Top
Home > मॅक्स ब्लॉग्ज > शरणागती की संघर्ष..?

शरणागती की संघर्ष..?

शरणागती की संघर्ष..?
X

ठाकरे कुटुंबियांना सत्तेचा निर्भेळ आनंद लाभत नाही, असंच म्हणावं लागेल. १९९५ साली शिवसेना-भाजप युतीची सत्ता आली. मनोहर जोशी मुख्यमंत्री झाले तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याकडं होता. युतीच्या संपूर्ण सत्तेवर बाळासाहेबांचं नियंत्रण होतं. बाळासाहेबांनी बस म्हटलं की बसायचं आणि ऊठ म्हटलं की उठायचं अशी सगळ्यांचीच स्थिती होती.

सत्ता मिळाल्यानंतर वर्षभराच्या कालावधीनंतर रमेश किनी मृत्यू प्रकरण घडलं आणि राज ठाकरे यांच्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण झालं. विद्यार्थी सेनेचे नेतृत्व करणारे राज ठाकरे त्यावेळी राजकारणात सक्रीय असलेले बाळासाहेबांच्यानंतरचे ठाकरे कुटुंबातले एकमेव सक्रीय सदस्य होते. त्यावेळी राज ठाकरे यांचं वय होतं २८ वर्षे.

युतीची सत्ता गेल्यानंतर मध्ये एकवीस वर्षे निघून गेली आहेत.

२०१९ साली महाराष्ट्रात सत्तांत होऊन उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तेवर आलं. सत्ता आल्यानंतर आठव्या महिन्यात ठाकरे कुटुंबावरील संकटाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येच्या निमित्ताने राज्याचे पर्यटनमंत्री असलेले आदित्य ठाकरे यांच्याभोवती संशयाचं वातावरण निर्माण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आदित्य ठाकरे यांचं वय आहे ३० वर्षे.

सत्तेसोबत स्वास्थ्य बिघडवणा-या संकटाची पुनरावृत्ती होताना दिसतेय. आणि हे होताना काही योगायोगही जुळून येताहेत.

हे ही वाचा...

BSNL चे टॉवर JIO कडे भाड्याने, भाडं कोण खातंय?

काम बंद, मंदीर सुरू…

आमच्या देशात रॉकस्टार का निर्माण होत नाहीत?

रामापेक्षा मोदी मोठे, भाजप खासदाराच्या ट्विटने नवा वाद

रमेश किनी प्रकरणाच्यावेळी वृत्तवाहिन्यांचा कोलाहल नव्हता. मुंबईतील प्रमुख वृत्तपत्रांतून तपशीलवार वृत्तांकन होत होते. रमेश किनी यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांची पत्नी शीला किनी यांनी केलेले आरोप, या प्रकरणाशी संबंधित लक्ष्मीकांत शहा आणि सुमन शहा यांच्याशी असलेले राज ठाकरे यांचे संबंध अशा काही थेट बाबी तरी होत्या.

राजकीय आघाडीवर छगन भुजबळ, सामाजिक आघाडीवर पुष्पाताई भावे यांनी रान उठवले होते. सत्तेतल्या सर्वोच्च कुटुंबातल्या व्यक्तिकडून एका सामान्य माणसावर झालेला अन्याय असे स्वरुप त्या प्रकरणाला प्राप्त झाले होते. त्यामुळे समाजाची व्यापक सहानुभूती रमेश किनी यांच्याबाजूला होती. यथावकाश या प्रकरणातून राज ठाकरे यांची निर्दोष मुक्तता झाली.

आताचे प्रकरण थोडे वेगळे आहे. गेले चार-पाच दिवस आदित्य ठाकरे यांच्याकडे संशयाची सुई जाईल आणि त्यांच्याभोवती संशयाचे धुके निर्माण होईल. अशा रितीने भाजपच्या नेत्यांकडून विधाने करण्यात येत होती. एकीकडे हे सुरू असताना दुसरीकडे हिंदी भाषिकांच्या काही ग्रूपवर आदित्य ठाकरे यांचा थेट नामोल्लेख असलेल्या पोस्ट फिरत होत्या.

सुशांतसिंह राजपूतची आधीची मॅनेजर दिशा सालियन हिची आत्महत्या, त्या आत्महत्येशी संबंधित असलेली कथित पार्टी आणि त्या पार्टीला आदित्य ठाकरे यांची कथित उपस्थिती अशी बॉलीवूड सिनेमाच्या थोबाडीत मारणारी स्टोरी तयार करून ती फिरवण्यात येत होती. सुशांत सिंहच्या आत्महत्येला बॉलीवूडची घराणेशाही कारणीभूत असल्याची गेल्या महिनाभातली चर्चा एकाएकी गायब झाली. त्याला निमित्त ठरले होते, सुशांत सिंहच्या वडिलांनी सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीविरोधात बिहारमध्ये दिलेली फिर्याद.

सुशांतसिंहचे प्रकरण बॉलीवूडशी संबंधित असल्यामुळे एखाद्या सिनेमाप्रमाणे त्यात अनेक ट्विस्ट येत गेले, हे खरे आहे. परंतु प्रकरणाला आता जे वळण मिळाले आहे. ते पूर्णपणे राजकीय स्वरूपाचे आहे. दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूपासून आतापर्यंत ज्या अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्यावरून घातपात किंवा हत्या अशा प्रकारचे कोणतेही तथ्य समोर आलेले नाही.

