बाद होत नाही तो वाद, म्हणजेच वंशवाद !

सगळी दुनिया करोनाच्या संकटात मग्न असताना तिकडे अमेरिकेत धुमाकूळ माजलाय. त्याचे कारण आहे एका कृष्णर्णीयांची पोलिसांनी केलेली हत्या. तसं बघायला गेलं तर अमेरिकेत आफ्रो-अमेरिकन आणि तेथील स्थनिक पोलिस यांच्यात सतत संघर्ष घडत असतो. त्याला दोन्ही बाजू आहेत. गोऱ्या पोलिसांना ‘कृष्णर्णीय’ नागरिकांबद्दल एक सुप्त असूया आणि राग असतो. त्याचप्रमाणे तेथील कृष्णर्णीयांनाही ‘गोऱ्या’ लोकांबद्दल सुप्त राग असतो. या रागाला आणि रोषाला छुप्या वंशवादाची किनारही आहेच. त्याचे प्रत्यंतर वेगवेगळ्या कारणांनी आणि वेगवेगळ्या ठिकाणी येत असते.

अमेरिकेतील गोऱ्या लोकांच्या दृष्टीने ‘कृष्णर्णीय’लोक हे उपरे आहेत.याच काळ्या लोकांनी अमेरितकेतील गोऱ्यांच्या अनेक संधी हिरावून घेतल्या आहेत अशी त्यांची धारणा आहे.अमेरिकेत लोकशाही आणि एकंदर मानवाधिकारांचा ढाचा एकदम पक्का असल्याने गोरे आफ्रिकन वंशाच्या लोकांचे सामाजिक अतिक्रमण इतक्या सहजासहजी मानण्यास तयार नाहीत. त्यामुळे,आपल्या संधी हिरावल्या गेल्या व सामाजिक उतरंडीत हे लोक भारी पडत असल्याची भावना गेल्या अनेक दशकात बनत गेली आहे.

या उलट अमेरिकेतील गुन्हेगारी, ड्रग्स,हत्या इत्यादींमध्ये आफ्रिकन वंशाच्या लोकांचा मोठ्या प्रमाणात भरणा दिसून येतो.त्यामुळे तिथल्या स्थनिक लोकांमद्धे या आफ्रिकन लोकांबद्दल सुप्त द्वेषाची भावना दिसून येते. या द्वेषाचा उद्रेक कोणत्या कारणांनी होईल ते सांगता येत नाही.

अमेरिकेतील मिनियापोलिस या राज्यातील पोलिसानी जॉर्ज फ्लोऍड या कृष्णर्णीयांला ताब्यात घेतले होते. त्याचे हात हाथकड्यानी बांधल्यानंतर आणि पुढे त्याचा मृत्यू झाल्यानंतर पुढचे रामायण घडून अमेरिकेत प्रचंड हिंसाचार होत आहे.

जॉर्जला अटक केल्यानंतर तेथील पोलिसानी त्याला जमिनीवर पाडला होता व त्यातील एका पोलिसाने त्याच्या मानेवर गुडघा दाबून धरला होता. तो अभागी मदतीची याचना करत होता, श्वास कोंडल्याचे सांगत होता. बाजूला उंभे असणारे बघे त्याला हरकत घेत होते. बघ्यांनी जॉर्जची तडफड पोलिस अधिकाऱ्यांच्या नजरेस आणून दिली.पण पोलिसांनी उलटपक्षी बघ्यांनाच धमकाविण्याचा प्रयत्न केला.

तदनंतर,रुग्णवाहिका आल्यानंतर त्यातील वैद्यकीय लोकांनी जॉर्जच्या नस तपासून बघण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळीसुद्धा पोलीस अधिकाऱ्याला त्याची दया आली नाही. उंदराला सापळ्यात मारताना जसे करकचून दाबले जाते तसेच जॉर्जची मान त्या नराधम अधिकाऱ्याने दाबून ठेवली होती.परिणामतः काही मिनिटात जॉर्जने शेवटची घटका मोजली.

कायद्याचे रक्षक असतानासुद्धा, घटनास्थळी उपस्थित असणारे इतर अधिकारी हा मृत्यूचा खेळ शांतपणे बघत होते. किंबहुना ‘त्या’नराधम अधिकाऱ्याच्या कृष्णकृत्यात सहभाग देत होते. हे कृत्य अत्यंत घृणास्पद आहे. वर्दीत असणाऱ्या पोलिसांनी केलेला हा खुनच आहे.वर्दीतील माणसांनी केलेलं हे नीच कृत्य असल्याने त्याचे गांभीर्य अधिक आहे.

या घटनेचे वृत्त कळताच जगभरच्या कृष्णर्णीय लोकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या आंदोलनाचे लोण इंग्लड आणि जर्मनीपर्यंत जाऊन पोहचले आहे.

हा देश अमेरिका असल्याने त्या दोषी अधिकाऱ्याला तेथील प्रचलित कायद्यानुसार कठोर शिक्षा होणार याबद्दल दुमत नाहीच. पण खरा प्रश्न उरतो की,श्वेतवर्णीय लोकांच्यात अशी मानसिकता का निर्माण झाली आहे?अमेरिकेतील वंशवाद संपण्याऐवजी वाढीस का लागत आहे? की, येत्या ऑगस्टमध्ये होत असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत ट्रम्प यांच्याविरुद्ध जनमत तयार करण्यासाठी या प्रकरणाचा आयताच वापर करण्यात आला आहे?

या सर्व शक्यता आणि प्रश्नांच्या गदारोळात मूळ प्रश्न उरतोच.
अमेरिकेतील वंशवादाचा, गोऱ्या कातडीच्या अमेरिकन्सचा!