Manu is alive and kicking!

Manu is alive and kicking!
X

फेसबुक वर एक चांगला ग्रुप वाटला म्हणून तिथे सदस्य झालो होतो. ग्रुपचे नाव आहे "दुर्मिळ पुस्तके", Rare Books! खरे तर चांगला वाटला म्हणजे चुकीचे आहे. कारण ग्रुपची कल्पना चांगलीच आहे व तिथे कोणती पुस्तके वाचनीय आहेत. ती कुठे मिळतील ही माहिती मिळते.

पण चार दिवसांपूर्वी तिथे जो अनुभव आला तो शेअर करतो. या ग्रुपवर एका सदस्याने "मनुस्मृती" हे पुस्तक कोठे मिळेल? अशी चौकशी केली. त्याला दुसऱ्या एका सदस्याने अत्यंत चुकीचे उत्तर दिले, ते म्हणजे टॉयलेट मध्ये मिळेल. या उत्तरावरून आणि त्या सदस्यांच्या नावावरून ते अनुसूचित जातीचे असावेत. असा सगळ्यांचा समज झाला आणि तो खराही असेल. हे उत्तर आणि भाषा चुकीची होती. यात शंकाच नाही. पण त्यानंतर ग्रुपवर जो गदारोळ सुरु झाला तो पाहण्यासारखा होता.

स्वतःला सुशिक्षित म्हणवून घेणारे आणि आडनावांवरून उच्चवर्णीय दिसणारे लोक ज्या कॉमेंट्स करीत होते. पाहून मनू आजही जिवंत आहे. आणि तो अनेकांनी मनात जपून ठेवला आहे हे दिसून आले. या माणसाला ताबडतोब ग्रुप मधून काढून टाका. अशी मागणी करणे अगदी योग्य होते. ऍडमिनने देखील तात्काळ सांगितले की, या व्यक्तीला ब्लॉक करण्यात आले आहे. पण ब्लॉक करण्याची मागणी करतांना ज्या कॉमेंट्स करण्यात येत होत्या. त्या डोळे उघडणाऱ्या होत्या. त्यातील काही अशा...

"ही घाण इथे कशी", "याची मजल फक्त टॉयलेटपर्यंतच!", "टॉयलेट मध्येच जन्माला आला वाटतं", "मुक्कामी असतो तिथे", "अक्कल, लायकी आपल्या पातळीप्रमाणेच", "तो टॉयलेटमध्येच राहायला असतो!", "वात्रट पोर बापाची लायकी काढायला पण कमी करत नाहीत!", (इथे हे लिहिणारे स्वतःला कोणाचा बाप समजतात?) "संस्कार दाखवून दिले", "मनुस्मृती समजून घ्यायला बुद्धी हवी. निर्बुद्ध आणि सर्वसामान्य वर्गातील माणसांना मनुस्मृती समजणार नाही.", "गाढवाला गुळाची चव काय, त्यातला आहे हा", "ही कुठली घाण आली आहे? आणि ही कोण, कशी आणि कधी साफ करणार?", "संविधान घाईघाईत लिहिल्याने सदोष आहे. हे आंबेडकरांनी मान्य केलंय", "मनुस्मृतीत समान अधिकार नाहीत, मग संविधानात आहेत का?", इत्यादी अनेक पातळी सोडून केलेल्या कॉमेंट्स करण्यात आल्या.

अर्थात त्याचा प्रतिवादी काही लोकांनी केला.

वास्तविक ती आक्षेपार्ह कमेंट लिहिणाऱ्याने, चुकीचे असले तरी, फक्त मनुस्मृतीबद्दल लिहिले होते. त्यात कोणत्याही जातीचा उल्लेख नव्हता. पण त्याच्यावर तुटून पडतांना त्याच्या जातीबद्दल जी कमेंट्स करण्यात आली. त्यावरून जो जन्मजात श्रेष्ठत्वाचा अहंभाव दिसून आला तो थक्क करणारा वाटला.

अनेकांनी मनुस्मृतीत आक्षेपार्ह काहीच नाही असे म्हटल्याने, आणि एका महिलेने तर त्यात स्त्रियांविरुद्ध काहीच नाही. असले कमेंट केल्याने राहवले नाही. त्यातच अनेक कमेंट्स "मनुस्मृती वाचली तरी आहे का? त्यात काहीच चूक नाही" अशा स्वरूपाच्या होत्या, त्यामुळे मग मी त्यांना उत्तर दिले की तुम्हाला मी अध्याय क्रमांक आणि श्लोक क्रमांक सांगून मनुस्मृतीत स्त्रिया आणि अस्पृश्यांविरुद्ध काय आहे? ते सांगू शकतो, आणि त्या तरतुदी सांगितल्या. एका महाभागाने मनू हा क्षत्रिय होता असे म्हटले, त्याला मी दाखवून दिले की ते चूक आहे.

त्यातच एका महाभागाने त्या मूळच्या आक्षेपार्ह कमेंट करणाऱ्यावर कॉमेंट करतांना "गाव तिथे......." असे लिहिले. त्याला मात्र, मी सांगितले की ही जातीयवादी कमेंट आहे आणि या म्हणीचा उत्तरार्ध लोकांना माहित नाही. असे तुम्हाला वाटतं असेल तर तो तुमचा गैरसमज आहे. यामुळे पोलीस केस होऊ शकते. असे लिहून मी ऍडमिनना विनंती केली, की तुम्ही जसे त्या मूळ व्यक्तीला त्वरित ब्लॉक केले आहे, तसे या हे जातीयवादी म्हण लिहिणाऱ्या व्यक्तीला ब्लॉक करा. त्यावर काहीही रिस्पॉन्स आला नाही.

ही गोष्ट रात्रीची!. दुसऱ्या दिवशी सकाळी सहज यात नवीन काही चर्चा झाली आहे का? ते पाहावे तर ऍडमिनने मलाच ब्लॉक केलेले!

आता मला त्या पोस्टवरच्या नवीन कॉमेंट्स दिसत नाहीत, जुन्याच दिसतात. पण त्यावर ही मी लिहू शकत नाही.. माझे दुसरे एक मित्र, मनोज पाटील, यांनी ही यांनी ही काही मते मांडली होती. जी मनुस्मृती विरोधात होती. त्यांना सहज विचारले, तर त्यांनाही ब्लॉक केले आहे. असे त्यांनी सांगितले.

वास्तविक आम्ही कोणतीही पातळी सोडून काहीही लिहिले नव्हते. मी तर फक्त तरतुदी सांगितल्या. आता त्या पोस्ट वर जे काही लिहिले जाईल ते एकांगी असेल आणि आणि त्याचा प्रतिवादही होणार नाही. म्हणून सुरवातीलाच म्हटले Manu is alive and kicking!

सुनील सांगळे

Updated : 6 Aug 2020 5:48 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top