Home > News Update > महाराष्ट्र संघर्षाच्या पिढ्या आणि वास्तव

महाराष्ट्र संघर्षाच्या पिढ्या आणि वास्तव

महाराष्ट्र संघर्षाच्या पिढ्या आणि वास्तव
X

डॉ. नरेंद्र दाभोलकरांची हत्या झाली त्या दिवशी एका महा राष्ट्राची हत्या झाली होती. इथला पिचलेला, दबलेला, घुसमटलेला कष्टकऱ्यांचा आवाज श्रद्धेच्या अंधश्रद्धेच्या बाजारात आधीच विरून जात होता तो आता कायमचा गाडला गेला. महाराष्ट्रातील कष्टकऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक हक्कांच्या खच्चीकरणाचं वास्तव उघड्या डोळ्यांनी पाहायला मिळेल असे कधी वाटले नाही. महाराष्ट्र दिन कामगार दिन म्हणून साजरा होतो, " कामगार आहे मी तळपती तलवार आहे सारस्वतांनो पुन्हा एक गुन्हा करणार आहे अशी पुस्तकी वाक्य टाळ्या मिळवायला नेहमीच उपयोगी पडतात. करोना आणि लॉकडाऊनच्या दरम्यान कानांची सुटका झाली. कामगार नेता और बदले मे क्या क्या लेता, तरीपण कामगार कुठे आहे? महाराष्ट्रातला हा बहुतांश वर्ग बेभरवश्याच्या शेतीवर न विसंबता नोकरीला प्राधान्य देणारा गरिबांचा, कष्टकऱ्यांचा होता.

गावागावातल्या तऱ्हेतऱ्हेच्या जातींचे, गावगाड्यातल्या शेतकरी संस्कृतीतले लोक, गिरण्यांच्या, कष्टाच्या कामावर आडोशाने स्थिरावत गेले. या कष्टकरी वर्गाची स्वप्ने छोटी होती. मालक बनण्याची आकांक्षा त्याच्या मनाला शिवत नव्हती. गिरणीत कामाला असण्याची त्या काळात प्रतिष्ठा होती. आज हाच महाराष्ट्रातला संघटीत / असंघटीत कामगार देशोधडीला लागला आहे. कामगार चळवळ संपली की संपवली गेली याचे विश्लेषण आणि चिंतन करने गरजेचे झाले होते कारण त्यानंतर उद्भवणाऱ्या प्रश्नांना सामाजिक व्यवस्थेला हि सामोरे जावे लागणार होते. आजही महाराष्ट्रातील कामगार वस्त्यांच्या पसाऱ्यातील हजारो कामगार खुरडत खुरडत जगतोय.

कामगार वस्त्यांमध्ये जिगर होती, उबदारपणा होता, प्रेम होतं, जोश होता, मस्ती होती. मालक असो वा सरकार दोन हात घ्यायची आणि दोन हात द्यायची तयारी होती. तेव्हा हाच कामगार वर्ग वस्त्यांमध्ये यांच्या नाटक मंडळी, भजनी मंडळी जोरात होती. सण सणावळ साजरा करत होता, कामगार वस्त्यात उत्सव वर्गण्या काढून साजरे व्हायचे पण या उत्सवांचे देवी देवता यांचे नवस फेडू शकले नाहीत ना यांचे स्थलांतर रोखू शकले. याची उत्तरे अब्जाधीश झालेल्या कामगार वस्तीतल्या मंडळांकडे सुद्धा नाहीत. पण, हे सारं फार फार तर १९८२च्या ऐतिहासिक संपापर्यंत टिकलं. संप फुटला आणि पहाडासारखी माणसं अक्षरशः कोलमडली, परागंदा झाली, हरवून गेली, खचली. याउलट सण उत्सव श्रद्धेचा बाजार कोटींच्या घरात गेला. फसलेल्या संपानंतर आर्थिक विषण्णतेपोटी ते यंत्र ती संस्कृती सारं काही उखडलं गेलं. शोषणातही हसून खेळून राहणाऱ्या त्या लोकांची दुसरी पिढी आता इथे भेटते. नोकऱ्या न मिळणारी त्यामुळे टाईमपास नि वासुगिरीत मन रमवणारी तरुण बेकार मुले जशी इथे दिसतात. तशी रिकामा वेळ, रिकामा खिसा आणि रिकाम डोकं या पोकळीत भाईगिरीचा पैसा कसा अलगद जाऊन बसतो त्याची झलक दाखवणारी तरुण पोरंही भेटतील. न्याय हक्कासाठी लढणारी वृत्ती संपली. मिल, पेंट, टायर आणि अनेक संघटीत / असंघटीत कामगार व्यवस्था कोलमडल्या त्यावेळी अनेक कुटुंबे शेतीचा मार्ग पत्करून निघून गेली, काही लढली संघर्ष केला, काही कुटुंबांचा घर विकून रस्त्यावर आल्याचा प्रवास दिसला तर काही रस्त्यांवरच संपलेली दिसली. कामगारांचे अपत्य असणे हा शाप वाटू लागला अनेकांना, मुलांचे शिक्षण, नोकऱ्या, मुलींचे लग्न आणि समाज प्रतिष्ठा यात कामगार पिसला गेला आणि श्रद्धेच्या, अंधश्रद्देच्या बाजारात त्याची माती झाली. महाराष्ट्रात आज कुणी ‘मी गिरणीत कामाला आहे’ असं सांगितलं की लोक टकामका बघायला लागतात. असं काही ऐकण्याची सवय आता महाराष्ट्राला राहिलेली नाही. असंघटीत कामगारच नाही तर संघटीत कामगार वर्ग सुद्धा व्यवस्था, न्याय, हक्क, स्वातंत्र्य, शोषणाविरुद्ध आवाज उठवायला आता तयार नाही याचे कारण लोकमान्य टिळकांना शिक्षा झाल्यावर मुंबईकर गिरणी कामगारांनी संप केला होता तो पहिला कामगार संप.. त्या संपाने कामगारांचे महत्त्व जाणवले व वाढले, तर १९८२च्या संपाने मुंबई गिरणी कामगार उध्वस्त झाला.

