Home > मॅक्स ब्लॉग्ज > 'निलोफर' मृत्यूने लातूर पॅटर्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? विध्यार्थी आणि पालकांना समुपदेशनाची गरज ! 

'निलोफर' मृत्यूने लातूर पॅटर्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? विध्यार्थी आणि पालकांना समुपदेशनाची गरज ! 

निलोफर मृत्यूने लातूर पॅटर्न पुन्हा वादाच्या भोवऱ्यात? विध्यार्थी आणि पालकांना समुपदेशनाची गरज ! 
X

लातूर शहरातील एका महाविद्यालयात इयत्ता १२ विच्या विज्ञान शाखेत शिकत असलेल्या निलोफर बारगीर या कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थिनीने महाविद्यालयाच्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला शहरातील एका खाजगी इस्पितळात उपचारादरम्यानच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने लातूरचे शैक्षिणक क्षेत्र पुन्हा एकदा हादरून गेले. एका खाजगी शिक्षण संचालकाची हत्या झाल्याच्या घटनेचे वादळ शमते न शमते त्यातच निलोफरच्या संशयास्पद मृत्यूने लातूरचा शैक्षणिक पॅटर्न पुन्हा एकदा राज्यभर चर्चेचा विषय ठरले आहे.

राज्याची शैक्षणिक पंढरी म्हणून ख्याती असलेले लातूर शहर अशा दुर्दैवी घटनाक्रमामुळे कलंकित होत आहे. निलोफर बारगीरची आत्महत्या आणि या घटनेमुळे निर्माण झालेले प्रश्न याचे उत्तर मिळवण्याचे कठीण कार्य पोलीस प्रशासनासमोर उभे आहे. निलोफरच्या मृत्यूनंतर तिचे प्रेत ताब्यात घेण्यासाठी तिच्या कुटुंबीयांनी विरोध केला आणि अनेक सामाजिक संघटना, सामाजिक कार्यकर्त्यांनी घेतलेली भूमिका यामुळे या घटनेचं गांभीर्य वाढलं. या आत्महत्येला महाविद्यालयाचे प्रशासन जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मयत निलोफरच्या नातेवाईकांनी केला आणि या घटनेला वेगळी कलाटणी भेटली. निलोफरच्या आत्महत्येपूर्वीची दृश्य cctv मध्ये कैद झाली आणि ती सर्वांसमोर आली. या दृश्यामध्ये निलोफर आणि महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा होते आणि निलोफर तडकाफडकी महाविद्यालयाच्या छतावर जाते आणि तेथून खाली उडी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न करते हे दिसून येत आहे यातच तिचा उपचारादरम्यान अंत होतो हि बाब लातूरकरांच्या जिव्हारी लागणारी आहे.

लातूर पॅटर्नच्या नावाखाली राज्यातून आणि देशातूनही लातूर शहरात विद्यार्थी शिक्षणासाठी येतात पालकांची यासाठी होत असलेली आर्थिक विवंचना हा वेगळा विषय असला तरी आपल्या पाल्याच्या उज्वल भविष्यासाठी पालक यासाठी सर्वोतपरी प्रयत्न करून लातूरच्या नामांकित महाविद्यालयात आपल्या पाल्याला प्रवेश घेऊन देतात. यानंतर संबंधित महाविद्यालयाची सर्वस्वी जबाबदारी असते कि त्या विद्यार्थी / विद्यार्थिनींची संपूर्ण काळजी घेणे. निलोफर बारगीर हि विद्यार्थिनी लातूरच्या एका नामांकित महाविद्यालयात प्रवेश घेते तिथल्याच वसतिगृहात राहते आणि याच महाविद्यालयात तिचा अंत होतो. ज्या महाविद्यालयात निलोफर शिक्षण घेत होती त्या संस्थेचे वस्तीगृह आहे तिथेच तीचा निवारा होता. हे वस्तीगृह केंद्रशासनाच्या 'नया सवेरा'योजनेअंतर्गत अस्तित्वात असलेले राज्यातील एकमेव वसतीगृह असल्याचे समोर आले आहे. या योजनेअंतर्गत प्रतिवर्षी एक करोड पंचवीस लाख रुपयाचा निधी केंद्र शासन या संस्थेला देत असल्याचे समोर आले आहे त्यातच निलोफरच्या वडिलांनी जवळपास ४० हजार रुपये महाविद्यालय प्रशासनास दिली असल्याची माहिती दिली आणि याच्या पावत्या देखील सोशल मीडियावर फिरत आहेत. आता या घटनेला महाविद्यालय प्रशासन वेगळ्या पद्धतीने समोर आणत आहे.

जनतेचा वाढत चाललेला रोष आणि निलोफरच्या पालकांनी घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पोलीस प्रशासनाने महाविद्यालयाच्या कर्मचारी आणि पदाधिकारी यांच्यावर गुन्हा दाखल केला आणि एका कर्मचाऱ्याला अटक सुद्धा केली. मात्र या आत्महत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी आजही पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दरम्यान या संशयित आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा न्यायाधीशांनी फेटाळून लावला आहे. राजकीय वरदहस्त असलेल्या या संस्थाचालकांना पोलीस प्रशासन अटक करेल काय? अशी शंका सर्वसामान्य जनतेतून व्यक्त होत आहे. संबंधित महाविद्यालयाच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृह कारभारासंदर्भात चौकशी करण्यात येत असल्याची महत्वपूर्ण माहिती लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिली आहे. याबाबत आपणास विविध पक्ष, संघटना आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशी करण्याचे निवेदन आणि आग्रही मागणी केली होती त्या अनुषंगाने चौकशी सुरु असून याचा अहवाल लवकरच संबंधित विभागास सादर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सांगीतले आहे.

एकंदरीतच "निलोफर" मृत्यू प्रकरणाने लातूरच्या शैक्षणिक वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ माजली समाजमाध्यमे आणि खाजगीतसुद्धा या प्रकरणावर अनेक प्रकारे चर्चा झाली मात्र परत एखादी "निलोफर" आपलं जीवन संपवणार नाही यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे आणि काळाची गरज आहे. महाविद्यालयीन तरुण आणि तरुणींच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न होण्याची आवश्यकता आहे. शिक्षणातील वाढती स्पर्धा या स्पर्धेत टिकून राहण्याची विद्यार्थ्यांची धडपड आणि यातून या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी कमालीच्या मानसिक तणावातून जात असल्याचे दिसून येत आहे. या सर्व बाबींचा सामना करण्यासाठी आणि हि मनस्थिती बदलण्याची मोठी जबाबदारी पालक आणि शैक्षणिक संस्थांवर येऊन पडली आहे. यासाठी पालक आणि शिक्षण संस्थांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांचे योग्य समुपदेशन करणे गरजेचे आहे. वाढत चाललेली शैक्षणिक स्पर्धा, त्यामुळे होणार न्यूनगंड आणि अपयशाची भीती आणि या वयातील तारुण्याच्या आकर्षणात अडकलेल्या विध्यार्थी आणि विद्यार्थिनींना योग्य समुपदेशन केल्यास नक्कीच फायदा होईल यात शंका नाही.

- सतीश तांदळे ( मुक्त पत्रकार )

Updated : 6 Aug 2018 2:49 PM GMT
Next Story
Share it
Top