Home > मॅक्स ब्लॉग्ज > हुतु, तुत्सी आणि आपण

हुतु, तुत्सी आणि आपण

हुतु, तुत्सी आणि आपण
X

चला आज तुम्हाला हुतु आणि तुत्सींची गोष्ट सांगतो. १९९४ सालची गोष्ट आहे ही रवांडा ह्या आफ्रिकन देशामधली. ज्यामध्ये बहुसंख्याक हुतुनी अल्पसंख्याक तुत्सींचा नरसंहार केला होता. हा नरसंहार एवढा भयंकर होता की १० लाख तुत्सी ह्यामधे मारले गेले तेही फक्त १०० दिवसांत.

हा आकडा तुत्सीच्या लोकसंख्येच्या ७०% एवढा होता. आणि हे सगळं होत असताना स्वतःला महाशक्ती म्हणवून घेणारे देश फक्त बघ्याच्या भूमिकेत होते. हे असं होण्यामागचं प्रमुख कारण होतं ते लोकांमध्ये पेरली गेलेली विषाची शेती. ज्याने लोकांना हातात शस्त्रे घेण्यास भाग पाडलं. हे एवढं भयावह होतं की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आणि चर्चमधल्या पाद्रींनी तिथल्या भक्तांना दरवाजे वगैरे बंद करून आत तलवारीचे वार करून मारून टाकले.

यामागची खदखद तशी खूप वर्षांपासूनची होती. हा सगळा असंतोष सुरु झाला तो १९ व्या शतकापासून जेव्हा हुतु शेतकरी होते आणि तुत्सी पशुपालन करत होते. त्यावेळी पशुपालन करणे समृद्ध मानलं जात होतं. त्यानंतर युरोपिअन देशांनी अचानक हुतूंना पॉवर दिली, मग काय तुत्सीची अवहेलना व्हायला सुरवात झाली. नंतर तुत्सीनीही त्यांची RPF नावाची बागी चळवळ सुरु केली. आल्या आल्या ह्या ग्रुपने तिथल्या नेत्याला मिसाईलने उडवले आणि मग ह्या रक्तचरित्राला सुरवात झाली.

यादरम्यान रवांडा रेडिओची एन्ट्री झाली आणि आल्या आल्या त्यांनी ठिणगी पेटवली. हा रेडिओ तुत्सीना कॉकरोच म्हणायचा आणि हे बाहेरून आले आहेत त्यांना बाहेर काढा असं सतत हुतूच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न करायचा आणि हुतु तलवारी, लाठ्या काठ्या घेऊन पेटून उठायचे. ही गोष्ट सांगण्याचा मुख्य हेतू म्हणजे रवांडा रेडिओसोबत आजकालच्या व्हाट्सएप्प फॉर्वर्डस आणि टीव्ही वरच्या झी, रिपब्लिक आणि तत्सम न्यूज चँनेल्सशी अनालॉजी दाखवणे.

आपण या प्रोपागंडाच्या आहारी जातोच कसे हे समजून घ्यायचे असेल तर काही आकडे आहेत आपल्याकडे. भारतात ३० करोड व्हाट्सएप्प युजर्स आहेत. एका सर्वेनुसार ४५% शहरी लोकांना फॅक्ट चेक करण्यासाठी वेबसाईट असतात हे ही माहित नव्हतं. हे झालं फक्त शहरांचं. परंतु गावोगावी तंत्रज्ञान जास्त एम्बेड नाही झालं. तिथं यापेक्षाही कठीण परिस्थिती आहे. ढोबळमानाने पाहिलं तर जवळपास ८०% फेक न्यूज ह्या एकतर सरकारच्या बाजूने किंवा मुस्लिम विरोधी असतात आणि लोक त्याला खरं समजतात. हे सगळं स्ट्रॅटेजिकली चालू आहे. राजकीय पक्षांच्या आयटी सेल जाणून बुजून हे सर्व करत आहेत.

इंडियास्पेंडच्या नुकत्याच एका अहवालानुसार कोरोनाच्या काळात भारतात फेक न्यूजने थैमान घातलं. २० जानेवारीला पसरवलेल्या दोन पोस्ट ६ एप्रिल येईपर्यंत ६० झाल्या आणि आता अजूनही वाढत आहेत. त्यामध्ये बहुतांश कोरोनावरचे घरगुती उपाय आणि धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या होत्या. अधिक माहिती आपण त्यांच्या वेबसाईट वर जाऊन पाहू शकतो.

'पीईन्ग हुमन' नावाचं युट्युब चॅनेल आहे त्याने एकदा या काही बातमीदार वर्गाच्या डिबेट्सचे विश्लेषण केलं होतं. त्यात कळलं की रोजगार, शिक्षण आणि आरोग्यावर एकही डिबेट शो झाला नाही. बहुतांश कार्यक्रमांचे विषय होते हिंदू-मुस्लिम, इंडिया-पाकिस्तान नाहीतर भारत-चीन. त्यात ह्या कोरोनाचं सावट आलं आणि त्यासोबत तब्लिकी आले. मग काय नुसता हाहाकार.

मग आता हे सगळं रोखण्यासाठी आपण काय केले पाहिजे, हा प्रश्न नक्कीच सगळ्यांना पडला असेल. तर मी म्हणेन की सगळं आपल्याच हातात आहे. सगळ्यात महत्वाचे म्हणजे मेसेज फॉरवर्ड करणे बंद केले पाहिजे आणि आपल्या घरच्या किंवा मित्राच्या ग्रुपमध्ये असले मेसेज येत असतील तर तिथून पळून न जाता, त्यांना फॅक्ट फाइण्डिंग करून दिले पाहिजे. ह्यात जास्त अवघड असं काहीच नाही, गूगल हे ज्ञानाचं भांडार आहे, आपल्याला फक्त गूगल करून किमान ४-५ व्हॅलिड सोर्सेस चेक करता येतील आणि फोटो वगैरे आला असेल तर रिव्हर्स इमेज सर्च आहेच.

मी हे माझ्या मित्रांना शिकवलंय जेणे करून ते स्वतः फॅक्ट चेक करू शकतील. हे जर अवघड वाटत असेल तर अल्टन्युज, बूम फॅक्ट चेक, क्विंन्टचं वेबकूफ, लल्लनटॉपचं पडताळ ह्यासारखी खुपसारी संकेतस्थळे आपण नियमित चेक करू शकतो.

राहिला प्रश्न न्यूज चँनेल्सचा, तर आपल्याला फक्त न्यूज लाउंडरीसारख्या पोर्टल्सचे हात बळकट करायचेत, त्यांचा एक नवीन प्रकल्प चाललाय ज्यामध्ये ते अशा न्युज चँनेल्सच्या असल्या मजकूरांना जाहिराती स्पॉन्सर करणाऱ्या ब्रॅण्ड्सवर दबाव टाकणार आहेत.

हे सगळं आपण प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन करतोय म्हणजे पोस्ट करणार्याचा रोष आपल्यावर येणे स्वाभाविकच आहे. पण तेवढं तर आपण देशाच्या भल्यासाठी सहन करूच शकतो.

- निकेश रोकडे

Updated : 25 May 2020 11:04 AM GMT
Next Story
Share it
Top