Home > मॅक्स ब्लॉग्ज > सुरमा भोपालीच्याही पलिकडला जगदीप!

सुरमा भोपालीच्याही पलिकडला जगदीप!

सुरमा भोपालीच्याही पलिकडला जगदीप!
X

बिमल राॅय, मेहबूब खान, गुरूदत्त, व्ही शांताराम हे खरे भारताचे लीडर! ते सिनेमाचा लोकांवरचा प्रभाव जाणून होते. त्या काळात लोक सिनेमा पाहायचे, सिनेमा ऐकायचे आणि सिनेमा बोलायचे ! सिनेमातून सामाजिक विषय मांडून देशातल्या राजकारण्यांवर दबाव निर्माण करण्याचं काम व्हायचं असा तो काळ होता. जिन्हें नाज है, हिंदपर वो कहां है...असं सिनेमातून थेट देशाला विचारणारा तो काळ होता...

जुन्या काळातल्या आपल्या आठवणी सांगताना सैय्यद इश्तियाक अहमद जाफरी मनातल्या भावना अशा मांडतात. भावूक होतात. पडद्यावर लोकांना हसवणारा हाच का तो विनोदी कलावंत, असा प्रश्न आपल्या मनाला पडतो आणि विनोदी कलावंताबद्दलची आपल्या मनातली चौकटीतली प्रतिमा गळून पडते.

जाफरी म्हटलं की आपल्याला आठवतात, सईद जाफरी, नावेद जाफरी, जावेद जाफरी ! त्यातल्या जावेद-नावेदचे वडील सैय्यद इश्तियाक अहमद जाफरी म्हणजेच अभिनेता जगदीप! फाळणीत उद्ध्वस्त झालेल्या कुटुंबाचं दु:ख उरात बाळगत असताना अख्खं आयुष्य लोकांना हसवण्यात घालवलेला अभिनेता जगदीप ! अगदीच सोपं करून सांगायचं तर शोलेतला सुरमा भोपाली !

आपल्याकडे एखाद्याला डोक्यावर घेताना त्याच्याच एखाद्या प्रतिमेचा शिक्का मारून त्याच प्रतिमेच्या चौकटीत एखाद्याची प्रतिभा बंदिस्त करणारी अजब रसिकता आहे. नकलाकारांनी अनेकांचं अनुकरण करताना एकच संवाद बोलून बोलून तो संवाद आणि ते पात्र इतकंच त्या कलावंतांचं अभिनयविश्व होतं की काय, असं चित्र निर्माण केलंय.

जगदीपचा आवाज एखाद्याने कितीही हुबेहूब काढला तरी सुरमा भोपाली आणि खंबा उखाडके कानावर पडल्याशिवाय तो आवाज रसिकांना जगदीपचा वाटत नाही, इतका सुरमा भोपाली आपल्या मानगुटीवर बसलेला आहे. अगदी जगदीपही त्याच्या जादूतून बाहेर पडू शकला नाही ! जगदीपचं निर्मिती-दिग्दर्शन असलेला एकमेव चित्रपट होता सुरमा भोपाली ! कुठेतरी अस्तित्वात असलेल्या सलिमजावेदने उसना घेतलेल्या सिनेमातील पात्राला सुरमा भोपालीला जगदीपने अजरामर केला खरा, पण जगदीप झाकोळला गेला.

हाताखाली तीन-चार घरकामगार सांभाळणाऱ्या जगदीपच्या आईवर परिस्थितीने मोलमजूरी करायची पाळी आणली होती, ते दिवस जगदीपच्या मनात अखेरपर्यंत घर करून होते. फाळणी आणि हिंदू-मुस्लिम द्वेषाने बेचिराख झालेला संसार तसाच मागे ठेवून ती माऊली मुलांना घेऊन मुंबईला आली होती. वडील काही दिवसांतच गेले होते.

