Home > मॅक्स ब्लॉग्ज > शरद पवार; भाजपसाठी विधानसभा निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू

शरद पवार; भाजपसाठी विधानसभा निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू

शरद पवार; भाजपसाठी विधानसभा निवडणूक प्रचाराचा केंद्रबिंदू
X

विधानसभा 2019 च्या प्रचारात भाजपच्या रणनीतीनुसार 'शरद पवार' हे इझी टार्गेट बनवले गेले आहेत, असे दिसू लागले आहे. सन 1981 पासून शरद पवारांचा जसाच्या तसा अनुनय करत, त्यांना फॉलो करणारे दोन ध्येयनिष्ठ युवक गुजरातमध्ये शरद पवारांचे राजकारण, वर्तन, विकासाची दृष्टी, संघटन, कारखानदारी, उद्योजकता, व्यापारी संबंध, ऊसाचे राजकारण, इ. बाबी जसाच्या तश्या शिकून घेत होते. शरद पवारांना ट्रॅक करत होते.

हे दोन युवक होते, नरेंद्र मोदी आणि अमित शाह.

लालकृष्ण अडवाणी यांची जी अवस्था राजकारणात व खुद्द भारतीय जनता पक्षात श्री. अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी केली आहे, ती गुरुदक्षिणा देण्याच्या उद्देशाने आज शरद पवार यांना केंद्रीभूत ठरवून व्यूहरचना आखली जात आहे.

महाराष्ट्र राज्यात मराठेतर सर्व जाती धर्मात शरद पवार व मराठा जातीविषयी हळूहळू सुप्त विष पेरण्याचे काम संघ व भाजपतर्फे विविध पद्धतीने केले गेले आहे. भाजपचे हिंदुत्व हे मोठ्या जातीसमूहांनी स्वीकारले पाहिजे, ही संघाची भूमिका राहिली आहे. मराठा क्रांती मोर्चा नंतर झालेल्या निवडणुकांत राज्यभरात मराठा मतांनी काँग्रेस - राष्ट्रवादी या पारंपरिक मराठा बहुल पक्षांची साथ सोडून भाजप व शिवसेनेला आश्रय दिला, हे चित्र आहे. त्यामुळे संघ - भाजपला अपेक्षित यश मिळवून देण्यात मराठा जातीसमूहाने सत्तेच्या लालसेपायी मोठा हातभार लावला आहे.

पारंपरिक मराठा बहुल असलेले काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे मराठ्यांचे पक्ष, भ्रष्टाचाराचे आगार, ग्रामीण नेत्यांची भरती असलेले, घराणेशाही, सरंजामशाही राबवणारे, शरद पवार या नावाभोवती फिरणारे राजकारण आणि अर्थकारण, या सर्व बाबींचा बारकाईने अभ्यास भारतीय जनता पक्षाच्या कुटीनीती तज्ञांनी केलेला दिसतो. त्यामुळे आक्रमणाची दिशा निश्चित करून मराठा जातीसमूहासह सर्व जाती धर्माच्या मतदारांसमोर शहरी असलेले, स्वच्छ प्रतिमा असलेले, काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसला सक्षम पर्याय असलेले, शरद पवारांपेक्षाही वरचढ ठरतील, अल्पसंख्यांक समुदायातील, कुठलीही थेट राजकीय पार्श्वभूमी नसलेले, नव्या भांडवलशाही व जागतिकीकरण यांची दिशा ओळखलेले व राजकारण व अर्थकारणात दीर्घकाळ नाव गाजवतील अशा देवेंद्र फडणवीस यांची पायाभरणी मोदी - शहा जोडीने केली. त्याला मागील पाच वर्षांत चांगले यश आलेले दिसून येत आहे.

शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार असे समीकरण महाराष्ट्र व देशात सर्वश्रुत झालेले आहे. मोदी - शहा यांचे एकेकाळचे गुरू द्रोणाचार्य असलेले शरद पवार हे काँग्रेसमुक्त भारत या संघ - भाजपच्या दिर्घलक्ष्यी धोरणातील अडथळा ठरतात.

