कोरोनात होमिओपथीच्या औषधांचा उपयोग आहे का?

देशाता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर आयुष मंत्रालयाने होमिओपथीमधील ‘आर्सेनिकम अल्बम 30’ हे औषध कोरोनाचा प्रतिबंधक उपाय म्हणून घेता येईल असा सल्ला दिला होता. या सल्ल्यानंतर होमिओपथीमध्ये कोरोनावर उपाय आहेत अशी चर्चा सुरू झाली. पण वास्तवात हे खरे नाही, कसे ते थोडक्यात बघूया…

होमिओपथी ही उपचार पद्धती काय आहे?

ही एक पूरक किंवा वैकल्पिक चिकित्सा पध्दती आहे. १७९० साली साधारण दोनशे वर्षांपूर्वी जर्मनीतील डॉ. सॅम्युअल हॅनिमन नावाच्या डॉक्टरने असा सिद्धांत मांडला की जसे विषाने विष मारता येते किंवा काट्याने काटा काढता येतो, तसे विशिष्ट लक्षणांना कारणीभूत पदार्थदेखील ती लक्षणे दूर करण्यास मदत करु शकतो. दुसरी बाब म्हणजे हे औषध ग्लुकोज किंवा पाण्यात टाकून जिकते जास्तीत जास्त पातळ करण्यात येईल तितकी त्याची गुणवत्ता वाढत जाईल. शेवटी अशी एक वेळ येते की त्या औषधात मूळ औषधाचा एखादाच कण शिल्लक राहतो किंवा एकही कण शिल्लक राहत नाही.

असे औषध नक्की काम करते काय? होमिओपथी खरोखर उपयोगी आहे का?

आज जगभरात असे सिद्ध झाले आहे की होमिओपथीच्या गोळ्या किंवा सिरपमध्ये कोणतेही औषध नगण्य किंवा अजिबात नसल्यामुळे होमिओपाथीच्या प्लासिबोच्या परिणामापेक्षा कोणत्याही आजारावर जास्त परिणाम होत नाही. प्लासिबो म्हणजे असे एक औषध ज्यात औषधाचा कोणताही भाग नसतो. पण दिसायला त्याचे रंगरुप मूळ औषधाच्या गोळी, सायरप किंवा इंजेक्शनसारखेच असते. परंतु केवळ त्या व्यक्तीला औषधोपचार आहे असे समजून घेण्यास भाग पाडले जाते. अनेक मनोकायिक किंवा आपोआप बरे होणार आजार प्लासिबोने बरे होऊ शकतात.

जगभरात होमिओपथीच्या वापरावर कडक टीका प्रख्यात वैज्ञानिकांची मते आणि त्यांनी केलेल्या अभ्यासांचा मजकूर खाली दिला आहे.

• सायन्स – ९ फेब्रुवारी २०१८, बहुतेक वैज्ञानिक संस्था, होमिओपथीला पाठिंबा देण्यासाठी कोणताही कठोर, विश्वासास पात्र वैज्ञानिक अभ्यास अस्तित्वात नसल्याचे म्हणतात. समालोचक म्हणतात की होमिओपथीक उपायांमध्ये कोणतेही सक्रीय रेणू नसतात.

• लॅन्सेट – ब्रिटीश जर्नल : होमिओपथीचे क्लिनिकल इफेक्ट हे प्लेसेबोचे परिणाम आहेत. होमिओपथीच्या निरनिराळ्या १८०० प्रकरणांच्या अभ्यासानंतर शास्त्रज्ञ असे जारही करतात की, होमिओपथी अजिबात उपयोगाची नाही.

• इंग्लंडमधील हाऊस ऑफ कॉमन्सच्या सायन्स अँड टेक्नॉलाजीच्या कमिटीचा २०१० सालचा रिपोर्ट- होमिओपथीचे उपाय प्लासिबो (डमी ट्रिटमेंट) पेक्षा चांगले काम करत नाहीत.

• जगातील ऑस्ट्रेलिया, युनायटेड किंगडम, स्वित्झर्लंड, फ्रान्स, रशिया या सर्व देशात केलेल्या अभ्यासानुसार होमिओपथीच्या मुल्यांकनानंतर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संस्थांनी होमिओपथी निरुपयोगी असल्याचे मत व्यक्त केले आहे.

• अमेरिकेतील कायदा – होमिओपथीच्या बाटल्यांवर “हे औषध (रोगांवर) बिनकामाचे आहे,” असे लेबल लावणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. त्याचबरोबर ‘हे औषध उपयोगी आहे’ असे कायदेशीर दाव्यात मांडायचे असेल तर या गोष्टींच्या सिद्धतेकरीता उत्पादकांना त्याबाबत शास्त्रीय पुरावा उपलब्ध करुन द्यावा लागेल, अन्यथा त्यांचा दावा मान्य केला जाणार नाही.

