Home > मॅक्स ब्लॉग्ज > मराठा आंदोलन : ध्रुवीकरण, एकाकीकरण, खच्चीकरण आणि विद्रुपीकरण

मराठा आंदोलन : ध्रुवीकरण, एकाकीकरण, खच्चीकरण आणि विद्रुपीकरण

मराठा आंदोलन : ध्रुवीकरण, एकाकीकरण, खच्चीकरण आणि विद्रुपीकरण
X

गेल्या सतरा दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चाचं ठिय्या आंदोल सुरू आहे. औरंगाबाद आणि परळी इथं ठिय्या देऊन बसलेले मराठा मावळे अजूनही उठले नाहीत त्यांच्या या क्षमतेची दाद द्यावी लागेल पण हाती काय लागलं याचा आता विचार करणं गरजेचं आहे.

खरंतर तर मराठा क्रांती मोर्चे निघाले तेंव्हापासूनच जातीय ध्रुवीकरणाला सुरुवात झाली. या जातीय ध्रुवीकरणाचा भाजपलाच जास्त फायदा होणार होता. त्यामुळे भाजप आणि rss या दोघांनीही मनातल्या मनात मांडे खाणं सुरू केलं. या मोर्चाला आणखी चालना देण्यासाठी मुख्यमंत्री राजीनामा देणार अशी धादांत खोटी आणि बोगस हुल उठवली. आणि मोठ्या प्रमाणात जातीय ध्रुवीकरण घडवून आणलं ज्याचा फायदा त्यानंतर झालेल्या अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपला झाला. सध्या गेल्या 18 दिवसांपासून सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनामुळे हे जातीय ध्रुवीकरण कमालीचं वाढलं असून त्याचा परिणाम हा जळगाव आणि सांगली महापालिकेत दिसून आलाच... मराठा,दलित,मुस्लिम वेगळे आणि obc मात्र एकत्र असं गणित लावून भाजपने या दोन महापालिका खिशात घातल्या आणि मराठा समाज मात्र हे साधं ध्रुवीकरणाचं गणित समजू शकत नाही आणि समजलं तरी त्यावर काही उपाय करायला तयार होत नाही.

मराठा समाजाने सुरू केलेल्या या आंदोलनामुळे मराठा समाजाचं एकाकीकरण सुरू केलं आहे. मुळात लोकशाही व्यवस्थेत सुद्धा मराठा ही जमात आपले राजे रजवाडे, सरदारकी, देशमुखी आणि पाटीलकी यातून बाहेर पडायला तयार नाही. मराठा समाजाला अजूनही हे लक्षात येत नाही की लोकशाही व्यवस्थेत इतर छोट्या जातींना सन्मानाने सोबत घेतल्याशिवाय सत्तेत येताच येत नाही. त्यामुळे मराठा अजूनही जात अभिमानी वर्चस्वातून वावरत आहेत. एक मराठा लाख मराठा ही त्यांचंच उत्तम उदाहरण आहे. मराठा वगळता इतर जातींचा किंवा नुसत्या obc चा जरी विचार केला तरी मराठा समाजाला सत्तेत येणं कधीही शक्य नाही. तरीही मराठा समाज हा स्वतःचा सवता सुभा कशासाठी मांडत आहे. एक मराठा लाख मराठा या मग्रुरीत जगणं म्हणजे स्वतःच्या हाताने पायावर धोंडा टाकून घेणं आहे. तरीही मराठा समाज स्व-अस्मिता अधिक प्रखर करून स्वतःच एकाकीकरण करून घेत आहे पर्यायाने मराठा समाजाचा यामुळे आत्मघात होणार आहे.

