Home > मॅक्स ब्लॉग्ज > लालभडक चिखलाची आम्हा शेतकऱ्याची दुनिया...

लालभडक चिखलाची आम्हा शेतकऱ्याची दुनिया...

लालभडक चिखलाची आम्हा शेतकऱ्याची दुनिया...
X

"तुमच्या रोपा झाल्या काय गा दोन दिवस आमचं बी येईतेस तर लै बरं व्हईत बघ...दांडगा त्रास हुलाय गा दिवसभर त्या बैलांच्या मागनं फिरोन फिरोन बेजार यउलाय"...हे बोल कोल्हापुरातल्या चंदगड तालुक्यात तुम्हाला या दिवसात नक्की ऐकायला मिळतील. भाषेच्या दुनियेत स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी आमची चंदगडी भाषा आहे. ही जी प्रत्येक चंदगडकराच्या ओठावर अभिमानाने घेतली जाते.

पावसाची धमाकेदार एंट्री आणि आता सुरु झालेली शेतकऱ्यांची लगबग...पेरण्या आटोपल्या पण आता महत्वाची मोहीम उरली ती म्हणजे रोपेची, सगळ्यांचे हात आता चालायला लागतात. उन्हात रणरण तापणारी माती आता गुडघाभर पाण्याखाली गेली आणि आणि त्याचा चिखल झाला. याच चिखलातून उद्या रोप बाहेर येतील जी वर्षभराची जमापुंजी असेल.

हाफ पॅन्ट, चिखलात मळलेलं शर्ट, डोक्यावर करकचून बांधलेलं पावसापासून वाचण्यासाठी पोतं, हा पेहराव पाहिल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. बैलांच्या साहाय्याने सगळं शेत अगदी चिखलाने लालभडक होत आणि त्या चिखलात सगळ्यांचे हात रोप लावण्यात व्यस्त होऊन जातात. कारण आज या चिखलात उभं राहून केलेलं हे काम उद्या पोटाची खळगी भरणार असत.

एकीकडे ही रोपेची गडबड जी सगळ्यांच्या मनाला लागलेली हुरहूर आहे. तर दुसरीकडे शेतात काम करणाऱ्या वारकरी मंडळींची मनं पंढरीच्या त्या विठ्ठलाच्या चरणाकडे कधी पोहोचता येईल याची वाट बघत आहेत. येत्या काही दिवसात गावागावातून, खेड्यापाड्यातून चालत चालत पंढरी गाठणाऱ्या वारीला सुरुवात होईल. कितीही कामाचा बोजा असला तरी वेळात वेळ काढून विठ्ठलाला भेटायला जाणाऱ्या आमच्या वारकरी मंडळींची गोष्टच न्यारी आहे.

दीड दोन महिना आधीच पेरणी केलेल तरू आता मोठं झालंय अगदी स्वतःला त्या चिखलात रूतवून घ्यायला. पेरणीच्या काळात काळ-वेळाचं भान नसताना अगदी सायंकाळी 7 वाजेपर्यंत शेतात राबणाऱ्या शेतकऱ्याला खरोखरच सलाम. या सगळ्या कामात अगदी महत्वाची भूमीका बजावणारी असतात ती आपली बैलजोडी. शेतकरी राजाच अगदी सर्वस्व असणाऱ्या या बैलजोडीच काम पाहिल्यावर कोणालाही आश्चर्य वाटेल. रोपेची लागवड होईपर्यंत कित्येक दिवस प्रामाणिकपणे ही बैलजोडी त्या गुढग्याच्या वरपर्यंत असणाऱ्या चिखलात काम करत असते. आज ही काम होऊन जातील आणि उद्या याच ठिकाणी भाताचं पीक मोठ्या डौलात उभं राहील हे जणू त्यांनाही माहिती आहे.

दिवस उगावायच्या आत सकासकाळी आमचा बाप आज शेत गाठतो तो संध्याकाळी दिवस मावळून गेल्यानंतर परतीची वाट धरतो आणि आम्ही मात्र एसीतल्या ८ तासांच्याच ड्युटीची प्रार्थना करतोय.

चिखलात मळलेले चेहरे दिवसभर राब-राब राबताना तुम्हाला शेताच्या प्रत्येक बांधावर नजरेस पडतील. ज्यांच्याकडे पाहून त्या लालभडक मातीत तुम्हालाही उतरायची इच्छा झाल्याशिवाय राहणार नाही. चिखलगुठयाच्या मागे बैलांच्या पाठीवर चाबकाचा धाक दाखवत धावणारा आणि लालभडक झालेल्या बापाचा मला अभिमान कायम असणार आहे.

मग येताय का चंदगडच्या लालभडक मातीत रोप करायला???

कृष्णा सोनारवाडकर

Updated : 10 July 2018 5:23 AM GMT
Next Story
Share it
Top