Home > मॅक्स ब्लॉग्ज > अमिताभच्या निमित्ताने...

अमिताभच्या निमित्ताने...

अमिताभच्या निमित्ताने...
X

१. अमिताभ बच्चनसारख्या महानायकाला करोनानं गाठलं तिथं आपल्यालाही होऊ शकतो. झाला तरी घाबरण्याचं कारण नाही, अशी एक भावना कालपासून वाढलेली दिसतेय. यानिमित्तानं करोनाची अनावश्यक दहशत कमी होत असेल तर चांगलीच गोष्ट आहे.

२. शेवटी करोनाच्या विषाणूला भावना असतीलच की! साला आपण मुंबईत एवढी मर्दुमकी गाजवली तर जगात आपलं नाव कुणाशी जोडलं जातंय तर धारावीशी याचं त्यालाही काही वाटलं असेल. म्हणून मग त्यानं इथल्या सगळ्यात मोठ्या माणसाला गाठलं. अमिताभ यांच्या प्रकृतीला लवकरात लवकर आराम पडो ही प्रार्थना!

३. .. तर आपल्यालाही होऊ शकतो म्हणून बिनकामाचं बोंबबलत बाहेर फिरण्याची आवश्यकता नाही. काळजी घ्यायला पाहिजे. ज्याची त्यानं घ्यायला पाहिजे. अठरा ते पन्नास वयोगटातल्या निरोगी माणसांनी कामासाठी घराबाहेर पडण्याची गरज असेल तर बाहेर पडून आपापली कामं करायला पाहिजेत. मास्क, सॅनिटायझर, सुरक्षित अंतर या त्रिसूत्रीचे पालन करून आपापली कामं करायला हरकत नाही. त्याचवेळी घरातील वृद्ध, आजारी लोक आणि लहान मुलांची विशेष काळजी घ्यायला हवी.

४. अमिताभमुळं भीती मोडली असली तरी मस्ती करण्याचे कारण नाही. फरक लक्षात घ्या, अमिताभ लगेच नानावटी हॉस्पिटलमध्ये भरती झाला. तुम्हाला न्यायला महापालिकेची गाडी येईल आणि कुठल्या सेंटरमध्ये नेऊन टाकतील याचा नेम नाही. अमिताभच्या देखभालीसाठी सध्या कशाची आवश्यकता नसली तरी अर्धा डझन डॉक्टर, एक डझन नर्सेस, दोन डझन पोलिस, तीन डझन राजकीय नेते, वीस डझन चॅनेलवाले तैनातीत आहेत. तुम्ही तुमच्या कॉटवर खरोखर बोंबललात तरी तुमच्याकडे कुणी डॉक्टर किंवा नर्स फिरकणार नाही. रेमडेसीविर मिळण्याची शक्यताच नाही. चुकून काही बरंवाईट झालं तर तुमची बॉडी तुमच्याच नातेवाईकांकडं सोपवली जाईल किंवा तुमच्या नातेवाईकांकडं सोपवलेली बॉडी तुमचीच असेल याची खात्री नाही.

त्यामुळं काळजी घ्यायला हवी. आणि शेवटी तुमच्या कुटुंबियांना तुमचे शेजारी वाळीतच टाकतील.

५. काळजी अशासाठीही घ्यायला हवी की चार महिन्यानंतरही परिस्थिती भीषण आहे. तुमचं भवितव्य अजोय मेहता यांच्यासारख्या अधिकाऱ्याच्या हातात आहे. आणि त्यांच्या सल्ल्याने चालणाऱ्या सरकारकडे लॉकडाऊनच्या पलीकडं काहीही उपाय नाही. जिथं लॉकडाऊन लागू करायचाय तिथं हातावर पोट असलेले किती लोक आहेत आणि त्या सगळ्यांची काळजी घेण्यासाठी सक्षम असलेली यंत्रणा आहे का याचा ताळेबंद असण्याची शक्यता नाही. लॉकडाऊन हे आपले अधिकार गाजवण्याचे शस्त्र म्हणून लोकप्रतिनिधी वापर करू लागलेत. वर्क फ्रॉम होमवाल्या मध्यमवर्गीयांना अजूनही त्याचे कौतुक असले तरी ते गरिबांना लाचार आणि भिकारी बनवणारे आहे हे लक्षात घेतले जात नाही.

६. तरी मित्रहो, काळजी घ्या. स्वतःची आणि इतरांचीही. अमिताभसाठी प्रार्थना जरूर करा, पण आपल्या आजूबाजूला कुणी करोना पॉझिटिव्ह आढळलं तर त्या कुटुंबाशी माणसासारखा व्यवहार करा.

- विजय चोरमारे

(सदर पोस्ट विजय चोरमारे यांच्या फेसबुक वॉल वरुन घेतली आहे.)

Updated : 12 July 2020 12:56 PM GMT
Next Story
Share it
Top