Home > मॅक्स ब्लॉग्ज > मायबाप डोंगऱ्या - एक प्रवास वर्णन

मायबाप डोंगऱ्या - एक प्रवास वर्णन

मायबाप डोंगऱ्या - एक प्रवास वर्णन
X

मी लय खुष होतो. शिरढोण गावाच्या डोंगरावरील जंगलात मी स्वछ श्वास अनुभवत होतो… डोंगराच्या माथ्यावर उभा राहून सर्वत्र घनदाट जंगल पाहत होतो.. दीर्घ श्वास भरून पुन्हा सोडत होतो. इथपर्यंत पोहचण्याचा प्रवास जितका रोमांचक तितकाच कठीण होता. सर्वत्र दाट झाडी.. असंख्य पक्षांचे आवाज. वेगवेगळे जीव जंतू. बेभान होऊन वाहणारा वारा. या वाऱ्याच्या सोबतीला आम्ही जवळपास २० जण या डोंगराच्या माथ्यावर. या डोंगरावर आम्ही वारा स्वतंत्र्य अनुभवताना पहिला. या डोंगराच्या कुशीत एक न अनेक चमत्कार दडलेले. डोंगरावर त्याचे पहारेकरी म्हणून उभी असणारी असंख्य झाडे. त्या झाडांवर डोंगऱ्याचे संदेश वाहक, असंख्य वन्य पशुपक्षी. या साऱ्यांच्या कितीतरी पिढ्यांची भूक भागंल, यवढी रसद हि या डोंगऱ्याच्या जंगलात, झाडा-झुडुपात, मातीत मौजूद होती. डोंगर आनंदी होता. हे त्यावर राहणाऱ्या पशु,पक्षी, जीव, जंतू, किड्या,मुंग्या, खेकडं, माकडं यांच्या स्वैर वावरातून दिसत होतं. डोंगराच्या कुशीत त्यांची स्वतंत्र आणि वेगळी दुनिया वसलेली…

माझ्या पायावर काहीतरी हालचाल जाणवली. तेंव्हा मी बूट आणि सॉक्स काढून एका दगडावर उभा होतो... मी खाली बसलो, बघितलं. किडे-मुंग्यां हिकडून तिकडं आणि तिकडून हिकडं ये जा करीत होती. त्यांचा हा प्रवास मला एखाद्या चावी दिलेल्या खेळण्यागत भासू लागला. मी जायच्या आदल्या दिवशीच या गावात पाऊस झाला होता. सर्वत्र पावसात भिजलेला मातीचा मस्त वास दरवळत होता. ‘वा, मातीचा चांगला वास येतोय’ मी म्हणालो. ‘कालच डोंगऱ्या पेटभरून पाऊस प्यायलाय,’ कृष्णा कातकरी म्हणाला. कृष्णा...कृष्णा म्हणजे या गावातील आदिवासींचा पुढारी. आम्ही या गावात येण्याचं कारण हि तोच.

डोंगराच्या पायथ्याशी उभा राहून त्यावर चढण्याचा चंग बांधला होता. पण हे जेवढ सहज सोपं वाटंत होतं त्याहून कितीतरी पटीने अवघड होतं. तर, या प्रवासाची सुरुवात या गावाच्या नावाच्या ओळखी पासून झाली.

शिरढोण. हे नाव उभ्या जिंदगीत दुसऱ्यांदा तानाजी या पिक्चरमध्ये मी ऐकलं होतं. त्याआधी ऐकलं होतं ते भगवान कडून. भगवान माझा मित्र, त्याने पहिल्यांदा या गावाचे नाव उच्चारलेल. (आता भगवान आणि मी एकत्र काम करतो. तसे आम्ही दोघे हि पूर्वाश्रमीचे सामाजिक चळवळीतले कार्यकर्ते). त्याने सांगितले होते अद्याक्रांतीकारक वासुदेव बळवंत फडके याचं हे गाव. या गावात डोंगराच्या पायथ्याशी आदिवासी वस्ती आहे. या गावातील आदिवासी लोक या डोंगराच्या कुशीत शेकडो वर्षांपासून जमीन कसंत आहेत. आपल्याला या गावात जायचे आहे. तसे आदिवासी मला पुस्तकांतून, चित्रा, वाचनातून परिचित आहेत. ते नेहमी रापलेले असतात आणि त्यांच्यावर नेहमी अन्याय होत असतो. असं नेहमीच बुका-भाषणांमधून माझ्या सहित अनेक शहरी मंडळी ऐकत आले आहेत. या गावाच्या आदिवासी वाडीत राहणारे, डोंगरावर प्रेम करणारे लोक आहेत. ज्यांनी, त्यांच्या किती तरी पिढ्यांपासून डोंगराच्या पाषाणी कठोरतेवर आपल्या कष्टाच्या घामाचा ओलावा शिंपडून जमीन तयार केली. हे आदिवासी ती जमीन त्यांच्या आज्या-पंज्या पासून करीत आहेत. कदाचित खापर पंज्यापासून. त्यांच्या कितीतरी पिढ्यांचा वावर या डोंगरावर होता. त्यांच्या सातत्याच्या वावरानेच या डोंगराच्या उरापोटावर वावर तयार केले. गरजेपुरती जमीन बनवली. या जमिनीवर जगण्या पुरती शेती करू लागले. पुनः पुनः निर्माण करण्याची कला या लोकांना चांगलीच अवगत आहे. ‘निगेशन ऑफ निगेशन’ चा समर्पक अर्थ शाळेची पायरीही न चढलेल्या या आदिवासी लोकांना माहित असेल (?).

