Home > मॅक्स ब्लॉग्ज > ‘तुम आखरी बार जहांगीर के साथ कब सोई थी?’: मकबूल

‘तुम आखरी बार जहांगीर के साथ कब सोई थी?’: मकबूल

‘तुम आखरी बार जहांगीर के साथ कब सोई थी?’: मकबूल
X

शेक्सपियरच्या मॅकबेथ या शोकांतिकेवर आधारित मकबूल हा सिनेमा. आपली वेगळी शैली निर्माण केलेल्या विशाल भारद्वाज या दिग्दर्शकाने दिग्दर्शित केलेला. मॅकबेथ ही तशी पॉलिटिकल शोकांतिका. त्यातील मॅकबेथ या पात्रावर आधारित मकबूल हे मुख्य पात्र निर्माण केलं. चित्रपटात पंकज कपूर, नसिरूदीन शाह, ओम पुरी, तब्बू आणि पियुष मिश्रा अशी अभिनयाची तगडी स्टारकास्ट जुळवून आणल्यावर मुख्य पात्र मकबूलसाठी असाच एक तगडा अभिनेताच अभिप्रेत होता. तिग्मांशु धुलीयाच्या ‘हासिल’ चित्रपटातून आपली अभिनयाची पात्रता इरफानने लीलया पेलून दाखवली. यानंतर मिळालेल्या या संधीचं सोनं इरफानने करून दाखवलं. या चित्रपटाचा नायक आणि खलनायक असा दुहेरी मुकुट त्याने डोक्यावर घेतला.

मकबूल मध्ये पंकज कपूर यांनी साकारलेल्या अब्बाजी उर्फ जहांगीर खानचा ‘शागिर्द’ (चेला) अशी मकबूलची ओळख घेऊन चित्रपटाला सुरुवात होते. अब्बजीसाठी जीवाची बाजी लावणारा त्याचा चेला मकबूल. एका दृश्यात ओम पुरी सहा महिन्यात मकबूल अब्बाजीच्या गादीवर बसेल अशी भविष्यवाणी करताच, मकबूलच्या डोळ्यात उतरलेला राग (तो दारूच्या नशेत असतांनाही) आणि त्याची ती भेदक नजर अब्बाजी बद्दलचं प्रेम सांगून जाते. इरफान अगदी सहजतेने ते डोळ्यात उतरवतो. इरफानच्या अभिनयाची ती एक निराळीच खासियत राहिली आहे. इरफानचे चेहऱ्यापेक्षा डोळेच जास्त लक्षात राहतात. अभिनय करतांना आधी त्याचे डोळे, मग एक समोरच्याला चिरत जाणारी नजर, त्यावर एक पॉज यातच तो संवाद पूर्ण व्हायचा आणि उरलाच असेल. तर मग त्याच्या खास आवाजातला संवाद. त्याचा तो अभिनय पूर्णत्वास न्यायचा.

हे इतकं सहजतेने करणारा तो अवलिया कलावंत एक निराळं रसायन. तब्बू अर्थात जहांगीरची बेगम निम्मी आणि मकबूल यांच्यातली ओढ नजरेतूनच जाणवत राहते. तोवर अब्बाजीला दगा फटका करावा. असा ध्यानी मनी नसतांना अचानक अब्बाजीची जागा घेण्याबद्दल गळ तब्बू घालू लागते. रस्त्यात उभं असतांना पुन्हा तो पॉज आणि ती कातरणारी मकबूलची नजर खूप बोलून जाते.

कमिशनर देवसरे सर्वांसमोर श्रीमुखात लगावल्यावर आश्चर्यचकित आणि असंबद्ध झालेला मकबूल फक्त डोळ्यांनी त्याने पुन्हा साकारला. पोलीस स्टेशन मध्ये देवसरेवर पंकज कपूर, पियुष मिश्रा आणि इरफान तिघांनी नजरा रोखलेल्या दिसतात. पण त्या दोघांपेक्षा पेक्षा इरफानची रोखलेली आग ओकणारी नजर कमालीची दाहक वाटते.

मकबूल कधीच अब्बाजीला दगा देणार नाही. असं वाटत असताना, निम्मी आणि मकबूल ने सोबत घालवलेल्या रात्रीनंतर ‘अब्बाजीला मारल्यानंतरच आपण एकत्र येऊ शकतो’ हे वाक्य ऐकताच इरफानची नजर आणि पॉज पुन्हा मनातली अस्वस्थता बंडाची भाषा बोलून जाते. तो एक प्रामाणिक शागिर्द आणि काहीही करायला तयार प्रेमी अशा दुहेरी नावेवर स्वार दिसतो. त्याच्या मनातली अस्वस्थता, दागाबाजीची मनातली सल इरफान केवळ डोळ्यावरून अगदी सहज अभिनयात उतरवतो.

