Home > मॅक्स ब्लॉग्ज > गावखेड्यातले भयान वास्तव !

गावखेड्यातले भयान वास्तव !

गावखेड्यातले भयान वास्तव !
X

सकाळी दिवस उगवायच्या आधीच गावात कुजबुज सुरू झाली. कोपरा गाठून माणसं हळू आवाजात काय तरी बोलू लागली. सकाळच्या धुरानं गावाला वेढून टाकावं तशी बघता बघता वार्या च्या वेगाने सा-या गावभर बातमी पसरली. बायका एकमेकींच्या दारावर जाऊन तोंडावर हात ठेवून म्हणू लागल्या, "हे काय बया नवं आक्रीत घडलं म्हणायचं! रांडेला पोरं सोडून जाव तरी कसं वाटलं पळून. सटवीला आधी पासनंच जायचं असल पण गरवार व्ह्यूती म्हणूनच थांबली असल. नवऱ्याला आता तान्ही लेकरं धरून गावात तोंड तरी दाखवू वाटल का? तिच्या वाक्याला धरून दुसरी एखादी बाई म्हणू लागली, त्या आबाला काय वाटत असल, आदी तरणी ताटी शिकलेली पोरगी पळाली अन आता सून पळाली. तर कुणी बापय म्हणू लागला, अरं रातीच मला गिरणीत दिसली व्हती. लई मोबाईल घिऊन मिरवत व्ह्यूती. पण बाय या चालीची निघल असं वाटलं नाय गड्या. तर कुणी म्हणू लागलं, आरं चालीचं म्हणशील तर बाय पहिल्यापासनचं लय बाराची हुती. काय त्यो नट्टा पट्टा अन तिचा ताल. पण अशी तरण्या ताट्या पोराचा हात धरून पळून जायचं डेरिंग करील असं नाय वाटलं गड्या. तर एखादा वयस्क म्हणू लागला, ह्यो टीव्ही न मोबाईल घात करतूया गड्या गावाचा. कितवी घटना म्हणायची ही गावातली. काय त्येला परमान हाय का नायच. सोन्यासारख्या खंडोजी आबाला चार माणसात गावात तोंड दाखवायची सुद्धा लाज राखली नाय बायनं. अजून कुणी काय काय म्हणू लागलेलं. सा-या गावभर हाच धूर पसरत चाललेला.

हळूहळू गावावर ऊन पसरु लागलं. घराघरातील गॅस अन चुली पेटू लागल्या पण खंडोजी आबाच्या घरात आज यातलं काहीच घडलं नाही. खंडोजीआबा काही नेता नव्हता. पुढारीही नव्हता किंवा गावाचा पंचही नव्हता. आपलं काम भलं आणि आपलं घर भलं या रीतीने अकाली गेलेल्या बायकोच्या मागे त्याचा एकाकी संसार चाललेला. जगण्याची धरपड चाललेली. आयुष्यभर ना कुणाच्या अध्यात ना मध्यात. ना कधी कुणाचं वाईट केलं ना कधी कुणा विषयीचा वाईट विचार डोक्यात आणला. त्याचा पोरगा संभाजी जास्त काही शिकला नाही पण शेतात राबून त्यानं एकुलती एक पोरगी मात्र शिकवली. तिला आईची उणीव कधी भासू दिली नाही. तिची आई आणि बाप अशा दोन्ही भूमिका त्यांनं पार पाडल्या. पुढं पोराचं लग्नही लावून दिलं. पण लग्न झालं की एकुलती एक पोरगी शेजारच्या गावातील एका तरुणाचा हात धरून पळून गेली. तिनं त्याच्याशी लग्न केलंय एवढंच त्याला समजलं. तिच्यासासाठी बाप मेला होता अन बापासाठी पोरगी मेली होती.

