Home > मॅक्स ब्लॉग्ज > मॉब लिंचिंगचे विदेशी कुळ आणि देशी मूळ

मॉब लिंचिंगचे विदेशी कुळ आणि देशी मूळ

मॉब लिंचिंगचे विदेशी कुळ आणि देशी मूळ
X

मॉब लिंचिंग विदेशी असल्याचा आक्षेप सरसंघचालक मोहन भागवत यांनी घेतला, तेव्हाच त्याचा प्रतिवाद करण्यासाठी लिहलेला हा लेख. निवडणुकीच्या गदारोळात वर्तमानपत्रांना तो सोयीचा नसल्याने छापून काही आला नाही. म्हणून आता या ब्लॉगवर...

श्रीराम अयोध्येत परतले होते. राज्याभिषेकाच्या त्या सोहळ्यात दानाची लयलूट होती. ब्रह्मवृंद भाट गायन करत होते. त्या गर्दीतून पुढे येत चार्वाक पंथाचा तो ब्राह्मण अयोध्येच्या राजाला म्हणाला, दानाच्या लोभाने हे गुणगान करत आहेत. यांना दान कशाला? राज्याची ही लूट थांबव. चिडलेला ब्रह्मवृंद चार्वाकावर चालून गेला. 'चार्वाकाला हाणा. मारा.' रामाच्या जयघोषांची जागा भेरीघोषाने घेतली. झुंड चालून गेल्यावर काय होणार?

कुरूक्षेत्रावरचं महाभारत संपलं होतं. आप्तजनांच्या संहाराचं दुःख आणि पश्चाताप विसरून धर्मराज युधीष्ठीर हस्तीनापुरात दाखल झाला होता. राज्याभिषेकासाठी ब्रह्मवृंदांनी शंखाचे ध्वनी सुरू केले. सिंहासनावर आरुढ होण्यासाठी ब्राह्मण मंत्रोच्चार सुरू करणार तोच, त्या ब्राह्मणवृंदातील चार्वाक पंथाचा एक ब्राह्मण उभा राहिला त्याने कुरूक्षेत्रावरील संहाराबद्दल धर्मराजाला सवाल केला. आप्तजनांचा, लक्ष निरपराधांचा संहार कशासाठी? चार्वाकाने धर्मराजाची निंदा केली.

त्याचा सवाल होता, युद्धातल्या संहारात धर्म कोणता?

युधीष्ठीराच्या राज्याभिषेकासाठी आणि सुवर्णमुद्रंच्या भिक्षेसाठी जमलेला ब्रह्मवृंद त्या सवालाने खवळला. ते म्हणाले, हा ब्राह्मण कपटी राक्षस आहे. नास्तिक चार्वाक आहे. खवळलेल्या ब्राह्मणांची झुंड त्याच्यावर चालून गेली.

'थांब चार्वाक आमच्या नुसत्या हुंकाराने आम्ही तुझा वध करतो.'

युआन च्वांग. म्हणजे ह्यु एनत्संग. महान चीनी प्रवासी. भारतात आला होता. प्रवासाचे साहस करीत. हे साहस संपत्ती आणि भौतिक लाभासाठी नव्हतं. कीर्तीसाठीही नव्हतं. च्वांग लिहतो, 'सर्वोच्च धार्मिक सत्यासाठी खरा धर्म जाणण्याची आकांक्षा माझ्या हृदयात आहे.' त्याच्या स्वागतासाठी कनौजला राजा हर्षाने सर्व धर्म परिषद बोलावली होती. राजाने ५०० वैदिकांनाही सन्मानाने बोलावलं होतं. पण धर्म चिकित्सेच्या महाचर्चेत युआन च्वांगच्या विजयाने वैदिक चिडले. त्यांनी थेट राजावरच हल्ला चढवला. परिषदेच्या मनोऱ्याला आणि तंबूला आग लावली. काय झालं हे पाहण्यासाठी हर्षवर्धन स्वतः मनोऱ्यात शिरला. त्याच्यावर सुरी हल्ला झाला. पराक्रमी राजाच तो. हल्ला करणाऱ्यालाच त्याने पकडलं. अधिकारी म्हणत होते याचा शिरच्छेद करा. राजाने माफ केलं. हल्लेखोराने कट कुणी केला, हे कबुल केलं होतं. खुद्द राजावर हल्ला करणाऱ्या त्या ५०० वैदिकांच्या झुंडीलाही राजाने माफ केलं. तंबूवर जळते बाण सोडणाऱ्या त्या ५०० ब्राह्मणांना अटक झाली होती. त्यांना नाहीसे करा, असा आग्रह होता उपस्थितांचा. महान हर्षवर्धनाने फक्त हद्दपारीची शिक्षा दिली.

झुंड बळी होता होता खुद्द राजा हर्ष वाचला. बाणभट्टाने ते थरारक नाट्य हर्षचरितात नोंदवून ठेवलं आहे.