तर विषय होता या गावात जायचा. या गावात का जायचे होते ? तर, शेकडो वर्षांपासून कसंत असणाऱ्या जमिनी अद्याप तरी या आदिवासींच्या नावावर अधिकृतपणे झालेल्या नाहीत. ‘आपण कसंत असणाऱ्या जमिनीचा सरकारी कागद करावा लागणार. त्यो कागद केला तरच आणि तरच हि जमीन पुन्हा आपल्याला कसंता येणार असल्याची भीती त्यांच्या उंबरठ्या पर्यंत पोहोचलेली आहे. त्यांच्या पूर्वजांना जमिनीचा कागद करायचा असतो हे माहित नव्हतं. कृष्णाच्या पिढीपर्यंत कुणीही शाळेची वाट चोखाळली नव्हती. का ? त्यांना का वाटल नसेल कि आपणहि शाळेत जावं? मुद्दा असा आहे कि शाळेत जाऊन काय करणार ? तर, कस जगावं याचं शिक्षण घेणार. त्ये तर आम्ही शाळेत न जाता ही जगतोच आहोत की...

कदाचित असा विचार त्यांच्या डोक्यात आला असेल.(?). पण,खरंच असा विचार त्यांच्या डोक्यात डोकावला तरी असेल का ? कि निसर्गाबरोबर जगताना मिळणाऱ्या सुखामुळे-आनंदामुळे त्यांना शाळेची गरजच वाटलीच नसेल?. माहित नाही नेमकं काय ते. तर, जमिनीचा अधिकृत ताबा मिळवणे आणि डोंगर वाचवणे हा मध्यवर्ती मुद्दा आम्हाला शिरढोण या गावातील आदिवासीवाडी पर्यंत घेऊन आला. या आदिवासींचा पुढारी कृष्ण कातकरी. कृष्ण हा अशिक्षित पण आदिवासी वाडीतले सारे लोक त्याला मानतात. त्याचा आदर करतात. कृष्णा म्ह्नजेच कुशाभाऊ या आदिवासींच्या हक्कासाठी गेल्या २ दशकांपासुन लढत आहे. अशिक्षित कुशाभाऊला सरकारी कागदाची भीती कळून चुकलीय. त्यामुळेच त्याने कागदाची लढाई कागदाने लढण्याचा संविधानिक मार्ग स्वीकारला आहे. त्याला माहित आहे कि जर या जमिनीचा सरकारी कागद न करता या जमिनीवर ताबा घेतला तर आपल्याला आणि आपल्या सारख्या अनेक आदिवासी लोकांना शिक्षा भोगावी लागेल. खरंतर मुद्दा शिक्षा भोगण्याचा नाही.

मुद्दा आहे तो विस्थापनाचा. “या जमिनीवरून हाकलवून लावल्यावर कुठ राहणार? काय खाणार? शेती कुठ करणार? पोरंबाळं कुठ खेळणार. या जमिनीचा ताबा नाही मिळाला तर हातचा रोजगार जाणार. या डोंगरावारला जिता- जीतराब पोराखा होणार. पोटापाण्यासाठी गाव सोडून शहराची हमाली करावी लागणार. त्यासाठी शहरात जाव लागणार. डोंगराच्या कुशीत भेटणारा बंधमुक्त श्वास मालकाच्या हुकमाचा ताबेदार होणार. कधी नसलं-असलं तर हेच्या-तेच्या कडून तेल मीठ मागता येत होतं या विस्थापितांच्या शहरांत कोणाकडं हात पसरवणार ?” हे कुशाभाऊचं मत साऱ्या भीतीचे यथोचित कथन करते. याचं पुरतं भान कुशाभाऊला आल्यानेच, त्याने त्याच्या आदिवासीवाडीतील प्रत्येकाला जमेल त्या मार्गाने पटवून देण्याचा प्रयत्न केला. जवळपास सार्यांनीच त्याला साथ दिली. या सार्यांच्या साथीनं कुशाभाऊ स्वतःसाठी आणि सर्वांसाठी या जमिनीचा सरकारी कागद होण्यासाठी भांडत आहे. झिजत आहे.

२०१० साली कोण्या संस्था, संघटनेच्या वतीने या आदिवासी लोकांनी पहिल्यांदा आपण स्वतः कसंत असणाऱ्या जमिनीवर अधिकृत ताबा मिळवण्यासाठी वनहक्क कायदा २००६ अंतर्गत वैयक्तिक वनहक्काचे दावे दाखल केले होते. परंतु सबळ पुरावे नसल्याचे कारण देत ते शासनदरबारी फेटाळून लावले गेले. आज घडीला जमीनीचा कागद करण्याच्या या धडपडीला १० वर्ष होताहेत. माझ्या मते १० वर्षे हा कालावधी १ दशक इतका असतो. तसं शाळेत शिकलोय मी. ज्यांच्या कितीतरी पिढ्या या डोंगराच्या मातीत विसावल्या, त्यांना आता पुरावा सदर करावा लागणार आहे. जर हे पुरावे सदर नाही केले तर (?), १९२७ च्या इंग्रज वन कायद्यानुसार राखीव वनात विना परवाना प्रवेश केल्याचे कारण देत ५००० रू. दंड / १ वर्ष कारावास, वनातील मालमत्ता नष्ट केली म्हणून रू. १००० दंड / १वर्ष कारावासची शिक्षा या लोकांच्या वाट्याला येऊ शकते. त्यांना कोणत्याही क्षणी या जमिनीवरुन बेदखल करून हाकलवून लावले जाईल.