धर्माने बुरख्यात बंदिस्त केलेल्या त्या स्वाभिमानी माऊलीने जगदीपला शिकवलं होतं,

वो मंजिलही क्या जो आसान हो, वो राह ही क्या, जो थककर रूक जाये!

अनाथालयात राहिली, मजूरी केली, पत्र्याचं काम, पतंग बनवण्याचं काम, पडेल ते काम तीने केलं. मुलांनी शिकावं म्हणून ! पण अनाथालयातील मुलं काम करून शिकायची ते पाहून जगदीपनेही ठरवलं की आईसोबत आपणही दोन पैसे मिळवायचे. खेळण्याबागडण्याचं चिमुकलं वय होतं ते !

एक दिवस अचानक समोर उभा ठाकलेल्या कलावंत पुरवठादारांपैकी एकाने त्याला सिनेमात काम करशील का म्हणून विचारलं आणि तिथून सैय्यद जाफरीतील जगदीपचा प्रवास सुरू झाला. शाळेच्या स्नेहमेळाव्याच्या प्रसंगात तो गर्दीत उभा राहिला आणि उर्दू बोलण्याच्या गरजेतून दखलपात्र झाला. यश चोप्रांचा अफसाना चित्रपट होता तो. तीन रूपये बिदागी मिळेल या आशेने जगदीपने ते काम केलं होतं.

पुढे फणी मजुमदार दिग्दर्शित धोबी डॉक्टरमध्ये त्याने युवा किशोरकुमार निभावला. इथे जगदीप बिमल राॅय यांच्या नजरेत भरला आणि दो बिघा जमीनमध्ये दिसला. धोबीडाॅक्टरमध्ये रडणारा जगदीप दो बिघामध्ये बूटपाॅलिशवाल्या मुलाच्या विनोदी भूमिकेत आला. नुसतंच बूटपाॅलिश करण्याऐवजी तिथे गिऱ्हाईकाला गाण्यात बोलावण्याची सूचना बिमल रॉयना करण्याचं धाडस छोट्या जगदीपने केलं आणि त्यांनी ते मान्यही केलं.

आपल्याला पडद्यावर छोटा जगदीप मस्ती करताना दिसतो, कलकत्ता में आयके, बूटपाॅलिश करायके, चले नहीं जाना, वो बाबूजी चले नहीं जाना! ही जगदीपची स्वत:कडची भर होती आणि तो त्याच्या सिनेकारकिर्दीचा सुरुवातीचा काळ होता.

रफी साहेबांनी जगदीपसाठी लहान वयात हम पंछी इक डालके गायलं, किशोरावस्थेत चली चली रे पतंग मेरी चली रे गायलं आणि युवावस्थेत पास बैठो तबीयत बहल जायेगी गायलं. अशी कितीतरी गाणी जगदीपने पडद्यावर रंगवली. साठ वर्षाच्या कारकिर्दीत चारशे सिनेमांत जगदीपने अनेक महत्त्वाच्या भूमिका निभावल्यात. त्याने कोणाची नक्कल केली नाही.

मेहमूद, जाॅनी वाॅकर या नामावलीतील तो एक स्वतंत्र शैली असलेला कलावंत होता. जगदीपने प्रत्येक मुलाखतीत आपल्या यशाचं श्रेय दोघांनाच दिलं. एक उपरवाला आणि दुसरी त्याची आई! त्याला ढसाढसा रडताना लोकांनी पाहिलं, आईच्या मयतावरच!

आयुष्यात खाल्लेल्या खस्तांची जाणीव जगदीपला होती. तो नेहमी जमीनीवरच होता. आयफाने गेल्या वर्षी त्याला सिनेश्रेत्रातील योगदानासाठी पुरस्कृत केलं होतं. कोणी एखादा संदेश द्या म्हटलं की जगदीप म्हणायचा, दुनियांमें आदमी तो बहोत सारे होते, इन्सान कम. हमें इन्सान बनना चाहिये!

Updated : 9 July 2020 12:47 PM GMT
Next Story
Share it
Top