‘आम्ही आमच्याच हाताने मुंबई विकली’ १९८२च्या संपानंतर हे असे काही मराठी कामगारांचे म्हणणे होते. संपूर्ण कामगार चळवळ उद्धवस्त झाली हाच संप इतर उद्योग क्षेत्रातील कामगारांना त्यांच्या न्याय, हक्क, शोषणाविरुद्ध लढण्यास बाधा ठरलाय तो आजपर्यंत. उद्धवस्त मराठी कामगारांच्या मुलांवर अवेळीच जबाबदाऱ्या आल्या, कुटुंब जगवणे, वाचवणे, बहिणीचे भावाचे शिक्षण लग्न, शेती, कोर्ट - कचेऱ्या आणि त्यातच खाजगी भांडवलदार वर्गाच्या खाजगी क्षेत्रात गुलाम बनत त्याच्या दावणीला त्याने बांधून घेतले आणि यातूनच स्वाभिमानशून्य मराठी तरुण पिढी उदयास आली. त्यातच डॉ. नरेंद्र दाभोलकारांचे विचार या पिढीला आशादायी वाटत होते. धर्माच्या, श्रद्धेच्या - अंधश्रद्धेच्या चौकटी ओलांड़ून बाप जाद्यांच्या चुका सुधारण्याची आणि स्वता:सह देशाच्या प्रगतीचा विचार विज्ञानवादी दृष्टीकोनातून समस्त पिढीला प्रेरणादायी वाटू लागला होता. उद्योग धंदे, व्यवसाय याची सुरुवात करून गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर पडावेसे वाटत होते. कारण हा वर्ग शिकला, संघर्ष करू लागला तर भांड्वलदारांबरोबर धर्मअंधांची पण दुकाने बंद होणार होती. जाती धर्माच्या चौकटी मोडल्या गेल्या असत्या. जात धर्माचे राजकारण करता येणे अशक्य झाले असते, त्यामुळे अंधश्रद्धा जिवंत ठेवणे हे कित्येकांच्या बाजाराचा आणि अस्तित्वाचा प्रश्न बनला होता. महाराष्ट्र दिनानिम्मिताने कामगार दिनाच्या शुभेच्छा देणार नाही, आपल्याला आपल्या मराठी समाजाला उद्योग धंदे उभारणीस सुरुवात करावी लागणार आहे.

आजही खाजगी क्षेत्रात मान खाली घालून दिवसाची रात्र करणारी ही मुले "माझ्या पप्पांचा पगार द्या’ ‘गिरणी कामगारांना हक्काची घरे मिळालीच पाहिजेत’ असे फलक घेऊन मोर्चे, रस्ता रोको करतात, थकबाकी गोळा करण्याचे प्रयत्न होतो. कामगारांच्या वेदना ठसठशीतच राहतात. गळूवर फोड आणि फोडावर पूटकुळी अशी काहीशी परिस्थिती कामगारांची आणि खाजगी क्षेत्रात काम करणाऱ्या त्यांच्या मुलांची झाली आहे. नोकरी किती दिवस टिकेल याची शाश्वती नसते, कंपनी कधी बंद होईल कधीच काही माहीत नसते. नवीन खाजगी कंपन्या रोज डझनाने सुरु होतात आणि बंद होतात, कामगार कोर्टात अशा खाजगी कंपनी मालकांविरुद्ध रोज नवीन नवीन केसेस उभ्या राहतात. टांगत्या तलवारी घेऊन त्या कामगारांची मुले झुंज देत आहेत या निष्ठूर व्यवस्थेबद्दल. हि तिच व्यवस्था आहे जी करोनासारख्या संक्रमित आजारावर विज्ञानवादी दृष्टिकोन न ठेवता टाळ्या, थाळी आणि दिवे लावण्याचे सल्ले देते. अंधश्रद्धेच्या माध्यमातून पिढ्याना गुलाम बनविण्याचे कारखाने उघडले गेले आहेत म्हणून दाभोळकर तुम्ही हवे होतात, तुम्हाला का मारले याची उत्तरे आज एमएनसी, आयटी कंपनीच्या नावाखाली काम करणाऱ्या आयटी सेल च्या गुलाम फॅक्ट्रीतील मुलांना समजायला हवीत. शिक्षणाचा उपयोग फक्त पैसा कमावून आज मध्ये जगण्यासाठी करू नका. उद्याची पिढी तुम्हाला दोष देत राहील असे वागू नका. सर्वायवल इज दि फिटेस्ट म्हणत "करियर अम्ब्रेला" समजणाऱ्या या मुलांना आजची चिंता नाही पण राजकीय व्यवस्थेच्या गुलाम पिढ्या तुम्ही तयार करत आहात हे विसरून चालणार नाही. महाराष्ट्र दिन साजरा करा.. महाराष्ट्र दीन करू नका.

लेखक : वैभव जगताप

Updated : 1 May 2020 4:52 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top