Home > Max Political > मोदी व माझा संवाद ...

मोदी व माझा संवाद ...

मोदी व माझा संवाद ...
X

मोदी- जम्मू काश्मीर संदर्भातील अनुच्छेद 370 हिम्मत असेल तर विरोधकांनी पुन्हा आणून दाखवावा...

असीम - पण साहेब, एक नागरिक म्हणून विचारतो देश तुमचा राजकीय पक्षांचाच आहे असे तुम्ही समाजताय का?

मोदी- अरे नागरिका, पण कायदे कोणते करायचे, ठेवायचे, बदलायचे आम्हीच ठरवितो आणि ते अधिकार घटनेने आम्हाला दिले आहेत ना?

असीम- बघा, तुम्ही ज्याप्रमाणे घटना मोडीत काढून व संविधानाची प्रक्रिया केराच्या टोपलीत टाकून अनुच्छेद 370 चा प्रभाव कमी केला तसेच बेकायदेशीर व असंवैधानिक इतर राजकीय पक्षांनी वागावे अशी जाहीर चिथावणी तुम्ही देताय ते चुकीचे आहे साहेब. खरे तर बहुमताचा उपयोग घटनाबाह्य वागण्याचे समर्थन करण्यासाठी तुम्ही करताय. आणि 370 चा केवळ भाग 2 आणि 3 तुम्ही काढून टाकला, 370 अजूनही आहे संविधानात असे अमित शाह यांनी संसदेतील भाषणात सांगितले आहे आणि तुम्ही तर थेट 370 रद्द केलं असं खोटंच सांगताय

मोदी- आम्ही लोकशाही मार्गाने बहुमत मिळवून निवडून आलो आहोत. आम्ही केलेलं सगळे कायदेशीर असते. देशातील आमच्या मतदारांना तसेच आम्ही पटवून दिले आहे.

असीम- साहेब, 'आमचे ते खरे म्हणा' असेच तुमचे नेहमी म्हणणे असते. अहो 370 हे अस्थायी आहे असेच लिहिले आहे संविधानात, पण ते प्रभावहीन करणे किंवा काढून टाकणे याची प्रक्रिया दिलेली आहे ना संविधानात... ती तुम्ही का नाही पाळली?

मोदी- अरे नागरिका तू जास्तीच हुशार समजतोस की काय स्वतःला? भावना आहेत का तुझ्या देशाप्रती? आमच्यासाठी जम्मू काश्मीर हा भारतमातेच्या अस्तित्वाचा विषय आहे. अनेक भारतीयांसाठी तो भावनिक नाजूक मुद्दा आहे. कोणत्याही देशासाठी अस्मिता महत्वाची असते आणि आम्ही देशातील बहुसंख्य अस्मिताप्रधान लोकांच्या सोबत आहोत व ते आमच्या मागे आहेत.

असीम- साहेब, जम्मू- काश्मीर तर भारताचा अविभाज्य भाग आहेच आणि तो भारताचा भूभाग आहेच. जम्मू-काश्मीरच्या संविधानात सुद्धा लिहिले आहे की, जम्मू काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे. मग इतका वाद का निर्माण करताय तुम्ही? पण अनेक नागरिक आहेत की जे केवळ जमिनीवर, भूभागावर नाही तर या जमिनीवरील प्रत्येक जाती-धर्माच्या माणसांवर, त्यांच्या भाषेवर, संस्कृतीवर सुद्धा समान प्रेम करतात. सगळ्या भारतीयांच्या असण्याला महत्व देतात.

मोदी- अरे नागरिका तू फार आदर्शवादी होऊन महान असण्याचा प्रयत्न करू नकोस. आमच्या पक्षाची सदस्य संख्या बघ आणि जरा तरी स्वतःच्या सुरक्षिततेचा विचार कर.

असीम- नागरिकांनी केवळ तुमच्या राजकीय पक्षाचे सदस्य राहावे असंच तुम्हाला वाटतं ना ? यातून नाही का होत भारताचा अपमान?

मोदी- आम्ही काहीही केले तरी लोक समजून घेतात. तुमच्या महाराष्ट्रात येऊन आम्ही केवळ अनुच्छेद 370 बाबत बोलतोय आणि आम्ही शेतकरी आत्महत्या, महागाई, बेरोजगारी, आरोग्य सुविधा, रस्त्यांची अवस्था, पूर व पुरात वाहून गेलेले लोक, नष्ट झालेले जीवन, वाढती गुन्हेगारी यावर बोलतोय का बघा. कशाचे तुम्ही पुरोगामी राज्यातील रहिवाशी. आता केवळ भावना आणि अस्मितेचे मुद्दे आम्ही काढणार व निवडणुका जिंकणार.

असीम- साहेब, हा तुमचा उद्दामपणा आहे....आणि.....

मोदी- अरे ए नागरिका, आपल्या औकातीत राहा....की टाकू तुला देशद्रोही म्हणून आत? सांगू का अमित शाह ला की बंदोबस्त करा म्हणून..

असीम- साहेब, अहो आमचे देशावर व संविधानावर प्रेम आहे. आम्हाला देशाचा खरा विकास व्हावा असे वाटते..

मोदी- तितके पुरेसे नाही....पाहिले तुम्ही माझ्यावर, अमित शाहवर, आमच्या राजकीय पक्षावर प्रेम करायला शिका त्यातच देशप्रेम, संविधान प्रेम सगळे काही आले. कळले का?? आणि बडबड थांबवा हा तुमची नाहीतर महाग पडेल.....

Updated : 15 Oct 2019 3:31 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top