एकट्या महाराष्ट्राचे भारताच्या वार्षिक आर्थिक उत्पन्नात 30 टक्के हुन अधिक योगदान आहे. दिल्लीत आजही महाराष्ट्रातील महत्वाचे नाव हे शरद पवार या नावाने सूरु होते. महाराष्ट्र पूर्ण ताब्यात घ्यायचा असेल, तर शरद पवार हे नाव पुसले गेले पाहिजे, ही रणनीती राबवण्यात येत आहे.

म्हणूनच 2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या शपथविधी समारंभात ठरवून शरद पवारांच्या आसनाबाबत संभ्रम निर्माण करण्यात आला. त्यानंतर पद्धतशीरपणे शरद पवारांना विविध ठिकाणी कॉर्नर करणे सुरू करण्यात आले आहे, याची उदाहरणे सांगता येतील.

शरद पवार यांच्या 50 वर्षांच्या राजकीय कारकिर्दीचा सोहळा सेलिब्रेट केल्यावर सत्ताधारी भाजपकडून शरद पवार पुन्हा टार्गेट करणे यात प्रचारापेक्षा असूया, महत्वाकांक्षा यांचा जास्त वास येतो.

सन 2014 च्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत सपाटून मार खाल्लेल्या शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसने पूर्वपुण्याई व मोदी - शहा यांना पक्ष विरहित मैत्रीत केलेलं सहकार्य यांची जाण ठेऊन मोदी - शहा यांनी पवार यांचे तोंडभरून कौतुक केले व वेळोवेळी ही मैत्री जाहीर केली. विधानसभा निवडणुकी नंतर स्वतःहून शरद पवारांनी भाजपला बिनशर्त पाठींबा देऊन हे नाते गहिरे केले. शरद पवार व राष्ट्रवादी काँग्रेसच्या क्रेडीबिलिटी वर तेंव्हापासून प्रश्नचिन्ह गडद होत गेले, त्यामुळे मतदार दुरावले आहेत, हे आजचे वास्तव आहे.

भलेही राजकारणात तडजोडी कराव्या लागत असतील, तरी मोदी - शहा - गडकरी यांच्याशी गुप्त बैठकीत काय वाटाघाटी घडल्या असतील, याची खबरबात या चौघांशिवाय इतरांना नाही. शरद पवारांनी दिल्लीत जाणे कमी करण्यामागे कोणती कारणे आहेत, याचा उहापोह होणे गरजेचे आहे. राज्यातील पक्ष संघटनेची ढासळलेली स्थिती मजबूत करणे ही जशी काळजीची बाब म्हणून पवार राज्यात तळ ठोकून आहेत, त्याहीपेक्षा त्यांना मोदी - शहा रचत असलेल्या प्रत्येक डाव - कटाचा अंदाज येत असावा, असे वाटण्याची शक्यता जास्त आहे.

त्यामुळे राज्यातील सन 2019 च्या निवडणुका जिंकणे अन्यथा सत्तेवाचून तडफडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाताहत पाहणे एवढेच शरद पवार व त्यांच्या टीमला समजले असावे.

त्यामुळे येनकेन प्रकारे लोकांमध्ये राहून मत बनवणे, लोकांना उपलब्ध राहणे व जनमत घडवण्यासाठी पवार साहेबांसह दिग्गज नेते प्रयत्न करत आहेत. पण मोदी - शहा व देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण बहुमतासाठी रणनीती आखून, आधीच ठरल्याप्रमाणे आपला कृती कार्यक्रम राबवणे सुरू ठेवलेले आहे.

सोलापूर येथील भारतीय जनता पक्षाच्या सभेत शरद पवार व राहुल गांधी यांच्यावर करण्यात आलेली टीका ही राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची केवळ सुरुवात आहे, असा माझा अंदाज आहे. आत्यंतिक देशभक्ती, धर्माचे, जातीसमूहाना मिळवून दिलेल्या लाभाचे चित्र उभे करणे व काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस कसे देशद्रोही, भ्रष्टाचार आणि सरंजामदार आहेत, हे पटवून देणे व ते कसे संपणे काळाची गरज आहे, हे जनमत घडवणे भारतीय जनता पक्षाचा मुख्य अजेंडा दिसतो.