असंख्य विचारांची जळती राख डोक्यात घेऊन खंडोजी आबा घराच्या कोपऱ्यातल्या खाटेवर अजून पडून होता. नेमकं चुकलं तरी कुठं म्हणायचं? आपण पोरीला शिकवली ही आपली चूक म्हणायची की आपला भाबडा विश्वास? आपण सुनंला कधी शेत-शिवार दाखवलं नाही ही आपली दुसरी चूक म्हणायची की तिच्यावरील श्रद्धा? डोक्यात नुसता विचारांचा भुंगा घोंगावत होता. इतक्यात चार-दोन गावातली जाणती माणसं खंडोजी आबांच्या घरात शिरली आणि त्याच्या विचारांची तंद्री भंग पावली. कितीतरी वेळापासून शून्यात हरवलेला खंडूजी आबा खाटीवर उठुन बसला. आतल्या घरात शेजारची हौसा म्हातारी संभाजीला सोबत घेऊन त्याच्या तान्ह्या दोन जुळ्या मुलांना दुध पाजत बसलेली. कसं घडलं काय झालं याविषयीचा अधिक खुलासा न करता आता पुढं कसं करायचं? पोलिसात तक्रार द्यायची का? अशी माणसं आबासोबत चर्चा करू लागली. पण आता व्हायचं ते झालंय, ती काय आता परत येणार नाही. पोरं तिला देऊन तरी ती सांभाळील कशावरून? नाहीतर मग ती टाकूनच गेली नसती. आणखी बेअब्रू चव्हाट्यावर आणून काय फायदा? असं संभाजी आणि आबा म्हणाल्याने सगळ्यांची तोंडं बंद झाली. खंडूजी आबाला आणि संभाजीला आधार देऊन माणसं वाटेला लागली.

दिवसांमागून दिवस अन रात्री मागून रात्री सरत निघाल्या. नंतरच्या काळात गावात कुणीतरी पोरी पळवून आणल्या. गावच्या कुणीतरी पळवून नेल्या. काळानुसार गाव मागच्या घटना विसरून नव्या घटनावर चर्चा करू लागलेलं. पण खंडोजी आबाच्या घराला हि घटना विसरणे कधीच शक्य नव्हतं. त्यात घराला बाईमाणूस नसल्यानं दोन्ही जुळ्या मुलांचं जास्तच हाल होऊ लागलं. अवघ्या वर्षभराची पोरं. ओठातून आई शब्द निघायच्या आधीच आई निघून गेलेली. पुरुष माणसांच्या सावलीत वाढणार तरी कशी? शेजारची हौसा म्हातारी येऊन स्वयंपाक पाणी करीत होती. पोरांना आंघोळ पाणी घालत होती. दुखलं खुपलं बघत होती. त्यातच गोठ्यातली म्हैस आटली आणि पोरांची पोरं खपाटीला जाऊ लागली. उसनं पासनं करून आणलेल्या दुधावर पोरांची भूक भागेना झाली. अशातच खंडोजी आबाचा आणी त्यांच्या सावत्र भावांच्या जमिनीचा कोर्टाचा निकाल तीस वर्षांनी लागला. निकाल सावत्र भावांच्या बाजूने लागला. कायद्यानुसार अर्धी जमीन त्यांच्या वाट्याला गेली. खंडूजी आबाच्या वाटणीला आता शेतात दोन तुकडे उरलं. त्यात राबून संभाजीचं पोटपाणी भागेना झालं.

अशातच हौसा म्हातारी थकून गेली. तिला मोकळा पाय उचलेना झाला. तरीहि ती पाय खुडत पोर साभांळत होती. पण काळानुसार तिचीच सेवा करायची वेळ तिच्या लेका सुनावर आली. तिचं संभाजीच्या घरी येणे जाणे बंद झालं. तीन-चार वर्षांची लहान पोरं दिवसभर सोडायची कुणाकडे? आणि येथून पुढे त्यांना घेऊन जगायचं कसं? अनेक प्रश्न समोर उभे राहिले. आता काही झाले तरी संभाजीचे दुसरं लगीन करावं लागणार या एकाच प्रश्नाचा विचार खंडूजी आबा करू लागला. पण आपल्या बिजवर मुलाला मुलगी तरी देणार कोण? आणि दिली तरी दोन लहान मुलांना ती स्वीकारेल का? चांगल्या शिकल्या-सवरल्या नोकरदार पोरांची लग्न होत नाहीत तर आपल्या सारख्या शेतकरी कुटुंबातील अशा पोराला पोरगी द्यायला कुठला तरी बाप तयार होईल का? अनेक प्रश्नांची वर्तुळे खंडूजी आबाच्या डोक्यात चकरा घालू लागली.

