Home > मॅक्स ब्लॉग्ज > पेसा चळवळीतील एक दुर्लक्षित संघर्षयोद्धा माधव गोटा !

पेसा चळवळीतील एक दुर्लक्षित संघर्षयोद्धा माधव गोटा !

पेसा चळवळीतील एक दुर्लक्षित संघर्षयोद्धा माधव गोटा !
X

माधव गोटा यांना एक दिवस सहज प्रश्न विचारला. जंगल आणि आदिवासी समाजाचे नाते काय आहे? ते म्हणाले आदीवासी आणि जंगलाचे नाते हे आई आणि मुलाचे आहे. जंगल हि आमची आई आहे. आई ज्याप्रमाणे मुलाचे पालनपोषन करते त्याप्रमाणे आंम्ही पालनपोषनासाठी याच जंगलावर अवलंबून आहोत. जंगल हि आमची संपत्ती नाही. तर ते आमच्या उपजिवीकेचे साधन आहे.

जल, जंगल, जमीन हे आदिवासींनी जतन केलेले आहे. त्यामुळे त्यावर आदिवासींचा हक्क असायला पाहिजे या हक्कासाठीच पेसा कायद्याची निर्मिती झाली. या पेसा कायद्याची निर्मितीमध्ये महत्वपूर्ण योगदान देणारे बी.डी. शर्मा यांचा सहवास गोटा यांना 1988 पासून लाभला. या संघर्षात ते पूर्णवेळ कार्यकर्ते होते.

संविधानाच्या 40 व्या अनुछेदावरुन पेसाची निर्मिती 1996 ला झाली. तोपर्यंत आदिवासी आपल्या हक्कापासून वंचितच राहिला. 1992 ते 93 ला भुरिया समितीचे गठन झाले त्यानंतर आदीवासींना त्यांच्या परंपरा पाळण्याचा हक्क देण्यात यावा ग्रामसभेला अधिकार द्यावेत वगैरे शिफारशी दिल्या.

यानंतर परंपरा या गोष्टींची माहिती देण्यासाठी जिल्ह्याजिल्ह्यात प्रशासनाने नेत्यांना बोलावून याबाबत सांगितले. गडचिरोलीत माधव गोटा उपस्थित होते. त्यांचे यातील परंपरा या मुद्द्यांवर तीव्र मतभेद झाले. परंपरा म्हणजे केवळ सांस्कृतिक कार्यक्रम नाचणे वाजवणे या गोष्टींचा उल्लेख केला होता. त्यांनी त्या प्रतिनिधीला सांगितले कि परंपरा म्हणजे आमचे जंगलावर आधारीत सामुहिक जीवन आहे. यातल्या वेगवेगळ्या परंपरा यात आल्या पाहीजेत. यावर चर्चा झाली.

त्यानंतर त्यांना दिल्लीतून वेगवेगळी पत्रे यायला लागली. त्या बैठकांना ते उपस्थित राहु लागले. तुकुम सारख्या छोट्या गावातून दिल्लीला जाण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसायचे. त्यांनी एक किस्सा सांगितला त्यांना दिल्लीला जायचे होते. जवळ एक रुपायाही नव्हता. एका जवळच्या मित्राने शंभर रुपयाची नोट दिली. जवळच्या सुट्ट्या पैशातून ते नागपूरला पोहचले. स्टेशनवर जाण्यासाठी शंभरची नोट काढली तर ती नंबरच्या ठिकाणी जळालेल्या अवस्थेत होती. ती नोट चालेना. नागपुरहून परत यायलाही पैसे नाहीत आणि पुढे जायलाही पैसे नाहीत. गाडीला वेळ होता. त्यांनी बर्डी गाठली. तिथे कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर गेले. त्यात त्यांनी जुने फाटलेले कपडे शोधून काढले. ते पिशवित ठेवून स्टेशनला आले. स्टेशनच्या कोपऱ्यात जाऊन अंगावरचे कपडे पिशवीत ठेवले आणि फाटके कपडे घातले. आणि जनरल डब्यात जागा असतानाही बाथरुमजवळ बसून प्रवास केला. तिथे उतरुन कपडे बदलून पुन्हा बैठकीला उपस्थित राहिले.

पेसा विधेयकाच्या विषयीचीही ते गंमत सांगतात, 20 डिसेंबर ला लोकसभेचे अधिवेशन होते. पी. ए. संगमा अध्यक्ष अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते. आदल्या दिवशी चहापानाच्या बैठकीत विरोधकांसह सत्तधारी बसणार होते. बी.डी.शर्मा यांच्यासोबत माधव गोटा या बैठकीला गेले होते. उद्या कोणती विधेयके आहेत यावर चर्चा झाली. पेसा विधेयक दुसऱ्या दिवशी मांडले जाणार होते. अटल बिहारींनी आदल्याच दिवशी या विधेयकावर सही केली. विरोधकांनीही तिथेच सह्या केल्या अशाप्रकारे आदल्या दिवशीच हे विधेयक बिनविरोध संमत झाले.

आज माधव गोटा थकलेले आहेत. त्यांनी केलेले काम पुढच्या पिढीला माहीत असणे गरजेचे आहे. आजही पेसा कायद्याचे नियम बनलेले नाहीत हि चिंता त्यांना सतावते. इतक्या संघर्षातून मिळालेले हक्क त्यांचा फायदा लोकांच्या अज्ञानामुळे भांडवलदार ठेकेदार घेत असल्याचे दु:ख त्यांना होते. गोंडी भाषेच्या संवर्धनासाठी गोटा जी गोंडी मराठी डिक्शनरी व्याकरणासह लिहीत आहेत. आजपर्यंतचा संघर्ष त्यांना आत्मकथनात शब्दबध्द करायचा आहे. पण पुस्तक काढने हे अर्थिकदृष्ट्या त्यांना परवडनारे नाही. त्यासाठी ते प्रकाशकांच्या शोधात आहेत.

माधव गोटा आज थकलेले दिसत आहेत. त्यांच्या जीवनसाथीने देखील त्यांना आयुष्यभर साथ दिली. ब्राझीलच्या मैत्रीणीबाबत सांगताना आजही दोघांच्या चेहऱ्यावर खट्याळ हास्य उमटते. जुनी पत्रे दस्तावेज आणि चेहऱ्यावर पडलेली जुनी जाणती वर्तुळे हे त्यांचा संघर्ष सांगतात. हि माणसे जिवंत आहेत तोपर्यंत त्यांचा संघर्ष शब्दबध्द झाला पाहिजे. कारण यांनी केवळ संघर्ष न करता पर्याय दिले. केवळ घोषणा न देता व्यवस्था उभी केली. लढ्यानंतर काय याची उत्तरे पुस्तकातल्या तत्वज्ञांनावरुन नव्हे तर जमिनीवरच्या जिवंत माणसांच्या अनुभवावरुन दिली. त्याची व्यवस्था म्हणून आज पेसा कायदा आहे.

Updated : 14 May 2020 9:12 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top