कोव्हिड-१९ आणि नर्सिंगची आव्हानं

Courtesy: Social Media

कोव्हिड-१९ ने जगभरात रौद्र रूप धारण केलं आहे. दिवसेंदिवस कोरोना व्हायरस गंभीर समस्या बनत चालली आहे. कोव्हिड-१९ ने जगाच्या नकाशावरील सर्वच देशांच्या आरोग्य व्यवस्थेसमोर एक मोठं आव्हान उभं केलं आहे. आपण एका न दिसणाऱ्या शत्रूशी लढत आहोत. या शत्रूने लोकांचं आरोग्य आणि जीवनावर कल्पनाशक्तीच्या पलिकडे आघात केलाय. लोकांचं आरोग्य धोक्यात आणलयं.

या आपात्कालीन परिस्थितीत एक आरोग्य कर्मचारी म्हणून आपल्याला विचार, आत्मपरिक्षण आणि तात्काळ निर्णय घेण्यास भाग पाडलं आहे. एक नर्स म्हणून समाजाची सेवा हे आमचं कर्तव्य आहे. पण, सर्वात मोठं आव्हान आहे. कोरोनाग्रस्तांची काळजी आणि त्यांना कोरोनामुक्त करण्याचं.

जागतिक आरोग्य संघटनेतर्फे आमच्या कार्याचं कौतूक करण्यासाठी २०२० हे वर्ष ‘आंतरराष्ट्रीय नर्स आणि मिडवाईफ’ म्हणून साजरं करायचं ठरवलं आहे. नर्स, आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाचा स्तंभ आहे. मात्र, कोव्हिड-१९ मुळे आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पडलाय.

नर्सच्या समोरची आव्हानं

रुग्णालयं आणि क्लिनिकमध्ये अनुभव असलेल्या नर्सची कमतरता.

इन्फेक्शनपासून बचावासाठी लागणाऱ्या पीपीई आणि मास्कची अपूरी संख्या. काही संस्थांकडून पुरवण्यात येणारे कमी दर्जाचे पीपीई किट्स.

रहाणं आणि प्रवासाची योग्य व्यवस्था नाही.

आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी पर्याप्त क्वॉरेन्टाईन सुविधा नाहीत.

शारीरीक थकवा आणि प्रचंड मानसिक तणाव.

स्वत:ची, समाजाची आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह.

तणावात असताना योग्य काउंसिलिंग न होणं.

रुग्णालय प्रशासन, नर्सिंगचे प्रमुख यांच्यात नसलेला सुसंवाद. यामुळे निर्माण होणारा गोंधळ. ज्यामुळे निर्णय घेण्यासाठी वाया जाणारा वेळ

ड्यूटीवर असताना योग्य जेवण न मिळणं

कामगार संघटना, राजकारण्यांचा स्वत:च्या फायद्यासाठी असणारा हस्तक्षेप

खरंतर ही लिस्ट खूप मोठी आहे. पण, रुग्णालय प्रशासन आणि अनुभवी नर्सेसच्या मदतीने आम्ही ही परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला आहे.

आपात्कालीन परिस्थिती कशी हाताळायची यासाठी नर्सना योग्य ट्रेनिंग देणं गरजेचं आहे. जेणेकरून त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण होईल. डिजीटल युगात नर्सना कोव्हिड-१९ बाबत माहिती आणि ट्रेनिंग व्हेबिनारच्या माध्यमातून सोपं झालंय.

व्यवस्थापनाशी असणाऱ्या थेट संपर्कामुळे तात्काळ आणि सहजरित्या निर्णय घेणं शक्य झालं. कोव्हिड-१९ बाबतचे स्टॅन्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर आणि नवीन धोरणं नर्सना समजावून सांगण्यात आली आहेत. वरिष्ठांच्या डे-टू-डे मॉनिटरिंगमुळे नर्सिंग स्टाफचं मनोबल उंचावण्यास मदत झाली. त्याचसोबत गरज पडल्यास त्यांच्या मनातील आपण चुक केल्याची भावना (गिल्ट) काढण्यासाठी टेलिफोनवरून काउंसिलिंगही करण्यात आलं.

नर्सिंग स्टाफला आराम मिळावा अशा पद्धतीने ड्यूटी चार्ट बनवण्यात आला. अतिदक्षताविभाग, आयसोलेशन वॉर्ड, आणि ताप असलेल्या रुग्णांची काळजी घेणाऱ्या नर्सचा संशयित रुग्णांशी संपर्क येवू नये. यासाठी विशेष काळजी घेण्यात आली. ताप असलेल्या आणि संशयित म्हणून आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांची काळजी घेण्यासाठी नर्सना ट्रेनिंग देण्यात आलं. ज्या नर्सेस लांब राहतात त्यांच्यासाठी हॉस्टेल आणि जेवणाची सोय करण्यात आली. चार दिवस सलग काम केल्यानंतर त्यांना घरी जाण्याची परवानगी दिली जाते.

टाटा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या कॅन्सर रुग्णांसाठी लागणाऱ्या नर्ससाठी प्रवासाठी योग्य सेवा पुरवण्यात आली. उपचारादरम्यान ज्या नर्स संशयित रुग्णांच्या संपर्कात आल्या, त्यांचे रिपोर्ट येईपर्यंत त्यांना क्वॉरेंन्टाईन करण्यात आलं.

ज्या ठिकाणी गरज आहे, तिथे पीपीई किट्स देण्यात आले आहेत. त्यांचा योग्य पद्धतीने वापर करण्यात येत आहे. यासाठी लॉगबूक मेंटेन करण्यात येतं.

नर्सेसचं प्रतिनिधित्व या नात्याने आम्ही आमचे प्रश्न राज्य आणि केंद्र सरकारसमोर मांडले आहेत. नर्सेसच्या विम्यासाठी आम्हाला आश्वासन देण्यात आलं आहे. त्याचसोबत, सद्य स्थितीला आम्ही पीपीई किट्सचा पुरवठा योग्य पद्धतीने व्हावा यासाठी काम करतोय. नर्सेस आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक हेल्पलाईन सुरू करण्याचा आमचा विचार आहे. याबाबत मुंबई आणि राज्य सरकारच्या आपात्कालीन विभागासोबत चर्चा सुरू आहे.

आव्हान अजूनही संपलेलं नाही. कोव्हिड-१९ च्या युद्धामुळे आपल्याला नवीन शिकण्याची संधी मिळाली आहे. आम्ही हे युद्ध जिंकणार हे निश्चित.

प्रो. स्वप्ना जोशी, नर्सिग अधिक्षक, टाटा मेमोरिअल रुग्णालय

(हा लेख कॅन्सर, रिसर्च स्टॅटिस्टिक एंड ट्रीटमेंट जर्नलमध्ये छापण्यात आला आहे)