कर्नाटक कडील काही एजंट लोक आजू बाजूच्या गावात अशा बिजवर मुलांची कमिशनवर लग्न जुळवून देत असल्याचं खंडूजी आबाला समजलं. आणि त्याने त्यांची वाट धरली. तालुक्याच्या ठिकाणी त्याला एक एजंट भेटला. त्याने आपण आजपर्यंत तालुक्यातील कित्येक जणांची लग्ने लावून दिल्याची सारी कुंडलीचं आबा समोर ठेवली. नाही होय करीत पन्नास हजारात मुलगी घरी माप ओलांडे पर्यंतचा सौदा ठरला. आठवड्या भरात एजंटने एक बेळगाव कडचं स्थळ आणलं खंडोजीआबा दोन जाणती माणसं आणि संभाजीला घेऊन मुलगी बघायला तिकडे गेला आणि यादी पे शादी करून नवी नवरी घेऊन घरी आला. मुलीच्या आणि सुनेच्या प्रकरणाने एके काळी जात कुळ बघून लग्न करणारा खंडूजी आबा आता जात कुळाचा प्रश्नच मोडून काढायला तयार झाला होता. जणू काळाचा महिमा. कित्येक वर्षांनी खंडूजी आबाच्या घराला बाई माणूस मिळालं होतं. सासूचे जपून ठेवलेले दागिने तिच्या अंगावर चढले. पोरांच्या अंगाला नवी कपडे मिळाली. संभाजीला वाटलं आपण आता पुन्हा संसारात उभारी घेऊ. दिवस रात्र राबू पण पोरांना मोठे करून दाखवू. पण त्याचा हा आनंद फार काळ टिकला नाही. दोन दिवस उलटले आणि तिसऱ्या दिवशी पहाटे नवी आलेली सून मेलेल्या सासूचे दागिने अंगावर घालून पसार झाली. गावात पुन्हा नव्याने तीच चर्चा. पुन्हा तीच कुजबुज. आणि वा-याच्या वेगाने तीच बातमी.

दिवस जात येत होते. संभाजी आणि आबा आता हि घटना विसरू लागले होते. मात्र पोरं चार वर्षांची मोठी झाली तरी अजून पोटाचं हाल सुरूच होतं. एक आजारी पडलं की त्याच्या वासानं दुसरं पण आजारी पडायचं. पावसाळयाचे दिवस सुरु झालेले. गावावर अखंड पावसाची धार कोसळत होती. अशातच दोन्ही पोरे थंडी तापानं फणफणु लागली. काही केल्या उतरायचं नावच घेत नव्हता ताप. खंडूजी आबाने गावात फेरफटका मारून दोन चारशे रुपये जमवून आणले. बाजाराचा दिवस गाठून संभाजी त्यांना एस.टीने तालुक्याला घेऊन आला. स्टँडवर उतरल्यावर पावसाची एक जोरदार चळक आली. पोरं भिजून जास्तच आजारी पडतील म्हणून तो निवा-याला स्टँड मध्ये शिरला. एका बाकड्यावर जागा मिळवून पोरांना त्यानं खाली बसविलं. सहज म्हणून त्याची नजर इकडे तिकडे वळवळू लागली आणि एका ठिकाणी ती जागेवरच थांबली. त्याच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. त्याची बहीण एका माणसासोबत पलीकडच्या बाकड्यावर बसलेली दिसली.