• इंग्लंडमध्ये प्रचलित असलेल्या NHS (National Health scheme)मध्ये होमिओपथीची औषधी(पूर्वीसारखी सवलतीच्या दरात) उपलब्ध होणार नाहीत, असे सांगण्यात आले आहे, कारण होमिओपथीच्या वापरास समर्थन देण्याचे कोणतेही स्पष्ट किंवा ठोस पुरावे सापडलेले नाहीत असे त्यांचे म्हणणे आहे.

होमिओपथीला आव्हान, १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे बक्षीस

अमेरिकेतील प्रख्यात जादूगार आणि शंकेखोर व्यक्ती जेम्स रँडी यांच्या ‘जेम्स रँडी एज्युकेशनल ट्रस्टतर्फे’ कोणत्याही व्यक्तीने होमिओपथी हे शास्त्र असून ते निरनिराळ्या रोगांवर उपयोगी आहे, असे शास्त्रीय निकषांवर सिद्ध केल्यास त्या व्यक्तीला १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा साडेसात कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. भारतातील नव्हे तर जगातील कोणत्याही व्यक्तीने होमिओपथी हे कोरोनावरच नाही तर इतर कोणत्याही आजारावर काम करते हे सिद्ध करावे आणि हे बक्षीस मिळवून दाखवावे.

होमिओपथीबद्दल वर लिहिलेले सत्य आपल्या भारताच्या आयुष मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांना माहित नाही का?
भारतात व्यवसाय करणाऱ्या होमिओपथी डॉक्टरांच्या समस्या होमिओपथीबद्दल वर सांगितलेली परिस्थिती असेल तर त्याची प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांबद्दल काय? हे एक सत्य आहे की, आजच्या परिस्थितीत भारतात अनेक पदवीधर होमिओपॅथिक डॉक्टर (आणि आयुर्वेदिक, युनानी डॉक्टर) रुग्णांसाठी एलोपथीची औषधे वापरत आहेत.

होमिओपॅथीची औषधं कोणत्याही रोगासाठी काम करत नाहीत ही वस्तुस्थिती संपूर्ण जगाने मान्य केली आहे. म्हणूनच कदाचित भारत सरकारने होमिओपॅथीच्या डॉक्टरांना एलोपथी मेडिसीन आणि फार्माकॉलॉजी शिकवण्यासाठी नुकताच एक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू केला आहे, त्याचे नाव आहे ‘CCMP’ (Certificate course in Modern Pharmacology ). जेणे करुन या प्रमाणपत्रानंतर ते आपल्या रुग्णांना एलोपथीची औषधं लिहून देऊ शकतील.
होमिओपॅथीच्या जगभरातील सत्य परिस्थितीचे अवलोकन केल्यास आता भारत सरकारने आणखी एका मुद्द्याचा विचार कऱणे महत्त्वाचे आहे.

भारतातील सर्व होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजेस बंद करुन अशा विद्यार्थ्यांना फिजीओलॉजी, पॅथॉलॉजी, सर्जरी, गायनॉकॉलॉजी मेडिसन (मॉडर्न) या बरोबर होमिओपॅथी न शिकवता CCMP सारख्या कोर्समध्ये शिकवला जाणारा Modern pharmacology हा विषय शिकवावा.

या नवीन कोर्सला काहीतरी नवीन नाव द्यावे लागेल कारण आता त्याला होमिओपॅथिक कॉलेज आणि Bachaler of Homeopathic Medicine (BHMS) म्हणता येणार नाही. कदाचित बॅचलर किंवा डीप्लोमा ऑफ कम्युनिटी मेडिसीन किंवा अशाप्रकारचे संयुक्तिक नाव द्यावे लागेल. अर्थात त्याला IMA(Indian Medical Association)चा फार मोठा विरोध असेल, तो दूर करावा लागेल.

भारत सरकार या सर्व गोष्टींचा विचार करेल त्याचबरोबर कोरोनावर होमिओपॅथीक औषध सुचवू नये अशी नम्र विनंती. लेखक डॉ. रवींद्रनाथ टोणगावकर हे Association of Rural Surgeons of India and International Federation of Rural Surgery या संघटनांचे माजी अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर ते अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या उत्तर महाराष्ट्र विभागाचेही माजी अध्यक्ष आहेत.