तर, मुद्दा असा होता की, ज्या कारणांमुळे या आदिवासी लोकांचे दावे नाकारले गेले त्या कारणांचा उलगडा एव्हाना भगवानने केला होता. भगवान गेल्या दोन-एक वर्षांपासून या प्रकरणांच्या मागे होता. तो म्हणाला, आपण अधिकचे पुरावे तयार करू शकतो. आपण उपग्रह प्रतिमा(Satellite Image) तयार करू शकतो. त्याच्या जिज्ञासेने उपग्रह प्रतिमा कशा तयार केल्या जातात हे शिकवणाऱ्या संस्थेचा शोध घेतला. आणि आम्ही, म्हणजे मी, भगवान, दुलारी, फराह आणि श्रीयश इ. हि आमची टीम त्याचे धडे घेऊ लागली. हे काम तसे दोन महिन्यांपूर्वीच सुरु व्हायचे होते. पण, कोरोना महामारीमुळे संबंध जग स्तब्दाव्स्थेत असल्याने ते होऊ शकले नाही. आम्ही त्या संदर्भात रोज चर्चा करू लागलो. ते कसे पुढे घेऊन जायचे यावर तासंतास चर्चा करू लागलो. या विषयात काम करणाऱ्या अनेक संघटनां, संस्थाच्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांच्याशी बोलून मुद्दे समजून घेऊ लागलो. अखेर महाराष्ट्रात अनलॉकडाऊन १ सुरु झाला.

अनलॉकडाऊन १ सुरु होण्या आधी जवळपास दोन आठवड्यांपूर्वी मी सध्या राहत असलेल्या सोसायटीमध्ये कोरोनाचे तीन रुग्ण सापडले. बिल्डींग नियमाप्रमाणे सील केली गेली. सोसायटीतून कोणही बाहेर जाणार नाही आणि बाहेरून आत येणार नाही याची सूचना देणारा महा नगरपालिकेचा बोर्ड आमच्या सोसायटीच्या गेटावर टांगण्यात आला. आणि भगवानचा व्हाट्सअपवर मेसेज आला.

डे अफ्टर टुमारो मॅपिंग इन शिरढोन व्हिलेज. मला समजण्यासाठी ह्या दोनच ओळी पुरेशा होत्या. सोसायटीमधून बाहेर कसे पढावे? काही समजेनास झालं. मोहीम रद्द करणं शक्य नव्हतं. कारण नंबर एक कि, या मोहिमेत आघाडीवर तीनच लोक असणार होते. या तीनातील मी एक, दुसरी दुलारी आणि भगवान तर वाटाड्या. गेल्या कितीतरी महिन्यांपासून भागवानने तहसील कार्यालयात उपाशी तपशी अगीनत चक्रा मारून या प्रकरणाची कागदपत्रे गोळा केली होती. ती आम्हाला समजून सांगितली होती. कारण नंबर दोन, म्हणजे गावकऱ्यांशी आदल्या दोन दिवासंपुर्वी भगवानने रात्री ११ वाजेपर्यंत मिटिंग केली होती. निघताना त्याची गाडी खराब झाली. मग ती नीट करून घराच्या वाटेला लागेस्तोवर १२.30 वाजले होते. आणि घरी पोहचायला जवळ पास १.३० झाले. अर्थात त्याची पावसातली एवढी मेहनत वाहून घालवणे परवडणारे नव्हते. परवडणारे या अर्थाने नव्हते कि, एकदा पाऊस सुरु झाला कि आम्हाला या डोंगरावर पोहचून उपग्रह प्रतिमा तयार करण्यासाठी डोंगरातील रानांचे बंध तुडवणे शक्य होणार नव्हते. याची सूचक कल्पना भगवानने या आधीच आम्हाला दिली होती. मग काय ? घरी पप्पू दादाशी बोललो. त्याने दोन पर्याय सुचवले. पैकी एक, वॉचमन उठायच्या आधी मागच्या गेटाने बाहेर पड. आणि दोन तुझ्या इतर टीमला पुढे पाठव तू नंतरहून, काही दिवसांनी जॉईन कर. त्यातला दुसरा पर्याय मला सोयीचा वाटला. कारण पहिल्या पर्यायात वॉचमन उठायचा संबंधच काय ? तो जगाचा असणार होता.