सुशांत सिंहचे मानसोपचार तज्ज्ञ, त्यांचे चार्टर्ड अकौंटंट यांच्याही मुलाखती आल्या असून त्यातूनही काही संशयास्पद धागेदोरे किंवा रिया चक्रवर्तीविरोधातील आरोपांना पुष्टी मिळत नाही. सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीवर जे आर्थिक स्वरुपाचे आरोप केले आहेत. त्यातही तथ्य नसल्याचे सुशांतच्या सीएने स्पष्ट केले आहे.

असे सगळे असताना सुशांतचे वडिल बिहारमध्ये तक्रार देतात आणि एकाएकी बिहार पोलिस सक्रीय होतात. मुंबईत घडलेल्या घटनेचा तपास स्वतःच सुरू करतात. मुंबईत घडलेल्या घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्याची शिफारस बिहारचे मुख्यमंत्री नीतिशकुमार करतात. हे सगळे एका सुनियोजित षड्यंत्रानुसार सुरू असल्याचे दिसते. ते केवळ बिहारच्या राजकारणापुरते मर्यादित नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणात उलथापालथ घडवण्याचाही उद्देश त्यामागे दिसून येतो.

चारपाच दिवस धुरळा उडूनही आदित्य ठाकरे यांच्यापर्यंत थेट कुणी पोहोचत नव्हते. त्यामुळे भाजपला शेवटी नारायण राणे यांना मैदानात उतरवावे लागलेले दिसते. राणे यांच्यासाठी यासारखी संधी दुसरी कुठली असू शकत नव्हती. राणे यांच्या पत्रकार परिषदेनंतर आदित्य ठाकरे यांना यासंदर्भाने निवेदन प्रसिद्धीस द्यावे लागले. शिवसेनेकडून परिवहनमंत्री अनिल परब यांना खुलाशासाठी पुढे यावे लागले.

किनी प्रकरणात भुजबळ यांनी बाजू लढवली होती, सुशांत सिंहच्या प्रकरणात नारायण राणे मैदानात उतरले आहेत. चोवीस वर्षांपूर्वी ठाकरे कुटुंबीयांना संशयाच्या भोव-यात खेचण्यात भुजबळ कमालीचे यशस्वी झाले होते. आज आदित्य ठाकरे यांच्याबाबतीत तसे यश राणे यांना मिळण्याची शक्यता कमी आहे. त्यासाठी आवश्यक असलेल्या विश्वासार्हतेचा अभाव राणे यांच्याकडे आहे. अशा प्रकरणात काही आरोप केले म्हणून कुणीही विश्वास ठेवावा. असा आदित्य ठाकरे यांचा भूतकाळही नाही आणि त्यांची प्रतिमाही तशी नाही.

तरीसुद्धा आदित्य ठाकरे यांच्यासाठी काळजी करण्याजोगती एक बाब आहे. राज ठाकरे यांच्या पथ्यावर पडलेली महत्त्वाची गोष्ट होती. ती म्हणजे त्यावेळची केंद्रातील सत्ता. त्या काळात एच. डी. देवेगौडा, इंद्रकुमार गुजराल हे जनता दलाचे नेते असलेले दोन पंतप्रधान झाले. दोन्ही वेळेला कम्युनिस्ट पक्षाचे इंद्रजित गुप्त हे गृहमंत्री होते. इंद्रजित गुप्त डाव्या पक्षाचे असल्यामुळे शिवसेनेचे कट्टर विरोधक असले तरी खुनशी आणि पाताळयंत्री नव्हते. आपल्या राजकीय हेतूसाठी यंत्रणांचा गैरवापर करणा-यांपैकी नव्हते. राजकीय विरोधकाला शत्रू मानून संपवण्याची राजकीय संस्कृती भारतीय राजकारणात तेव्हा रुळली नव्हती.

आज केंद्रातील परिस्थिती वेगळी आहे. सीबीआय हा नुसता पोपट नाही. तर चावीचे खेळणे बनले आहे. त्यांनी तपास घ्यायचा का? घेतला तर काय तपास करायचा आणि तो कुठपर्यंत न्यायचा याचे डिक्टेशन त्यांना थेट गृहमंत्र्यांकडून दिले जाईल. कुठल्या मुद्यावर तडजोड करायची, कोणता सौदा करून प्रकरणावर पडदा टाकायचा हेही ठरवले जाईल. काही वर्षांपूर्वीपर्यंत राजकीय नेत्यांना, यंत्रणांना किमान न्यायालयांचे भय होते. आता राजकीय प्रकरणांमध्ये न्यायालयेही सरकारच्या मर्जीविरुद्ध जात नाहीत.

केंद्रातल्या सत्तेपुढे शरणागती पत्करून तडजोडीसाठी तयार व्हायचे. की संघर्षास सिद्ध होऊन अग्निपरीक्षा द्यायची हे ठाकरे कुटुंबीयांना ठरवावे लागेल.

विजय चोरमारे यांच्या फेसबूक वॉलवरुन साभार...

Updated : 5 Aug 2020 12:32 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top