Home > मॅक्स ब्लॉग्ज > चंद्रावरचा नील आणि आंबेडकरी चळवळीचा आवाका!...

चंद्रावरचा नील आणि आंबेडकरी चळवळीचा आवाका!...

चंद्रावरचा नील आणि आंबेडकरी चळवळीचा आवाका!...
X

विदयमान आंबेडकरी पक्षांकडे भारतातील सर्व समाजाचं उत्थान करणारे आणि भविष्याचा वेध घेणारे जाहिरनामे नसतात. मग, ही चळवळ शासनकर्ती कुठल्या आधारे होणार? SC समाजाच्या प्रश्नांपलिकडे यांचा अभ्यास नसतो. तो सुद्धा दोन/ चार मुद्दयांचाच आवाका! SC समाज यांना मतं देतो कारण डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले महान उपकार. पुढील कोटयावधी वर्षे हा समाज डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्याच नावावर मतं देईल. मात्र केवळ या मतांवर आपण सत्तांतर करू शकणार नाही. हे कधी कळणार ? वास्तविक सत्ताधारी होण्यासाठी SCची मतं पुरेशी नाहीत. सत्ता घेण्याकरिता इतर समाज घटकांची मते असावी लागतात. त्यामुळे असंख्य पातळयांवर सक्रीय राहावं लागतं. राजकीय चळवळी बरोबरच, सामाजिक, आर्थिक शैक्षणिक तत्सम प्रश्नांवर पायाभूत कामे असावी लागतात. आंबेडकरी समाजातले कार्यकर्ते, नवतरूण अतिशय ऍक्टिव आहेत. पण त्या ऍक्टिवतेला योग्य दिशा, नियोजन आणि गोल देण्याची गरज आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाणानंतर व्यापक प्रमाणात काहीच घडलेलं नाही. सत्ताकेंद्रीत सर्व क्षेत्राला स्पर्श करणारी चळवळ झाली नाही. मोजके विषय हाताळले गेले, या बाबत सहमती आहेच पण सर्वव्यापी सत्ताकारणासाठी आपण अपुरे पडलोय. नवनवीन नेतृत्वाने, किरकोळ नवीन मुद्दे घेत, चळवळ उभारण्याचा प्रयत्न केला पण नेत्यांचं तोकडं नेतृत्व उभं राहिलं समाज उभा राहिलेला नाही. अतिशय बुद्धीमान नेतृत्वाखाली, सामूहिक बुद्धीवंतांच्या दुसऱ्या फळीबरोबरच लाखो हुशार, जागृत कार्यकर्त्यांनी " गोल" निश्चित करून काम करणं नितांत गरजेचं होतं. पण ६ डिसेंबर १९५६ नंतर अदयाप असं अतिशय बुद्धिमान नेतृत्व, बुद्धिमंतांची दुसरी फळी व हुशार कार्यकर्यांचा जत्था निर्माण झालेला नाही.

Moon, Neil Armstrong, Dr. Ambedkar, marathi, maxmaharashtra, blog,नील अंतराळातून चंद्रावर जाताना त्याच्या झेपेला उर्जा देणारे तितकेच ताकदीचे लोक त्याच्या सोबत आणि पृथ्वीवर कार्यरत होते. चंद्रावरचं प्रथम पाऊल तर नीलनेच ठेवलं पण त्याचा फायदा अख्या अमेरिकेला झाला. ५० वर्षा नंतरही अमेरिका फायदा घेतेय तर नील नवीन पिढयांचा प्रेरणास्थान होऊन, चिरंतन, अजरामर झालाय.

घटना एकच पण अभूतपूर्व, जगकेंद्रीत करणारी. नील चंद्रावर गेला त्या घटनेला परवा ५० वर्षे पूर्ण झाली तर आंबेडकरी चळवळीला २०१९ मध्ये ६३ वर्षे होत आहेत. १३ वर्षे आपण सिनियर मात्र रिझल्ट ? नील,त्याची टिम, अमेरिका ब्रेन वर्क करीत राहिली कारण स्पर्धक होती रशिया. आंबेडकरी चळवळ प्रचंड प्रचंड फिजिकल वर्क करत राहिली. ब्रेन वर्क करत राहिला संघ. कारण संघाने स्पर्धक शत्रू मानले होते डॉ बाबासाहेब आंबेडकर ! तिकडे नील रक्ताचा एकही थेंब न सांडवता, जीवाची बाजी लावत क्रांतिकारी ठरला. तर आपल्याकडे आरएसएस कोणतंही युद्ध न करता, पूर्ण सत्ता ताब्यात घेऊन प्रतिक्रांतीकारकाची भूमिका पार पाडतोय. नील आणि त्याच्या अमेरिके पेक्षा जास्त आंबेडकरी चळवळीचा आवाका आहे. कुणालाही माझ्या मताची अतिशयोक्ती वाटेल पण हे सत्य आहे. आंबेडकरी समाजाला फक्त गरज आहे स्वतःला ओळखून क्रांतीच्या वाटेने जाण्याची.