च्वांग यांनी एका परिषदेचा वृत्तांत त्यांच्या नोंदीत लिहून ठेवला आहे. श्रावस्तीला विक्रमादित्याने परिषद बोलावली होती. मनोर्हित नावाच्या विद्वान बौद्ध पंडिताला अद्दल घडवण्याचा त्याचा इरादा होता. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या 'जिज्ञानापुरुष ह्यु एनत्संग' या पुस्तकात तो वृत्तांत मूळातून वाचण्यासारखा आहे.१०० विद्वान आमंत्रित होते. अग्नी आणि धुराचा दृष्टांत मनोर्हितांनी दिला काय, खुद्द राजा आणि त्याच्या समर्थकांनी गोंधळ घातला. मनोर्हित खुलासा करत राहिले. पण त्यांना अपमानित केले गेले.

आपल्या जीभेचा लचका तोडत मनोर्हित त्या झुंडीतून बाहेर पडले. आपला शिष्य वसुबंधूला म्हणाले, 'पक्षपाती लोकांच्या जमावात न्याय नसतो. फसवल्या गेलेल्या अज्ञानी लोकांमध्ये विवेक नसतो.' हे लिहल्यावर ते मरण पावले. (की मारले गेले?) कंसातला मजकूर माझा.

त्या महाभारतीय 'उन्मादी हुंकाराचे बळी' पुढेही होत राहिले. 'वध' या नावाखाली होत राहिलेल्या हत्यांना वधाचे समर्थन मिळाले. आदिभारतातील त्या पहिल्या झुंड बळींची चर्चा पुढे कधीच झाली नाही. रामायणातील त्या घटनेचा उल्लेख प्रक्षिप्त असल्याचा आक्षेप घेतला जाऊ शकेल. रामायणाच्या अनेक आवृत्त्या (संहिता) आहेत. त्यातलं कुठलं रामायण खरं यावर वाद होऊ शकेल. पण प्रक्षेपालाही इतिहासातील त्या प्रक्षेप काळातील तथ्यांचा आधार आणि हितसंबंधांचं कारण असतं. लिंचिंग हा शब्द, हा प्रकार भारतीय नाही, असा आक्षेप सरसंघचालक मोहन भागवतांनी घेतला आहे. चुकीचं घडलं असेल तर शिक्षा द्या. नवा कायदा करा, असंही ते म्हणाले. म्हणजे घडत असल्याबद्दल ते इन्कार करू शकलेले नाहीत. आणि शिक्षा व कायद्याची मागणी ते करत असतील, तर त्याचं स्वागत करायला हरकत नाही. पण देशातल्या मॉब लिंचिंग घटनांची चिकित्सा त्यांनी केली नाही. उलट हिंदुत्वाला बदनाम करण्यासाठी मॉब लिंचिंग शब्दाचा वापर होत असल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

Lynching चा इंग्रजी अर्थ आहे extrajudicial killing by a group. न्याय व्यवस्था नाकारून कायदा हातात घेणं. केस न चालवता शिक्षा देणं. चार्ल्स लिंच आणि विल्यम्स लिंच हे बंधू या लिंचिंगचे कर्ते. अमेरिकन सिव्हील वॉरच्या आधी आणि नंतरही रंगाने काळ्या असणाऱ्या ३५०० हून अधिक आफ्रो अमेरिकनांचं लिंचिंग झालं. प्रतिशोधात १२०० हून अधिक गोरेही मारले गेले. लिंचिंगचा इतिहास युरोपात, मेक्सिकोत, ब्राझीलमध्ये जगभर आहे. भारतीय झुंडबळींचा इतिहास त्याआधीचा आहे. लिंचिंगमध्ये न्याय नसतो. अधिकार नाकारलेला असतो. दमन असतं. वर्चस्वाचा उन्माद असतो. द्वेष, घृणा आणि सूडाचा बारूद ठासून भरलेला असतो. लिंचिंग शब्द अलीकडचा आहे. परदेशी आहे. पण त्यातलं दमन, अत्याचार, सूड, घृणा, द्वेष आणि उन्मादाचा बारूद सर्वत्र सारखाच आहे. भारतीय मॉब लिंचिंगच्या घटनांमध्ये तर धर्म द्वेष आणि वर्ण द्वेष यांचा सनातन इतिहास ठासून भरलेला आहे. हिंदुस्थानात गेल्या ५ वर्षात झुंडबळीत मारले गेले ते मुसलमान आणि दलित. त्यातही हे बहुतेक गाईचे बळी आहेत. गो रक्षकांनी त्याची सुरवात २०१० लाच केली होती. म्हणजे मोदी सरकार येण्याच्या अगोदरच. संख्या आणि आक्रमकता वाढली ती गेल्या ५ वर्षात. २८ मारले गेले. त्यातले २४ मुस्लिम आहेत. १२४ जखमी आहेत. भारतीय सीमेवर देशाचं संरक्षण करणारा सरताज अखलाखच्या वडिलांना, मोहम्मद अखलाख यांना घरातल्या फ्रिजमध्ये असलेलं मटण गोमांस असल्याची अफवा पसरवून ठेचून मारण्यात आलं. तपास अधिकारी सुबोध कुमार सिंग यांनाही झुंडीनेच ठार मारलं.