दुसऱ्या दिवशी या मोहिमेची सारी जबाबदारी दुलारी आणि भगवानवर टाकायची ठरवली. उद्या सकाळी दोघांनाही फोन करून सांगायचे ठरवले. दोघांनाही कॉल करे पर्यंत दुलारीच्या परीक्षेचा भला मोठा इग्रंजीतला मेसेज आमच्या टीमच्या व्हाट्सअप ग्रुपवर येऊन धडकला होता. आणि त्या खालोखाल भगवानाचा त्या मेसेजच्या समर्थनात पाठवलेला अंगठाही. या मोहिमेत दुलारीला सहभागी होता येणार नाही असा या मेसेजचा सार होता. आणि भागवानच्या अंगठ्याचा अर्थ ओके इथपर्यंतच मर्यादित होता. आता दोन दिवसांनी मोहिमेवर जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

दिनांक ९ जूनच्या रात्रीला उद्या सकाळी सोसायटीतून बाहेर कसे पडावे या चिंतेच्या पाणवठ्यावर निराशेचा पक्षी गोंधळ टिपत होता. सकाळी ६ चा आलाराम वाजला. मी मुकाट्याने अंघोळीला गेलो. सारं काही आटपलं. ७ ला दाराच्या बाहेर पडणार तोच खट खट...दार वाजले. मी दार उघडले. तर समोर मामा... हां, तर मी मामाकडे राहतो. आणि मामांना यातलं काहीच माहित नाही. आणि माझे मामा पूर्वाश्रमीचे या सोसायटीचे सेक्रेटरी. ‘एवढ्या लवकर कुठं?’ मामांनी विचारलं. ‘कुठं नाय’ मी म्हणालो. मामा घरात आले आणि थेट बाथरूमात गेले. त्यांच्या बाथरूमचे दार बंद होताच मी घराचे दार उघडून बाहेर पडलो.

आता बाहेर वॉचमनच करायचं काय ? त्याला काय उत्तर द्यायचं? या प्रश्नांच्या सोबतीनं जिन्याने खाली उतरलो. लिफ्टने न येण्याचे कारण म्हणजे वॉचमनला समजलं तर? तेवढ्यात ‘गुडमॉर्निंग साहब’ मागून आवाज आला. ‘बहार जारे’ ? मी प्रती उत्तरात गुडमॉर्निंग म्हणायच्या आधीच समोर वॉचमन उभा. मी नकारार्थी मान हलवत ‘हो’ उच्चारलो. त्याने गेटच्या दिशेने अगेकुच केली. आता हा मला गेटावरचा बोर्ड वाचायला लावणार वाटतं, मला वाटलं. ‘क्या साहब,’ ‘बिल्डींग का सील खुलतेही बाहर जानेवाले आप पेहले हो,’ म्हणत त्यांनं गेटचे दार उघडले. मी सुटकेचा श्वास घेतला. आणि गाडी घेऊन बाहेर पडलो. काल रात्री भगवानने सकाळी ८ पर्यंत पळसपी फाट्यावर भेटू सांगितले होते. गाडी घेऊन सुसाट शिरढोणच्या दिशेने निघालो.

मला सानपाडा ते शिरढोण असा प्रवास करायचा होता. सानपाड्याहून पनवेलच्या दिशेने निघालो. गावात पोहचण्याची घाई होती. लोकांशी केंव्हा भेटतोय आणि आपण हाती घेतलेल्या कामाची सुरुवात करतोय अस झालं होतं. या कामाची सुरुवात करणं म्हणजे मला जिंकल्या सारं वाटत होतं. शिरढोणच्या दिशेने निघताना नेरूळ, सीबीडी बेलापूरचे काल पर्यंत महाबलाढ्य असणारे डोंगर कोण्यातरी रोगाचे शिकार होऊन खंगूनखंगून निमुळते झाल्याचे दिसत होते. आनपानी न मिळालेल्या कुपोषित लेकारागत वाटत होते. डोंगरावर खानकाम केल्याचा भाग मला डोंगर सोलून ठेवल्यागत वाटू लागला. मी या डोंगरांना बघत बघत मीटर दरमीटर अंतर कापत होतो.

जसजसा मी शिरढोणच्या दिशेने पुढे पुढे जात होतो तसतसा, शहरांच्या गटारीचा वास मागेमागे पडत होता. चाळीस एक मिनिटांत मी पळसपेफाट्यावर पोहचलो. ठरल्या प्रमाणे मी भगवानला कॉल केला.. त्याने थेट गावात भेटण्याचा सल्ला दिला. मी पळसपे फाट्याहून शिरढोणला कसं जायचं विचारायला एका व्यक्तीच्या जवळ जात होतो. ‘ये चल मागं’, ‘मागं हो मागं’ असा हाताचा इशारा करीत मास्कच्या आतल्या तोबरा भरलेल्या तोंडाने मला सज्जड दम भरू लागला. मी विसरलो होतो कि कोरोना नावाची महामारी सुरु आहे. मी...सॉरी- सॉरी म्हणत रस्ता इचारला. त्याने लांबूनच एका हाताने इशारा करत दुसऱ्या हाताने तोंडावरचा मास्क बाजूला करत, थुकत-थुकत बोलला ‘सरळ मार्गी रस्ता धर.’ मी थेट गाडी काढून गावाच्या कमानी जवळ पोहचलो. कोरोनाच्या काळात पहिल्यांदा गरमागरम वडापाव खाल्ला तो कमानी जवळ. मी दोन वडापाव खाल्ले आणि भगवान पोहचला.