खरंतर मराठा सामाजचे मूळ प्रश्न हे अरक्षणाबरोबर शेती आणि व्यवसाय आणि व्यापाराचे सुद्धा आहेत. आरक्षणाची मागणी करून व्यवसाय आणि व्यापरातलं शंभर टक्के आरक्षण हे मारवाडी गुजराथी आणि ब्राम्हणांना फुकटात देऊन टाकणार आहे का.? बरं गेल्या अठरा दिवसांपासून आरक्षणासाठी प्रत्यक्ष लढाई सुरू आहे. आणि दोन वर्षांपासून आरक्षणासाठी प्रयत्न सुरू आहेत. तथापि गेल्या 33 वर्षांपासून मराठा समाज आरक्षणाची मागणी करत आहे. इतकं सगळं करूनही मराठा समाजाचं आरक्षण अजून तरी नजरेच्या टप्प्यात सुद्धा आलेलं दिसत नाही. त्यामुळे मराठा समाजात कमालीचं नैराश्य पसरलेलं आहे. त्यामुळे आजपर्यंत तब्बल 18 उमद्या तरुणांनी आत्महत्या केल्या आहेत. काल शनिवरचाच एक दिवस काय तो आत्महत्याशिवाय शांत गेला, नाहीतर रोज दोन-तीन आत्महत्या होत आहेत. खरंतर या आत्महत्या होण्याआधी मराठा आंदोलन अगदी जोमात सुरू होतं. पण आत्महत्या सुरू झाल्यामुळे ठोक मोर्चा समन्वयकामध्ये सुद्धा संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय परिणामी सुरू असलेल्या ठोक मोर्चामुळे समाजाला चालना गती आणि उत्साह मिळण्याऐवजी मराठा समाजाचं खच्चीकरणच झालेलं पाहायला मिळत आहे. आणि त्याचबरोबर समाजतले 18 उमदे तरुण तरुणी गेल्याचं दुःखही समाजातील नातेवाईकांना पचवावं लागत आहे.

या मोर्चात गेल्या दोन दिवसात घडलेली आणि समोर आलेली सर्वात महत्वाची बाबा म्हणजे या ठोक आणि ठिय्या मोर्चाचं विद्रुपीकरण सुरू आहे. याला कारणीभूत ठरली ती रुपाली पाटील आणि नितेश राणे यांची ऑडिओ क्लिप या क्लिप मध्ये अप्पा कुडेकर आणि रमेश केरे पाटील या दोघांनी डिमांड केल्याचं सांगितलं आहे. मुळात जगात सगळीकडे मोबाईल फोन रेकॉर्ड केले जातात हे नीतेश राणे यांना माहीत नाही का. तरीही ते हे सगळं फोनवर का बोलले बर रुपाली पाटील या व्यक्ती कोण त्यांनी राणेंना फोन का केला आणि राणे त्यांच्याकडेच का बोलले आणि रुपाली पाटील यांनी हा समाजाचा प्रश्न असताना तो मीडियात का नेला या प्रशांची उत्तरे शोधली तर हा एक प्रिप्लॅन कट असावा असंच वाटतं मुळात आरोपींना गुन्हा केलाय का हे सिद्ध करण्यासाठी कुण्यातरी एक त्रयस्थ व्यक्तीन ते कथन करणं हा काही पुरावा होत नाही. अप्पा कुडेकर आणि रमेश केरे यांनी थेट डिमांड केल्याचा ठोस पुरावा जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत ते दोषी असले तरी त्यांना दोष देण्याचा अधिकार कुणालाही नाही. पण तरीही मॉब लिंचिंगचा प्रकार डोळ्यासमोर ठेऊन मोर्चाचं विद्रुपीकरण केलं की काठीशिवाय साप मारता येतो हे साधं तत्व यात वापरलेलं दिसतं. हे असं असलं तरी ठोक मोर्चात सध्या जी चर्चा सुरू झाली आहे, ज्या शंका कुशंका उपस्थित केल्या जात आहेत. कार्यकर्त्यांच्या मनात जे मळभ दाटून आलेलं आहे. त्यावरून तरी मराठा मोर्चाचं विद्रुपीकरण करण्यात सरकार काही प्रमाणात यशस्वी झाल्याचं दिसून येतं.

आरक्षण मिळवण्याच्याच दृढ हेतूने सुरू करण्यात आलेला मराठा क्रांती ठोक आणि ठिय्या मोर्चाकडे अठरा दिवसानंतर वळून पाहताना हाती काय लागलंय याचा विचार करायचं ठरवलं आणि त्याची जमा बेरिज केली तर मर्द मराठ्यांचे सगळे हात रिकामे असल्याचे दिसत आहेत. या आंदोलनातून मराठा समाजाने आपले हात आजच्यापुरते रिकामे केले नाहीत तर कैक दशकांसाठी स्वतःला रिकामं करून घेतलं आहे. आगामी काळात ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर मराठा समाजच्या हाती ध्रुवीकरण, एकाकीरण, खच्चीकरण आणि विद्रुपीकरणाशिवाय काहीच लागणार नाही.

दत्ता कानवटे, औरंगाबाद.

Updated : 5 Aug 2018 11:36 AM GMT
Next Story
Share it
Top