Home > मॅक्स ब्लॉग्ज > '५२ बोलीभाषा आपल्या कुशीत सांभाळणारी माय मराठी'

'५२ बोलीभाषा आपल्या कुशीत सांभाळणारी माय मराठी'

५२ बोलीभाषा आपल्या कुशीत सांभाळणारी माय मराठी
X

मला हिब्रू येत असती, तर हिब्रूतून व्यक्त झालो असतो. मला भाषेचा प्रॉब्लेम नाही. व्यक्त होण्याशी मतलब... सध्या मराठी व्यतिरिक्त हिंदी मासिके वाचतो. उर्दू मुशायरे ऐकतो. इंग्रजी डॉक्युमेंटरी पाहतो. ज्ञानाला कोणतीच भाषा वर्ज्य नसते.

असे सारे असले तरी, मराठी जिवापाड प्रिय आहे. कारण मी माहिती गोळा करण्यासाठी भले हजारो भाषा माध्यम म्हणून वापरेन, पण त्या माहितीला ज्यावेळी माझ्या विचारांनी स्वीकारण्याची वेळ येते, तेव्हा माझ्या माय मराठीला पर्याय नसतो. कारण मला विचार फक्त मराठीत करता येतो. आणि माझी विचार करण्याची भाषा मला प्राणप्रिय आहे. जवळपास ५२ बोलीभाषा आपल्या कुशीत सांभाळणारी देशात नव्हे, जगात दुसरी कोणती भाषा नसावी. 'अमृताची पैजा जिंके' असा ज्ञानाचा विश्वास या भाषेत आहे. 'आता या शहाराशहराला आग लावत चला' म्हणणाऱ्या नाम्याचा अंगार या भाषेत आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सागे सोयरे' म्हणणाऱ्या तुक्याचा वैश्विक संदेश या भाषेत आहेत. अशा असंख्य भाव-भावनांचा मिलाफ माझ्या मराठीत आहे.

मला माझ्या भाषेचा प्रचंड अभिमान आहे. अर्थात त्या अभिमानाला अहंकाराचा स्पर्श नाही. इतर भाषांचा दुस्वास नाही. माझी भाषा मुळातच मला सर्वसमवेशकता शिकवते. त्यामुळे इतर भाषांचा टोकाचा द्वेष करणारे मराठीचे खरे पाईक आहेत, असे मला कदापि वाटत नाही. कुणाचाही द्वेष न करता, कुठलेही राजकीय हेतू न बाळगता, कुठलाही वैयक्तिक स्वार्थ न बाळगता मराठी भाषेसाठी लढणारे मला कायमच आवडतात. प्रा. डॉ. दीपक पवार यांच्या कार्याचा यासाठीच मला अभिमान वाटतो. आदर वाटतो.

आणि हो, अभिजात दर्जा मिळो, अथवा न मिळो. ज्या भाषेत मी व्यक्त होतो, जगतो, रडतो, हसतो... ती भाषा मला प्रिय आहेच आणि राहील. मराठी भाषा दिन वगैरे निमित्त. पण त्या निमित्ताने ऋण तरी व्यक्त करता येतात.

Updated : 27 Feb 2018 4:51 PM GMT
Next Story
Share it
Top