मी आणि भगवान आदिवासी वाडीवर पोहचलो. वाडीपर्यंत पोहचताना भगवानने मला अजून गावात कुठे वडापाव भेटतो ते दाखवले. फडके वाडा दाखवला. भगवान आणि मी, आम्ही दोघेही बाळाराम कातकरीच्या दारात पोहचलो. भगवानला ओळखणारे हळूहळू जमा होऊ लागले. अजून कृष्णा म्हणजेच कुशाभाऊ यायचा होता. भगवानने लोकांशी माझी आणि मला लोकांची जुजबी ओळख करून दिली. ‘कुशाभाऊ कुठंय तुम्ही’..भगवान खुडचीवरून उठता उठता उच्चारला. हाच तो आदिवासी कुशाभाऊ उर्फ कृष्णा. गाडी कुठवर जाईल ? मंदिरा पर्यंत जाईल का ? रस्ता कसाय ? पाऊस झालाय? भगवान आणि कुशाभाऊचा संवाद चलू होता. ‘बर तुम्ही काय खाणार ?’ ‘दुपारच्या जेवणाचं काय ?’ हा कुशाभाऊचा प्रश्न आणि ‘काहीच नको’ हे भगवानचे उत्तर. भगवानचे हे उत्तर माझ्या नापसंती पडले.

भगवान त्याच्या बायका पोरांना गंडवून आला होता अर्थात उपाशी. आणि मी हि सकाळी घरातून काहीच न खाता बाहेरपडलो होतो. भगवान आणि मी आम्ही दोघेही न खातापिता गावात पोहचलो होतो. मी एकत उभा होतो. हेल्मेट इथच ठिवा म्हणत सर्वजन डोंगराच्या दिशेने निघाले. मी आणि भगवानने हेल्मेट बाळाराम कातकरीच्या घरात ठेवले. आणि आम्ही निघालो, डोंगराच्या दिशेने. आम्ही डोंगराच्या पायथ्याशी पोहचलो. भगवानने माझ्याकडे आणि मी भगावानकडे बघितले. त्याला माझे मनोबल टिकवून ठेवायचे होते बहुदा. कारण मी ज्या पद्धतीने डोंगराकडे डोक्याला हात लाऊन वर मान करून बघत होतो, त्यावरून कदाचित त्याला शंका आली असावी कि हे वर पर्यंत येतंय कि नाही. ‘ती कुटी दिसतीय का’? ‘तिथ जायचंय.’ डोंगरावर एखाद्या टिंबा एवढ्या आकृतीच्या झोपडीकडे बोट दाखवत कुशाभाऊ बोलला. मी काहीही बोलायच्या आधीच ‘मग कसं वाटतंय’ ? ‘भारीच वाटतंय की’ असा एकाच दमात प्रश्न विचारून उत्तर देऊन भगवान मोकळा झाला.

त्याला मानसशास्त्र चांगल समजतं असा माझा समज आहे. आणि चल आता म्हणून माझ्या पुढे चालू लागला. मला १५ वीस मिनिटे चालून झाल्यानंतर, ती झोपडी डोंगराच्या इतक्यावर नसायला हवी होती असं वाटू लागलं. डोंगर चढून घायाळ झालेल्या डोक्यात डोंगराच्या इतक्या उंचावर असणाऱ्या त्या झोपडीचा राग येऊ लागला. त्यानंतर प्रत्येक पाऊलागणिस वाटू लागल. ती झोपडी अजून तेवढीच का दिसतेय? ती लवकर जवळ यावी किंवा आम्ही तिच्या पर्यंत लवकर पोहोचावं अशा आर्त किंकाळ्या मनात उठू लागल्या. मी तीव्र उतारावर दगडी वाटेने गुडघ्यांवर हाताचा जोर टाकत वर चढत होतो.

सर्वजन हसत चर्चा करत माझ्या पुढे चाललेले. मी जरा जोरात पाऊलवाट तुडवत त्यांच्या पुढे निघालो. अर्ध्याच तासात मी दमलो आहे हे मला इतरांना समजून द्यायचं नव्हतं. ‘थेट चला वर वर;’ मागून आवाज आला. मी आता पुरता थकलो होतो. मधून मधून भगवान माझ्याकडे बघून स्मित हास्य करीत होता. काळजीपोटी, त्याचे माज्यावर लक्ष होते. आणि मला, कुणीतरी उचलून वर न्याव असं वाटत होतं. धाप लागू नये म्हणून मी श्वसनावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करत होतो. पाऊलं जड झालीत आणि मी एका जागी थांबलो. ‘दमला का ?’ एकजण इचारून वरच्या दिशेने निघून गेला. भगवान सहित पुढचे पुढेच गेले. दिसेनासे झाले. मागे कोणी असेल याची कल्पना नव्हती. मी अंदाजा घेत दगडावर बसलो. अजून कितीवार चढायचंय ? किती वेळ लागणार? मी चढेन नं वर पर्यंत ? धापा टाकीत विचार करत होतो. ‘लक्ष कुठाय तुमच?’ ‘पाणी पायजे का ?’ ‘दोनदा इचारलं दादा मी तुम्हाला.’ हलवून मला एकाने सांगितलं. तो शंकर होता. शंकरने मला हलवून जागा करेपर्यंत माझ्या डोळ्यावर अंधारी होती. आवाज एकू येत नव्हता. मी पाण्याची बाटली खोलली आणि तोंडाला लावली. जोरात दम सोडत शंकरला विचारलं ह...अजून किती वर चढायचंय ?. ‘ते काय तिथपर्यंतच जायचंय’ शंकरने त्याला दिसणार्या कोणत्या तरी गर्दीतल्या एका झाडाकडे हाताचा इशारा केला.