अब्बाजीला मारतांना असलेली अस्वस्थता, मारण्याचा हव्यास, भीती, काळजी आणि दाहकता सारं एकाच दृश्यात त्याने फक्त अभिनयातून अफलातून मांडलं. पियुष मिश्राच्या देहाचा पुन्हा जिवंत होण्याच्या भासावेळी इरफानमधला अवलिया अभिनेता पुन्हा प्रकर्षाने जाणवून येतो. जिवंत असण्याचा भास त्याचं देहभान हरपतो, त्याचा आकांत, ओरडाओरड सगळचं कमालीच निभावालय त्याने.

तू बाप होणार. हे तब्बुच्या तोंडच वाक्य ऐकल्यावर इरफानचा एक पॉज, शून्यात नजर आणि ‘तुम आखरी बार जहांगीर के साथ कब सोई थी?’ हा तिखट प्रश्न आणि त्यावेळचा अभिनय कमाल आहे. अगदी स्तब्ध करणारा. त्याच्यातला संशयी प्रेमी अप्रतिम दिसतो. या चित्रपटात पोलीस स्टेशनमध्ये एका दृश्यात नासिरभाईच्या डोक्याला बंदूक लावून त्याच्या नजरेत नजर घालून त्याला धमकावणारा इरफान डोळ्यातून आग ओकातांना दिसतो. नसीरुद्दीन शाह सारख्या अभिनयाच्या बादशहा समोर त्याच्याच नजरेत नजर घालून अभिनय करणं आणि त्याला शिरजोर ठरणं हे वाटत तितकं सोपं नाही. भल्याभल्यांच्या पायाखालची वाळू सरकते असा अभिनय करतांना. कारण समोर नसीरुद्दीन आणि ओम पुरी असे कलंदर अभिनेते ठाकलेले होते. पण नवखा इरफान इथेही अचंबित करतो.

तब्बू सोबतच्या शेवटच्या दृश्यात प्रेमात सगळे अंदाज चुकलेला, खून करून चुकलेला, सर्व संपल्याची जाणीव झालेला मकबूल पुन्हा अस्वस्थ, हताश डोळ्यांनी त्याने साकारलाय. त्याचा हताशपणा आपल्या अंगावर आल्याखेरीज राहत नाही.

चित्रपटाच्या अखेरीस आपल्या मुलाला योग्य हातात गेलेलं पाहून निश्चिंत झालेला एक बाप, त्याचा चेहरा, कपाळावरून काचेवर ओघळणारा घाम स्तब्ध करणारा आहे. अखेरीस निर्विकार, निश्चिंत, सगळं संपल्याचं जाणवलेला बाप इरफान केवळ आपल्या चेहऱ्याने, डोळ्याने आणि चालण्याने सहजतेने दाखवून देतो. गोळी लागल्यावर मरतांनाची अवास्तविक, अतिशयोक्ती अभिनय आपण बॉलीवूडमध्ये असंख्यवेळा पाहिलाय. पण मकबूलचा हा शेवट, किलकिले होणारे डोळे, अस्फुट कण्हणं अगदीच वेगळं.

एकाच चित्रपटात कट्टर शागिर्द, अबोल प्रेमी, खुनी नायक, भंडावून गेलेला खलनायक, कोणत्याही थरावर जाऊ पाहणारा मजनू, संशयी बाप, भासांनी वेढलेला आणि स्वतःच्या नजरेत पडलेला गुन्हेगार आणि अखेरीस एक सगळं हरवून बसलेला एक बाप अशा निरनिराळ्या अवस्थांमधून साकारलेला मिया मकबूल. शेक्सपीयरला देखील त्याने लिहू घातलेला नायकरुपी खलनायक पाहून समाधान वाटलं असतं. भेदक डोळे, नजरेचा कटाक्ष, पॉज आणि खास शैलीतला आवाज अन संवाद एवढ्यावर अभिनयाची यशस्वी गलबत पार करणारा कलावंत. न विसरता येणारा मियाँ मकबूल.

.......जयेंद्र राणे

Updated : 30 April 2020 3:13 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top