भागवतांनी बायबलचा दाखला दिला. पण लिचिंग शब्द तेव्हाही नव्हता. ती वेश्या होती. पापी होती. म्हणून लोक दगड मारत होते. ख्रिस्ताने हात उंचावून त्यांना थांबवलं. ज्यांनी नजरेनेही कधी पाप केलं नाही त्यांनी दगड मारावा, असं ख्रिस्ताने म्हणताच हातातले दगड खाली पडले. त्या निरपराध स्त्रीचे प्राण वाचले. लिचिंग झालं नाही. रामाच्या दरबारात त्या चार्वाकाचे प्राण वाचले नाहीत. लोकापवादासाठी सीता धरत्रीच्या पोटात गेली की मर्यादा पुरुषोत्तम रामाचे धर्मसत्तेपुढे काही चालले नाही. महाभारतीय चार्वाकावर झुंड चालून गेली, तेव्हा धर्मराजा युधीष्ठिरही ख्रिस्ताचे ते आवाहन करू शकला नाही. चार्वाक मताचा पुरस्कार करणाऱ्या द्रौपदीलाच त्याने गप्प केलं.

धर्मसत्तेला आव्हान देणाऱ्यांचे प्राण हत्येने घेतले जातात. लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर यांचे प्राण घेण्यासाठी पुरोहितांची झुंडच राजाश्रयाने दरबारातच चालून गेली होती. बसवण्णांचे प्राण वाचवण्यासाठी लिंगायतांना महासंघर्ष करावा लागला.

हत्यांची परंपरा प्रचीन आहे. बळीपासूनची. बळी हा शब्दच तिथून सुरू झाला. भारतीय संस्कृती व्यामिश्र आहे. असख्ंय विरोधभासांनी भरलेली आहे. ती राम राम म्हणत परस्परांना भेटते. रामाने मारलेल्या वालीचीही आठवण काढते. कुणी आधारवड गेला की म्हणते, 'कुणी वाली राहिला नाही'. ती विष्णूचं पूजन करते. पण वामनाचं एकही मंदिर बांधत नाही. बळी राजा मात्र हृदयाच्या कुपीत तीन हजार वर्षांनंतरही जपून ठेवते. ईडा पीडा टाळण्यासाठी बळीराज्याचा सण दिवाळी साजरा करते. वामनाने बळी राजाचा काटा काढला. कपटाने. दुष्टाव्याने. वर्ण द्वेषाने. निरपराध माणसाचा कपटाने जीव गेला की भारतीय संस्कृती म्हणते, बळी गेला. लिंचिंग शब्दाला काही शतकांचा इतिहास आहे. झुंडबळींना इसवी सन पूर्व शतकांचा. येशू ख्रिस्ताने त्या वेश्येचा झुंडबळी जाऊ दिला नाही. त्या घटनेला दोन हजार वर्ष झाली. भरत भूमी हिंदुस्थानात त्या आधी आणि नंतरही झुंडबळी होत राहिले आहेत.

गांधी, दाभोलकर, पानसरे, कलबुर्गी, गौरी लंकेश. विवेकाचा आवाज बुलंद करणाऱ्यांच्या हत्या थांबलेल्या नाहीत. हत्यांचा तपास होतो. कोर्ट केस होते. हुतात्म्याच्या बाजूने सामान्य जनतेच्या मनात हुंदका असतो. त्यापेक्षा झुंड बळी सोपा. द्वेषाची भिंत उभी करता येते. उन्मादाचा गुलाल डोळ्यात आणि मेंदुत फेकता येतो. कोर्ट केस होत नाही. झाली तरी सुटकेसाठी संशयाची जागा असते. 'बळी', 'वध' यांची रिस्क लिंचिंग - झुंडबळीत नाही.

मनोर्हित यांनी कैक शतके आधी इशारा देऊन ठेवला होता, 'पक्षपाती लोकांच्या जमावात न्याय नसतो. फसवल्या गेलेल्या अज्ञानी लोकांमध्ये विवेक नसतो.'

बौद्ध मताच्या हद्दपारीचं सोपं हत्यार, झुंडबळीचं शास्त्र वर्णवर्चस्ववादी वैदिकांनी तेव्हाच विकसित केलं होतं. झुंडबळी ही काही भारताची ओळख असू नये. निर्ऋती, चार्वाक, बुद्ध यांची स्वातंत्र्य, समता, मेत्ता आणि विवेकाची परंपरा ही ओळख असायला हवी. पण न्याय आणि विवेक नसलेल्या, फसवलेल्या जमाव तंत्राने ती ओळख पुसण्यात वैदिकांना यश मिळालं. गांधी आणि आंबेडकरांच्या आधुनिक भारताची ओळख म्हणजे न्याय, समता, बंधुता.

ती पुसून टाकण्यासाठी पुन्हा जमाव तंत्राचा वापर सुरू झाला आहे. मॉब लिचिंग ते ट्रोलिंग.

कपिल पाटील

(लेखक महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य आणि लोक भारती पक्षाचे अध्यक्ष आहेत.)

Updated : 13 Dec 2019 1:20 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top