मी धापा टाकत टाकत दोन वेळा इचारून खात्री करून घेतली. नेमक तिथ पर्यंतच चढायचंय ना ? पहिल्या उत्तरात तो हो म्हणाला आणि खात्रीच्या उत्तरात पुढं सारं सपाटंच आहे म्हणाला. मी समजून चुकलो त्या पुढेही चालायचंय तर.. मी त्याच्या खांद्यावर हात टाकला. माझा भार त्याच्या खांद्यावर टाकण्याच्या उद्देशाने. आणि मी दमलोच नसल्याचे उगाच त्याला भासवू लागलो. त्याने काही विचारले कि मी फक्त ‘हम्म’ किंवा ‘अंहम्म’ एवढेच हुंकारु लागलो. एकदाचा त्याने दाखवलेल्या झाडापर्यंत येऊन पोहचलो. आमची, खरंतर माझी वाट बघत सर्वजन उभे होते. भगवानने नेहमी प्रमाणे माझ्याकडे बघत स्मित हास्य करत दोन्ही हाताचे अंगठे दाखवले. त्याला कळूनचुकलं होतं. आता याची विकेट पडणार, बहुतेक. त्याच्या स्मित हास्यात मी स्पष्ट काळजी पाहू शकत होतो. मी दीर्घ श्वास घेऊन उच्चारलो. आता आपुन बसून बोलूया. थोडं पाणी पिऊया. आणि मग कामाला म्हणजे मॅपिंगला सुरुवात करुया. सर्वांनी होकारार्थी माना डुलवल्या. मी खुश झालो. आता बसायला भेटणार याच्या आनंदाने. पण दुसऱ्या क्षणातच आनंद भंग पावला. बसायला, माना डुलवल्याच्या ठिकाणापासून पुढे २० मिनिटे चालत जायचे होते.

कारण त्या टोका कडून कामाला सुरुवात करायची असं कदाचित त्यांच्यात ठरलं होतं. आत्ता पर्यंत दीड तासाहून अधिकचा वेळ झाला होता. आम्ही चालत होतो, डोंगर चढत होतो. आम्ही जवळपास साडेचार किलोमीटर अंतर कापून डोंगर चढला होता. अखेर बसायच्या ठिकाणी पोहचलो. ‘बसा इथ’ आवाज ऐकल्याबरोबर मी पटकन खाली बसलो. एक अख्खी पाण्याची बाटली गळ्याखाली उतरवली. तशी थंडगार वार्याची झुळूक आली. डोंगरावल्या जंगलानं माझ्यावर मायेचा हात फिरवल्याचा भास झाला. कदाचित या जंगलाला माझी दया आली असावी. मी दम सोडला. पंधरा-वीस मिनिटांनी कामाला लागलो. मॅपिंगला सुरुवात केली. ती मागील १५ वर्षे या गावाचे पोलीस पाटील राहिलेले अंबाजीच्या जमिनी पासून.

मी शक्य तितक्या उंचवट्यावर उभा राहून संपूर्ण माळ न्याहाळला. आणि भगवानाला सांगितले आज जर हा माळ पूर्ण नाही झाला तर, घरी जायचं नाही. घरी जायचं नाही या माझ्या विधानाचा अर्थ होता कि डोंगरावरंच राहायचं. कारण उद्या परत एवढा डोंगर चढायचा याचा विचार करणे शक्य नव्हते. किमान मी तरी हेच ठरवलं होतं.

मॅपिंगला सुरुवात केली. आम्ही बड्या कष्टानं तयार केलेला सर्वेचा फॉर्म मी माझ्या मोबाईलमध्ये ओपन केला. नाव ? मी प्रश्न विचारला. अंबाजी जेटू कातकरी ? वय ? ६५ आसल, कितीवार्षण पासून इथ राहता ?. पंज्यापासून. अंबाजी उत्तरला. अंबाजीचे वय ६५ पण तब्बेत खनखणीत, पिळदार शरीर आणि प्रस्थापित सौंदर्याच्या मानकात न बसणारे त्याचे सौंदर्य. अंबाजीचे रान म्हणजे तीव्र उताराची जागा. चढून दमलो होतो. त्यात अंबाजीचे ‘रान’ खानदानी वैरत्व निभावण्यासाठी तयार होते. मी मॅपिंगला सुरुवात केली. जड पावलांनी. अंबाजी माझ्या पुढे आणि मी त्याच्या मागे चालत होतो. अंबाजी तरातरा माझ्या पुढे सरकला. काही वेळाने तो दिसेनासा झाला. मी आवाज दिल्यावर तो कुठेतरी थांबला. मी त्याच्या पर्यंत कसाबसा पोहचलो, त्याच्या हाताला पकडलं. कसं यातून चालायचं. कट्याकुट्याचिं झाडं, दगडगोटं आणि त्यात हा तीव्र उतार कसं चालायचं ह्यातून?