Moon, Neil Armstrong, Dr. Ambedkar, marathi, maxmaharashtra, blog,गेल्या ६३ वर्षात प्रचंड संघर्ष करणारा आंबेडकरी समाज आज कुठं आहे ? भारताचा आधुनिक विकास करताना, डॉ बाबासाहेब आंबेडकर झपाटून काम करत होते. भारताच्या विकासाचा रथ प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी ओढलाय, या विकास रथाचा नकाशा तयार करताना डॉ बाबासाहेब आंबेडकरां समोर ब्रिटिश तज्ञ आणि संशोधक बसायचे. शांतपणे त्यांचं म्हणणं ऐकून त्यावर अंमल करायचे. एवढया मोठया उतुंग विद्वान महापुरूषाचे आपण अनुयायी. आजही हातात फारसं काही नाही पण लढण्याची स्फूर्ती घेऊन आहोत. भारताचा आधुनिक विकास करत असतानाच , दुसऱ्या बाजूला अस्पृश्यांच्या प्रश्नांवर डॉ बाबासाहेब आंबेडकर जीवाचं रान करून लढत होते.

तर, मुद्दा "आंबेडकरी चळवळीला यशो शिखरावर घेऊन जाण्याचा." जे मुद्दे आंबेडकरी विचारात नव्हते असे मुद्दे घेऊन चळवळ उभी करण्याचे प्रयत्न १९५६ नंतर अनेकांनी केले. करत आहेत. तत्कालीन काळात, तात्पुरते यश देणारे क्षण आले सुद्धा! नेमक्यां लोकांना स्वतः साठी याचा पुरेपूर उपयोग करून घेतला मात्र असंख्यांकांनी आपले प्राण वेचले. अनेकजण जगण्याची ऐशीतैशी करून जगले.

आंबेडकरी पक्षांच्या राजकारणाचा परिघ विस्तृत करताना, प्रथमतः समाजाचा विश्वास संपादन करावा लागेल. उर्वरित समाज घटकांना , त्यांच्या प्रश्नांना वाव देऊन आपल्यात सामावून घ्यावे लागेल. त्यांच्या मूलभूत आणि इतर संविधानिक अधिकारांना न्याय देण्याचा लढाई लढतानाच, त्या समाज घटकांच्या जाणीवा जागृत करणाऱ्या आयुधांचा वापर करावा लागेल. प्रत्येक भारतीयास" संविधानाचं" शिक्षण मोफत आणि सक्तीचं करावं लागेल. राष्ट्रीय प्रश्नांवर लढे उभारावे लागतील.आधुनिक तंत्रज्ञानाचा, विज्ञानाचा भविष्यातील भारताच्या उभारणीतला सहभाग अधोरेखित करून त्यावर कार्यक्रम आखावा लागेल. उपलब्ध आर्थिक स्रोतांबरोबरच नवीन आर्थिक स्रोत निर्माण करणारी यंत्रणा उभारावी लागेल. त्या दृष्टीने शोध मोहिमा घ्याव्या लागतील. आंबेडकरी दृष्टिकोनातून पर्यावरणाचा विचार करत भारतातील व जगातील जनतेचा विचार करणारी योजना बनविणे महत्त्वाचे आहे. पुढील अर्धशतकाचा जागतिक विचार करता, आपला देश आणि त्यातील सर्व देशबांधवांची तत्कालीन परिस्थिती यावर सर्वांगीण बाजूचा आधारभूत कार्यक्रम दयावा लागेल.. खरंतर यांसारखे अजूनही असंख्य विषय आहेत आणि हा लेख वाचणाऱ्यांच्या डोक्यातही शेकडो मुद्दे असू शकतात. मात्र गरज आहे; ती या विषयांना आंबेडकरी पक्ष्यांनी आपल्या जाहिरनाम्यात घेण्याची. तसेच याच्या अंमलबजावाणी करिता वास्तव संघर्ष करण्याची.

Updated : 22 July 2019 10:59 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top