पोप पायस बारावे आणि होलोकॉस्ट

Newly Unsealed Vatican Archives Lay Out Evidence of Pope Pius XII’s Knowledge of the Holocaust
Courtesy: Social Media

जगभर एक हाहाकार माजलेला असताना व्हॅटिकनच्या पवित्र जगात एक वेगळीच खळबळ उडाली आहे.

व्हॅटिकनमधून काही पुराभिलेख बाहेर पडले आणि त्यातून असं कळलं की जर्मन नाझींनी केलेल्या ज्यू हत्याकांडासंबंधी तेव्हाचे पोप- पोप पायस (बारावे) यांना निश्चितपणे माहिती होती. आणि तरीही त्यांनी घेतलेल्या निर्णयांवर त्या माहितीचा काहीही परिणाम झाला नाही.

दुसऱ्या जागतिक महायुद्धात कॅथलिकांच्या शिखर चर्चचे सर्वोच्च नेते बारावे पोप पायस होते. या कालखंडात साठ लक्ष ज्यू धर्मीयांची वंशविच्छेदाच्या हेतूने हत्या केली गेली. पण या सर्वोच्च धर्मगुरूने, करुणामयी जीझसच्या प्रतिनिधीने, पृथ्वीतलावर ईश्वरी राज्य कायम करण्यासाठी अस्तित्वात आलेल्या संस्थेच्या प्रमुखाने या बाबत निषेधाचे अवाक्षरही काढले नाही. पॅपसी- पोपचे राज्य अबाधित रहावे, हातातील सूत्रे घट्ट रहावीत म्हणून युरोपमधील ज्यूंची निर्घृण हत्या, छळकांड होत असताना पोपने डोळे मिटून गप्प रहाणे पसंत केले.

हा पोप देवधर्माचा, नैतिकतेचा रक्षक पोप न रहाता, हिटलरचा पोप म्हणूनच ओळखला जाईल. जगात साम्यवाद आला तर धर्माचे महत्त्व कमी होईल, म्हणून साम्यवादाला ठेचणारा हिटलर पोपला महत्त्वाचा वाटला.

अर्थातच- हिटलरचे लक्ष चर्चकडे वेधले गेल्यास चर्चचे मदतकार्य थांबवले जाईल. म्हणून पोपने असे केले अशा लंगड्या सबबी पोपचे समर्थक पुढे करत होतेच.

१९४२मध्ये हिटलरच्या नाझी सैन्याने चालवलेल्या अत्याचाराची पक्की खबर मिळालेली असूनही पोपने एका सल्लागाराचा हवाला देत, या खबरी अतिशयोक्त आहेत. असे अहवाल अमेरिकेकडेही पाठवले.

पोपपदी नियुक्त होण्याआधी कार्डिनल असलेल्या या धर्मगुरूने १९३३ मध्येच हिटलरसमवेत एक तह केला होता. या तहातील सारी कलमे अगदीच धूसर आणि तशी निरर्थकच होती. हिटलरच्या नाझी राजवटीला जागतिक मान्यता देणे. एवढेच त्या तहाचे उद्दिष्ट होते. या तहामुळे व्हॅटिकनला कसलेसे पिळपिळीत संरक्षण मिळेल. असे त्यात केवळ ध्वनित झाले होते. या तहावर सह्या करायला हे भावी पोप महाशय आणि हिटलर एकत्र आल्याचे छायाचित्र उपलब्ध आहे.

Pope Pius XII Courtesy: Social Media

नाझींच्या विरोधात पोपने बोलावे. म्हणून दोस्त राष्ट्रांनी व्हॅटिकनवर दबाव टाकला होता. पण आपण तटस्थता राखली पाहिजे. असे सांगत व्हॅटिकन गप्पच राहिले. आणि पोपला दुखवायचे नाही. असला फालतू संकेत असल्यामुळे कुणाही राजकीय नेत्याने त्याच्यावर जाहीर टीका केली नाही. किंवा तो फॅशिस्टांना कुशीत घेतो आहे. असे स्पष्ट म्हटले नाही. मुसोलिनीविरुद्धही पोपने भूमिका घेतली नव्हती.

सध्याच्या कोविड १९च्या प्रसारामुळे हे पुराभिलेख पुन्हा एकदा बंद कपाटाआड जाण्याआधी- मार्चच्या पहिल्या आठवडाभरातच संशोधकांना काही अभिलेख वाचता आले. आणि त्यात मिळालेली माहिती ही पोप बारावे पायस यांच्या नीतीमत्तेबद्दल अनेक प्रश्नचिन्हे स्पष्टच उभी करते.