कदाचित तो तिचा नवरा असावा. क्षणभर तो पहातच राहिला. एका क्षणी त्याच्या मनात विचार येऊन गेला, झाले गेले विसरून तिच्या जवळ जावे, आपल्या सद्याच्या परिस्थितीची तिला कल्पना द्यावी. आपल्या मुलांचा सांभाळ करेल का ते हि तिला विचारून बघावे का? असाही विचार त्याच्या मनात येऊन गेला. पण तिने तोंड फिरवले आणि पुढच्याच क्षणी तो विचार कुठल्या कुठे निघून गेला. पाऊस थांबल्यावर तो पोरांना घेऊन दवाखान्यात गेला. नंबर आल्यावर डॉक्टरांनी दोन्ही पोरांना तपासलं. बरेच दिवस ताप अंगात मुरल्याचे आणि न थांबल्यास दोन दिवसांनी पोरांना ऍडमिटही करावे लागेल असे सांगितले. त्याने नुसती मान हलवली आणि बाहेर पडला. काही औषधे लिहून दिली. पोरांना घेऊन तो शेजारच्या मेडिकलमध्ये गेला. डॉक्टरने दिलेली चिट्ठी दाखवली. औषधे घेतली. पैसे दिले आणि मुख्य रस्त्याला लागला. बाजारचा दिवस असल्याने रस्त्यावर तुफान गर्दी होती. समोरच एक कृषी सेवा केंन्द्राचे दुकान दिसले. तिकडे बघून तो काहीवेळ रस्त्यातच थांबला. काहीतरी विचार करू लागला. क्षणात त्याचं अंग थरथर कापू लागलं. अखेर मनाचा ठिय्या केला आणि दुकानाकडे वळाला.

घरी येईपर्यंत चांगलाच अंधार पडला. पावसाळी अमावस्याची रात्र. पावसाने उघडीप दिली असली तरी काळाकुट्ट अंधार पडलेला. गावात कुत्र्यांचा नुसता कल्लोळ उठलेला. सारा गाव हळूहळू झोपत बुडू लागलेला. खंडोजीआबा सकाळची अर्धी कच्ची शिळी भाकरी खाऊन बाहेरच्या सोप्यात शांत झोपला होता. आत नातवांच्या पोटात कालवाकालव चालू होती. काही केल्या पोरांना झोपा येत नव्हत्या. बाजारातून आणलेले भडंग चिरमुरे संभाजीने पोरांना खाऊ घातले. संभाजीने दुपारी मेडिकलच्या समोर असलेल्या कृषी सेवा केंद्राच्या दुकानातून आणलेली किटकनाशकाची पिवळ्या रंगाची बाटली बाहेर काढली.

याच बाटलीने गावातले कितीतरी शेतकरी कायमचे शांत झालेले त्याने उघड्या डोळ्यांनी पहिले होते. त्याने बाटलीचा बूच ताकतीने फिरविला आणि एका ग्लास मधी अर्धी बाटली रिकामी केली. त्यात साखर कालवली. कसलं औषध हाय बाबा! पोरं बोलू लागली. तो शून्यात बघत म्हणाला, हे पिल्यावर झोप येईल तुम्हाला बाळांनो. गाढ झोप. पोरं परत पुढे म्हणाली, झोप आल्यावर मग काय होणार? तो पुन्हा त्यांच्या डोळ्यात पाहत म्हणाला, मग तुम्ही उंच उंच आकाशात भरारी घेणार? पुन्हा पोरं पुढं म्हणाली, तिथे आम्हाला कोण भेटणार मग? तिथे तुम्हाला एक परी भेटणार आणि ती तुम्हाला खूप खूप खाऊ देणार. पोट भरून. पुन्हा पोरं म्हणाली, मग तिथे आई भेटणार का आम्हाला? यावेळी त्यांने कोणतेही उत्तर दिलं नाही. यावेळी त्यांने कोणताही प्रतिसाद दिला नाही. यावेळी त्याने फक्त शेजारी ठेवलेली अर्धी बाटली तोंडाला लावली आणि क्षणात रिकामी केली. दुस-याच क्षणी थरथर कापणा-या हातातील भरलेला ग्लास पोरांच्या तोंडापुढं धरून तो मनातल्या मनात म्हणाला, मला माफ करा पोरांनो...

Updated : 21 Dec 2019 4:44 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top