Home > मॅक्स ब्लॉग्ज > मातृभाषेला आपण कुठवर गृहीत धरणार?

मातृभाषेला आपण कुठवर गृहीत धरणार?

मातृभाषेला आपण कुठवर गृहीत धरणार?
X

गज़लकार जनार्दन केशव भाषेच्या काटेकोरपणाबद्दल सतत चर्चेत असतात. गज़लेवर विलक्षण प्रेम करणारा हा युवा साहित्यिक. मराठी भाषा दिनानिमित्ताने संवाद साधतोय, मॅक्समहाराष्ट्र : सकळ मराठी, प्रबळ मराठी या उपक्रमात...

आज मराठी राजभाषा दिनाच्या निमित्ताने तुमच्याशी हा संवाद होतोय. माऊली ज्ञानेश्वरांपासूनची साहित्य परंपरा असलेल्या आपल्या मायमराठीच्या आपण कायमच ऋणात आहोत. तिचं उतराई होण्यासाठी आपापल्या परिने प्रयत्न करत राहुया. तुमच्यासोबतचा हा संवाद तुमच्या माध्यमातून अनेकांसोबत होणारा संवाद आहे. आजचा कार्यक्रम तुम्ही ऐकताय, पाहताय.. ह्या पोर्टलवर तुम्ही आहात. ह्याचाच अर्थ तुम्हाला आपल्या भाषेविषयी, आजच्या दिवसाविषयी प्रेम आणि आदराची भावना आहे. म्हणूनच तुमच्याशी हा संवाद, जो तुम्हीही, इतरांसोबत करायचा आहे.

२७ फेब्रुवारी हा खरंच मराठी राजभाषा दिवस आहे की, केवळ एक सरकारी सोपस्कार?.. हो, सोपस्कारच.. कारण ज्या पद्धतीने प्रतिवर्षी तो राबवला जातो. त्याला अभियान वगैरे तर अजिबातच म्हणवत नाही. मग त्यातला मराठी 'अभिमान' वगैरे फार दूरची गोष्ट. १ जुलैला दरवर्षी त्याच त्या खड्ड्यात नवीन रोप लावण्याच्या प्रघाताप्रमाणेच २७ फेब्रुवारी ह्या राजभाषा दिवसाची अवस्था झालेली आहे.

माझा शिक्षकांवर रोष नाहीय. पण, कित्येक शिक्षकांनाच हा दिवस का, कुणामुळे आणि कशासाठी साजरा केला जातो, हेच माहीत नसते. पुढे मग कुसुमाग्रज कोण, त्यांचं नाव काय, त्यांचं साहित्य, एकूण योगदान ह्याबद्दल तर बोलायचंच नाही. मागच्याच वर्षी मी व्याख्यानाला गेलो होतो एका महाविद्यालयात. तिथे कुसुमाग्रज आणि वि. वा. शिरवाडकर यांची जयंती एकाच दिवशी असण्याचा आविष्कार तेथील प्राध्यापिकेने केला होता. प्राध्यापिका विज्ञानाची असली तरी असा शोध लावावा, हे नक्कीच अभिप्रेत नव्हते. माझ्या सवयीनुसार मी त्यांना थांबवले. चूक सांगितली. ती सांगताना वातावरण गंभीर न होऊ देता, ते हलकंफुलकं होईल, ह्याची काळजी घेतली. तरीही ते त्यांच्याच विद्यार्थ्यांसमोर त्यांना कमीपणा वगैरे आला. पण, माझे भाषाविषयक सूत्र काही मी सोडले नाही.

शाळा महाविद्यालयांमध्ये केवळ सरकारी आदेशाचं पालन म्हणून हा दिवस साजरा केला जातो. साजरा होण्यापेक्षा तो दिवस पाळला जातो, म्हटल्यास ते मुळीच वावगे ठरणार नाही. किंबहुना तेच अधिक सयुक्तिक ठरेल. इतपत वाईट अवस्था आहे. ह्याला काही मोजके अपवाद असू शकतील. पण, त्या अपवादांची संख्या फारशी समाधानकारक नक्कीच नाही. कार्यक्रम, कार्यशाळा, व्याख्याने ह्या निमित्ताने अनेकदा शाळा महाविद्यालयांना भेट देण्याचा संबंध येतो. दहा कॉलेजांमागे एखाद ठिकाणी अरविंद दोडे, प्रा. दीपक पवार, प्रा. नितीन आरेकरांसारखा मराठी भाषेविषयी आस्था असणारा कुणी अभ्यासू प्राध्यापक किंवा विद्यार्थ्यांना उपक्रमशील बनवून भाषेचा लळा लावणार्‍या प्रा. प्रज्ञा दया पवार, प्रा. वीणा सानेकर, प्रा. दीपा ठाणेकर, प्रा. वृषाली विनायक क्वचितच गवसतात. प्रा. दीपक पवार हे राज्यशास्त्राचे प्राध्यापक आहे. त्यांची भाषेविषयीची रुची अभिमानास्पद आहे. अर्थात ही नावे प्रातिनिधिक असून ती केवळ उदाहरण म्हणून दिली आहेत.. प्रमाण सांगण्यासाठीच त्यांचे प्रयोजन आहे. महाराष्ट्रात अनेक सजग शिक्षक माझ्याही परिचयाचे आहेत. इथे सर्वांचीच नावे लिहिण्याला मर्यादा आहेत. मूळ मुद्दा हाच की, भाषेविषयी आस्था असणार्‍या शिक्षकांचे प्रमाणही यथातथाच आहे.

