Home > मॅक्स ब्लॉग्ज > मराठी लोकांचा केमिकल लोचा...

मराठी लोकांचा केमिकल लोचा...

मराठी लोकांचा केमिकल लोचा...
X

मराठी लोकांमध्ये कोणता तरी केमिकल लोच्या आहे. महाराष्ट्र राज्य निर्मितीचा दिन, 1 मे मराठी राजभाषा दिन म्हणून साजरा केला जातो आणि 27 फेब्रुवारी हा कुसुमाग्रजांचा जन्मदिन मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. हा निर्णय 21 फेब्रुवारी 2013 साली घेण्यात आला. महाराष्ट्रात सर्वाधिक लोकप्रिय कविता तुकारामांची आहे. आजही सर्वाधिक उद्धरणं तुकारामांच्या कवितेतली असतात. गप्पांमध्ये, भाषणात वा लेखनात. पण मराठी भाषेच्या गौरव दिनाचा मान ना तुकारामाला मिळाला, ना ज्ञानेश्वरांना की चक्रधर स्वामींना. संतकवी, पंतकवी आणि आधुनिक कवी अशी कवींची विभागणी आम्हाला शिकवण्यात आली होती. तिथपासूनच मराठी माणसाचा केमिकल लोचा सुरु होतो.

ज्ञानेश्वरांनी पर्शियन भाषेच्या नाही तर संस्कृत वर्चस्वाच्या विरोधात बंड केलं होतं. या सर्व भावंडांना ब्राह्मणांनी वाळीत टाकलं होतं. बहुजन समाजाने त्यांना आपलंस केलं. ब्राह्मणांपेक्षा बहुजन समाजामध्ये निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई हे नावं सर्वाधिक आहेत. ज्ञानेश्वर, एकनाथ, चोखामेळा, नामदेव, तुकाराम यांनी आपल्या रचना अस्सल मराठी वृत्तांमध्ये केल्या. ओवी, अभंग, भारुड ही वृत्त संस्कृतात नाहीत. लोक बोलतात ती भाषा. त्या भाषेला ब्राह्मणांनी मान्यता दिली नव्हती. परंतु महाराष्ट्र राज्याच्या स्थापनेनंतर राज्याचं नेतृत्व बहुजनांकडे आलं. विधिमंडळातील ब्राह्मणांची संख्या रोडावत गेली.

परंतु राज्याची भाषा मात्र संस्कृतप्रचुर मराठी झाली. सचिवालय या शब्दाला मंत्रालय हा पर्याय सुचवला तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशींनी. ज्या इमारतीत राजाला (मुख्यमंत्री वा मंत्री) यांना ऋषी (म्हणजे सचिव वा ब्राह्मण) राज्यकारभाराचा मंत्र देतात, ती मंत्रालय, असं स्पष्टीकरण तर्कतीर्थांनी दिल्याचं आठवतं. एकनाथ जातीने ब्राह्मण होते. त्यांनी प्रतिष्ठान या संस्कृत शब्दासाठी पैठण हा लोकभाषेतला शब्द योजला. पण मराठवाडा साहित्य परिषदेच्या नियतकालीकाचं नाव आहे प्रतिष्ठान. ज्या भाषेच्या वर्चस्वाच्या विरोधात मराठीने बंड केलं त्याच भाषेच्या पदराआड जाऊन मराठी भाषा इंग्रजीच्या आक्रमणापासून स्वतःचा बचाव करू लागली आहे. हा मराठी जनांचा केमिकल लोचा आहे.

या संस्कृतप्रचुर, कृत्रिम भाषेने युरोप-अमेरिकेतील साहित्याचं अनुकरण करून इथल्या वास्तवाकडे पाठ फिरवली. त्या विरोधात साठच्या दशकात लेखकांनी बंड केलं. राजा ढाले, नामदेव ढसाळ, भालचंद्र नेमाडे, अशोक शहाणे असे अनेक लेखक या बंडात सहभागी होते. त्यामुळे बोलल्या जाणार्‍या मराठी भाषेला मान्यता मिळाली. परंतु मराठी जनांचा केमिकल लोचा तसाच राह्यला. महाराष्ट्रात शाळा नाहीत विद्यालयं, महाविद्यालयं आणि विद्यापीठं आहेत. पुस्तकालयं वा लायब्र्या नाहीत ग्रंथालयं आहेत.

कार्यालयीन कामाकाजाच्या वेळा आहेत, कचेरी इतिहासजमा झाली. विधिमंडळातील सदस्यांची भाषणं ऐका. गुलाबराव पाटील, केशवराव धोंडगे, साबीर शेख, नरसय्या आडाम यांच्यासारखी मराठमोळी भाषा क्वचित कानावर पडते. सर्वच सदस्य शासकीय मराठी भाषेत बोलायचा प्रयत्न करतात. त्यामुळे “या ठिकाणी” हा शब्द असंख्य वेळा उच्चारला जातो. बच्चू कडू, छगन भुजबळ यांच्या भाषणांमुळे मराठी भाषेत थोडीतरी धगधग आहे असं वाटतं. अन्यथा महाराष्ट्रात खानदेश, विदर्भ, वर्‍हाड, कोकण, कोल्हापूर हे प्रदेश आहेत याचा थांगपत्ता विधिमंडळातील भाषणांच्या भाषेवरून लागत नाही.

लोकभाषा कशी असते याचे दोन नमुने पाहा—

सरळ मराठी गद्याचे नमुने

नमुना क्रमांक 1

(पोलीस मोटार वाहातुक विभाग एम.टी. पत्रक. नं. 14)

विषय

1. ड्रायव्हरने करावयाची रोजची तपासणी व कामे. ड्रायव्हरने आपली गाडी आतून व बाहेरून स्वच्छ ठेवली पाहिजे. आपल्या ए. सेक्शनच्या ठरविल्या दिवशी गाडी धुण्याची जबाबदारी ड्रायव्हरची आहे.

