडबडीने फॉरवर्ड केलेली माहिती चुकीची आहे, हे लक्षात येताच त्याची भलतीच गोची होते. त्याचा हेतू चांगलाच असतो, पण परिणाम अनिष्ट.

त्यामुळे योग्य माहिती कुठली आणि अयोग्य कुठली याचा नीरक्षीरविवेक करण्यासाठी उपयुक्त अशा काही सूचना मी इथे मांडणार आहे. पहिली सूचना अशी की पुढ्यात माहिती येताच तात्काळ ती पुढे पाठवू नका. विशेषतः ‘ही माहिती तात्काळ, लगेच, ताबडतोब शेअर करा’, अशा प्रकारचा आग्रह असेल; ‘यापूर्वी कधीच न पाहिलेली गोष्ट पहा’, अशी भलावण असेल, तर मग ही शेअर करण्याच्या लायकीची आहे का हे दहा-दहा वेळा तपासून पाहायला पाहिजे हे नक्की समजा. त्याच बरोबर भीती, करुणा, घृणा, बीभत्स, भयानक अशा इंटेन्स भावनांना आवाहन करणाऱ्या पोस्ट या निश्चितच तपासून घ्यायला हव्यात.

अधिकृत बातम्या आणि बाता यामध्ये एक महत्त्वाचा फरक आहे. बातम्या या वस्तुस्थिती निदर्शक असतात आणि बाता या नेहमीच काहीतरी जगावेगळं सांगायचा; स्वप्न, आशा, दिलासा विकण्याचा प्रयत्न करत असतात. समाजमध्यमांच्या या बाजारात अनेक प्रकारचा माल विक्रीला आहे. पण सर्वात जास्त खपतंय ते भय!... आणि या आडून, या भयावरती अभय म्हणून अनेक उपाय.

या उपायांबाबत अगदी ठाम विधाने, अक्सीर इलाज, शर्तीली दवा, असाध्य रोगांवर रामबाण उपाय असले वाक्प्रचार हे धोक्याचे इशारे आहेत. एखाद्या उपचाराने, औषधाने; शंभर टक्के यशाची खात्री कोणी देत असेल, अजिबात दुष्परिणाम नाहीत असं कोणी सांगत असेल, तर तो/ती बनेल आहे अशी शंका नी:शंकपणे घ्यावी.

ज्या अर्थी तुम्हाला ती माहिती वाचताच तात्काळ पुढे पाठवण्याची उबळ येते आहे, त्या अर्थी त्यामध्ये मेंदूत खवखवेल असंच तरी काही असेल; सामान्य तर्कापेक्षा काहीतरी अतर्क्य असं विधान केलेलं असेल, जे चालू आहे त्याच्या बरोब्बर विरुद्ध असं काहीतरी लिहिलं असेल, त्यामुळे पुढे पाठवण्याची उबळ किंचित काळ दाबून धरा. असं म्हणतात की रागाने काही बोलायचं झालं तर मनातल्या मनात दहा आकडे मोजावेत आणि मग बोलावं; किंवा कोणाला शिव्या देणारं पत्र लिहायचं झालं तर ते लिहून ठेवून द्यावं, दोन दिवसांनी पुन्हा वाचावं आणि मग पाठवावं. हाच नियम सोशल मीडियातल्या माहितीला लागू आहे.

थांबून, शक्य झाल्यास या माहितीचा मूळ स्रोत शोधून काढावा. बऱ्याचदा कोणा शास्त्रज्ञांच्या नावाने, डॉक्टरांच्या नावाने माहिती फिरत असते. पण त्या व्यक्तीचे नाव, हुद्दा, ती काम करते त्या संस्थेचे नाव, पत्ता, असं सगळं त्या पोस्टमध्ये नसेल तर ती पोस्ट शंकास्पद मानावी. अशी काही माहिती असेल तर त्या सुतावरून त्या संस्थेचा स्वर्ग गाठवा आणि ही माहिती त्या संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळावर किंवा त्या व्यक्तीच्या वैयक्तिक पेजवर आहे का हे तपासून घ्यावे. अधिकृतरित्या अशी माहिती याठिकाणी उपलब्ध असेल तर निदान ती ती व्यक्ती, ती ती संस्था, त्या माहितीला जबाबदार आहे एवढं आपल्याला समजतं.

त्या माहितीच्या तुकड्यात जे रंजक, अतिरंजक, अतिरंजित किंवा धक्कादायक विधान आहे; तेही आपल्याला स्वतंत्रपणे तपासून पाहता येईल. गुगल अथवा इतर सर्च इंजिन्सच्या मदतीने हीच माहिती अन्य कोणी, अन्यत्र कुठे दिली आहे का, हे सहज तपासता येतं. काही फॅक्टचेकिंग साइट्स असतात; खरंखोटं तपासून मांडणं हेच यांचं काम; त्यांच्या मदतीने ही माहिती तपासून घेता येईल.

जरा विचार केला तर लक्षात येईल की अधिकृत सूत्रांची भाषा ही नेहमीच संतुलित आणि संयत असते. बाता मारणाऱ्याची भाषा भडक तर असतेच पण त्यात बरेचदा व्याकरणाच्या आणि शुद्धलेखनाच्याही चुका असतात.

अर्थात यात मी कुठलीच जगावेगळी गोष्ट सांगत नाहीये कारण जगावेगळ्या व्यक्तींनी करण्यासाठीची ही कृतीच नाही. ही तर तुम्हांआम्हां सामान्यजणांनी करायची कृती आहे. फक्त जगावेगळ्या माहितीबाबत ती आहे.

अर्थात इतकं सगळं करूनही गोच्या होऊ शकतातच पण निदान त्याचे प्रमाण आणि तीव्रता आपण कमी करू शकतो. करोनाच्या साथीने कावलेल्या, वैतागलेल्या, लोकांच्या वैतागात आपण भर तरी घालणार नाही. एवढं साधलं तरी पुरेसं आहे. सरकारचे अधिकृत संकेतस्थळ, जागतिक आरोग्य संघटना, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च, इंडियन मेडिकल असोसिएशन अशा संस्थांची अधिकृत संकेतस्थळे यावर जाऊन तुम्ही शहानिशा करू शकता. आणि यातलं काहीच नाही साधलं तरी एक नियम तुम्ही स्वतः पुरता पाळलाच पाहिजे. जर शंका असेल तर माहिती पुढे पाठवूच नका.

डॉ. शंतनु अभ्यंकर, वाई.

Updated : 7 July 2020 3:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top