बरं, जे शिक्षक खरंच उत्सुक असतात, सक्षम असतात, त्यांना अनेकदा सरकारी उपक्रमांना (जनगणना, निवडणुका वगैरे) जुंपले जाते. त्याव्यतिरिक्त कार्यालयीन अथवा वैयक्तिक अडचणींना तोंड द्यावे लागते. त्या बाबींकडेही गांभीर्याने पहायला हवे आहे. असे अपवाद बाजूला सारले तरी एरव्ही मात्र शाळामहाविद्यालयांमध्ये कार्यक्रमाविषयीचा उत्साह आणि भाषेविषयीची उदासीनता असंच चित्र सर्रासपणे पहायला मिळतं. शिक्षकांमधली ही उदासीनता हीच आपल्या भाषेपुढील मुख्य अडचण आहे. उदाहरणासाठी पुन्हा पु.ल. आठवतीलच. पण, त्यांनी रेखाटलेले चितळे मास्तर मराठी भाषेला हवेच आहेत. स्वतःमध्ये भाषेविषयीची वत्सलता जपणारी शिक्षिका, भाषेकडे जबाबदारीने पाहणारा शिक्षकच पुढच्या पिढीकडे मराठीची पालखी नेऊ शकेल. असे शिक्षक, शिक्षिका महाराष्ट्रात आहेत, त्यांचा शोध घेऊन त्यांच्याकरवी भाषाविषयक उपक्रमांचे, कार्यशाळांचे आयोजन करवले पाहिजे.

वृक्षारोपण, भाषादिवस यांचे महत्त्व सणांपुरते मर्यादित रहायला नकोय. मी तुलना करणार नाहीय. पण, व्हेलेंटाईन ह्या एका दिवसासाठी सात दिवस आधीपासून वेध सुरू होऊन सात दिवस नंतरपर्यंत ते नेले जाऊन व्हेलेंटाईन पंधरवडा साजरा केला जाऊ शकतो. तर भाषा दिवसाचा पंधरवडा का होऊ शकत नाही? तरुणाईमध्ये ह्याविषयीची जागरुकता निर्माण करणे, ही खरी गरज आहे. भाषा टिकवण्यासाठी काय करावे, ह्या उपाययोजनांमध्ये तसे कुणाला फारसे स्वारस्य नसते. मात्र आहे ती भाषा, बोली लिहिण्याची तरी किमान काळजी आपण घेतो आहोत का?

आता आपण किमान काय करायला हवं, ह्या विषयी एक मुद्दा. २०२० सालात आज आपण आहोत. प्रगत तंत्रज्ञान, नवनवे शोध असं सगळं वातावरण आपल्या अवतीभवती आहे. वीसएक वर्षांपूर्वी मराठी लिहिण्यासाठी हस्तलिखिता व्यतिरिक्त टाईपरायटर, कॉम्प्युटर यावर मराठी लेखनासाठी आपल्याला इतरांवर अवलंबून रहावं लागत असे. आता मात्र आपल्या कॉम्प्युटर, लॅपटॉप, टॅब, मोबाईलमध्ये आपल्याला मराठी लेखन सहज उपलब्ध आहे. समाजमाध्यमे आज प्रत्येक भाषेची झाली आहेत, तशी ती मराठी देखील झाली आहेत. भाषेसाठीची लेखन साधने सुलभ सहज उपलब्ध होऊ लागली आहेत. पण, ह्या सोपेपणात आपण भाषा जपण्यात यशस्वी होतो आहोत का?