2. रेडीएटर कोठेही लीक होत नसून नेहमी पाण्याने भरलेला आसला पाहिजे.

3. इंजिन ऑइलची लेवल तपासून खात्री केली पाहिजे व ऑइल प्रेशर बरोबर दाखवीत आसले पाहिजे.

4. पेट्रोल सिस्टीम वेवस्थित आसले पाहिजे. रोज बरोबर दाखवित आसावे, पेट्रोल सिस्टीममध्ये कोठेही लिकीज आसू नये.

नमुना क्रमांक 2

(शिवाजीराजांनी ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदी येथील मंदिरास इनाम जमीन दिली त्यासंबंधीचे, 25 ऑक्टोबर 1671 चे पत्र)

अजव रतरवाने राजश्री शिवाजीराजे साहेब दाम दौलय हू.हाजर बज्यानेव कारकून हाल व इस्तकवाल व देशमुखानी व देशपांडे यांनी व मोकदमानी व रयानी प्रांत चाकण सु इसने सबैन अलफ श्री याचे इनाम मौजे आळंदी प्रगणे यासी सालाबाद जि मुजेरी येक खंडी अडीच मण देवाचे दिधले असे. कुलाबा व कुलाकानू दुमाले केले से. दुमाला करणे. यासी काडीची तोसीस न लावणे. थलकरी अगर कोणी इस्कील न करणे. सदरहू थलबद देणे. देवाचे देवास चालवणे. साल दरसाल चालवीत जाणे. ताजा खुर्दखताचा उजूर न करणे. हिंदू होऊन इस्कील करील त्यास गाईची आण असे. मुसलमान होऊन इस्कील करील त्यास सोराची आण असे. ..........

मराठी भाषेचं स्वरुप कसं असावं, कोणते शब्द मराठी म्हणून मान्य करून घ्यावेत ह्या विषयीच्या कोणत्याही दंडकाचे दडपण त्यांच्या लेखकांवर नाही. काही काम करण्यासाठी हे लिखाण करण्यात आलं आहे आणि ते काम साधलं जाण्यासाठी लेखकाने आपलं म्हणणं स्वच्छ आणि नेमकेपणाने मांडलं आहे. पहिल्या नमुन्यात ड्रायव्हरच्या तोंडी रुळलेले अनेक इंग्रजी शब्द आहेत तर दुसर्‍या नमुन्यात लोकांच्या म्हणजे महसूल अधिकार्‍यांच्या तोंडी रुळलेले फारसी शब्द आहेत. म्हणून हे सरळ सोप्या मराठी गद्याचे नमुने आहेत.

मात्र अशी भाषा आपल्याला पाठ्यपुस्तकांमध्ये आढळत नाही. वर्तमानपत्रांत वा वृत्तवाहिन्यांवर सापडत नाही. सरकारी कारभारात नसते. संस्कृतप्रचुर, कृत्रिम मराठी भाषा सक्तीची केल्याने त्यामुळे कुणाचं काय भलं होणार देवजाणे. मराठी लोकभाषा शिक्षणाचं माध्यम बनली तर विज्ञान आणि गणित इंग्रजी माध्यमात आणि बाकीचे विषय मराठी माध्यमात शिकायची वेळ विद्यार्थ्यांवर आली नसती.

बहुसंख्य मराठी माणसं ही प्रमाणित भाषा वापरत नाहीत. ते स्वतःच्या भाषेत बोलतात. त्यामुळे सुशिक्षित माणसांपासून वेगळे पडतात. त्यांच्या भाषेमुळे त्यांच्यावर अडाणीपणाचा छाप बसतो. त्यांना मार्गदर्शन करायला हवं, त्यांचं नियंत्रण करायला हवं असं सुशिक्षितांनाच नाही तर त्यांनाही वाटतं. ही वासाहतिक परिस्थिती आहे कारण परकीय लोक ज्ञान, कौशल्य, कर्तबगारी या बाबतीत देशी समाजाहून वरचढ असतात आणि त्यांच्या कल्याणासाठीच आपण त्यांचं नियंत्रण करतो आहोत अशी परकीय लोकांची धारणा असते.

ब्रिटीश काळातली ही परिस्थिती आजही आहे. भारत आज परकीयांची नाही पण परभाषकांची वसाहत बनला आहे. कारण मला न कळणार्‍या भाषेतील व्यवहार मला समजत नाही, त्याचं मूल्यमापन मी करू शकत नाही. संयुक्त महाराष्ट्र निर्माण झाल्यावर राजकीय सत्ता बहुजनांच्या हाती आली परंतु मराठी भाषेवरील ब्राह्मणांची पकड अधिक घट्ट झाली. या भाषेच्या मगरमिठीतून सुटका झाल्याशिवाय म्हणजे लोकांच्या दैनंदिन बोलण्यातील शब्द शिक्षण, राज्यकारभार व प्रसारमाध्यमांमध्ये रुळल्याशिवाय या भाषेत ज्ञाननिर्मिती होणार नाही. स्वायत्त व्यक्तींची बंधुभावावर आधारित समाजव्यवस्था हे भारतीय राज्यघटनेचं उद्दीष्टही त्याशिवाय साकार होणार नाही. मराठी माणसांचा केमिकल लोचा सोडवल्याशिवाय मराठी भाषेला गौरवाचे दिन येणार नाहीत.

Updated : 1 March 2020 4:55 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top