II होबासकी II  

32

“अरे जय महारास्ट तीर्मख भाऊ !”

“ज्यय माहरास्ट बम्बयीत अन जय विदर्भ नागपुरात होबास राव !”

“ ऑ? हे असं कसं लेका? हे असं रिमिक्स त म्या पयल्यांदाच पायल (पाहिलं) सायाचं? ज्यय महाराष्ट?

“आता कालपर्यंत त तुमी ज्यय विदर्भ म्हणत होता बावा बेंबीच्या देठापासून ! अन आज हे काय नवं धतिंग (भानगड) सुरु केलं लेक ? “

“नवं धतिंग? अरे हैट! हे त माह्य जुनंच धतिंग आहे होबासराव!

हे धतिंग ढोलताशा सारखं कन्नावून वाजोलं की हायकमांडवाले कानात बोटच घालतात खपालकन !

अन मंग हे नौटंकी बंद कऱ्यांसाठी माह्याशी सौदा करतात! कि मंग मी कमाईचे एखांदं पद खिशात घालतो, अन तोंडानं जय माहारस्ट चा वग (जप) सुरु करतो!

आता मीच नाही तं माह्यासारखे आपल्या पट्ट्यातले आठदाहा झनतरी हाच फार्मुला वापरतात होबासराव !

पण पद भेटल्यावर मंग काय होते की माहे विरोधक मंग माह्याखीलाप काळ्या (काड्या) करतात.

अन ह्या काळ्या सक्सेसल्या की मंग माह्य पद जाते !

की मंग नव्या पदासाठी मले आणखीन एकडाव जुन्या धातींगाचा  मुर्दा उकरून काढा लागते ! आतातरी धसलं (घुसलं) का नाई काही डोकश्यात ? “

“धसालना! धसलं धसलं ! सयनय (सगळं) धसलं !

बाकी पदं मिळवाचा हा शोर्टकट बंबाट आहे तुमचा ! नाईतं काही येडे कार्यकर्ते वर्षानुवर्ष सतरंज्याच उचलत रायतात नुस्त्या! तुमच्या जाहीर सभा करण्यातच जिंदगी जाते त्यायची ! ज्यवानी (जवानी ) खापी घालून म्हातारे होतात पण अश्या सामान्य कार्यकर्त्याइले अखीरलोग (आखरी पर्यंत ) पद भेटतच नाई!

बाकी तुमाले मानलं बावा ! म्हंजे पद भेटलं त ज्यय माहारास्ट अन पद काढून घेतलं घेतलं की ज्यय विदर्भ ! व्वा व्वा ! क्या बात है !

“मंगSSS यालेच पालिटिक्स म्हणतात होबासराव! स्वतंत्र विदर्भाची यव्हरग्रीन रेकार्ड रिमिक्स करून वोजोली दे दनादन की हायकमांड लोटांगनच घालतेनाहो मायासाम्ने !

हे याले काय म्हंतेत मालूम आहे ? “

“ ब्लॅक मेल? “

हैट राजेहो! तुमी तोंडाले येईन तेच बकता बावा कायीसायी (वाट्टेल ते) ! या प्रकाराले उपद्रव मूल्य म्हणतात होबासराव राजकारणाच्या भाषेत !

म्हंज्ये जनता पाठीशी असो की नसो! तशी सगळी जनता पाठीशी नसतेच म्हणा ! अस्ती तं स्वतंत्र विदर्भ कयीचाच (कधीचाच) झाला असता! आतालोग (आतापर्यंत) रायलाच नसता !

पण जनता जरी पाठीशी नसेना तरी माह्य पब्लीशिटी डीपार्टमेंट माह्या पाठीशी अस्ते ! अन ते माहा डमरू असा काई वाजोते का बस्स का ज्याच कायी नाव नायी !

की मंग महिन्या दोन मयण्यात हाय कमांड वाले मूकबधीर होतात अन मले खांद्यावर बसवतात ! मंगSSS मी म्हणजे काय गम्मत आहो काय होबासराव SSS SSS ? “

“व्वा ! वाहोव्वा ! तीर्मख भाऊ व्वा ! त मंग या नव्या इनिंगचा काय फंडा आहे म्हणता ? “

“त्याचं काय अस्ते होबासराव की आता युपीचे, उत्तराखंडचे, मणिपूरसगट पंजाबचे इलेक्शन सरले (संपले) ! गोवा गुटख्याची पुडीबी मस्त चघळनं सुरु आहे ! पन माह्य सायाचे कुठचं काही धतिंग ज्यमले नाही! आपल्या इथल्ल्या झेळपी अन महानगर पालिका बी माह्यासाठी वान्झोटयाच ठरल्या !

म्हणून म्या हे स्वतंत्र विदर्भाचे धतिंग आत्ता रिमिक्स प्लस डाल्बी साउंड अश्या शिस्टीमनं वाजवाले सुरवात केलं सध्या ! अन त्यातई फोर ट्रॅक वापरून रायलो मी जादा प्रेशरसाठी !

आवाज वाढो डीजे तुले आईची शपथ हाय S S S “S

“ ते कसं काय लेक ? “

“ म्हंजे त्याचं काय आहे होबासराव की असा रिमिक्स वाजोनारा मी एकटाच थोळी आहो ! माह्यासारखे आहेत पाच दहा लीडर्स त साऱ्याइले संग घेऊन म्या आता एक नवं दुकान उघललं इतल्यात (इतक्यात) !

आवाज वाढो दीजे तुले आईची शपथ आहे  S S S “

व्वा ! काई सुपर डोक्स चालोलं बाकी तुमी त राजेहो या टायमाले ! पन काहो तीर्मखभाऊ तुमची हे अशी दुकानदारी पाहून तीकळे स्वर्गात त्या बापुजी अणे, ब्रिजलाल बियाणी, जांबूवंतराव धोटे याईले काय वाटत अशीन ? आता वर्षानुवर्षापासून तुमचीच त सत्ता होती राजेहो बम्बई अन दिल्लीत !

तुमीही लय डाव बसले लाल दिव्याच्या गाळीत ! त मंग तवा काऊन नाही खटपट केली तुमी?

स्वतंत्र विदर्भाचं राज्य तवाच श्यांगशन (सँक्शन) करून काऊन नाही घेतलं?

म्हणजे खुर्ची भेटली की अलग नाटक कराच अन खुर्ची गेली की अलग ड्रामा कराचा याच्यातली गोम समजली बऱं पब्लीकले !

तुमी पब्लिक ले भयताळ समजू नका तीर्मखभाऊ ! आता अश्यान २०१९ ले पानिपत होईन नाई त तुमचं !

तवा आता हे धतिंग बाजी बंद करा अन जनतेच्या जीवन मरनाईच्या प्रश्नाईले हात घाला ! कारण तुमच्या या नाटकाईले पब्लिकचा अज्यीबात पाठींबा नाई म्हटलं ! पब्लिक कटायली (कंटाळली ) तुमच्या या नाटकाले !

तवा जनतेच्या खऱ्याखुऱ्या असली समस्या निवारन्यासाठी यखांद आंदोलन उभारा तीर्मखभाऊ ! हे महागाई काय वाढून रायली झपाझप,  हे बेकारी काय वाढून रायली भयानक ! हे शेतकरी आत्महत्या काऊन करून रायले एका लायनिनं, सगळ्या क्षेत्रातला भ्रष्टाचार …….

ऑ ! कुठी उपयले? ऑ ! कुठी गायप झाले हे तीर्मखभाऊ आताच्याआता ? कुठी गेले म्हनावं लेक सटालकन्? “

II समाप्त II

 

Comments