ह्या प्रश्नाचं उत्तर खरंतर १००% होय, असंच यायला हवं. पण, ते तसं होत नाही. आपली भाषा, मातृभाषा म्हणून आपण तिला अगदी गृहीत धरतो. इतर कोणतीही भाषा लिहीत किंवा बोलत असताना त्या भाषेतील शब्दांची आपण किती काळजी घेत असतो? खरंतर ती काळजी आपल्याला कुणी चुकीचं म्हणू नये, ह्यासाठीची असते. पण, तीच काळजी आपण आपल्या मातृभाषेची घेत नाही. इतर कोणत्याही भाषेपेक्षा वेलांटी, उकार, काना, मात्रा यांचं सौंदर्य मराठी, हिंदी आणि संस्कृत ह्या भाषांना लाभलेलं आहे. केसांचा भांग कधी बिघडू नये, ह्याची काळजी घेणारे आपण, भाषेच्या सौंदर्याच्या बाबतीत खरंच दक्ष असतो का? आपण आपल्या दिसण्याची जितकी काळजी घेतो, तशीच आपल्या भाषेचीही काळजी घेतलीच पाहिजे. मग ती काळजी लिहिण्यातली असो की बोलण्यातली.. आपण दक्ष असलंच पाहिजे.

हिंदीपेक्षा तुलनेने आपल्या मराठी भाषेचे व्याकरण अधिक बारकावे असणारे आहे. एवढ्या कमी वेळात, कामी शब्दात फार उदाहरणे देता येणार नाहीत, तरीही हे एक उदाहरण.. 'पाणी' हा शब्द आपल्या नित्याच्या वापरातला आहे. आता त्यातही 'पानी' की 'पाणी' ह्यावरून होणारे उच्चारवाद बाजूला ठेवूया. कोणत्याही शुद्धतेला होणारा विरोध ही खरेतर शुद्धतेपासून काढलेली पळवाटच असते. केवळ शुद्धतेलाच नव्हे तर तो अभ्यासालाही केलेला विरोध असतो. हे माझे अगदी ठाम मत आहे. असो.. पण, ह्या 'पाणी' मधील 'णी' ची वेलांटी 'दीर्घ' म्हणजे दुसरी आहे. ती जर र्हस्व म्हणजेच पहिली दिली, तर शब्दाचा अर्थच बदलतो. 'पाणी' ऐवजी 'पाणि', असं लिहिलं तर त्या शब्दाचा अर्थ 'हात' असा होतो. आता लक्षात घ्या अशा किती शब्दांचे उकार, वेलांटी आपण चुकवत असतो. जे थोड्याशा प्रयत्नाने सुधारता येऊ शकतात.

ह्या लेखात अनेक मुद्दे राहून गेले आहेत, ह्याची मला नम्र जाणीव आहे. लेख संपवतानाही एक मुद्दा स्मरतो आहे. 'सुलेखनाचा' ह्या बाबतीत, अच्युत पालव, निलेश गायधनी, नंदू गवांदे, संजय शिंदे ह्या आणि अशा अनेक सुलेखनकारांचेही योगदान महत्त्वाचे आहे. तितकेच जबाबदारीचे स्थान प्रकाशकांचे आहे. त्यांनीही साहित्य प्रकाशित करताना मर्यादा, दर्जा यांचा विचार करायला हवा आहे. वृत्तपत्र आणि इलेक्ट्रानिक मिडिया यांना तर मराठी भाषेची कोणतीही काळजी नसल्याचे चित्र पहायला मिळते आहे.

भाषा सहज उपलब्ध आहे, पण तिच्यातली सुलभता आपण शोधून तिचं सौंदर्य जपलं पाहिजे. इंग्रजीतलं मराठी लिहिणं कटाक्षाने टाळलं पाहिजे. केवळ एका क्लिकवर इंग्रजीसारखं टाईप करून मराठी अक्षरे उमटण्याची सुविधा उपलब्ध असताना आपल्याच तंत्रआलस्याने आपण एकप्रकारे भाषेची गळचेपीच तर करत असतो. विशेषतः लिहित्या हातांनी, म्हणजेच लेखक, कवींनी ह्या बाबत जागरूक राहून अत्यंत जबाबदारीने आपलं लेखन केलं पाहिजे. शुद्धलेखनापासून तर फारकत घेऊच नये. कळत नाही, वेळ नाही अशी क्षुल्लक कारणे देताना आपण स्वतःला मराठीचे लेखक म्हणवून घेत आहोत, ही बाब ध्यानात असू द्यावी.

राजभाषा दिनाच्या निमित्ताने किमान एवढी काळजी घेण्याचा संकल्प केला, तरी माय मराठीच्या आपल्यावरील ऋणांचे आपण थोडे तरी उतराई होऊ शकू..

- जनार्दन केशव

Updated : 27 Feb 2020 6:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top