शरद पवार हे 1990 नंतर जन्मलेल्या यंग वोटरला भ्रष्टाचारी, चंद्रावर जमीन घेऊ शकणारे जमीनदार, इ. स्वरूपाने ओळखीचे आहेत. हा वोटर शरद पवारांचा चाहता नाही, तर हेट करणारा क्राऊड बनवला गेला आहे. हा क्राऊड अत्यांतीक हिंदुत्ववादी व अत्यांतीक जातीयवादी बनवला गेला आहे. सत्ताधारी असताना पवार यांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्था, उद्योग, ऊसाचे राजकारण, ग्रामीण - शहरी डिव्हाईड, साखरेचे बाजार कोसळणे, क्रोनी कॅपिटलिस्ट इकॉनॉमिक मॉडेल्स, रिअल इस्टेटमध्ये असलेला दबदबा या बाबी नोटाबंदी नंतर संदर्भहीन होऊ लागल्या आहेत.

काँग्रेस - राष्ट्रवादीने आणलेल्या जागतिकीकरणाचे लाभार्थी असलेले महाराष्ट्रातील 54% जनमत भाजप व शहरी लाभांश वाढवण्यासाठी सेना - भाजपसोबत मानसिक, आर्थिक, धार्मिक व भावनिकदृष्ट्या जोडलेले आहे. हे नाते गुंठामंत्री विरोधात, गोल्डमॅन विरोधात, स्कॉर्पिओ मालकांविरोधात, झटपट पैसे मिळवून श्रीमंतीचा राजमार्ग सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सक्सेस फॉर्म्युल्या विरोधात जास्त गतीने गहिरे झालेले आहे.

शरद पवार यांचे जनतेतील प्रतिमाभंजन करणे, हे शरद पवार या व्यक्तीचा प्रतिकात्मक हत्या करण्यासारखे कुटील तंत्र आहे, हे मोदी - शहा व त्यांचे कुटणीतीतज्ज्ञ पुरेपूर जाणून आहेत. कारण याबाबत तेच तर सर्वात अनुभवी व कुशल आहेत.

त्यामुळे शरद पवारांच्या रूपाने विरोधी पक्षातील जुने मार्गदर्शक असलेले 'नवे लालकृष्ण अडवाणी' घडवणे, संपूर्ण सर्वंकष सत्ताप्राप्ती करणे व नव्या स्वातंत्र्याचा राजमार्ग महाराष्ट्रातून आखत पुढे तो आंध्र, तमिळनाडू, केरळच्या दिशेला नेणे हा विजयाचा राजसूय यज्ञ मोदी - शहा यांनी आखलेला दिसू लागला आहे.

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी व काँग्रेस बदलण्याची काडीमात्र चिन्हे नाहीत. त्यामुळे कोणे एकेकाळी पृथ्वीवर डायनोसॉर नावाचे अजस्त्र प्राणी राहत असत, ते आजच्या पालीसारखे होते, हे सांगतात. तसे काही सर्व्हायव्हल ऑफ दि फिटेस्ट च्या नियमानुसार काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे भवितव्य दिसू लागले आहे. हा विचार करताना व नोंदवताना चार्ल्स डार्विनचेही मनःपूर्वक आभार मानतो.

(ता. क. सन 2002 ते 2012 अशी दहा वर्षे गुजरातमध्ये अमित शहा व नरेंद्र मोदी यांच्यासोबत विश्वासू कार्यकर्ते म्हणून काम पाहिलेले महाराष्ट्राचे नेते आहेत, श्री. चंद्रकांतदादा पाटील.)

- हर्षल लोहकरे

Updated : 3 Sep 2019 5:17 AM GMT
Next Story
Share it
Top