Home > मॅक्स ब्लॉग्ज > मुंबईत प्रलय!

मुंबईत प्रलय!

मुंबईत प्रलय!
X

'तो' दिवस आठवला की १३ वर्षांनंतरही अंगावर भीतीने काटा उभा राहतो. २६ जुलै २००५ हा दिवस आणि त्या नंतरची रात्र मुंबईकरांसाठी काळरात्र ठरली.

आषाढ महिना संपू लागला होता व दुपारनंतर अचानक धो धो पावसाला सुरुवात झाली. मुंबईची उपनगरे, ठाणे, रायगड, रत्नागिरीत पुढचे २४ तास केवळ धुंवाधार वर्षा होत राहिली.

या प्रलयात तब्बल १४९३ जणांचे बळी गेले आणि ४५० कोटींचे नुकसान झाले. त्यानंतर मिठी नदीच्या मगरमिठीतून बाहेर पडण्यासाठी आजवर सुमारे २५०० कोटी खर्च झाले आहेत. तरी आजही मुंबईत पाणी तुंबत आहे. याचा त्रास मुंबईकरांना सहन करावा लागत आहे.

मुंबईतील २६ जुलैच्या महापुराला कारणीभूत ठरलेल्या मिठी नदीच्या विकासासाठी राज्य सरकारने ‘मिठी नदी संरक्षण व विकास प्राधिकरणा’ची स्थापना केली. ह प्राधिकरण नक्की काय करते? त्याचा कामाचा आढावा कोण घेतो?

१७.८ कि.मी. लांबीच्या मिठी नदीपैकी ११.८ कि.मी. लांबीची नदी महापालिकेच्या अखत्यारीत आहे. पुन्हा सातत्याने आठवडाभर पाऊस पडला तर २६ जुलैच्या आठवणी ताज्या होतील, अशी भीती मुंबईकर व्यक्त करतात. पण कृतीसाठी कुणीच पुढे येत नाही.

जगभरातील कोणत्याही एका शहरात एका दिवशी इतका पाऊस झाल्याची गेल्या २०० वर्षांत नोंद नाही. त्यामुळे या नैसर्गिक 'आपत्ती'मुळे सर्व यंत्रणा निरुपयोगी ठरणे समजण्यासारखे आहे. पण या आपत्तींनंतर एकमेकांविरूद्ध चिखलफेक करणे व मदत पुरवण्याच्या नावाखाली स्वत:ची प्रसिद्धी करून घेणे याच्या पलिकडे आपण काहीच शिकलो नाही, हे दुर्दैव.

आजही गटारात, नदीच्या पत्रात आपण प्लॅस्टिकच्या पिशव्या फेकतोच आहोत; नाल्यांच्या कडेला झोपड्या उभ्या राहातच आहेत व गाळ उपसण्याच्या कामात भ्रष्टाचाराचा गाळ साचतोच आहे.

मुंबईचा प्रलय आला व ओसरला; आम्ही मात्र कोरडे ठणठणीतच राहिलो. या महानगरीची आणखी एक शोकान्तिका उघड झाली!!

भारतकुमार राउत

Updated : 26 July 2018 6:35 AM GMT
Next Story
Share it
Top