मी झाडाच्या फांद्या पकडत, स्वतःला सावरत, स्वतःशीच बोलत होतो. ‘आमच्या पाया खालची वाट हाय.’ ‘आम्ही कधी जमिनीकडं बघत नाय.’ ‘पण हि माती, डोंगर, हि झाडंझुडपं, दगुडगोटं आम्हाला इजा पोचवत नाय.’ ‘आमच्या पायानं चुकुन बी इचुकाटा मरायचा नाय.’ ‘हे घर हाय आमचं.’ ‘त्ये आमाला आणि आमी त्याला (घराला) जपतो.’ ह्यो डोंगर आमचा मायबाप हाय’. अंबाजी उत्तरला. या डोंगरावरील जंगलातील प्रत्येक सजीव, निर्जीव गोष्ट त्याच्या घरातील सदस्य असल्यागत अंबाजी बोलत होता. मी जीव कानात आणून त्याच हे बोलणं ऐकत होतो. स्वताला सावरत त्याच्या बरोबर चालत होतो...30 मिनिटे सलग चालून अंबाजीच्या रणाचे मॅपिंग पूर्ण झाले...काहीवेळाने अंबाजीने मला त्याची काठी आसऱ्यासाठी दिली. ‘ही तुमाला पडू द्यायची नाही’ म्हणत त्यांन ती माझ्या समोर केली. आणि मी अंबाजीची काठी दिवसभर मिरवली.

असेच एकूण २३ जणांच्या रानांचा बांध तुडवायचा होता... आणि जवळपास सर्वांच्याच जमीनीचा किमान काही भाग तरी अशाच तीव्र उताराचा, दगड धोंड्यांचा, काटेरी झुडुपांचा होता. सकाळी ११ वाजता कडक उन्हाच्या तडाख्यात सुरु केलेले मॅपिंग संध्याकाळी साडेसहाला संपले. जवळपास २५ ते 30 किलोमीटर उभा अडवा भूगोल पायाखाली घालून, आम्ही डोंगर उतरू लागलो. तेंव्हा हा डोंगर आमच्यासाठी गुडघ्यावर बसला. दोन्ही हात जमिनीला टेकवून तो आम्हाला खाली उतरवण्यासाठी जमिनीशी खिळला. आणि आम्ही त्याच्या खांद्यावरून खाली उतरलो.

आम्ही वाडीच्या दिशेने निघालो. आम्ही जसजसा वाडीच्या जवळ पोहचू लागलो तसतसा डोंगर पुन्हा उठून उभा राहू लागला. आम्ही वाडीत पोहचलो. मी मागे वळून डोंगऱ्याकडे पहिले. काहीवेळ मी डोंगऱ्याला न्याहाळले. जणू काही ह्या डोंगऱ्याने आम्हाला एखाद्या जत्रेची सैर करून आणली होती. मी कधीच न अनुभवलेली दुनिया या डोंगऱ्याने मला दाखवली होती. आता डोंगऱ्या मला माझ्या आज्या सारखा भासू लागला. त्यानं नातवंडा प्रमाणं मला, भगवानला त्याच्या पोठडीत असणारी कंदमूळं खायला दिली. स्वच्छ हवा, कंदमूळं, अनेक पक्षांचे आवाज. कधीच न बघितलेल्या राण भाज्या हे आणि आसंच बरच काही दिलं. आणि म्हणूनच मी खुष होतो.

वाडीत आल्यावर या आदिवासी ( कातकरी या आदिम जमातीच्या लोकांबरोबर) लोकांबरोबर पुनः बैठक सुरु झाली...उद्या काय काय कागद पत्रे आणायची याची माहिती मी आणि भगवान त्यांना देऊ लागलो. शरीर थकलेल होतं परंतु, आपलं घर (डोंगर-जंगल) आपलंच राहणार याचा आनंद कुशाभाऊ अंबाजीच्या, या आदिवासींच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. त्यांच्या आनंदा समोर माझा थकवा पराभूत होऊन गळून पडला होता. साडेआठच्या सुमारास मी आणि भगवान घराकडे जाण्यासाठी निघालो, उद्या परत गावात येण्यासाठी. भगवान माझ्या थोडासा पुढे गेला मी गाडी थांबवून पुनः डोंगराकडे बघितले तोही माझ्याकडेच बघत होता. मी त्याचा निरोप घेतला. आणि मी डोंगऱ्याच्या जंगलाकडून सिमेंटकाँक्रेटच्या जंगलाचा रस्ता धरला.

या संपूर्ण प्रवासात एक गोष्ट तीव्रतेने जाणवली. अंबाजी आणि त्यांचा म्हातारा डोंगऱ्या. दोघेही अतिशय फाकड मित्र. अंबाजी आणि डोंगऱ्या दोघांनी अंबाजीला कळू लागल्यापासून कधीही फारकत घेतली नाही. अंबाजीचं सारं सुखदुःख या डोंगऱ्याला माहित. अंबाजीला काय हवं नको तेही त्यालाच माहित. अंबाजीचं काय दुकू-खुपू लागलं तर त्याचा कायमचा इलाजही डोंगऱ्याकडं. अंबाजीच्या भल्याबुऱ्या गोष्ठींचा डोंगऱ्या-जंगल खुद्द साक्षीदार आहे. अंबाजीसहित त्याची नातवंडं, परतुंडं डोंगऱ्या आपल्या उरा-खांद्यावर खेळवतो. हि पोरंसोरं डोंगऱ्याला-जंगलाला गुदगुल्या करून हसवतात. आणि डोंगऱ्या-जंगलही हसत हसत त्येच्या या लेकरांना अगदी मायेन रानमेवा भरवतो. त्यांना निरोगी ठेवतो. त्यांना काय हवं नको ते बघतो. त्यांना शिकवतो. तो सुर्याच्या डोळ्यात डोळे घालून बघण्यासाठी सुर्यफुल होण्यासाठी निसर्ग दृष्टी देतो. निसर्गाच्या डोळ्यान पाहण्याचा आत्मभान देतो.