१९४२ मध्ये पोप पायसचे सहाय्यक- आणि भावी पोप पॉल सहावे यांना काही प्रत्यक्ष साक्षीदारांकडून महाभयंकर कत्तलीचे अहवाल मिळाले होते. पण हे अहवाल अतिशयोक्त आहेत, ज्यू लोक नेहमीच अतिशयोक्ती करत असतात, पूर्वेकडचे लोक- म्हणजे आर्चबिशप शेप्तिस्की यांच्यासारखे लोक हे काही फारसे प्रामाणिक नसतात. असे म्हणून व्हॅटिकनने ते उडवून लावले होते. ही नोंद या पूर्वी पोपच्या कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या दस्तावेजांतून गायब होती. ती आता मिळाल्यावर पोप किती ज्यूद्वेषी होता, आणि म्हणूनच तो होलोकॉस्टच्या विरोधात बोलत नव्हता हे स्पष्ट झाले आहे.

हे दस्तावेज खरे तर अजूनही उजेडात आले नसते. २०१८ पर्यंत ते बंदिस्तच राहिले असते. पण पोप पायस बारावे यांना संतपद देण्याचे प्रयत्न सुरू झाले असताना हा इतिहास खुला करावा. अशी मागणी सुरू झाली. आणि पोप फ्रान्सिस यांनी आम्ही इतिहासाच्या पानांना घाबरत नाही, त्यात काहीही वावगे मिळणार नाही असे सांगत ती खुली केली.

अजूनही पोप पायसच्या या कृतीमुळे हजारो ज्यूंचे प्राण चर्चमध्ये त्यांना लपवून ठेवून आम्ही वाचवले वगैरे सांगितले जात आहे. पण १९४३ मध्ये व्हॅटिकनच्या परिसरातूनच हजारभर ज्यू कुटुंबांना बेघर करून नेले गेले होते आणि त्यातील केवळ १६ जण जिवंत वाचले. त्यामुळे या दाव्यांत फारसा अर्थ नाही.

पॉप पायस आणि नाझी…. Courtesy: Social Media

या सर्व कादगपत्रांचा अभ्यास पूर्ण झाल्यानंतरच पोप पायस बारावे हे निर्दोष होते की नव्हते हे समोर येईल. आणि हा अभ्यास पुढील दहा वर्षे सुरू राहू शकतो. सध्या कोविड १९ने या अभ्यासाला खीळ घातली आहे…

आता पोप पायस बारावे यांच्या गप्प राहाण्यून आपण कोणता धडा घ्यायचा. पोप बारावा पायस दोषी की निर्दोष याने आपल्याला काय फरक पडतो. मला या अहवालावर शब्द खर्ची घालण्याचे काय कारण? इतके विषय असताना नाझी कालखंडात व्हॅटिकनमध्ये काय झाले, याच्याशी आपल्याला काय घेणे देणे?

तर याचे उत्तर अगदी सरळ आहे. कुठल्याही धर्मांचे सर्वोच्च धर्मगुरू, जगद्गुरू मानवसमूहांवरील अन्याय, अत्याचार, कत्तली या बाबत काय भूमिका घेतात, हे आपण डोळसपणे पाहिलेच पाहिजे.

दोन इमारतींवर हल्ला करून हजारो माणसं मारली गेली. तेव्हा हल्लेखोरांच्या धर्माचे सर्वोच्च गुरू तोलून मापून बोलत होते. गुजरात दंगलीत जे भयानक अत्याचार आणि खून झाले. तेव्हा दंगलखोरांच्या धर्मगुरूने धडधडीत निषेध करण्यापासून अंग चोरले. म्यानमारमध्ये रोहिंग्यांवर चाललेल्या अत्याचाराबाबत बुद्धाचे अनुयायी असलेले धर्मगुरू झडझडून बोलले नाहीत. आणि परमकारुणिक बुद्धाला बट्टा लावून गप्प राहिले… एवढेच काय, स्वतःचे पूर्वज कुटुंबिय भयानक भोगातून गेलेले असतानाही इस्राएलचे ज्यू धर्मीय पॅलेस्टीनींवर अन्याय करताना दिसत असूनही त्यांचे सर्वोच्च राबाय् ब्र सुद्धा काढताना ऐकू येत नाहीत.

तात्पर्य हेच की मानव्याचे रक्षण करण्यात धर्म आणि धर्मगुरू असफल होतात. त्यांना आपल्या सत्तेचे कळस चकचकीत ठेवण्यात अधिक रस असतो. हे पोप पायस बारावे यांच्या उदाहरणातून वादातीत स्पष्ट होते.

ते रक्षण माणसांनी माणसांसाठी सदसद्विवेक जागा ठेवूनच करायचे आहे.

भारतात जुलमी, अन्यायी फॅशिस्टांचा उदोउदो सुरू झालेला असताना हे काही प्राथमिक धडे आत्मसात करून ठेवायला हवेत. म्हणून पोप पायस बारावे यांची दखल.