Home > मॅक्स ब्लॉग्ज > मोहम्मदी रफी आणि नेहरु

मोहम्मदी रफी आणि नेहरु

मोहम्मदी रफी आणि नेहरु
X

आज मोहम्मद रफीचा स्मृतीदिन. मोहम्मदी रफी यांना आवाजाचा जादुगार म्हटलं जायचं. त्यांची गाणी आजही लोक गुणगुणत असतात. ते जिवनाच्या शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या गाण्यामध्ये व्यस्त होते. त्यांची तब्येत ठीक नसताना समोरच्या व्यक्तीला दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी जीवनाच्या शेवटच्या दिवशी ही ते रेकॉर्डिग मध्ये व्यस्त होते.

वयाच्या 56 व्या वर्षी त्यांनी 31 जुलाई 1980 ला अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.

मोहम्मद रफीने पार्श्वगायन सुरू केले, तेव्हा 1944 मध्ये 'सोनिये नि हिरीये नि' हे गाणे त्याने गायले. ते 'गुलबलोच' या पंजाबी चित्रपटासाठी संगीतकार श्यामसुंदरने स्वरबद्ध केले होते.1945 साली 'गाँव की गोरी' या हिंदी चित्रपटात त्याने स्वतंत्रपणे गाणे गायले. गांधीजींची हत्या झाल्यानंतर हुस्नलाल भगतराम, राजेंद्रकृष्ण आणि मोहम्मद रफी यांनी मिळून 'सुनो सुनो दुनियावालो बापूजी की अमर कहानी' हे अविस्मरणीय गीत निर्माण केले.

नेहरुंनी देखील रफीला एकदा आपल्या घरी मैफल करण्यासाठी आमंत्रित केले होते. रफीने सुमारे 4500 हिंदी गाणी गायली. शंभराहून जास्त इतर भाषांतील गाणी गायली आणि 300 पेक्षा जास्त व्यक्तिगत गाणी केली. आसामी, कोकणी, भोजपुरी, इंग्रजी, पर्शियन, उर्दू, तेलुगु, गुजराती, पंजाबी, बंगाली, मराठी, डच आणि स्पॅनिश भाषेतही रफीने स्वराकाश निर्माण केले. बीबीसीने केलेल्या एका पाहणीत 'बहारों फूल बरसाओ' हे रफीचे सर्वाधिक लोकप्रिय गीत ठरले होते.

मी पुण्याहून मुंबईस नोकरीनिमित्त आलो आणि त्यानंतर दोनच वर्षांनी मोहम्मद रफी पैगंबरवासी झाला. तो दिवस आजही आठवतो... त्याचा जनाजा निघाला, तेव्हा 10 हजारपेक्षा अधिक लोक त्यात सामील होते, हे मला अजूनही आठवते. रफीला घरचे लोक 'फिको' या नावाने हाक मारत. गावातील फकीर जी गाणी गात, तीच रफीने बालपणापासून गायला सुरुवात केली. त्याची गाण्यातली तयारी इतकी होती की, वयाच्या तेराव्या वर्षी एका मैफलीत कुंदनलाल सहगल यांच्याबरोबर गाण्याची संधी त्याला मिळाली.

साधारणपणे 1950 ते 1970 पर्यंत मोहम्मद रफीने पार्श्वसंगीत क्षेत्रावर अधिराज्य गाजवले. 'आराधना'नंतर किशोर अव्वल स्थानी पोहोचला. परंतु किशोर आणि रफी यांची दोस्ती कायम होती. काही चित्रपटांत किशोरसाठी रफीने आवाजही दिला आहे. ज्या दिवशी रफीचे निधन झाले, तेव्हा त्याच्या पार्थिवापाशी बसून किशोर बराच वेळ अश्रू ढाळत होता, हे आजही स्मरते...

राष्ट्रीय ऐक्य साधण्यात रफीसारख्या कलावंतांनी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. रफीचे हे ऋण विसरता येणार नाही, कदापी नाही! आज रफीला जाऊन चाळीस वर्षे झाली. अवघ्या 56 व्या वर्षी तो अल्लाला प्यारा झाला, पण एवढ्याशा आयुष्यात त्याने तेवढे थोर काम करून ठेवले बघा ना! त्याला आदरांजली.

Updated : 31 July 2020 6:34 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top