जसा अंबाजी, कुशाभाऊ आणि इतर जन या डोंगरा-जंगला शिवाय जगू शकत नाहीत तसाच हा डोंगऱ्या, जंगलही या लोकांशिवाय मरून जाईल... या डोंगरा जंगलांनी अंबाजीला आणि अंबाजीने या डोंगराला, जंगलाला जिवंत ठेवले आहे... पण, हे दोघेही आता घाबरून आहेत. अंबाजी, डोंगऱ्याला आणि डोंगऱ्या अंबाजीला हरवण्याच्या भीतीने... दोघेही अस्वस्थ आणि भयभीत...रोज ते एकमेकांना घसा भरवतात... ते एकमेकां बरोबर राहतात... आता अंबाजी आणि डोंगऱ्याला-जंगलाला हे माहित आहे कि, शिकून मोठे झालेल्या लोकांच्या डोळ्यात नियोजित शहरांचं फुल पडलंय. त्यांच्या कंत्राटी स्थापत्य शास्त्राची आणि अक्राळविक्राळ यंत्रा-तंत्रांची नजर या अंबाजी आणि डोंगऱ्यावर-जंगलावर पडलीय... डोंगऱ्याच्या नेरूळ, सीबीडी बेलापूरच्या भावकीने त्यांच्या उध्वस्तीकरणाची खबर एव्हाना डोंगऱ्या पर्यंत आणि अंबाजी पर्यंत निश्चित पोहचवली असेल….

या देशातील सुशिक्षित जनतेने विकासासाठी मतदान केले आहे... आणि अशिक्षित कुशाभाऊनेही... पण या अशिक्षित कुशाभाऊच्या विकासाचा अर्थ याच देशात राहून वेगळा आहे...तो जंगलाला, डोंगराला मायबाप मानतो, घरदार मानतो... त्ये वाचलं तर आपण वाचू असा त्याचा आशावाद आहे... अन शिक्षितांच्या मते विकासाचा अर्थ म्हणजे डोंगरा-जंगलाच्या उध्वस्तीकरणावर उभ्या राहिलेल्या मॉल, बिल्डिंगी आणि रस्ते. हे विचारातील मुलभूत फरकाचे अंतर आपल्याला पार करून कुशाभाऊच्या आणि अंबाजीच्या विकासाच्या अर्थापर्यंत जमेल तेवढ्या लवकर पोहोचावे लागेल... अन्यथा आजचा तथाकथित विकास या डोंगऱ्या-जंगलासाठी सुरुंगाचेच काम करेल.

डोंगर फोडून, जंगल तोडून उभ्या राहिलेल्या मॉल, बिल्डिंगी आणि रस्त्यांचे उत्सव साजरा करणाऱ्या अमानुष प्रथा-परंपरा एखाद्या संसर्गजन्य रोगाचे रूप धारण करत चालल्या आहेत.

माणूस आणि निसर्ग (निसर्ग म्हणजे केवळ झाडे नाहीत. त्याच्या अवती भवती असणारे असंख्य जीवजंतू, पशु पक्षी, प्राणी यांच्या सहित.) या दोघांमध्ये समतोल साधला गेला तरच या पृथ्वीचे आणि पृथ्वीवरील माणसाचे अस्तित्व टिकून राहू शकते. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ऐतिहासिक अन्यायाच्या परंपरेला खंडित करता येऊ शकते. हे इंगित उमगल्यानेच आम्ही या डोंगराचे, जंगलाचे उपग्रह नकाशे तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. लढाई मोठी आहे जिंकली तर अगीनत फायदा आणि हरली तर मानवी समुदायांचे, पृथ्वीचे मारेकरी ठरू…

राहता राहिला प्रश्न या लोकांच्या हक्काच्या पुराव्यांचा तर, हा डोंगर, हे जंगल, जंगलातील हि झाडं झुडपं, किड्या-मुंगी, इंचू-काटं, खेकडं-माकडं वाडीतली माणसं-कोणसं आणि उपग्रह नकाशे साक्ष देतीलच....

जसे पाण्याशिवाय नदीची, हवे शिवाय श्वासाची कल्पना करणे शक्य नाही तसेच डोंगरा, जंगला शिवाय मानवी अस्तित्वाची, विकासाची आणि वनहक्क कायद्याची कल्पना करता येणे शक्य आहे काय ? हा प्रश्न या अनुषंगाने उभा ठाकतो. म्हणूनच किमान आहेत ते जंगलं, डोंगर, दऱ्या खोऱ्या, झाडी-वेली, इंचू-काटं, किड्या-मुंगी, खेकडं-माकडं, वाचवण्यासाठी आणि कुशाभाऊ, अंबाजी सारखी डोंगरावर प्रेम करणारी, डोंगराला जंगलाला आपलं घर समजणारी, त्यावर राहणाऱ्या प्रत्येक सजीव-निर्जीव घटकांना आपल्या घराचे सदस्य समजणारी माणसं वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढं यावं... हे या निमित्तानं आवताण.

शैलेश तानाबाई अनिल….

Updated : 13 July 2020 4:05 PM GMT
Next Story
Share it
Top