चपला....

चपला....
X

दोनेक वर्षांपूर्वीचा हा फोटो आहे. ठाण्याच्या ज्युपिटर रूग्णालयात मी तपासणीसाठी गेलो होतो. ह्रदयरोगतज्ज्ञ विजय सुरासे हे नावाजलेले डॉक्टर. ईसीजीचा ग्राफ आणि रक्तदाबाचे आकडे दाखवून इतर डॉक्टर सतत घाबरवत असतात, अशा वेळी सुरासे तुम्हाला हसतमुखाने काही झालेलं नाही, असा दिलासा देतात.

कुठल्याही मोठ्या दौऱ्याच्या आधी मी एकदा त्यांना भेटत असतो. किंवा फोनवरून सल्लामसलत करत असतो. गेली अनेक वर्षे उच्चरक्तदाबाचा त्रास असल्याने फार रिस्क घ्यायची नाही असं मी स्वतःला अनेकदा बजावत असतो. प्रचंड काळजी घेतल्यानंतरही माझं रिडींग क्वचितच जागेवर असतं. त्यामुळे त्या आकड्यांची फारशी चिंता करायची नाही, असं मी ठरवून टाकलेलं आहे.

तरी सुद्धा रूग्णालयात गेलं की, आसपासच्या रूग्णांना बघून काळजी वाटायला लागते. कधी त्यांची तर कधी आपली.. कधी कधी तर डॉक्टरांचीही काळजी वाटते. उगीच आपण डॉक्टरांचा वेळ खातो, कितीतरी गंभीर रूग्ण जगण्यासाठी तडफडत असताना, आपण मात्र छोट्या छोट्या गोष्टींसाठी काळजी करत बसतो. रूग्णालयामध्ये बसल्या बसल्या इतर रूग्णांचं बारिक निरिक्षण करणं हा माझा आवडता छंद आहे. खरं म्हणजे तुम्ही तिथं बसून इतर काही करूही शकत नाही. मोबाईल मध्ये घुसून बसावं तर मग घराबाहेर पडण्याला अर्थ तो काय.

असंच ज्युपिटरच्या लॉबीत बसलो होतो. डॉक्टर सर्जरी मध्ये बिझी होते. इकडे तिकडे बघत होतो, इतक्यात एक बाई आपल्या पाच-सहा वर्षाच्या आपल्या बाळाला घेऊन शेजारच्या डॉक्टरच्या केबिन मध्ये घुसली.

तिच्या सोबत तिचा पोरगेलसा नवरा, आणि एक मुलगी होती. महाराष्ट्राच्या कुठल्याशा ग्रामीण भागातून प्रवास करत हा परिवार रूग्णालयात आला होता. बहुधा त्यांना आंघोळ करण्याची जागाही कुठे मिळू शकली नव्हती.

कपड्यांचं गाठोडं आणि हातात दहा-पन्नास रूपयांच्या काही नोटा इतकीच संपत्ती त्यांच्याकडे दिसत होती. डॉक्टरांच्या केबिन मध्ये घुसताना मुलाच्या आईने केबिनच्या बाहेरच चप्पल काढली. केबिनच्या दाराशी वाकून पाया पडल्या आणि ती आत गेली… मी केबिनच्या दरवाज्याशीच थांबलो. तिच्या मुलाला ह्रदयरोग होता. तात्काळ ट्रीटमेंटची गरज होती. पैसे ही जास्त लागणार होते. खर्चाचा आकडा ऐकून परिवार हादरला होता. डॉक्टरांशी बोलून ती बाई लगबगीनं आपल्या पोराला हाताशी घेऊन बाहेर पडली. तिचा नवरा तिच्या मागोमाग बाहेर पडला. बाहेर पडताना केबिनच्या बाहेर काढलेली चप्पल घालायचं भान ही तिला राहिलं नव्हतं.

ती चप्पल तिथेच ठेवून ती आपल्या मुलाला घेऊन तिथून बाहेर पडली. थोड्यावेळाने तो परिवार परत केबिनपाशी आला, आणि ख़ाली जमीनीवर बसला.

मी त्यांना पैशाची तजवीज करायला मुख्यमंत्री कक्ष आणि इतर काही एनजीओ सुचवल्या. राजीव गांधी योजनेतून ऑपरेशन करता येईल हे ही सांगीतलं. एकदोन नंबरही दिले, तितक्यात डॉक्टरांचा फोन आला म्हणून मी त्यांच्याकडे जायला निघालो, तितक्यात त्या बाईने माझ्या पायांना हात लावून तो हात स्वतःच्या डोळ्यांना आणि कपाळाला लावला. मी आतून हादरूनच गेलो. मला सतत केबिन बाहेरच्या या चपला डोळ्यासमोर दिसत होत्या.

कधी खूप डाऊन फिल झालं, काही मार्ग सापडला नाही. की, मी माझ्या फोनमधल्या या चपलांचे फोटो बघतो… त्यानंतरच्या भावना मात्र मी लिहू शकत नाही.

रवींद्र आंबेकर

Updated : 11 Aug 2020 6:43 AM GMT
Next Story
Share it
Top